तुजविण सख्या रे.. भाग ७

तुजविण सख्या रे..अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- प्रेमकथा
कथेचे नाव :- तुजविण सख्या रे..
निशा थोरे (अनुप्रिया)

तुजविण सख्या रे.. भाग ७

रुद्रची दुखरी बाजू समजल्यानंतर तन्वीच्या मनात त्याच्याविषयी आदर निर्माण झाला होता. त्याच्या तुसड्या वागण्यामागची कारणं समजली होती. दोघांमधली दरी हळूहळू मिटत चालली होती. प्रेम तर होतंच पण अजूनही दोघांपैकी कोणीही पहिलं पाऊल उचललं नव्हतं. एक दिवस रुद्रने त्याच्या मनात तिच्या विषयी असलेल्या प्रेमभावना तिला सांगायचं ठरवलं. आणि डायरीतल्या पानावर अलगद शब्द उमटले,

“उद्या मी तिला कॉफी पिण्यासाठी बाहेर घेऊन जाणार आहे. तेंव्हा मी तिला माझं तिच्यावर किती प्रेम आहे हे सांगणार आहे. माझ्या मनातल्या भावना बोलून दाखवणार आहे. ती माझा प्रस्ताव मान्य करेल? ती मला हो म्हणेल?”

त्याने डायरी मिटून ठेवली. विचारांच्या गर्तेतच तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी रुद्र ऑफिसला पोहचला. दिवसभराच्या कामाचं नियोजन केलं. एक दोन मिटींग्स होत्या त्या संपवल्या. तन्वी सुद्धा तिच्या कामात व्यस्त होती. शेखर सरांनी बऱ्याच नवीन प्रोजेक्ट्सची कामे तिच्याकडे सोपवली होती. सर्व कामे संपवता संपवता दिवस कसा संपला तिला कळलंच नाही. इतक्यात रुद्र तिच्या केबिनमध्ये आला आणि त्याने तन्वीला विचारलं,

“तन्वी, संपलं की नाही तुझं काम?”

“हो संपत आलंय. अरे, उद्या शेखरसर क्लाईंट विझिटसाठी दिल्लीला चाललेत ना! म्हणून थांबलेय. त्यांचं फ्लाईटचं तिकिट बुकिंग, हॉटेल बुकिंग सगळं करायचं होतं. त्यानंतर त्यांचं प्रेझेंटेशन बनवलं आणि आता हे बघ, त्यांना मेल सुद्धा केली.”

तन्वी हसून म्हणाली.

“हं.. चल जाऊया. मी तुला तुझ्या घरी ड्रॉप करतो.”

रुद्र तिच्याकडे पाहून म्हणाला. तिने मान डोलावली. थोड्याच वेळात ते दोघे ऑफिसमधून बाहेर पडले. पार्किंगमधून कार बाहेर काढली. तन्वी त्याच्या शेजारी येऊन बसली. रुद्रने कार स्टार्ट केली. जाताना वाटेत एक कॅफे लागलं.

“तन्वी, कॉफी घेऊया?”

“हो चालेल असंही फार कंटाळा आलाय बघ. कॉफी घेतली की जरा फ्रेश वाटेल.”

तन्वीने उत्तर दिलं. रुद्रने कॅफेसमोर गाडी उभी केली आणि तो म्हणाला,

“तन्वी, दोन मिनटं हं. तू आत जाऊन बस. मी गाडी पार्क करून आलोच.”

“हो, चालेल. लवकर ये.”

तन्वी गाडीतून खाली उतरली आणि कॅफेच्या दिशेने चालू लागली. तन्वी कोपऱ्यातल्या शेवटच्या टेबलाजवळ जाऊन खुर्चीत बसली आणि रुद्रच्या येण्याची वाट पाहू लागली. इतक्यात तिला समोरून रुद्र येताना दिसला. त्याच्या हातात रातराणीच्या फुलांचा गुच्छ होता. रुद्रने तिच्याजवळ येत फुलांचा गुच्छ तिच्यासमोर धरला.

“अरे! हे कशासाठी? कुठून आणलंस?”

तन्वी आश्चर्याने फुलांकडे पाहत म्हणाली. फुलांचा सुगंध तिला मोहित करत होता.

“हे तुझ्यासाठी. अगं इथे शेजारीच आहे फ्लॉवर शॉपी. तुला फुलं आवडतात ना!”

“हो फार आवडतात पण सर्वांत जास्त प्राजक्त आवडतो.”

“का? प्राजक्तच का?”

“प्राजक्त मला खूप काही शिकवून जातो. क्षणभंगूर जीवन जगताना आनंद कसा शोधायचा हे शिकवून जातो. प्राजक्त मला स्वतः ओघळून जाताना दुसऱ्यांना आनंद कसा वाटावा हे शिकवतो. त्याचा सुगंधित दरवळ पसरवून आपलं जगणं फार समृद्ध करतो.”

तन्वी भरभरून बोलत होती आणि तो तिला मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. ती बोलता बोलता मधेच थांबली आणि जीभ चावत स्वतःच्या डोक्यावर टपली मारत ती हसून म्हणाली,

“सॉरी रे, एकटीच बडबडत होते.”

“अगं नाही, खूप छान बोलतेस तू. असं वाटतं की ऐकतच राहावं.”

तन्वीकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकत रुद्र म्हणाला.

“नाही रे तू बोल.”

“त्या आधी ऑर्डर देऊया? काही खाणार तू?”

“नाही. कॉफी सांग फक्त..”

“एक गार्लिक व्हेज सँडविच आणि दोन नेस कॉफी.”

वेटर ऑर्डर घेऊन निघून गेला.

रुद्रने सारी हिंमत एकवटून बोलायला सुरुवात केली.

“तन्वी, आज मी तुला माझ्या मनातली एक गोष्ट सांगणार आहे. खरंतर त्यासाठीच हे भेटीचं प्रयोजन केलं होतं. कालपासूनच माझी तयारी सुरू होती.”

“अच्छा, काय सांगतोयस? काय प्रयोजन होतं?”

तन्वीने प्रश्न केला इतक्यात वेटर त्यांची ऑर्डर घेऊन आला. टेबलवर दोघांच्या समोर सॅन्डविच आणि कॉफी ठेवून तो निघून गेला. तन्वीने कॉफीचा कप आणि सँडविचची प्लेट पुढे सरकवली. रुद्रने कॉफीचा एक घोट घेतला आणि शब्दांची जुळवाजुळव करत तो बोलू लागला.

“तन्वी, माझा स्त्रियांवरचा विश्वास पूर्णपणे उडाला होता. मी कधी पुन्हा प्रेमात पडेन असं स्वप्नांतही वाटलं नव्हतं. श्वासांची घरघर चालू होती म्हणून जगणं सुरू होतं पण एक दिवस तू माझ्या आयुष्यात आलीस. पाहता क्षणीच तू मला आवडली होतीस पण आता मला फक्त सौन्दर्याने भुरळ पडणार नव्हती. मी तुझ्यासोबत काम करू लागलो. तुला जाणून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो. तुझी कामाबद्दलची आस्था कमाल होती. इतरांच्याविषयी तुझ्या मनात असलेली ओल मला दिसत होती. तुला आठवतं? त्यादिवशी कामगारांना पगारवाढीची घोषणा झाली. तुला किती आनंद झाला होता! सगळ्यात जास्त तू खूष होतीस. तेंव्हा मला तुझ्या मनात महिला कर्मचाऱ्यांविषयी असलेला जिव्हाळा, ती तळमळ स्पष्ट जाणवली. त्या दिवशी जेंव्हा मी तुला रागावलो. तुही चिडलीस. जॉब सोडणार असं म्हणालीस. मला वाटलं, ‘तू आता खरंच राजीनामा देणार. नोकरी सोडून निघून जाणार.’ या विचारांनी मी खूप घाबरलो. तू मला सोडून जाणार या जाणिवेने मी बैचेन झालो. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी तुझ्या प्रेमात पडलोय.”

इतकं बोलून झाल्यावर रुद्रच्या घशाला कोरड पडली. क्षणभर थांबून त्याने टेबलवर ठेवलेल्या ग्लासमधलं पाणी प्यायलं आणि तो पुढे बोलू लागला.

“तन्वी, हो माझं तुझ्यावर प्रेम आहे. जी मुलगी इतरांना इतकं छान समजून घेते. ती मला नक्कीच समजून घेईल. तुझी साथ मला आयुष्यभरासाठी हवीय. देशील न साथ? माझ्याशी लग्न करशील? आयुष्यभर सोबत राहशील?”

अचानक उद्भभवलेल्या प्रसंगाने तन्वी गांगरून गेली. चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित आनंद पसरला. तिला रुद्र आवडत होता पण त्यालाही ती आवडत असेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं. रुद्र असं काही म्हणेल अशी तिने कधीच कल्पना केली नव्हती. तिच्या डोळ्यातून आपोआप पाणी झरू लागलं. तन्वी लाजत थोडी खाली झुकून हळूच त्याच्या कानात कुजबुजली,

“आय लव्ह यू टू रुद्रा..”

तिचे शब्द रुद्रच्या कानावर पडले. क्षणभर तो जागीच स्तंभीत झाला. अंगावर रोमांच उभे राहिले. कानाजवळचे तिचे श्वास त्याला स्पष्ट जाणवत होते. तिच्या शब्दांनी, तिच्या होकाराने त्याला अतिशय आनंद झाला होता. तिचा हात अलगद आपल्या हातात घेत रुद्र म्हणाला,

"तन्वी, आज मी तुला एक प्रॉमिस करतो, तू जो विश्वास माझ्यावर टाकलाय नं, त्याला मी कधीच धक्का लावू देणार नाही. तूझा हात मी कधीच सोडून जाणार नाही.”

रुद्रचा हात घट्ट पकडत तन्वी त्याला म्हणाली,

“रुद्रा, मी कायम तुझ्यासोबत असेन. मीही तुला कधीही सोडून जाणार नाही. मी तुला वचन देते.”

तिच्या शब्दांनी तो भावुक झाला. डोळ्यातून पटकन दोन अश्रू ओघळले. आज त्याच्या डायरीत काही स्वर्ण अक्षरे उमटणार होती.

“तन्वीच्या होकाराने माझ्या आयुष्याला अर्थ लाभला. तिची साथ, माझ्या हाती तिचा हात अजून काय हवंय जगायला?”

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all