तुजविण सख्या रे.. भाग ४

तुजविण सख्या रे..


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- प्रेमकथा
कथेचे नाव :- तुजविण सख्या रे..
निशा थोरे (अनुप्रिया)


तुजविण सख्या रे.. भाग ४

तन्वीच्या एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली होती. नवीन शहर, अनोळखी भाषा, अनोळखी ऑफिसचं वातावरण, अनोळखी माणसं या साऱ्या गोष्टींचा तिला मेळ बसवायचा होता. सारं तिला एकटीला निभावून न्यायचं होतं. एक सुरभी सोडली तर तिथे कोणीच असं ओळखीचं, जिवाभावाचं नव्हतं. हळूहळू तन्वी नव्या शहरात, नव्या ऑफिसमध्ये रुळू लागली. नवीन ऑफिसमधल्या लोकांची, तिथल्या वातावरणाची तिला सवय होऊ लागली.

शेखरसर खूप शांत स्वभावाचे पण कामात मात्र खूप कडक शिस्तीचे होते. दिसायला रुबाबदार, नीटनेटकं राहणीमान साधारण तिशी पस्तीशीच्या वयाचे, चालण्या बोलण्यात एक विशेष जरब दिसून यायची. हळूहळू तन्वीला शेखर सरांच्या कामाचं नियोजन, त्यांच्या मिटींग्स, विझिट्स शेड्युल करणं जमू लागलं. त्याचसोबत तन्वी ऑफिसची बाकीची कामेही पाहू लागली. एच आर मॅनेजर सोबत राहून ती सगळ्या प्रोसेस नीट समजावून घेत होती. कामगार वर्गाशी संवाद वाढवून त्यांच्या समस्या समजून घेत होती. फार कमी वेळात तिने ऑफिसच्या बऱ्याच गोष्टी अवगत करून घेतल्या होत्या. प्रत्येक मिटिंगमध्ये सहभागी होऊन तिचे पॉईंट्स काढून शेखर सरांना देणं, त्यावर चर्चा करणं, तोडगा काढणं तिला आवडू लागलं. शेखर सरांनाही तिची स्वतःला झोकून देऊन काम करण्याची पद्धत, जिज्ञासूवृत्ती, शांतपणे आपले मुद्दे मांडण्याची शैली आवडू लागली. फार कमी अवधीत तन्वी तिच्या मनमोकळ्या लाघवी स्वभावामुळे ऑफिसमधल्या कर्मचारी वर्गात आवडती कर्मचारी झाली. तिने सर्वांशी छान नातं बनवलं होतं. एकीकडे इतर लोकांशी तिचे सूर जुळू लागले होते. तर दुसरीकडे लोकांच्या चांगल्या वाईट स्वभावाचा अनुभवही तिला येत होता. तिथे जशी चांगली माणसं होती तशी वाईट विचारांची राजकारणी माणसंही होतीच.

शेखर सर जितके मृदू स्वभावाचे होते तितकाच रुद्र शीघ्रकोपी होता. कामचुकारपणा, बेशिस्तपणा, हलगर्जीपणा तो बिलकुल खपवून घ्यायचा नाही. राग तर नाकाच्या शेंड्यावरच बसलेला. मनासारखं नाही झालं की त्याची आदळआपट सुरू व्हायची. सर्व वरिष्ठ, कनिष्ठ सहकाऱ्यांना तो धारेवर धरायचा. त्याने सांगितलेल्या कामाचे रिझल्ट त्याला लगेच हवे असायचे. छोट्या छोट्या गोष्टींवर तो पटकन व्यक्त व्हायचा. त्याच्या रागाला सर्वचजण घाबरून होते पण अतिशय हुशार असल्याने आज तो कंपनीच्या सीईओची जबाबदारी अतिशय चोखपणे बजावत होता. शेखर सरांच्या जवळचा अतिशय विश्वासू माणूस होता. शेखर सरांच्या अनुपस्थितीतही तो उत्तमरित्या कंपनी सांभाळत असल्याने आजवर त्याला कोणीच विरोध केला नव्हता. सर्वजण शेखर सरांइतकाच त्यालाही मान देत होते. तन्वीलाही रुद्रच्या स्वभावाची कल्पना आली होती. रोज त्याचं कोणा ना कोणावर तरी चिडणं, रागावणं सुरू असायचं. त्याच्या केबिनमधला आवाज संपूर्ण ऑफिसमध्ये घुमायचा.

“किती चिडतात सर!, सारखे कोणावर तरी डाफरत असतात. सारखं सारखं इतरांवर चिडून कंटाळा कसा येत नाही यांना? जाऊ दे. आपण कामाशी काम ठेवू. आपलं काम नीट करू. त्यांना रागावण्याची संधीच द्यायची नाही.”

तन्वी रोज स्वतःलाच बजावत असे. कामात चूक होऊ नये म्हणून ती तिचं काम काळजीपूर्वक करत असे पण एक दिवस काय घडलं कोणास ठाऊक! रुद्र रागारागात तन्वीच्या केबिनमध्ये आला. तन्वी उठून उभी राहिली.

“मिस तन्वी, मी तुम्हाला शेखर सरांचं पुढच्या महिन्याचं शेड्युल विचारलं होतं. त्यावरून मला माझं शेड्युल त्यांना सांगायचं होतं. आम्हा दोघांना क्लाईंट्स विझिट्स ठरवायच्या होत्या. किती वेळ लागतोय तुम्हाला? काम करता की झोपा काढता? आणि ती एस.के. डेव्हलपर्सच्या प्रोजेक्टची फाईल? शहा अँड शहा कंपनीच्या विझिटचं शेड्युल? काय झालं त्याचं? एकही काम धड नाही. काय चाललंय तुमचं? जमत नसेल तर नोकरी सोडून द्या. समजलं?”

तो चिडून म्हणाला तसं तन्वीच्या डोळ्यात पाणी दाटू लागलं.

“झालं! जरा रागवलं नाही की रडायला सुरू. तुम्ही मुलीं पण ना! जरा काही झालं नाही तर लगेच अश्रू नावाचं शस्त्र काढून तयारच असता. लगेच सहानुभूती मिळवायची असते म्हणूनच मी या पोस्टसाठी मुलीची निवड नको म्हणत होतो.”

तो तन्वीवर खूप चिडून बोलत होता.

“एक्सक्यूज मी सर, प्लीज शांत व्हा. सरांचं शेड्युल तयार आहे. एसकेची फाईल मी मनोहरला तुमच्या टेबलवर ठेवायला सांगितलीय. त्याने ती तुमच्या टेबलवर ठेवलीय. पुढच्या आठवड्यात मिस्टर शहा यांची अपॉइंटमेंट फिक्स्ड केलीय. तसा त्यांना मेलही केलाय आणि त्याची तुम्हालासुद्धा कॉपी मार्क केली आहे.”

तिचं बोलणं ऐकून रुद्र थोडा वरमला.

“ठीक आहे.”

इतकंच बोलून तो केबिनच्या बाहेर जाऊ लागला. इतक्यात डोळ्यांतलं ओघळून गालावर आलेलं पाणी पुसत तन्वी म्हणाली,

“एक मिनट सर, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय.”

प्रश्नार्थक नजरेने त्याने तिच्याकडे पाहिलं.

“सर, तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. तुम्ही न पाहताच आरडाओरडा करायला सुरुवात केलीत. एकदा तुम्ही सर्व मेल चेक केले असते तर बरं झालं असतं ना! तुमचा इतका त्रागा नसता झाला.”

“शट अप मिस तन्वी, उलट रिप्लाय देताय मला? याचे परिणाम काय होतील, माहितेय का तुम्हाला? यू विल बी फायर्ड.”

“का? काय केलंय मी? माझी काहीच चुक नसताना तुम्ही मला असं तडकाफडकी नोकरीवरून का काढून टाकाल? सर, तुम्ही असं करू शकत नाही. माफ करा सर, थोडं स्पष्टच बोलते, प्रॉब्लेम माझ्यात नाही, तुमच्यात आहे. तुम्ही मला शांतपणे विचारू शकला असता पण नाही, तुम्हाला फक्त चिडून बोलायचं असतं. सर्वांवर ओरडून बोलल्यावरच कामं होतात असं तुम्हाला वाटतं का? आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, मुली जास्त हळव्या असतात म्हणून चटकन डोळ्यात पाणी येतं याचा अर्थ असा नाही की आम्ही कमकुवत असतो. सर, मला असली फुसकी हत्यारं वापरून सहानुभूती मिळवण्याची काहीही गरज नाही. माझं स्पष्ट बोलणंच पुरेसं आहे. आर के सर, आम्ही तुमच्या इथे नोकरी करतो म्हणजे आम्ही तुमचे गुलाम आहोत असा अर्थ होत नाही. आम्हालाही आमचा स्वाभिमान आहे आणि तो गमावून मी इथेच काय तर कुठेही काम करू शकत नाही किंबहुना मला करायचंच नाही. मीच माझ्या पदाचा राजीनामा देते. ठीक आहे?”

तिच्या डोळ्यातून अश्रूरुपी अंगार बरसत होता. तो काहीच न बोलता तिच्या केबिनमधून निघून गेला.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all