तुजविण सख्या रे.. भाग ५

तुजविण सख्या रे..



अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- प्रेमकथा
कथेचे नाव :- तुजविण सख्या रे..
निशा थोरे (अनुप्रिया)


तुजविण सख्या रे.. भाग ५


तन्वी प्रचंड संतापली होती.

“समजतो काय स्वतःला? ऐकून घेतोय म्हटल्यावर डोक्यावरच बसायला लागलाय. जाऊ दे. जिथे मुलींचा आदर केला जात नाही. अशा ठिकाणी मला कामच करायचं नाहीये.”

तोंडातल्या तोंडात पुटपुटली. टेबलवर ठेवलेल्या बॉटलमधलं थंड पाणी प्यायली आणि आपल्या खुर्चीत जाऊन बसली. लॅपटॉपवर मेल ओपन केला आणि ती शेखर सरांना, एच आर मॅनेजर यांना कॉपी मार्क करून रुद्रला राजीनाम्याचा मेल टाईप करू लागली. इतक्यात सुजाता आत आली.

“काय करतेयस तन्वी? राजीनामा?”

“हे बघ सुजाता, तू तुझ्या बॉसबद्दल काही सांगायला आली असशील तर प्लीज मला काही सांगू नको. मी काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. तुला सांगू! हे पुरुष असेच असतात. त्यांना फक्त बायकांवर आपलं वर्चस्व, सत्ता गाजवायची असते. सुजाता, आरकेंना अजिबात वागण्या-बोलण्याचे मॅनर्स नाहीयेत. ज्या व्यक्तीला मुलींशी नीट बोलता येत नाही, त्यांचा आदर करता येत नाही अशा अनप्रोफेशनल व्यक्तीबरोबर मी काम करू शकत नाही. सॉरी.”

तन्वीला मध्येच थांबवत सुजाता म्हणाली,

“तन्वी, मी तुला काहीही सांगायला आले नव्हते. मला माहितीये, तू जे करशील ते पूर्ण विचार करूनच करशील पण मी या ऑफिसमध्ये तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत म्हणून सांगतेय, प्रत्येक पुरुषाला एकाच चष्म्यातून पाहणं सोडून द्यायला हवं. तू समजते तसं आरके वाईट नाहीत. काही कांगोरे आहेत त्यांच्याही आयुष्यात जे अजूनही कोणालाच माहीत नाही. अगदी मला इथे सहा सात वर्ष झाली तरीही! तन्वी, सर्वांच्या अडीअडचणीत आरके कायम धावून येतात. मान्य आहे की ते तापट आहेत पण त्यांच्या इतकं प्रेमळ माणूस आपल्या ऑफिसमध्ये शोधूनही सापडणार नाही. माझे बाबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना त्यांनीच मला आर्थिक मदत केली. संपूर्ण उपचाराचा खर्च त्यांनी केला होता. आपल्या कंपनीतल्या कामगारांच्या हुशार, गरजू, होतकरू मुलांना ते नेहमी शिक्षणासाठी आर्थिक मदत करतात. कंपनीतल्या लोकांना त्यांचा खूप आधार वाटतो. त्यांच्या अशा तिरसट वागण्यामागे त्यांची काही कारण असू शकतात. ते कधीच कोणाला स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दल बोललेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. तन्वी, शेवटी निर्णय तुझा आहे. तुला ठरवायचंय. चल, मी जाते. बाय सी यू.”

असं म्हणून सुजाता तिच्या केबिनमधून निघून गेली.

“काय घडलं असेल त्याच्या आयुष्यात? तो सर्वांशी असा फटकून का वागत असेल?”

तन्वी विचारात गुंग झाली. रुद्र आयुष्याबद्दल तिच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं.

रुद्र तिच्या केबिनमधून तिरमिरीतच बाहेर पडला. मनात कमालीची अस्वस्थता होती.

“आज कोणीतरी पहिल्यांदा आपल्याला या भाषेत बोललंय. आजवर कधी कोणाला माझ्यासमोर तोंड वर करून बोलायची हिंमत नव्हती पण ही मिस तन्वी मला फाडफाड बोलली. समजते काय स्वतःला? बॉसशी कसं बोलावं हेही कळत नाही?”

त्याच्या केबिनचा दार जोरात लोटून आत येत खुर्चीत बसता बसता तो बडबडला. रागाने तो लालबुंद झाला होता. थोडा वेळ असाच शांततेत गेला. राग निवळू लागला आणि तो पूर्वपदावर आला.

“पण तिचं खरंच चुकलं होतं? आपण तिच्यावर रागावलो हे योग्य होतं? तिने नेमून दिलेली सगळी कामे चोख केली होती. आपण तिच्यावर उगीच रागावलो. माझंच चुकलं.”

त्याच्या आतल्या मनाने प्रश्न केला आणि त्याचं त्यालाच उत्तर मिळालं. त्याच्या हृदयाने तो चुकल्याचा कबुली जबाब दिला होता.

“सॉरी म्हणू? नाही मी या कंपनीचा सीईओ आहे आणि मी तिला सॉरी का म्हणू?”

तो जागेवरून उठून पुन्हा बसला. मनातला पुरुषी अहंकार त्याला तसं करू देत नव्हता पण तन्वीला दुखावल्याचं शल्य त्याला स्वस्थही बसू देत नव्हतं. तो त्याच्या खुर्चीतून उठून बाहेर जाणार इतक्यात त्याला तन्वी त्याच्या केबिनच्या दिशेने येताना दिसली. तिच्या हातात कसलातरी पेपर होता.

“अरे! ही खरंच राजीनामा तर देत नाहीये ना? ते तिच्या हातात काय आहे? खरंच ती खूप दुखावली गेलीय. तिने ही गोष्ट जर शेखर सरांना सांगितली तर त्यांनाही माझ्याबद्दल गैरसमज होणार. काय करावं?

रुद्र विचार करत असताना केबिनच्या दारावर टकटक झाली.

“मे आय कम इन सर?”

“येस कम इन..”

तन्वी आत आली. तो काही बोलायला सुरुवात करणार इतक्यात तन्वीच्या तोंडून आपसूक शब्द बाहेर पडले.

“सॉरी.”

रुद्रने तिच्याकडे चमकून पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरलं.

“मिस तन्वी, जे झालं, ते चुकीचं होतं. मी तुमच्यावर इतकं चिडायला नको होतं. तुम्ही राजीनामा देऊ नका.”

“आरके, मी तुम्हाला हे कोटेशन दाखवायला आले होते. तुम्हाला काय वाटलं? माझा राजीनामा?”

ती गालातल्या गालात हसली.

“चला, म्हणजे मतभेद मिटले असं समजू? या निमित्ताने एक कॉफी?”

तिने हसून मान डोलावली. रुद्रने तन्वीला समोरच्या खुर्चीत बसायला सांगितलं आणि टेबलवरच्या इंटरकॉमवरून सुजाताला कॉल केला.

“केबिनमध्ये दोन कॉफी पाठवून द्यायला सांग.”

“ओके सर.”

असं म्हणून सुजाताने कॉल कट केला. थोड्याच वेळात मनोहर दोन कॉफी घेऊन आत आला आणि टेबलवर कॉफीचे मग ठेवून निघून गेला.

“बाय द वे, तुम्ही का सॉरी म्हणालात? तुमची तर काहीच चूक नव्हती.”

कॉफीचा मग तिच्या समोर सरकवत रुद्रने विचारलं.

“आरके, मी तुम्हाला आवाज चढवून बोलायला नको होतं. तुम्ही चिडलेले असताना मी शांत राहायला हवं होतं पण मी रागाच्या भरात तुम्हाला उलट बोलले. मी असं बोलायला नको होतं. माझं चुकलं होतंच. प्लीज, मला माफ करा.”

तन्वीने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल आश्चर्य आणि आदर दोन्ही भाव दिसत होते. रुद्र काही बोलण्याच्या आत तन्वी पुन्हा म्हणाली,

“जाऊ देत सर, जे झालं ते झालं. आता पुन्हा असं घडणार नाही याची आपण काळजी घेऊ. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू. बरोबर ना?”

तिच्या वाक्यावर त्याने होकारार्थी मान डोलावली आणि कामाच्या काही फाईल्स दाखवत त्याने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं. थोड्या वेळाने काम संपवून तन्वी केबिनच्या बाहेर पडली. संध्याकाळ झाली सर्वजण आपापल्या घरी परतत होते. आज तोही लवकर घरी जाणार होता. त्याच्या त्या निळ्या डायरीत आज तो एक वाक्य लिहणार होता.

“आज एका नव्या नात्याची रुजवात झाली. वादविवादाने का असेना तिच्या आणि माझ्या नात्यात गोड साखरपेरणीला सुरुवात झाली.”

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all