तुजविण सख्या रे भाग - १

तुजविण सख्या रे..


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- प्रेमकथा
कथेचे नाव :- तुजविण सख्या रे..
निशा थोरे (अनुप्रिया)


(सदर कथेतील पात्र, व्यक्ती, घटना, नावे, प्रसंग सर्व काल्पनिक आहेत. ही कथा फक्त मनोरंजनाच्या हेतूने लिहिलेली आहे. त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

तुजविण सख्या रे.. भाग - १

"हे बघ तन्वी, हा आपला शेवटचा कॉल. तुला जे काही बोलायचंय ते आताच बोल. मला तुझ्याशी एक शब्दही बोलायची इच्छा उरलेली नाहीये. आजनंतर आपल्यात कोणतंच नातं नसेल. अगदी मैत्रीचंही नाही. यापुढे तू मला फोन करायचा नाही, मेसेज करायचा नाही. तन्वी, लक्षात घे आपल्यातलं नातं संपलंय.”

तो तिच्याशी तावातावाने बोलत होता. ती मात्र निःस्तब्ध उभी होती. कानात कोणीतरी उकळतं तेल टाकावं तसं तिला वाटलं. डोळ्यातून आसवांचा पूर वाहत होता.

“नको ना रुद्रा, का इतका चिडतोयस? प्लिज असं बोलू नकोस रे! माझं काय चुकलंय ते तरी सांग? का असा वागतोयस?”

“का? तुला खरंच काही माहित नाही? जाऊ दे मग तो विषय नकोच. हे बघ, मला हे असं बळजबरीचं नातं पुढे न्यायचं नाही. मी तुझ्याशी ब्रेकअप करतोय. आजपासून तुझा माझा काही संबंध नाही. यापुढे मला तुझं तोंडही पहायचं नाही.”

“अरे पण नेमकं झालंय काय? इतका राग का भरलाय तुझ्या मनात? गेली दोन वर्ष आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत आणि आताच काय झालंय तुला? अगदी नातं तोडून टाकण्याइतकं मी काय केलंय?”

“हो झालंय पण तुला ते समजत नाहीये याचंच मला खूप आश्चर्य वाटतंय. आता तर मी तुला काही सांगावं इतकी तू माझ्यासाठी महत्वाची राहिली नाहीस आणि माझं काही ऐकून घेणं तुझ्यासाठीही तितकं गरजेचं उरलं नाही. यापुढे मी तुझ्यावर कोणताच अधिकार सांगणार नाही. मी तुझ्यावर कसलीच बंधनं लादणार नाही. तुला हवं तसं जग आणि मलाही माझ्या मनासारखं जगू दे. गुडबाय.”

असं म्हणून त्याने खाडकन फोन ठेवून दिला.

“अरे पण माझं ऐकून तर घेशील…”

तन्वीचे शब्द तोंडातच विरून गेले. तिचं काही ऐकून घेण्याऐवजी तिलाच सुनावून त्याने कॉल कट केला होता. तन्वी मटकन खाली पलंगावर बसली. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. तन्वी विचार करू लागली. प्रश्नांचा ससेमिरा तिची पाठ सोडत नव्हता. मनाचे वारू भूतकाळाच्या दिशेने धावू लागले. तीन वर्षापूर्वीच्या साऱ्या घटनावळी, जुन्या आठवणी नजरेसमोर फेर धरू लागल्या. ‘पर्सनल असिस्टंट’च्या पदाच्या मुलाखतीसाठी स्वागतिका कक्षेत बसलेली लाजरीबुजरी तन्वी तिला दिसू लागली.

“मिस तन्वी, तुम्ही मुलाखतीसाठी आत जाऊ शकता. बेस्ट ऑफ लक मॅडम..”

रिसेप्शनिस्टने तिला किंचित हसून शुभेच्छा देत आत जायला सांगितलं. ती आत आली. समोर मुलाखत घेण्यासाठी सारे वरिष्ठ मंडळी बसली होती. तिला बसायला सांगितलं.

“थँक्यू सर..”

सर्टिफिकेट्सची फाईल टेबलवर ठेवत खुर्ची पुढे ओढून ती शांतपणे बसली. गुलाबी रंगाचा चुडीदार तिच्या गोऱ्या रंगावर अधिकच खुलून दिसत होता. चाफेकळी नाक, गालावर गोड खळी, पाणीदार काळेभोर बोलके डोळे, नाजूक गुलाबी ओठांच्या पाकळ्या. कानात अमेरिकन डायमंड जडलेले सुंदर एअरिंग्स, हातात नाजूक ऑक्सिडाईजचं ब्रेसलेट, काळेभोर मोकळे सोडलेले केस, वाऱ्याने अधूनमधून चेहऱ्यावर येणारी केसांची बट कानामागे ती सारत होती. आणि मुलाखतीला सुरुवात झाली.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all