तुला नक्की हवं तरी काय? ... भाग 2

चहापाणी झाल, इकडे तिकडे केलं, विकास समोर येऊन बसला, तो त्याच्या जिजाजींशी बोलत होता, वर्षाने त्यांनाच विचारायला सांगितलं



तुला नक्की हवं तरी काय? ... भाग 2
........

राज्यस्तरीय करंडक कथा मालिका स्पर्धा

विषय.. कौटुंबिक कथा

उपविषय.. तुला नक्की हवं तरी काय?

©️®️शिल्पा सुतार

नाशिक टीम
...

घरची परिस्थिती बेताची तरी काटकसर करून आई बाबांनी विकासला चांगलं शिकवलं, ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला लगेच नोकरी मिळाली ते प्रियाच्या ऑफिसमधेच, तेव्हापासून किती चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटी आल्या पण केवळ आणि केवळ प्रियामुळेच त्याने कधीच स्वतःची बदली घेतली नाही किंवा कंपनी ही बदलली नाही, वेळोवेळी जेव्हा तिला गरज होती तेव्हा पैशाची मदत केली. कुठलेही सामान आणायचं असो त्यांच्या घरी काय मदतच हवी असो विकास नेहमी तत्पर असायचा. तिच्या बहिणीला मदत केली.

सगळ्यांना माहिती झालं होतं आत्तापर्यंत विकास आणि प्रिया बद्दल. विकास तिची प्रत्येक गोष्ट ऐकायचा. किती वेळा तिने लग्नाला नकार दिला होता तेव्हा त्याला समजायला हवं होतं. आता खूप उशीर झाला होता.

विकास जेवायला खाली आला, तो खूप गप्प होता, अजिबात त्याचं जेवणाकडे लक्ष नव्हतं, आईने ताट वाढले आई बाबा विकास जेवायला बसले,

बाबा विकास कडे बघत होते,.. "काय झालं आहे विकास? तू जेवत का नाहीस व्यवस्थित? तुला जर वाटलं तर तू आमच्याशी मोकळं बोलू शकतो",..

" प्रियाचं लग्न जमलं आहे आई बाबा, तिने मला काही सांगितल नाही, तिच्या साठी मी कुठे दुसरीकडे नौकरी घेतली नाही, लग्न केल नाही, आणि तिने बघा कस केल",..विकास

" मला माहिती होत अस काहीतरी होणार होत ते, मागच्या वर्षा पासुन ती तुझ्याशी नीट वागत नव्हती ",.. सुरेखा ताई

"मी उद्या तुमच्या सोबत मुलगी बघायला यायला तयार आहे",.. विकास

आई बाबा दोघांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता, बर झाल लवकर समजल याला, उद्या काय काय करायचं ते दोघ ठरवत होते, विकासने कसे बसे दोन घास खाल्ले आणि तो रूममध्ये निघून गेला,

सुरेखा ताईंनी वर्षाला फोन लावला,.." विकास उद्या मुलगी बघायला यायला तयार आहे ",.

" बर झालं आई, आता हे लग्न लवकरात लवकर करून टाका",.. वर्षा

त्यांना सगळ्यांना आनंद झाला होता, विकास रूममध्ये टीव्ही बघत होता पण त्याचा टीव्हीकडे अजिबात लक्ष नव्हतं, डोळ्यात पाणी होतं त्याच्या, प्रियाने असं का केलं असेल? जाऊ दे आता मी सुद्धा माझ्या आई बाबांच ऐकेन, आधी मी प्रियासाठी आई-बाबांना दुखवत होतो, पण आता नाही मी माझ्या मनानेच वागणार लग्न करून घेऊ आणि सुखी राहू, या पुढे प्रियाचा चेहरा बघायचा नाही.

ऑफिसला सुट्टी होती, ते मुलगी बघायला जाणार होते, सकाळी आई बाबा रेडी होते, मनात नसून सुद्धा विकास रेडी झाला, वर्षाताई जिजाजी आलेले होते, वर्षाताईचं नुकतच लग्न झालं होतं, चांगलं चाललं होतं तिचं, त्यामुळे तिला असं वाटत होतं आपल्या भावाचंही व्यवस्थित लग्न होऊन संसार सुखाचा व्हायला पाहिजे

"आई अग मुलीकडे फोन केला का की आम्ही येतो आहे एका तासात",.. वर्षा

"हो निघण्याआधी करूया आपण दहा वाजता निघणार आहोत",.. सुरेखा ताईंनी फोन करून पुढे सांगितलं की आम्ही येतो आहोत

गाडीत विकास शांत होता सुरेखाताई आणि वर्षा बोलत होत्या

मनाविरुद्धच लग्न होत आहे हे माझं, ठीक आहे पण बघू काय होतं ते, त्याने परत एकदा प्रियाला फोन लावायचा विचार केला, जाऊ दे आता ती पण तिच्या लग्नालाच गेली आहे, किती खोटं बोलली ती माझ्याशी, माझा सारखा चांगला मुलगा नको आहे तिला, मी कधी विचार केला नव्हता मी अस मुलगी बघायला जाईल, करून घेवू लग्न

राधाकडे पाहुणे बघायला येणार म्हणून खूप गडबड सुरू होती, राधा ग्रॅज्युएट होऊन नोकरी करत होती, राधाची बहीण ज्योती तिला तयार करत होती,.. "ताई मला समजत नाही काय करू मी?, लग्नाची घाई नाही ना होत ",

"मुलगा चांगला आहे ग राधा, नोकरी चांगली आहे, बाबा म्हणत होते त्या दिवशी आईला",.. ज्योती

"वय जास्त आहे मुलाच, आमच पटेल ना",.. राधा

" तुझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठे आहेत ते, तेवढं तर चालतच ग, बघ तुला आवडलं तर दे होकार, पण मन जुळणे महत्त्वाच, स्वभाव बघ, चांगले असतिल ते, तू खूप काळजी करत बसू नकोस ",.. ज्योती

आजी पुढे बसून सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे का ते बघत होती, आई मीनाताई किचनमध्ये पोहे करत होत्या, पाहुणे आले म्हणून बाबांनी सांगितलं

विकास,विकासच्या घरचे सगळे आत येऊन बसले, विकास अगदीच रस नसल्यासारखा फोन मध्ये बघत होता, सुरेखाताई मीनाताई बोलत होत्या, अण्णा आणि राधाचे बाबा ही गप्पा मारत होते ,मुलीला बोलवा,

राधा तिच्या बहिणी सोबत ज्योती सोबत बाहेर आली, सगळे तिच्याकडेच बघत होते, दिसायला एकदम नाजूक होती ती, साधीशीच, छान साडी नेसलेली होती ,केस लांब, खूप सुंदर, थोडी घाबरलेली समोर येऊन बसली

नकळतच विकास तिची आणि प्रियाची तुलना करायला लागला, प्रिया किती डॅशिंग आहे, ऑफिसच काम किती एका हाती हँडल करते ती आणि ही भोळसट राधा एकदमच काकूबाई आहे, पण राधा खूप सुंदर आहे शांत आहे, ही माझं सगळं ऐकलं असं वाटतं आहे तिच्याकडे बघून,

सुरेखाताई राधाला बघून खूप खुश होत्या, कोणालाही आवडेल अशी शांत छान नाजूक राधा, अण्णा ही खुश होते, वर्षा तिच्याशी बोलत होती

विकास राधा यांना बोलायला बाजूच्या रूममध्ये पाठवलं, राधा चहा घेऊन आत मध्ये गेली, आपले ताई आणि जीजू कसे बोलतात एकमेकाशी, असं तिला वाटलं होतं विकास तिच्याशी बोलायला मैत्री करायला खूप उत्सुक असेल, पण कसलं काय तो एकदम शांत बसलेला होता, समोरच्या खुर्चीवर जाऊन राधा बसली, कोणी काहीच बोललं नाही,

दोन मिनिट झाले, काय कराव हे खूप शांत दिसता आहेत, राधा विचार करत होती, शेवटी ती बोलली .. "तुम्हाला काही विचारायच असेल तर विचारा",

"तुम्ही कुठे जॉब करता",.. विकास

राधाने सांगितलं

"लग्नानंतर तुम्हाला हा जॉब आपल्या घरापासून लांब पडेल",.. विकास

"काही हरकत नाही",.. राधा म्हटली

"घरच्या जबाबदाऱ्या कमी होणार नाही पण नोकरी केली तरी काही हरकत नाही",.. विकास

"मी घरचं करून जॉबला जात जाईल",.. राधा

" तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का ",.. विकास

" तुम्ही कुठे जॉब करता? ",. राधा

विकासने त्याच्या ऑफिसची माहिती दिली शिक्षण सांगितलं इतर अशाच कामाची गोष्टीबद्दल ते बोलले, दोघे बाहेर आले

जरा वेळ बसल्यानंतर मुलाकडची मंडळी गेली

सगळे राधाला विचारात होते कसा वाटला मुलगा?

" माहिती नाही आमचं काही विशेष बोलणं झालं नाही, त्यांनी मला विचारलं कुठे नोकरी करते? मी त्यांना विचारलं कुठे नोकरी करता? , बस एवढंच बाकी आवड निवड इतर तर कुठल्या गोष्टी काहीच बोललो नाही आम्ही ",. राधा

"मग तुझा होकार आहे की नकार",.. ज्योती

"मला थोडा विचार करायला वेळ हवा आहे, मला असं वाटतं की मी विकासला एकदा दोनदा फोन करावा मग मी सांगेन ",.. राधा

ठीक आहे..

" ज्योती राधा जवळ बसली काय वाटत आहे तुला राधा कसा असेल मुलगा ",..

" शांत वाटले ते मी काय करू समजत नाही ताई ",..राधा

"उद्या फोन करून बोलून घे मग ठरव ",.. ज्योती

माहेरची परिस्थिती जेमतेम होती त्यांची, राधाचा पगार यायचा, बाबा ही जायचे कामाल, पण ते अधू होते त्यामुळे विशेष कमाई नव्हती, फॅक्टरी काम करतांना त्यांचा एक्सीडेंट झाला होता, आता त्याच फॅक्टरीत ऑफिसमध्ये काम असतं, पण विशेष जबाबदारी नव्हती त्यांच्या वर, बढती मिळाली नाही कधी, त्यामुळे आहे त्या पगारावरच बरेच दिवस झाले चालल होत त्यांच, त्यात पायाचा खर्च खूप, दवाखाना अजूनही सुरू होता त्यांचा

राधाला खूप काळजी वाटत होती घरच्यांची, मला आई बाबांना मदत करायची आहे पुढे ही, ते ही बोलून बघु का विकास सोबत, नंतर हो नाही नको,

सुरेखाताई वर्षा ताई विकास सगळे घरी आले सुरेखाताई वर्षाला खुणवत होत्या की तू विचार विकासला कशी वाटली मुलगी?

तिने थांब असं सांगितलं.

चहापाणी झाल, इकडे तिकडे केलं, विकास समोर येऊन बसला, तो त्याच्या जिजाजींशी बोलत होता, वर्षाने त्यांनाच विचारायला सांगितलं

"कशी वाटली तुला राधा पसंत आहे का तुला स्थळ",..

" हो मला राधा पसंत आहे मला, काही अडचण नाही यापुढे आई बाबा आणि तुम्ही दोघं म्हणाल तेच मी करेन",..विकास

सगळ्यांना खूप आनंद झाला, विकास खूप शांत होता,

"मग सांगायचं का पुढे की मुलगी पसंत आहे",.. वर्षा

" हो चालेल सांगून द्या",.. विकास

संध्याकाळी सुरेखा ताईंनी फोन करून राधाकडे सांगून दिलं की आम्हाला मुलगी पसंत आहे

राधाला खूप आश्चर्य वाटलं, अजून काही बोलण झाल नाही, तरी कशी काय पसंती आली? नक्की काय आहे हे? घरचे सगळे म्हणायला लागले की आता मुलाला मुलगी पसंत आहे तर तू उगीच काहीतरी विचार करू नको,

तरी उद्या मी फोन करून बघतेस विकासला राधाने मनोमन ठरवलं तिने तिच्या आई-बाबांकडून विकासचा नंबर घेतला

🎭 Series Post

View all