तुजविण सख्या रे.. भाग ६

तुजविण सख्या रे.. भाग ६



अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- प्रेमकथा
कथेचे नाव :- तुजविण सख्या रे..
निशा थोरे (अनुप्रिया)


तुजविण सख्या रे.. भाग ६

“मला वाटलं होतं, तितका हा खडूस नाहीये. छान बोलला पण मग मधेच त्याला काय होतं? असा का चिडतो? काय कारण असेल?”

तन्वीच्या मनाला प्रश्न पडला होता. रुद्रच्या चिडचिडी मागची कारणं काय असतील हे जाणून घेण्याची उत्सुकता तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तन्वी आणि रुद्र यांचं नातं छान रुजू लागलं. कामाच्या निमित्ताने एकत्र उठणं, बसणं होऊ लागलं. कधी मिटींग्सच्या निमित्तानं बाहेर जाणंही होऊ लागलं. दोघांनाही एकमेकांच्या स्वभावाची ओळख होऊ लागली होती. तन्वीच्या शांत समजूतदार स्वभावामुळे रुद्रच्या स्वभावातही कायापालट होऊ लागला होता पण कधीतरी मनातला संताप उफाळून येत असे आणि मग त्यावेळी समोरच्याची काही धडगत नसे पण त्यावेळीसही तन्वी अतिशय संयमी स्वभावाने कोणतीही बिकट परिस्थिती उत्तमरित्या सांभाळून घेत होती पण रुद्रच्या संतापामागचं कारण काही कळत नव्हतं. एक दिवस काम संपल्यावर तन्वीनेच विषय काढला.

“आरके, राग नसणार तर एक प्रश्न विचारू?”

“बोला नं.”

“तुम्ही मधेच इतके का चिडता? इस्पेशली जेव्हा कोणी मुलगी कामात चुकली की तुम्ही प्रचंड चिडता का सर? तुमच्या मनात कसला राग?”

रुद्र उदास झाला. हातापायांच्या बोटांची चुळबुळ सुरू झाली. तो अस्वस्थ असला की असाच करायचा. दीर्घ श्वास घेत त्याने बोलायला सुरुवात केली.

“मिस तन्वी, मला माहित आहे, आपण नोकरी करताना पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य या दोन गोष्टी वेगळ्या ठेवतो किंबहुना ठेवायला हव्यात. मीही खूप प्रयत्न करतो पण कितीही ठरवलं तरी सरमिसळ होतेच. आजपर्यंत मी कधीच कोणाला माझ्या खाजगी आयुष्याबद्दल सांगितलं नाही. त्याचं कारणही तसंच आहे. तुम्हाला माझा स्वभाव विक्षिप्त वाटला असेल. हो आहे मी विक्षिप्त. आहे माझा स्वभाव तुसडा! आजवरच्या अनुभवांच्या निखाऱ्यावर चालून होरपळून निघालोय आणि त्यामुळे स्वभावही तसाच बनलाय. माझं पर्सनल आयुष्य खूप गुंतागुंतीचं होतं. स्त्रियांविषयी माझ्या मनात प्रचंड संताप होता.”

हे सांगताना रुद्रचे डोळे भरून आले होते. तन्वीही गंभीरपणे त्याचं बोलणं ऐकू लागली. डोळ्यातलं आभाळ सावरत त्याने पुढे बोलायला सुरुवात केली.

“मी दोन तीन वर्षांचा होतो, तेंव्हा माझी जन्मदाती, माझी आई मला आणि बाबांना सोडून गेली.”

तो क्षणभर थांबला. एक आवंढा गिळून त्याने बोलायला सुरुवात केली. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. आवाज थरथरला.

“ओह्ह! सॉरी आरके!”

“नाही, नाही. सॉरी काय! ती गेली. हो, खरंच ती माझ्यासाठी मरणच पावली होती. तिचं माझ्या बाबांवर प्रेम नव्हतं म्हणे! तिने बाबांकडून घटस्फोट घेतला आणि तिच्या प्रियकरासोबत त्याचा हात धरून पळून गेली. माझा पुसटसा विचारही तिच्या मनाला शिवला नाही. मला एकट्याला टाकून ती निघून गेली. ती माझ्या आयुष्यातली पहिली ‘स्त्री’ जिच्यामूळे माझ्या मनात स्त्रियांच्या प्रती द्वेषाचं बीजारोपण झालं. मग बाबांनी दुसरं लग्न केलं. ती आई माझ्यावर सारखी रागावायची. शुल्लक गोष्टींवरून रोज मारायची. पोटभर खायलाही मिळायचं नाही पण सांगणार कोणाला? आईच्या जाण्याने बाबा पुरते ढासळले होते. ते जास्तीतजास्त वेळ घराबाहेर ऑफिसच्या कामात व्यस्त राहायचे. रात्री खूप उशिरा घरी येत. दारूच्या नशेत धुंद! त्यांना कशाचीच शुद्ध नसायची. एक दिवस माझ्या सावत्र आईने बाबांचे कान भरले आणि तिच्या सांगण्यावरून मला हॉस्टेलला ठेवण्यात आलं. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी मी आई वडील असतानाही पोरका झालो होतो. ही सावत्र आई माझ्या आयुष्यातील दुसरी स्त्री जिने मला स्त्रियांचा द्वेष करण्यासाठी उद्युक्त केलं.”

तन्वीने बराच वेळ कंठात दाटून आलेला उमाळा आवरून धरला होता पण डोळ्यातल्या आसवांनी बंड पुकारलं आणि वाहायला सुरुवात झाली. रुद्र बोलत होता.

“त्यानंतर शालेय शिक्षण संपवून मी कॉलेजमध्ये जाऊ लागलो. तिथे मला केतकी भेटली. दिसायला सुंदर, गोरी गोमटी, निळ्या डोळ्यांची, काळ्याभोर लांबसडक केसांची.. पाहता क्षणी कोणालाही पसंत पडावी अशीच होती. साऱ्या कॉलेजला तिने वेड लावलं होतं पण तिला मी आवडायचो. मलाही ती खूप आवडायची. मग एकमेकांच्या कधी प्रेमात पडलो हे आम्हालाच समजलं नाही. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. कधीही दूर न जाण्याची वचनं दिली पण ऐन वेळेस तिने माघार घेतली. परदेशात राहणाऱ्या युवकाशी लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाली. ती माझ्या आयुष्यातली शेवटची स्त्री, जिने माझा विश्वास तोडला आणि माझ्या प्रेमाला सुरुंग लावला. त्यानंतर मग माझा कोणत्याच स्त्रीवर विश्वास उरला नाही आणि जो काही उरला सुरला विश्वास होता तो माझ्या सावत्र भावंडांनी संपुष्टात आणला. बाबांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ते हे जग सोडून कायमचे निघून गेले. बाबांच्या हयातीत सावत्र आईने मोठ्या शिताफीने सर्व स्थावर संपत्ती, घर, जमीन जुमला, कंपनीचे शेअर्स सगळं स्वतःच्या नावावर करून घेतलं होतं. आणि मग बाबा गेल्यावर माझ्या सावत्र भावंडांनी मला वडिलोपार्जित संपत्तीमधून हद्दपार केलं. घरातून हाकलून दिलं. मित्रांनी आधार दिला. मी माझ्या मित्रांसोबत त्यांच्या फ्लॅटमध्ये राहू लागलो.”

रुद्र क्षणभर थांबला. जखमेवरची खपली निघाली होती आणि जखम भळभळा वाहू लागली होती. तो पुढे बोलू लागला.

“बाबांच्या कंपनीत बाबांचे जे शेअर्स होते ते माझ्या सावत्र भावंडांनी कवडीमोल दामात विकून टाकले. माझ्याकडे काहीच शिल्लक उरलं नव्हतं. पितृछत्र हरपलं आणि खऱ्या अर्थाने पोरका झालो. डोक्यावर छप्पर राहिलं नव्हतं. पण मग म्हणतात न! सर्व दारे बंद झाली की, एक ईश्वर आपल्यासाठी एक दरवाजा उघडतो. तसंच काहीसं झालं. अशा कठीण परिस्थितीत एक व्यक्ती मदतीला देवासारखी धावून आली. आमच्या कंपनीचे दुसरे डायरेक्टर मिस्टर बजाज म्हणजेच शेखर सरांचे वडिल माझ्या बाबांचे चांगले मित्र होते. नेहमी आमच्या घरी त्यांचं येणं व्हायचं. बाबांच्या मृत्यूनंतर माझे होणारे हाल त्यांना पाहवत नव्हते. मिस्टर बजाज यांनी ते सारे शेअर्स माझ्या भावंडांकडून विकत घेतले आणि माझ्या नकळत माझ्या नावावर ट्रान्सफर करून ठेवले पण त्यांनी मुद्दामच मला याची कल्पना दिली नव्हती. कारण त्यांना मला इतकं सहजपणे आयतं काहीच द्यायचं नव्हतं. ते माझी परीक्षा घेत होते. माझी योग्यता पडताळून पाहत होते. त्यांनी मला नोकरीला ठेवून घेतलं. बारावी पूर्ण झाल्यानंतर लगेच नोकरीला लागलो. पगार मिळू लागला. मित्रांना राहण्याचे घरभाडे देऊ लागलो. हातात पैसे खेळू लागले पण शिक्षण अर्धवट राहिलं. जीव ओतून काम केलं. न दमता, न कंटाळता हा खडतर रस्ता चालत राहिलो. मग कष्टाला, संकटाशी दोन हात करण्याचं बळ मिळत गेलं. पुढे काही वर्षांनी नोकरी सांभाळत मी बाहेरून परीक्षा दिली आणि पदवीधर झालो. तब्बल दहा वर्षांनी माझ्या कष्टाचं चीज झालं. मी बिजनेस सांभाळण्यास सक्षम आहे याची खात्री पटल्यावर योग्य वेळ पाहून त्यांनी मला सत्य सांगितलं. माझे शेअर्स परत केले आणि मी या कंपनीचा सीईओ झालो.”

रुद्रचा खडतर प्रवास ऐकून तन्वीचे डोळे पाण्याने डबडबले. ती रुद्रच्या हातावर हलकेच थोपटत म्हणाली,

“आरके तुमचा प्रवास खूपच खडतर होता. खरंतर कोणाच्याही वाट्याला असं आयुष्य येऊ नये पण अशा एक दोन स्त्रियांमुळे संपूर्ण स्त्री जातीला नावे ठेवण्यात काय अर्थ आहे? संपूर्ण स्त्री जातीला बदनामीच्या खाईत लोटण्यात काय पॉईंट आहे? जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे आणि आपण माणुसकीवर विश्वास ठेवला पाहिजे.”

“हो, म्हणूनच तर मी तुमच्या बोलतो. तुमच्याशी बोललं की मला छान वाटतं. अजून एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती.”

तिने प्रश्नार्थक नजरेने रुद्रकडे पाहिलं.

“ही अहोजावोची औपचारिकता सोडून देऊया का? छान फ्रेंड्स बनूया का?”

रुद्रने तन्वीला प्रश्न केला आणि तिनेही होकारार्थी मान डोलावली.

आता हळूहळू त्यांच्यात मैत्री फुलू होती. रुद्र तन्वीच्या सहवासात आनंदी राहू लागला. स्वभावातली चिडचिड कमी झाली होती. तो आता सर्वांशी शांतपणे बोलू लागला होता. मैत्री हळूहळू प्रेमात रूपांतरीत होत होती. म्हणतात ना! एकत्र राहिल्याने, सहवासाने प्रेम रुजू लागतं. मायेच्या स्पर्शाने बहरू लागतं. अगदी तसंच त्या दोघांच्या आयुष्यात दबक्या, चोरपावलांनी प्रेमाने प्रवेश केला होता. आणि हळूहळू त्याच्या निळ्या डायरीची तन्वीसाठी असलेली पानं तिच्या सुगंधी सहवासाच्या अनुभवाने भरू लागली. तन्वीलाही हळूहळू रुद्रचा स्वभाव कळू लागला होता. त्याच्या सहवासात राहिल्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजूही समजू लागली होती. प्रेमांकुर तर फुलू लागला होता पण अजूनही त्याची कबुली कोणी दिली नव्हती.

पुढे काय होतं? रुद्र आणि तन्वी आपल्या प्रेमाची कबुली देतील? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all