तुला काय कमी आहे

Tula Kay Kmi
आम्रपाली चल बाई मी आता निघते मला आज खूप कामे करायची आहेत आणि कामवाली पण नाही.. त्यात घरी खूप राढा पडला आहे... आईंना आता काही होत नाही दिवसेंदिवस त्यांना कोणते ही काम पेलवत नाही..आणि मग सगळे काम घमून फिरून माझ्याकडेच येते... त्यात श्रावणी खूप थकलेली असते.. मग मी ही तिला काही मदत करते का हे म्हणायची हिम्मत करत नाही... मधुरा आपल्या वहिनीला सांगत होती...


मधुरा आणि आम्रपाली ह्या दोघी खूप खास मैत्रिणी आणि नंतर नणंद भावजई ह्या नात्यात अडकल्या गेल्या...


मधुरा तिला अजून ही आपल्या मैत्रिणीच्या नात्यातून तिच्या खास गुज गोष्टी सांगत आणि बोलून मन मोकळे करत असत...अगदी सासरी कशी तारांबळ उडते ,ते सासू आणि नणंद कश्या एका ही कामाला मदत करत नाहीत.. आणि मला सगळे करावे लागते..


मधुरा स्वतः नौकरीला होती ,तिचे मिस्टर ही मोठ्या पदावर. नणंद ही कमवून शिकत होती तर सासुबाई retire शिक्षिका होत्या, सासऱ्यांची पेन्शन आणि सोबत retire झाल्या नंतर एक नौकरी करत होते त्याचे वेगळे मानधन मिळत त्यांना. एकंदर काय तर त्यांची परिस्थिती खाऊन पिऊन सुखी होती...पाचही बोटे तुपात होती..घरात पैशाला काही कमी नव्हती...तिला कोणाकडे हात पसरायची गरज नव्हती असा तिला स्वतःला ही गलेलठ्ठ पगाराची नौकरी होती...पण घरी कामवाली फक्त झाडू ,लादी आणि भांडी करत बाकी स्वयंपाक तर घरच्या बाईने करावा हीच अट होती...आणि म्हणून ती किती ही थकलेली असू दे ,तिनेच घरी येऊन सगळ्यांच्या आवडी विचारून स्वयंपाक करायचा...



इकडे आम्रपाली च्या घरची परिस्थिती मात्र बेताची होती ,घर छोटे ,पगार कमी ती ही थोडा हातभार लावत नवऱ्याला तरी महिना जेमतेम 30 हजार होत मिळून..ती आपली परिस्थितीची तुलना हळूहळू मुधुराच्या परिस्थिती शी करू लागली होती ,आणि त्यामुळे तिच्या मनात मधुराबद्दल इर्शा निर्माण होऊ लागली होती... तिला ज्या मुलाचे स्थळ आले तो गिरीश कधी काळी तिला बघायला आला होता पण मधुराच्या भावाच्या प्रेमात पडल्याने ती आंधळी झाली होती आणि त्यामुळे तिने गिरीश सारख्या बलढल्या  श्रीमंत मुलाचे स्थळ नाकारले होते आणि ह्या सुजय सोबत लग्न केले होते...तेव्हा मात्र म्हणत होती मी तुझ्यासोबत कोणत्या ही परिस्थिती त साथ देईल ,मी तुझ्यासोबत चटणी भाकर खाऊन ही सुखी राहीन...मला फक्त तुझी साथ हवी ,पैसा काय रे गौण आहे माझ्यासाठी... मी तुझ्या सोबत नेटाने संसार करेन ,अगदी किती ही संकटे आली तरी मी मन विचलित होऊ देणार नाही...


हळूहळू परिस्थिती आणि गरिबी ह्यात तिची स्वप्ने तिच्या मागण्या ,इच्छा आकांक्षा आणि आवडी तिला पूर्ण होताना दिसत नव्हत्या...तिला हवे तसे घर, हवी तशी परिस्थिती अजून ही प्राप्त करून घेता येत नव्हती ,त्याच तिच्या सोबत मधुराचे तर दिवस छान पालटत होते, तिला बांगला गाडी नौकर,चाकर ,मोठी नौकरी...श्रीमंती तिच्या पायाशी लोळण घेत होती...हे सगळे ऐश्वर्य मी नाकारले म्हणूनच तिला मिळाले होते असा तिचा समज होत होता... आज मी गीरीश सोबत लग्न केले असते तर हेच सुख माझ्या पायाशी लोळण घेत असते जे आज मधुराच्या पायाशी लोळण घेत आहे... तिला मधुराचे सुख बघून जळफळाट होत होता...पण ह्या गोष्टी पासून आणि सत्या पासून मधुरा अलिप्त होती...ती आपली खास सखी समजून आम्रपाली हिस सगळे सुख दुःख सांगत.. काही नवीन गोष्ट घेतली किंवा गिरीश ने गिफ्ट केली तरी सगळ्यात आधी ती आम्रपाली ला दाखवत...आणि हे तिच्या वर बहाल केले जाणारे त्याचे असीम प्रेम पाहून आम्रपाली अजूनच स्वतःच्या मनाला खात...



एकदिवस मधुरा घरी आली ,नेहमी सारखे तिच्या वाढदिवसाच्या दिवशी गिरीश ने तिला काही गिफ्ट दिले होते, ते म्हणजे diamond नेकलेस होते, ज्याची किंमत 5 लाख अशी होती...आणि काही पैसे ही दिले होते..... हे पाहून आम्रपाली चे डोळे मोठे झाले होते... तिला ही त्या नेकलेस चा मोह आवरला नव्हता...ती लगेच म्हणाली


ती....अग माझी एक इच्छा पूर्ण करशील का मधु, मला आजच्या दिवस हा नेकलेस देशील का ,हा मला घालून बघायचा आहे...आणि मी काय म्हणते आग मला ही उद्या सोन्याचा हार घ्यायचा आहे, तर तुला दिलेले पैसे मला दे...कोणाला काय कळणार तुझ्या सासरी..तुम्ही मोठी माणसे जणू समुद्र पैस्याचा..त्यातून काही कमी झाले तर काय फरक पडणार आहे तुम्हाला... तुला तशी ही काहीच कमी नाही... जरी विचारले कोणी तर सांग टाकले खर्चून...मग कोण तुझ्या कडून हिशोब घेणार ग..

मधू.... अग तुला पैसे हवेत तर सांगायचे ना ,दिले असते आणि तसे ही तू सवडीने परत करशीलच की हळूहळू ,पण अग पण तो मला गिफ्ट दिला आहे ,आणि तो मी आज पहिल्यांदा घालणार आहे ,त्यांनी मला दिलेली वस्तू ती तू कशी घालणार ,हे जर नेहमीचे असते तर मी तुला नाही म्हटले नसते ग... मी तुला नाही देऊ शकत ग वहिनी..


ती.... इतके पण काय त्यात, माझ्या कडे असते तर तुझ्या कडे मला भीक मागावी नसती लागली बरं... आज जे हे तू घालून मिरणार आहेस ते सुख मी डावलले नसते तर ते आज माझ्या नशिबात असते...त्या गिरीशला मी नकार दिला आणि म्हणूनच तो तुझा झाला हे लक्षात ठेव..


मधुरा आपल्या खास मैत्रिणीचा खरा चेहरा पाहून अवाक झाली होती ,आज आम्रपाली जे काही बोलली त्यात तिचा द्वेष साफ दिसत होता... तिने मैत्रीवर घाला घातला होता ,ती आपल्यावर जळत होती आणि आपण तिला किती खास समजून आपला आंनद सांगत होतो...


आता तिला ह्या मैत्रीत जळण्याचा,ईर्षेचा आणि द्वेषाचा गंध येऊ लागला होता...एका झटक्यात नात्यात दरी निर्माण झाली होती...तिने लगेच आपली पर्स उचलली आणि वहिनीच्या हातातून ते पैसे आणि नेकलेस घेऊन घरी निघाली होती... डोळ्यात तप्त राग होता..आणि मनात अतोनात दुःख एक चांगले नाते गमवल्याचे..