तुला पाहते रे - भाग 1

Love story - Love After marriage story writing competition

तुला पाहते रे - भाग 1


" नीता ताई.....हे सगळं नीट झाडून घ्या हा... हा बघा इथे कचरा राहिलाय तो पण भरून टाका..." सई  काम करणाऱ्या नीता मावशींना मटार सोलता सोलता सूचना देत होती. 

" हो....ताई सगळं चकाचक करते की नाही बघाचं..." त्यांनी सईला हसून सांगितलं. 

" हो. तुम्ही करताच हो दरवेळी सगळं नीट...मला काही बघावं लागत नाही. पण आज आई बाबा यायचे आहेत ना...तुम्हाला माहितेय ना आईंना सगळं कसं लख्ख हवं असत ते..." ती म्हणाली.

" हो. माहितेय मला चांगलंच मागे एकदा माझ्याकडून खोलीतला केर काढायचा राहून गेला होता...केवढं ऐकवलं होतं त्यांनी. बाकी एरवी बऱ्या आहेत तशा.." नीता मावशींनी असं म्हटल्यावर दोघीही खळखळून हसल्या. 

मग नीता मावशींनी सगळं घर आवरलं. दार ,खिडक्या, लाद्या पुसून काढल्या. घर अगदी लखलखत होतं. आज सईच्या सासूबाई आणि सासरे त्यांच्याकडे राहायला येणार होते. त्यामुळे त्यांची सकाळपासून गडबड चालू होती. जेवायला काय करायचं काय नाही इथपासून सगळं आधी ठरवावं लागे कारण सईच्या सासूबाईंना आंबट, तेलकट काही चालत नसे. खरतर सईचे सासरे सगळं आवडीने खात पण बायकोपुढे काय बोलणार  असं त्यांचं होई. तरीही सई त्यांच्यासाठी मुद्दाम त्यांच्या आवडीचं करायला सांगून सासूबाई नसताना त्यांना खायला द्यायची. दोघांचंही अगदी बापलेकी सारखं नातं होतं. 

....................................

सई ही सुभाष आणि मेधा देशपांडे यांची मोठी मुलगी. ती  इंटिरिअर डिझाईनर होती.तर दुसरी मुलगी सईपेक्षा चार वर्षांनी लहान होती. तिचं नाव पुजा. ती अकरावीत शिकत होती. त्यांचं छान हसतं खेळतं चौकोनी कुटुंब होतं. सुभाषराव एका प्रायव्हेट कँपनीत मॅनेजर होते आणि मेधा ताई घरीच असायच्या.त्यांचं कुटुंब खाऊन पिऊन सुखी होतं. सई दिसायला सावळी .....चाफेकळीसारखं नाक....बोलके डोळे....खांद्याच्या थोडे खालपर्यँत रुळणारे कुरळे केस....हनुवटीवर डाव्या बाजूला छोटासा तीळ...छान निरागस रूप होतं तीच..!!! .. ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतांनाच तिला मिहिरचं स्थळ सांगून आलं. तो सईच्या आत्याच्या मैत्रिणीचा मुलगा होता.त्यामुळे आत्याने ' एकदा तरी स्थळ नजरेखालून घाला ' म्हणून घोषा लावला होता. पुढच्या वर्षी पुन्हा पुजाची बारावी येईल. त्यामुळे त्या आधीच सईचं लग्न करून टाका असा एक किडा आत्याने सुभाषरावांच्या डोक्यात सोडला होता. त्यामुळे त्यांनाही तिचं म्हणणं पटत होतं. त्यामुळे त्यांनीही सईशी याबाबतीत बोलायचं ठरवलं. एकदा रात्रीच जेऊन झाल्यावर ते दोघेही सईच्या खोलीत आले. ती बेडला टेकून
पुस्तक वाचत बसली होती. 

" सई..... काय करतेस ग...."  आई दारातूनच आत येत म्हणाली. तिच्यापाठोपाठ बाबाही आत आले.

" काही नाही.....बसलेय पुस्तक वाचत....ये बस ना..." तिने हातानेच आईला बेडवरती तिला बसायला सांगितलं. 
बाजूच्याच टेबलाजवळची खुर्ची ओढून बाबाही त्यांच्या जवळ बसले.

" आज काय विशेष......दोघ एकदम......काय चाललंय काय...." तिनं काहीसा अंदाज घेत हसून विचारलं.

" म्हणजे आम्ही दोघे काय बोलायला येत नाही का तुझ्याशी...." आई रागावल्यासारखं करत म्हणाली.

" तसं नाही ग आई....पण तुम्ही दोघेही एकत्र असे माझ्याशी बोलायला येत नाही ना कधी....म्हणून म्हटलं.....बोला काय म्हणताय...." ती म्हणाली.

तेवढ्यात आई नि बाबांचं हळूहळू बोलणं चालू झालं मी सांगू का तुम्ही सांगताय...तू सांग ....तू सांग त्यांचं चालू झालं..

" काय.... बोला काय ते असे हळुहळु का बोलताय...."  सई. 

" आईला तुझ्याशी बोलायचंय......" बाबा पटकन म्हणाले. 

"आता....?? मी काय सांगू....तुम्ही बोला ना..." आई म्हणाली. त्यांच   असं तू तू मै मै चाललेलं पाहून सईला हसू आलं.

" सई आत्याने तुझ्यासाठी एक स्थळ पाठवलंय.. आम्ही सगळी माहिती विचारली. स्थळ चांगलं आहे......" बाबा बोलत होते.

" पण बाबा मी अजुन शिकतेय.....इतक्यात नाही लग्न करायचं मला...." ती काहीसं वैतागून म्हणाली. कारण आई बाबा लग्नाचा वगरे विषय काढतील असं तिला वाटलं नव्हतं.

" अग नुसतं बघायला काय हरकत आहे..? ....आम्ही काय तुला लगेच गळ्यात नाही बांधणार त्याच्या...." आई

" तरी पण ग..........." सई बोलत होती पण बाबांनी हातानेच तिला थांबवलं.

" हे बघ बाळा.....आम्हालाही कळतं आमचया मुलीसाठी काय योग्य काय अयोग्य आहे ते...तू एकदा बघून तरी घे मुलाला...नाही आवडला तर नाही...त्यात काय..आम्ही तुझ्यावर कसलीच जबरदस्ती करणार नाही...चालेल ना..." बाबांनी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तशी तिनं होकारार्थी मान हलवली. 


पुढच्याच रविवारी सईच्या बघण्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला. दोन्हीकडची मंडळी सईच्या आत्याकडेच जमणार होती. त्यामुळे देशपांडे कुटुंब आदल्या दिवशी पासूनच आत्याच्या मदतीला आलं होतं. सई , पूजा आणि आत्याची दोन्ही मुलं आदित्य आणि मीरा साफसफाई करायला लागले. ' मिहिरच्या आईला सगळं कसं लखलखीत लागत ' आत्या त्यांच्यासाठी चहा आणता आणता म्हणाली. मग सगळ्यांनी मिळून चहा घेतला आणि पुन्हा एकदा कामाला लागले. छान साफसफाई केली. सगळं नीट आवरून ठेवलं. सोफ्यावरती नवीन कव्हर्स घातली. पलंगावर नवीन बेडशीट अंथरल. पाहुण्यांना खायला देण्यासाठी प्लेट्स नवीन कपबशी असा सगळा सरंजाम तयार झाला. आता फक्त उद्या पाहुणे यायची सगळेजण वाट पाहू लागले. 

..........................................


दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच सगळ्यांची गडबड चालू झाली. जरी मुलाकडची तीन चारच माणसं येणार होती तरी सगळं कसं नीट व्यवस्थित असावं असं आत्या आणि सईच्या आई बाबांना वाटतं होतं. कारण सईला दाखवण्याचा हा तसा पहिलाच कार्यक्रम होता. त्यामुळे प्रत्येकालाच मनात थोडी भिती होती सगळं नीट होतंय की नाही याची.पूजाने सईला छान तयार केलं. हलकासा पिंक कलरचा टॉप त्यावर व्हाईट आणि पिंक कलरचा लायनींगचा चुणीदार पायजमा....त्यावर डार्क पिंक कलरची आणि गोल्डन डिझाईनची ओढणी...समोरून घातलेली सागरवेणी....मॅचिंग एअरींगस...आणि बांगड्या.... छोटीशी चंद्रकोर.....!!!  तिला असं पाहून कोणीही तिला पसंत केलं असतं.. तिची तयारी चालू असतांनाच खाली पाहुणे येऊन बसले. पूजाने जिन्यातूनच मिहिरला पाहिलं आणि ती ताईला सांगायला वर पळाली. नेव्ही ब्ल्यू कलरचा प्लेन थ्रि फोर्थ हँड शर्ट....त्यावर अफव्हाईट कलरची पॅन्ट.... गोरा रंग... व्यवस्थित विंचरलेले केस...उजव्या हातात घड्याळ...पूजाला तो जीजू म्हणून फार आवडला.लगेच तिने वरती येऊन सईला   ' तो कसला भारी आहे ' म्हणून सांगितलं. त्यामुळे सईला देखील त्याला बघायची उत्सुकता लागली..!!! मधुकर आणि नलिनी लिमये यांचा मिहीर एकुलता एक मुलगा होता.मिहीर एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. आई एक रिटायर्ड शिक्षिका होती आणि वडिलांनी कंपनीतून वोलेंटरी रिटारयमेंट घेतली होती. त्यांचं स्वतःच घर होतं. दुसऱ्या एका ठिकाणी फ्लॅट घेतलेला होता. त्यामुळे परिस्थिती बघता उत्तम दिसत होती.. हॉल मध्ये सईचे बाबा, मिहीर आणि त्याचे आई बाबा, आत्याचे मिस्टर असे सगळे बसले होते.पूजा आणि सई खाली किचन मध्ये आल्या.  आत्याने सईच्या हातात पोह्यांच्या प्लेट्सचा ट्रे दिला. तो घेवून सई बाहेर आली. बसलेल्या प्रत्येकाला तिने पोहे दिले. मिहीरकडे मान वर करून बघायची तिची हिंमतच होईना. तिच्या छातीत नुसतं धडधडत होतं. ती बाबांच्या बाजूला जाऊन मान खाली घालून बसली. मधूनच जरा मान वर करून तिने मिहिरला पाहून घेतलं. ' खरच कसला हँडसम आहे...मला पसंत तरी करेल का...' ती मनातच म्हणाली. आत्याच्या मिस्टरांनी सगळ्यांशी ओळख करून दिली. बाकीचं बोलणं झाल्यावर मग मिहिरचे बाबा म्हणाले की " "मुलांना हवं तर जरा बाहेर पाठवूया बोलायला.. त्यांना एकमेकांना काय विचारायचं असेल ते विचारतील..." मग सई आणि मिहिरला वरच्या खोलीत बोलण्यासाठी पाठवलं. खोलीच्या गॅलरीत जाऊन दोघेही उभे राहिले. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. सई आपली उगीचच ओढणी बोटांशी गुंडाळत उभी होती. शेवटी मिहिरनेच बोलायला सुरुवात केली.


" तू नेहमी अशीच गप्प असतेस का....?? मला बोलणाऱ्या मुली फार आवडतात...." तो जरा वातावरण हलकं करण्यासाठी म्हणाला. 

" नाही तसं नाही....पण आज पहिल्यांदाच भेटलो ना आपण .....काय बोलायचं सुचत नाही...." ती दुसरीकडे बघत म्हणाली. तीने चेहरा तिकडे फिरवला आणि तिच्या हनुवटीवरचा तीळ त्याला स्पष्ट दिसला. त्याला तो खूपच आवडला.......आणि सईसुद्धा...!!!!

" हो ते झालंच......पण बोलायला तर हवं ना....त्यासाठीच तर पाठवलंय आपल्याला इकडे....तू मला च्याव म्यावची गोष्ट सांगतेस का....मी ऐकतो..त्या निमित्ताने तरी तू बोलशील.." तो छान हसत म्हणाला.

" काय.....??? " तो काय बोलला तिला पटकन कळलंच नाही. 

" काही नाही.....सई तू तुझा पूर्ण वेळ घे. आमची काही घाई नाही...आपल्या दोघांच्याही हा आयुष्याचा प्रश्न आहे...हे माझ्या कंपनीच कार्ड..." तो तिच्याकडे कार्ड देत म्हणाला. " यावर माझ्या ऑफिसचं नाव ,पत्ता सगळं आहे. माझी माहिती खरी आहे की नाही ती तू स्वतः चेक कर.." तो म्हणाला.

" याची काही गरज नाही पण........." ती पुन्हा त्याच्याकडे कार्ड देत म्हणाली. 

" असुदे हे तुझ्याकडेच.... त्यावर माझा मोबाईल नंबर आहे...त्यावर तुझं उत्तर जे काही असेल ते कळव...आपलं नाहीचं जमलं तर निदान आपण फ़्रेंडस म्हणून तरी राहू...." असं म्हणून त्याने हात पुढे केला.

त्याच्या या सगळ्या बोलण्यावर ती इतकी भारावली होती की तिने नकळत त्याच्या हातात आपला हात दिला.. तिलाही तो आवडला होता...

................................

" ताई ओ सई ताई.....कुठे हरवलात..." निता मावशीच्या हाकेने सई भानावर आली. आज साफसफाईच्या निमित्ताने तिला पुन्हा एकदा ते सगळं आठवलं आणि ती स्वतःशीकज हसली. एरवीही ती घर साफ ठेवायची पण आज आई बाबा येणार म्हणून घर जरा जास्तच चकचकीत करायला लागत होतं.

" ताई.....जरा बाजूला होता का....तेवढी खालची फरशी पुसून घेते..." नीता मावशी म्हणाल्या.

" अं.... हो हो...." आपल्या विचारातून बाहेर येत तीने समोरच्या बटनाने आपली व्हीलचेअर जरा मागे घेतली..एवढयात दारावरची बेल वाजली आणि नीता मावशी आणि सईने चमकून एकमेकींकडे पाहिलं.....


क्रमशः....

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे हक्क लेखिकडे सुपूर्द आहेत. त्यामुळे कथा इतरत्र आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कथा आवडल्यास नावसाहित शेअर करावी. 

🎭 Series Post

View all