Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तुजविण सख्या रे.. भाग ८

Read Later
तुजविण सख्या रे.. भाग ८अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- प्रेमकथा
कथेचे नाव :- तुजविण सख्या रे..
निशा थोरे (अनुप्रिया)

तुजविण सख्या रे.. भाग ८

“आणि आज तोच रुद्र माझं तोंड पाहायचं नाही म्हणतोय? त्याला माझ्याशी नातं नकोय. का? काय चुकलं माझं?”

तन्वीच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. रुद्रच्या आजच्या बोलण्याने इतक्या वर्षांच्या घडलेला सारा घटनाक्रम अलगद तिच्या डोळ्यांसमोरून एखाद्या चित्रपटासारखा सरकत गेला. डोळ्यातला पाऊस निरंतर झरत होता.

“नाही, नाही मी असं होऊ देणार नाही. नक्की काय झालंय ते मला समजायलाच हवं. तो मला इतकं इग्नोर करतोय म्हणजे नक्कीच काहीतरी घडलंय. त्याशिवाय तो असं वागणार नाही.”

तिने रुद्रला पुन्हा कॉल केला. पुन्हा पुन्हा ती त्याला कॉल्स करत होती पण तो तिचे कॉल्स घेत नव्हता. कॉल्स कट करत होता. तिने त्याला ऑफिसमध्ये भेटण्याचाही प्रयत्न केला पण तो तिला टाळत होता. क्लायंट विझिटच्या नावाखाली तो दिवस दिवस ऑफिसबाहेर राहत होता.

“गेली आठ दिवस झाले रुद्र ऑफिसमध्ये थांबत नाही आणि आला तरी तो माझ्याशी एक शब्दही बोलत नाही, मला काही कामही सांगत नाही. माझे कॉल्स घेत नाही. काय झालंय ते सांगत नाही. मग मला कसं कळेल की त्याला नेमका कशाचा राग आलाय? काय खटकलंय? त्याच्या घरी जाऊनच पाहते. ऑफिसपेक्षा घरीच निवांत बोलता येईल.”

तन्वीने विचार केला आणि रुद्रला भेटण्यासाठी त्याच्या बंगल्यावर निघाली. ऑफिसमधून बाहेर पडल्यावर तिने कॅब केली आणि तडक रुद्रच्या बंगल्यावर पोहचली. थोड्याच वेळात गाडी बंगल्याच्या समोर उभी राहिली. ती गाडीतून खाली उतरली. कॅबवाल्याला कॅबभाडं दिलं आणि ती बंगल्याच्या दिशेने चालू लागली. ‘रुद्र कर्वे’ दारावरच्या नावावरच्या पाटीवरून नकळत तिचा हात फिरला. डोळ्यातला श्रावण दाटू लागला. दारावरची बेल वाजवणार इतक्यात तिचं लक्ष दारावरच्या कुलूपाकडे गेलं.

“अजून रुद्र घरी आलेला नाही वाटतं. वाट पाहूया. आज काहीही झालं तरी त्याला भेटून जायचंच.”

तन्वीने मनाशी पक्कं ठरवलं होतं. त्यामुळे ती तिथेच दारात बसून राहिली. इतक्यात तिला समोरून शांताकाकू येताना दिसल्या. शांताकाकू रुद्रच्या घरी साफसफाई आणि स्वयंपाक करायला यायच्या. मागच्यावेळीस जेंव्हा ती रुद्र सोबत आली होती तेंव्हा तिची आणि शांताकाकूंची ओळख झाली होती.

“शांताकाकू, ही तन्वी पेडणेकर. आता लवकरच ती तन्वी रुद्र कर्वे होणार आहे. माझी बायको बनून या बंगल्यात येणार आहे. आता लवकरच तुमचं काम पहायला एक नवीन माणूस येणार आहे बरं का!”

तन्वीला रुद्रचं बोलणं आठवलं तशी ती खुदकन हसली. शांताकाकू जवळ येताच तन्वीला पाहून हसल्या.

“अहो ताईसाहेब, तुम्ही इथे? आणि रुद्रसाहेब?”

शांताकाकूंनी लगबगीनं दारावरचं कुलूप काढता काढता विचारलं.

“त्यांनाच भेटायला आलेय. आज ते ऑफिसला आले नाहीत नां. म्हटलं तब्येत ठीक आहे की नाही ते पहावं म्हणून आले पण पाहते तर काय त्यांचाच तपास नाही.”

ओठांवर उसणं हसू आणत तन्वी म्हणाली.

“चला, आत बसून बोलू. साहेब येतीलच इतक्यात. तुम्हाला फार थांबावं लागलं नाही ना?”

आत शिरत शांताकाकू म्हणाल्या. तिने नकारार्थी मान हलवून नाही म्हटलं. तन्वी आत आली. तिला तो दिवस आठवला ज्या दिवशी पहिल्यांदा रुद्र बंगल्यावर घेऊन आला होता. त्या गंमतीजंमती आठवून तिला हसू आलं. तिचं लक्ष बेडरूमकडे गेलं.

“काकू, मी आतल्या खोलीत आहे हं. रुद्रसाहेब आले की सांगा मला.”

शांताकाकूंनी मान डोलावली. तन्वी रुद्रच्या खोलीच्या दिशेने चालू लागली. काही गोड मधाळ आठवणी मनात रुंजी घालू लागल्या. बेडरूममध्ये येताच ती लाजली.

“तर राणीसरकार, लवकरच तुम्ही या खोलीच्या स्वामींनी होणार आहात. ही खोली, हे कपाट, हा पलंग आणि हा तुमचा सेवक रुद्र हे सारं काही तुमचं असणार आहे.”

रुद्रच्या आठवणींनी ती मोहरली. पलंगावर बसत तिने अलगद बेडवरून आपला हात फिरवला. तिला रुद्रच्या स्पर्शाचा भास झाला. तिने कपाट उघडलं त्याच्या कपड्यांना स्पर्श केला. त्याचा सुगंध तिच्या श्वासात भरून गेला. इतक्यात तिची नजर कपाटात एका कोपऱ्यात ठेवलेल्या निळ्या डायरीवर गेली. तिच्या मनात कुतूहल निर्माण झालं. तिने डायरी हातात घेतली आणि कपाट बंद केलं.

“अरे, रुद्रची डायरी! अशी कोणाची पर्सनल डायरी वाचू नये नां! बॅड मॅनर्स!”

तन्वीच्या मनात विचार चमकून गेला.

“पण तो आणि मी थोडीच वेगळे आहोत! एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची वचनं दिलीत. एकमेकांपासून काय लपवायचं?”

तन्वीने विचार केला आणि हिंमत करून तिने डायरी वाचायला सुरुवात केली. सुरुवातीची काही पानं वाचून तिला आनंद होत होता. तिच्या आणि त्याच्या पहिल्या भेटीपासूनच्या सगळ्या घटना त्याने डायरीत लिहल्या होत्या.

“आणि आयुष्यात सोनपरी आली यापासून तर मला प्रपोज केल्या पर्यंत सगळं सगळं रुद्रने लिहून ठेवलंय. खरंच रुद्र, किती चांगला आहेस तू!”

ती मनातल्या मनात पुटपुटली आणि ती डायरीचं एकेक पान उलटून पुढे लिहलेलं वाचू लागली. सुरुवातीची काही पानं वाचून तिला आनंद होत होता पण जसजशी ती पुढची पाने वाचू लागली तिच्या चेहऱ्याचा रंग उडू लागला. डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या.

“अच्छा हे कारण आहे तर, माझ्याशी हा दुरावा, राग चिडचिड करण्याचं! पण त्याला असं का वाटलं? माझ्याबद्दल इतकं मन कलुषित कधी झालं?”


तन्वी जसजशी डायरी वाचत होती तसतसं तिला रुद्रच्या विक्षिप्त वागण्याचा उलगडा होऊ लागला. रुद्रच्या हीन विचारसरणीची तिला कीव आली. तिला त्याचा प्रचंड राग येत होता. डायरीतल्या एका पानावर गेल्या महिन्यात झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा प्रसंग लिहून ठेवला होता. ऑफिसमधल्या तिच्या सहकाऱ्याची, प्रमोदची त्यावर असलेली प्रतिक्रिया लिहली होती.

“वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दिवशी शेखर सरांनी सर्वांची पगारवाढ जाहीर केली होती. तसं ते प्रत्येक वर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दिवशी करतात पण यंदाची गोष्ट वेगळी होती. त्यांनी यावर्षी तन्वीला सर्वांत मोठं प्रमोशन दिलं. चांगली पगारवाढ दिली आणि सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे तिला सीईओची पोजिशन दिली. यावर प्रमोद विकासला म्हणाला,

“एका पर्सनल सेक्रेटरीला इतकी मोठी पोजिशन? काय तरी गडबड आहे बघ. प्रमोशनसाठी या मुली कोणत्याही थराला जातील. यांचं काही सांगता येत नाही. अरे विक्या तुला सांगतो, या सुंदर मुलींचं बरं असतं. त्यांना हे प्रमोशन मिळवण्यासाठी फारसं काही करावं लागत नाही. छान छान दिसायचं. चेहऱ्यावर मेकअप चढवायचा. सरांच्या मागे पुढे केलं की प्रमोशन फिक्स्ड. विक्या तुला म्हणून सांगतो, या तन्वीचं आणि शेखरसरांचं लफडं एक ना एक दिवस या आरके समोर येईल ना तेव्हाच त्याचे डोळे उघडतील. तोवर तोही तिच्या प्रेमात वेडा झालेला असेल. ही तन्वी दोघांनाही खेळवतेय.”

हे खरं असेल का? तन्वी मला फसवतेय? माझ्या साधेपणाचा गैरफायदा घेतेय?

ते पान वाचून तन्वीला खूप मोठा धक्का बसला होता. ती पुढे वाचू लागली. पुढच्या पानावर लिहलं होतं.

“मलाही आता तिचा संशय येऊ लागलाय. तिचं सारखं सारखं त्यांच्या केबिनमध्ये जाणं मला खटकतय. परवा प्रमोद म्हणाला की, त्या दोघांना त्याने शहराबाहेरच्या एका लॉजवर जाताना पाहिलं. ते पूर्ण रात्रभर तिथेच होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी तिथून चेकआऊट केलं. म्हणजे त्यांच्यात फिजिकल रिलेशन? शिईईई, तन्वी, तू इतकी वाईट असशील असं वाटलं नव्हतं.”

“तन्वी मला तुझं तोंड पाहायचं नाही. तू माझ्या प्रेमाचा अपमान केलास. तू मला फसवलंस. मोठा साधेपणाचा आव आणत होतीस ना! आता कळलं मला तू कोणत्या चालीची आहेस ते!”

तिने खाडकन डायरी बंद केली. पुढची पाने तिला वाचवत नव्हती. आता तिला त्याच्या विक्षिप्त वागण्यामागचं कारण लक्षात येऊ लागलं होतं. डोळ्यातलं तळं रितं होऊ लागलं होतं. डायरी पंलंगावर तिने भिरकावून दिली आणि तडक धावतच त्या खोलीच्या बाहेर आली. सोफ्यावर ठेवलेली तिची पर्स उचलली आणि काहीही न बोलता ती दुसऱ्या क्षणाला रुद्रच्या बंगल्याबाहेर पडली. शांताकाकू आवाज देत राहिल्या पण तिने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. भरल्या डोळ्यांनी तिने कॅब बुक केली. कॅब येताच ती त्यात बसून निघूनही गेली.


पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

निशा थोरे (शिवप्रिया - शब्दस्पर्श)

Service

मला शब्दांच्या विश्वात रमायला खूप आवडते.

//