तुजविण सख्या रे.. भाग ३

तुजविण सख्या रे..


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- प्रेमकथा
कथेचे नाव :- तुजविण सख्या रे..
निशा थोरे (अनुप्रिया)


तुजविण सख्या रे.. भाग ३


“हॅलो दादा, एक गुड न्यूज आहे. माझं सिलेक्शन झालं. उद्यापासून जॉईन करायला सांगितलंय.”

“अरे व्वा, मस्तच! छान झालं. आता मी सुरभीला कॉल करून सांगतो. तू तिच्यासोबतच रहा. अनोळखी शहर आहे. आपल्या ओळखीचं कोणीतरी असलं म्हणजे तुलाही बरं पडेल. तिचा नंबर आणि ऍड्रेस तुला मेसेज करतो. तूही बोलून घे.”

तन्वीचा दादा पलीकडून म्हणाला.

“हो दादा, मी सुरभीशी बोलते. तू आईला सांग माझी काळजी करू नकोस. मी ठीक आहे. सुरभीकडे गेले की कॉल करेन. बाय दादा.”

तन्वी खूप खूष होती. तिने लगेच तिच्या घरी कॉल करून नोकरी मिळाल्याची आनंदाची बातमी कळवली. घरीही सर्वांना आनंद झाला होता आणि का होणार नाही! पेडणेकर घराण्यातली पहिली मुलगी उच्च शिक्षण संपवून नोकरीसाठी घराबाहेर पडली होती. तिची जिद्दच तिला इतक्या मोठ्या कंपनीत नोकरीसाठी घेऊन आली होती. तिच्या स्वप्नांचा एक टप्पा तिने पार केला होता. सुरभीला कॉल करून दादाने तिच्या राहण्याची सोय केली होती. तन्वीच्या ऑफिसपासून सुरभीचं घर बरंच लांब होतं. रोज येऊन जाऊन साधारणपणे दोन एक तास प्रवासातच मोडणार होते पण सुरभीबरोबरच राहायचं अशी तन्वीच्या दादाने तंबीच दिली होती. सुरभी दादाची कॉलेजमधली मैत्रीण होती. नोकरीनिमित्त त्या शहरात आली होती. त्यामुळे तन्वीला त्याच शहरात नोकरी मिळाल्याने तिच्या दादाला थोडं हायसं वाटलं होतं. तन्वी त्याच्या ओळखीच्या मैत्रिणीसोबत, सुरभीसोबत राहणार होती. अखेर तन्वी आपलं सामान घेऊन सुरभीच्या फ्लॅटवर राहायला आली.

“या या.. तन्वी मॅडम. या नवीन शहरात तुमचं हार्दिक स्वागत आहे.”

सुरभी मिश्किलपणे म्हणाली तशी तन्वी खळखळून हसली. सुरभीने तिचं मस्त स्वागत केलं. तिलाही एक छान रूममेट मिळाली होती. एका नव्या मैत्रीची रुजवात झाली होती.

दुसऱ्या दिवशी तन्वी ऑफिसला जाण्याची तयारी करू लागली. तिने अंगावर सलवार कमिज चढवला आणि आरशासमोर उभी राहून केस विंचरू लागली. इतक्यात सुरभी तिथे आली.

“अगं हे काय सलवार कमिज! तन्वी, तू एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणार आहेस. असं काकूबाई सारखं तयार होऊन कसं चालेल? वेगळे आउटफिट्स घेतले पाहिजेत. हे असले नकोत.”

“यात काय वाईट आहे? छान तर आहेत आणि आपण तिथे काम करायला जाणार आहोत. फॅशन शो नाहीये तिथे.”

“हो माहितीये मला. पण ऑफिसवेअर आउटफिट्स असायला हवेत. आपण प्रेझेंटेबल असायला हवं. समजलं? आज तू ऑफिसवरून आलीस की आपण शॉपिंगला जाऊ तुझ्यासाठी चांगले नवीन कपडे घेऊ. चालेल?”

“हो बाई जाऊ या. तू म्हणशील तसं करूया आणि मला काही पुस्तकं घ्यायचीत. ते पण पाहूया.”

तन्वी हसून म्हणाली आणि तिच्या तयारीला लागली. थोड्याच वेळात तन्वी ऑफिसला पोहचली. एच आर असिस्टंट सुजाताने तिच्या जॉइनिंगच्या साऱ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि सर्व स्टाफची ओळख करून दिली.

“ह्या मिस तन्वी पेडणेकर आजपासून आपल्या ऑफिसमध्ये आपले एमडी शेखर बजाज यांच्या पर्सनल असिस्टंट म्हणून जॉईन झाल्या आहेत. तन्वी मॅडम, मी तुम्हाला सर्वांची ओळख करून देते.”

असं म्हणत सुजाताने एकेक करून सर्वांची ओळख करून दिली. त्यानंतर सुजाता तिला घेऊन सीईओच्या केबिनच्या बाहेर थांबली. केबिनच्या दारावर टकटक केलं.

“मे आय कम इन सर?”

त्याने खुणेनेच त्या दोघींना आत यायला सांगितलं.

सुजाता आणि तन्वी आत आल्या.

“सर, ह्या मिस तन्वी पेडणेकर, आजपासून आपल्याला जॉईन करताहेत आणि मिस तन्वी, हे आपले सीईओ रुद्र कर्वे सर्वजण यांना ‘आरके’ या नावानेच संबोधतात.”

“हॅलो सर, गुडमॉर्निंग.”

तन्वीने रुद्रकडे पाहिलं. तो कसल्यातरी फाईलमध्ये डोकं घालून बसला होता. तिच्याकडे न पाहताच तो म्हणाला,

“व्हेरी गुडमॉर्निंग मिस तन्वी, सर्व स्टाफची ओळख झाली? काम समजून घेतलंत? तुम्ही शेखर सरांना असिस्ट करणार आहात. कामात काहीही चुक होता कामा नये. मला कामात चुक आवडत नाही. शेखर सरांच्या कामाचं, मिटींग्सचं शेड्युल तयार करण्याचं महत्वाचं काम तुमच्याकडे आहे. पर्सनल असिस्टंट हा डायरेक्टरचाच चेहरा असतो. कपंनीच्या डायरेक्टर इतकाच महत्वाचा असतो तेंव्हा त्यांची प्रतिमा जपणं हे जोखीमचं काम तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुमच्या कोणत्याही वर्तनामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का लागणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. समजलं?”

“हो सर, मी नक्कीच काळजी घेईन. तुम्हाला तक्रार करण्याची कोणतीही संधी देणार नाही.”

तन्वीने उत्तर दिलं.

“सुजाता, त्यांना त्यांची केबिन दाखव आणि शेखर सरांची कामे नीट समजावून सांग.”

सुजाताने होकारार्थी मान डोलावली. त्याच्या आवाजात एक विशेष जरब होती.

“किती खडूस आहे हा! जितका हँडसम आहे तितकाच रुड वाटतोय. साधी एक नजर वर करून पाहिलं नाही की चेहऱ्यावर साधी एक स्माईलही आली नाही. एका पाठोपाठ नुसत्या ऑर्डर सोडतोय. कमाल आहे! जाऊ दे आपल्याला काय त्याचं! थोडी ना त्याच्याशी सोयरीक साधायचीय! आपलं नेमून दिलेलं काम करत राहायचं बस्स! देवा, कसं होणार माझं, ते तुलाच रे ठाऊक!”

तन्वी मनातल्या मनात पुटपुटली.

“काही म्हणालात का मिस तन्वी?”

“नो.. नो सर.”

“मग ठीक आहे. या तुम्ही.”

“थँक्यू सर.”

असं म्हणत तन्वी आणि सुजाता तिथून बाहेर पडल्या. सुजाताने तन्वीला तिचं आणि शेखर सरांचं केबिन दाखवलं. तिचं काम समजावून सांगितलं आणि ती तिच्या जागेवर निघून गेली. तन्वी आपल्या खुर्चीत बसली. पर्समधून बाप्पाची छोटी मूर्ती बाहेर काढून टेबलवर ठेवली. मनोभावे हात जोडून तिने नमस्कार केला आणि तिच्या कामाला सुरुवात केली.

रुद्र मात्र तन्वीला दुरूनच न्याहाळत होता. त्याच्या केबिनसमोरच तिची केबिन होती. ती त्याला पाहताक्षणीच आवडली होती. मुलाखत घेत असतानाच तिचा शांत स्वभाव, निरागस हास्य चेहऱ्यावरचा आत्मविश्वास त्याला भावला होता. हृदयाच्या तारा तेंव्हाच झंकारल्या होत्या. घरी आल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी त्याने त्याच्या कपाटाच्या ड्रॉवरमधून निळ्या रंगाची डायरी बाहेर काढली. मनातलं आपोआप पानावर उतरलं.

“आणि मी जिची वाट पाहत होतो, ती सोनपरी चोरपावलाने माझ्या आयुष्यात आली.”


पुढे काय होतं? रुद्रा आणि तन्वी दोन विरुद्ध टोक असलेल्या दोन जीवांत प्रेम फुलेल? पाहूया पुढील भागात?

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all