Login

तुजविण सख्या रे.. भाग ९

तुजविण सख्या रे..


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- प्रेमकथा
कथेचे नाव :- तुजविण सख्या रे..
निशा थोरे (अनुप्रिया)

तुजविण सख्या रे.. भाग ९


तन्वीचे डोळे निरंतर वाहत होते.

“रुद्रा, तुझ्या मनात माझ्याविषयी या इतक्या नीच भावना? शेखरसर आणि माझ्या नात्याला तू कलंकित करायला निघाला आहेस? अरे, त्यांना मी माझा गुरू मानते. चुकलंच माझं, मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं. माझं सर्वस्व तुला दिलं.”

तन्वीचं मन आक्रंदत होतं.

“ज्याचा आताच आपल्या जोडीदारावर विश्वास नाही तो संसार काय करणार! संशयाचं भूत त्याच्या डोक्यावर बसलंय. मी कितीही जीव तोडून त्याला सांगितलं तरी त्याचा विश्वास बसणार नाही आणि मुळात मी त्याला सांगायला का जाऊ? मी त्याचा गैरसमज का दूर करायला जाऊ? का त्याचा माझ्यावर विश्वास नव्हता? आणि त्याचा विश्वासच नसेल मग मी तरी स्वतःला का सिद्ध का करू? प्रत्येकवेळी अग्निपरीक्षा सीतेनेच का द्यावी? वर्षानुवर्षे तिच्याच चारित्र्यावर शिंतोडे का उडावे?”

तन्वीच्या डोळ्यातला अंगार अश्रूवाटे बरसू लागला. विचारांच्या तंद्रित ती घरी पोहचली. डोळ्यांचं वाहणं सुरूच होतं. अखेर तन्वीने तिच्या आयुष्यातला एक मोठा निर्णय घेतला. घरी येताच तिने तिचा लॅपटॉप उघडला. शेखरसरांना सीसी मार्क करून तिने एचआरला तिचा राजीनामा मेल केला आणि तिने तिची बॅग भरायला घेतली. इतक्यात सुरभी तिथे आली.

“हे काय बॅग का भरतेयस तू? घरी चालली आहेस का? सुट्टी मिळाली तुला? कमाल आहे बाबा तुझ्या ऑफिसची! लगेच सुट्टी मंजूर!”

सुरभी तिला चिडवण्यासाठी म्हणाली.

“सुरभी, मी कायमची माझ्या घरी जातेय. मी नोकरीचा राजीनामा दिला.”

“व्हॉट? अगं पण का? असं अचानक तडकाफडकी जॉब का सोडतेय? आणि ऑफिसचे तुला इतक्या सहज सोडतील? नोटीस पिरियड तरी त्यांना द्यावा लागेल ना?”

“नाही, मी जातेय. अचानक जीव गेला असता तर काय मला मेल्यावरही नोटीस पिरियड सर्व्ह करायला बोलावलं असतं? नाही ना! मग झालं तर! असंही माझ्या जाण्याने कोणालाही काही फरक पडत नाही.”

तन्वी तिच्याकडे न पाहताच म्हणाली.

“तन्वी, तुझं आणि रुद्रचं भांडण झालंय का? तू अशी का वागतेय? तो काही म्हणालाय का?

सुरभीने काळजीने विचारलं. तन्वी तिच्या प्रश्नाला काहीही उत्तर न देता डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली,

“सुरभी, एक काम करशील. माझ्याबद्दल कोणाला काहीही सांगू नको. मी हे शहर सोडून जातेय. मी कुठे गेले? का गेले? माझा पत्ता. हे कोणालाही सांगू नकोस. माझी शपथ आहे तुला. कोणीही माझा शोध घेत माझ्या मागे येऊ नये म्हणून सांगतेय. सुरभी, माझं चुकलं गं.”

रुद्रमुळे तन्वी जॉब सोडून चाललीय ही गोष्ट ध्यानात यायला सुरभीला वेळ लागला नाही. तिने तन्वीला प्रश्न केला.

“काय चुकलंय? तन्वी, प्रेम करणं चुकीचं आहे?”

“सुरभी, प्रेमात स्वतःला झोकून देणं वेगळं आणि स्वतःला हरवून बसणं वेगळं. मी रुद्रच्या प्रेमात स्वतःला हरवून बसले. माझं अस्तित्व, माझं स्वप्न, माझ्या आकांक्षा सारं काही गमावून बसले.”

तन्वी रडू लागली. सुरभी तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होती. थोड्या वेळात तन्वीने तिचं सामान पॅक केलं आणि पहिल्या फ्लाईटने ती तिच्या घरी निघून गेली. प्रवासात पुन्हा पुन्हा तिच्या मनात रुद्रचेच विचार घोळत होते.

“रुद्र आणि माझं नातं खरंच इतकं ठिसूळ होतं? अविश्वासाचे पंख लावून मी उडणार तरी कशी होते? त्याच्या मानगुटीवर बसलेलं संशयाचं भूत कशी उतरवणार होते? आणि का? त्याचं माझ्यावर प्रेम होतं ना मग विश्वास कुठे हरवला? मी त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, आयुष्याचा जोडीदार मानलं हेच माझं चुकलं का?”

विचारांचं वावटळ तिला शांत बसू देत नव्हतं. कधी एकदा घरी पोहचतेय आणि आईच्या कुशीत जाऊन रडतेय असं तिला झालं होतं. आणि एकदाची ती घरी पोहचली. घरातल्या सर्वांनी ती अशी अचानक परत आल्याने आश्चर्य वाटलं होतं पण आल्या आल्या कसं विचारायचं म्हणून सगळेच शांत होते तन्वी फ्रेश झाली आणि हॉलमध्ये येऊन बसली. तिचे बाबा आणि दादाही काळजीत होते. आईने तिच्यासाठी कॉफी करून आणली होती. ती तन्वीला देत ती म्हणाली,

“अगं, अशी अचानक कशी आलीस? सगळं ठीक आहे ना?”

“बाबा, मी नोकरी सोडली. का, कशासाठी प्लीज मला काही विचारू नका.”

तन्वीच्या डोळ्यात पुन्हा पाणी साठू लागलं.

“अगं ठीक आहे ना! नोकरी सोडली तर रडायचं काय त्यात? एक गेली तर दुसरी मिळेल.”

तन्वीचे बाबा समजावणीच्या स्वरात म्हणाले.

“आणि आयुष्यभर काय नोकरीच्याच मागे धावायचं का? आता तुझ्या लग्नाचंही पहावं लागेलच ना! आयुष्याला जोडीदार हवाच. मनाला स्थिरता हवीच.”

आई प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. आईच्या तोंडून जोडीदार हा शब्द ऐकताच तन्वीने आईकडे पाहिलं आणि तिच्या आसवांचा बांध फुटलाच. आईच्या कुशीत शिरून तन्वी रडू लागली.

“एक नोकरी गेली तर पोर किती दुःखी झालीय! बाळा, अपयश पचवता यायला हवं. काही हरकत नाही. देवाने तुझ्यासाठी दुसरं काहीतरी योजलं असेल. त्याचं आपल्याकडे लक्ष असतं गं. रडू नको शांत हो.”

आजी तिला समजावत होती. नोकरी गेली म्हणून तन्वी रडतेय असंच सर्वांना वाटतं होतं पण तिच्या मनाची तडफड फक्त तिलाच माहित होती. ना तिला हे सहन होत होतं ना कोणाला सांगू शकत होती.

इकडे शेखरसरांना तन्वीचा मेल मिळाला. त्यांनी एचआर मॅनेजर आणि रुद्रला आत बोलवून घेतलं आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली.

“तन्वीचा काही ईशु झालाय का? असं अचानक तिने मला तिचा राजीनामा मेल केलाय. नेमकं काय झालं? तुमच्या दोघांशी ती काही बोलली होती का? काही फॅमिली प्रॉब्लेम?”

“नाही सर, मॅडम माझ्याशी काहीच बोलल्या नाहीत. मीही त्यांचा मेल पाहून शॉक झालोय.”

एचआर मॅनेजरांनी उत्तर दिलं.

अरे मग तू तिला कॉल केला होतास का? तू तिला थांबवलंस का नाही? तू तिच्याशी एकदा बोलून घ्यायला हवं होतं.”

शेखरसर त्यांच्याकडे पाहून म्हणाले.

“मग तुम्हाला काही अडचण? गेली तर गेली. अशा कितीतरी हुशार सेक्रेटरी आपण अशा उभे करू शकतो. ती गेली म्हणून कोणाचं काही अडलं नाही.”

रुद्रचा बदलेला सूर पाहून शेखरसरांना आश्चर्य वाटलं.

“अरे पण तू तिच्या विषयी असं कसं बोलतोयस? आणि तुझी तर ती गर्लफ्रेंड होती ना!”

शेखरसर रुद्रकडे पाहून म्हणाले.

“आहे नाही होती. आता तिचा माझा काहीही संबंध नाही. आमचा ब्रेकअप झालाय आणि याला तुम्ही कारणीभूत आहात.”

रुद्र रागाने म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून एचआर मॅनेजरही त्याच्या तोंडाकडे आश्चर्याने पाहू लागले.

“आरके, तुम्ही काय बोलताय? तुम्ही शेखर सरांना या भाषेत कसं काय बोलू शकता?”

रुद्रची बदलेली देहबोली पाहून एचआर मॅनेजर म्हणाले.

“ए तू गप रे, मला शहाणपणा शिकवू नकोस. आरकेशी बोलतोयस तू! आणि मी काय चुकीचं बोललो? ती माझी गर्लफ्रेंड होती. आम्ही आमच्या प्रेमाबद्दल आमच्या घरी सांगणार होतो. लवकरच लग्न करणार होतो. आमच्या दोघांचं नातं साऱ्या कंपनीला माहित होतं पण तरीही यांनी काय केलं? तिलाच माझ्यापासून हिरावून घेतलं. यांची पर्सनल सेक्रेटरी होती ना! मग बरोबर आहे यांनी पर्सनली तिचा वापर….”

दुसऱ्या क्षणाला कानाखाली त्याच्या आवाज निघाला. डोळ्यासमोर काजवे चमकले. शेखरसर खूप संतापले होते.

“आपल्या कलीगविषयी असं बोलताना तुला लाज नाही वाटत? अरे ती फक्त तुझी कलीग नव्हती तुझी होणारी जोडीदार होती. तुझं तिच्यावर प्रेम होतं ना मग विश्वास नको? आरके एक दिवस तुला सत्य समजेल आणि तुला तुझ्या या वागण्याचा नक्कीच पश्चाताप होईल. मार्क माय वर्ड्स. तू आता माझ्या नजरेसमोर जा. मला अजून राग देऊ नकोस. चालता हो. समजलं?”

“जाणारच आहे कायमचा. मलाही इथे थांबण्यात काही इंटरेस्ट नाही. तुमच्यासारख्या व्यक्तीसोबत काम करण्याची माझी अजिबात इच्छा नाही. तुमचे बाबा मिस्टर बजाज यांच्यातला एकही गुण तुमच्यात नाही. एक नंबरचे वाह्यात आहात तुम्ही. तुमच्या वडिलांचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही पण आता मला इथे एक क्षणभरही थांबायचं नाही. मला माझे शेअर्स विकून माझी रक्कम द्या. मी माझं बघेन काय करायचं ते.”

रुद्र रागाने केबिनबाहेर पडला. शेखरसर त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अवाक होऊन पाहत होते. आज त्याच्या डायरीत शब्द होते.

“आणि अशा रितीने तिच्या व्यभिचारामुळे एका सुंदर नात्याचा ऱ्हास झाला.”

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all