तुला लढावचं लागेल!

कशाला वाट बघायची इतरांची की, कुणी येईल मदतीला,तू सक्षम आहेस स्वतःसाठी लढायला.
कथेचे नाव :- तुला लढावचं लागेल!
विषय :- स्त्री आणि परावलंबित्व
फेरी :- राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा

श्रावणी आणि आई दोघी मायलेकी  गावाकडचं घर सोडून शहरात रहायला आल्या होत्या. कारण श्रावणीचे बाबा एका अपघातात मरण पावले होते. आता तिची शाळेत ने-आण करायला दुसरं कुणी नव्हतं. आणि नेमक या वर्षी तिचं महत्वाचं म्हणजे दहावीचं वर्ष होतं.


"श्रावणी अगं मावशी आणि पल्लवी येणार आहेत बघ आपल्याच शेजारी रहायला.आता काकांची बदली झाली  म्हणून ह्या दोघी आता इकडेच राहणार."

" अरे व्वा! मग मस्त मज्जा येईल, तशी तू कुठे बाहेर निघत नाही, ना हॉटेलिंग , ना शॉपिंग.तुझं ते शिलाई काम आणि तुझे ते केक बनवण्यात बिझी असते तू."

" श्रावणी! अगं मग खाणार काय आपण? आता बाबा नाही आहे तुझे चोचले पुरवायला."

श्रावणीने आईकडे बघितले आणि म्हणाली,

" तू काय बाबांपेक्षा कमी आहे, जे जे हवे ते सगळं देते मला." आणि आईच्या कुशीत आली आणि हुंदके देऊन रडायला लागली.


" सॉरी....अगं मी तुला हर्ट केलं."

" तूच मला सांगते बाबांचा विषय नाही काढायचा आणि तूच काढतेस. आता तू नको रडायला लागू... वेडी गं माझी आई वेडी."

दोघींनी अश्रू पुसले आणि तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजली.

श्रावणीने धावत जाऊन दरवाजा उघडला...

" अय्या मावशी!!! हाय पल्लवी...कशी आहेस गं? आणि काका कुठे आहेत?"

" अगं काका नव्हतेच येणार त्यांची बदली झाली दिल्लीला गेलेत ते, मग आम्ही दोघी तिकडे काय करणार म्हणून तुमच्या बाजूला आलोय."

" हो... आईने मला  सांगितलं ."

आईने आतून आवाज दिला..

" श्रावणी अगं आत बोलावं त्यांना...बाहेरच किती वेळ आणि किती बोलणार आहेस?"

" ओहह! सॉरी सॉरी...विसरलेच मी."

" ताई अगं तुझी बरी हिंमत बाई, एवढ्या मोठ्या शहरात एकटं राहायची. माझ्यात  अजिबात नाही हिंमत म्हणून तुझ्या शेजारी आले."

" अगं हिंमत तर करावीच लागेल, कोण येणार नेहमी आपल्या मदतीला. चल आज इकडेच जेवा आणि उद्यापासून शाळा सुरू होत आहे. पल्लवी अगं ट्युशनच बोलून ठेवलंय मी मॅमला श्रावणी जाते तिच्यासोबत जा तू पण."

" हो चालेल."

दुसऱ्या दिवशी सकाळी श्रावणी आणि पल्लवी शाळेला  गेल्या. आणि दुपारी  साधारण दोन वाजेच्या दरम्यान त्यांची बस आली. पल्लवी तिच्या घरी गेली आणि श्रावणी घरी आली.


जेवणं झाली, सगळं आवरून पल्लवी आणि मावशी श्रावणीकडे आल्या.


" ताई अगं दोघींना मी सोडून येते."

" नको गं त्या जातील  त्याचं.आता काय लहान नाही त्या."

" पल्लविला अजून काही माहीत नाही गं इकडचं."

" अगं हो... श्रावणी आहे ना सोबत, तिला माहित आहे."

त्याला  पहिलाच दिवस होता.संध्याकाळचे चार वाजले होते.दोघी रस्त्याने चालल्या होत्या. थोड्या अंतरावर काही मुलं बसली होती,ह्यांना  त्यांनी काही हात वारे  केले पण यांनी लक्ष दिले नाही .त्या दोघी सरळ निघून गेल्या.

" श्रावणी अगं आईला आणायला पाहिजे होतं आपण."

" काही नाही होत गं, चल तु"

ट्यूशन झाली आणि दोघी परतल्या. तेव्हा ती मुलं अजून तिथेच बसली होती. यावेळी मात्र त्यातला एक ओरडला... "अरे थोबडा तो अच्छा नही लेकीन बॉल तो बहुत छोटे हैं, और जिसका थोबडा थोडा अच्छा हैं उसका बॉल  बहुत छोटा चिकू जैसा लगता है!"


दुसरा ओरडला, " ओय जानेमन.... गुस्सा आया क्या...चलो नाराज मत हो, आम ही सही... पर रस हैं क्या?? अरे बेहेरी हो क्या?"


श्रावणीला प्रचंड राग आला..ती सरळ त्या मुलांच्या घोळक्या जवळ  गेली.

" मराठी कळत ना! "

" अगं हो राणी तुझ्या नजरेची भाषा पण कळेल, बोल ना!"

" तू जे बॉल, चिकू, आंबे जे काही म्हटले हे तुला खूप आवडतात ना. ते तुझ्या घरी सुद्धा आहे, बघितले असणार .. तू नालायका. ज्या आईच्या छातीला तोंड लावून दूध पिलास ना... ते ही बॉल आहेत हे विसरला वाटतं. तिला सांग हे जे काही आम्हाला बोलला, तुमच्या पैकी कुणाची बहिण असेल ना तिच्याकडे सुद्धा आहे जे माझ्याकडे आहेत , प्रत्येक स्त्री कडे आहे.त्याला स्तन म्हणतात कळलं. लाज नाही वाटत असं बोलायला."

श्रावणी खूप मोठयाने बोलली म्हणून  आजूबाजूचे लोक सुद्धा बघू लागले.पण कुणी काहीही बोललं नाही.

हे ऐकून त्यांच्या पैकी एक मुलगा पुढे आला आणि त्याला ओढून घेऊन गेला त्याच्या पाठोपाठ सगळे गेले.

श्रावणीचा आवाज बराच चढला होता, तिचे डोळे लाल झाले होते,असं वाटत होतं  जर ती मुलं निघून गेली नसती तर नक्कीच तिने त्याला हाणला असता.

" ताई अगं चल लवकर घरी? मला फार भीती वाटे गं"


" काहीही होणार नाही आपल्याला. अगं आपण घाबरलो ना की अशा लोकांना फावत, अजून जोर येतो त्यांना."

दोघी घरी आल्या. मावशी घरी बसलेली होती.पल्लविने आईला सगळा प्रकार सांगितला.

आई खूप घाबरली आणि म्हणाली,

" तरी मी म्हणत होते, मी जाते म्हणून सोडवायला. पल्लवी मी तुला म्हटलं होतं हे जिन्स घालू  नको म्हणून. पण ही एक नाही ऐकत माझं .अगं आपणच त्यांना असं बोलण्यास भाग पाडतो. कशाला घालायचे आपण असे कपडे."

" अगं तू काय बोलतेस हे?...त्या मुलींची काय चूक आणि  तू त्यांनाच बोलते. मला सांग ह्या सलवार कमीज घालून गेल्या तर ते बोलणं सोडतील का? अगं असतं तर बलात्कार झालेचं नसते."

" ताई, पण आपण जपून राहावं ग बाई."

" हो  ..बरोबर. पण ज्यांच्या नजरेत वासना आहे ना, तेव्हा  तू कोणतेही कपडे  घाल त्यांच्या नजरेतून तू नाही सुटणार. त्यांची वाईट नजर जेव्हा आपल्या शरीरावरून फिरवली जाते तेव्हा त्यांचे डोळे सुद्धा बलात्कार  करून जातात असं वाटतं. आपण काय घालावं आणि काय नाही तो प्रश्न नाही. त्या नराधमांच्या डोळ्यात वासना असते म्हणून तर  सहा वर्षाची  मुलगी काय किंवा सत्तर वर्षाची म्हातारी, बलात्कार होतोच ना?"


" आई खरचं अगं मला तुझा अभिमान आहे. कारण बाबा गेल्यावर आजीने मला शाळा सोडायला सांगितले पण तू खंबीर  होतीस. खरं तर तुझ्यामुळे मी हे करू शकले. नाहीतर माझ्यात हिंमत नसती. मला माहित आहे बाबा जरी आपल्या सोबत नसले तरीही माझी आई कुठेही कमी नाही."

"अगं किती दिवस आपण आपल्या मुलींना सांभाळणार आहोत, दर वेळी आपण नाही जाऊ शकत त्यांच्याबरोबर. त्यांनी स्वतः खंबीर  होऊन परिस्थितीशी  सामना करणं हे आपणच शिकवायला पाहिजे. शाळा, कॉलेज, नोकरी, सासरचं काय पण भररसत्यावर आपण अन्याया विरोधात आणि आपला सन्मान आपण स्वतः टिकवण्यासाठी आपण लढलेचं पाहिजे आणि आपल्याला लढावचं लागेल."

त्यांनतर पल्लवी आणि श्रावणी त्या रस्त्यावरून गेल्या मात्र त्यांना ती मुलं नंतर  कधीच दिसली नाही.

म्हणून जेव्हा कुठे आपल्यावर अन्याय होते तेव्हा वेळीच आपण लढले पाहिजे, कुणी येईल आणि आपली मदत करेल ही कुणा कडून अपेक्षाच नको करायला.


माझी ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे, ही कथा कशी वाटली ते जरूर कळवा.

धन्यवाद!
©®कल्पना सावळे
जिल्हा :- पुणे