तुजविण सख्या रे.. भाग १४ (अंतिम)

तुजविण सख्या रे..



अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- प्रेमकथा
कथेचे नाव :- तुजविण सख्या रे..
निशा थोरे (अनुप्रिया)

तुजविण सख्या रे.. भाग १४ (अंतिम)

रुद्रने मागे वळून पाहीलं.

“तन्वी तू?”

तन्वीला समोर पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. तोंडातले शब्द तोंडातच विरून गेले.

“संशय, संशय आणि फक्त संशय. हा संशयच चांगल्या नात्याला सुरुंग लावतो. तुमच्यासारख्या संशयी पुरुषांमुळेच आम्हा बायकांचा साऱ्या पुरुषजातीवरचाच विश्वास उडत चाललाय. प्रभाचा बॉस कोण आहे हे पाहण्याची सुद्धा तुम्ही तसदी घेतली नाहीत. लगेच बायकोवर आरोप करून मोकळे झालात कारण तुम्ही पुरुष सॉफ्ट टार्गेट शोधत असता. स्त्री म्हटली की चारित्र्यावर घाला घालायला तुम्ही मोकळे. तुम्हाला माहित आहे तिच्या कॅरेक्टरवर बोट ठेवलं की ती कमकुवत होणार. कमजोर पडणार. तुमच्याजवळ असलेल्या संकुचित विचारांच्या बुद्धीची मला खरंच खूप कीव येतेय.“

तन्वी चिडून बोलत होती. रुद्र खजिल झाला.

“पण प्रभा, तू कधीच काही बोलली नाहीस की तुझा बॉस एक पुरुष नसून एक स्त्री आहे.”

“त्याने काय फरक पडतो? स्त्री असो वा पुरुष प्रत्येकवेळी त्या एकाच नजरेतून पाहायला हवंच का? तुझा माझ्यावर विश्वास नव्हता? अरे इतकी वर्ष आपण सोबत आहोत हीच पारख केलीस माझी?”

प्रभा चिडून म्हणाली.

“पडतो प्रभा, फरक पडतो अगं. स्त्री पुरुष यांच्यातल्या नात्याला एकाच दृष्टीने पाहण्याची यांना सवय लागलीय. प्रभा, ज्यावेळी तू मुलाखत दिलीस. त्यावेळेस तुझी आर्थिक परिस्थिती आम्हाला समजली होती. तुला या नोकरीची किती गरज आहे आणि त्याचबरोबर तुझ्याजवळ असलेली तुझी योग्यता हेही आम्हाला माहित होती म्हणून मग तुझी निवड केली पण इथे तर चित्रं वेगळंच दिसतंय. तुझ्या यजमानांनी कधीच तुझी कदर केली नाही. मुळात यांचा तुझ्यावर विश्वासच नाही.”

प्रभाच्या डोळ्यात पाणी साठू लागलं. तन्वी पुढे बोलत होती.

“प्रभा, मलाही या संशयाचं फटका बसलाय. आपण प्रामाणिकपणे नातं निभावत असतो पण समोरचा आपल्यावर संशय घेऊन आपल्याच चुकीचं ठरवत असतो. नातं कोणतंही असो ते सहजपणे स्वीकारलं की त्यातून एक आत्मिक आनंद मिळतो. नात्यातली सहजताच नाती टिकवून ठेवते पण हे स्वीकारणंही दोन्हीकडून हवं नां! नाहीतर एकतर्फी प्रेमही काय कामाचं? हे एकतर्फी नातं टिकवण्याचा नादात आपण लाचार होतो गयावया करू लागतो पण समोरचा बेफिकीर.. आपण मात्र मनाने खचत जातो. वेड लागेल की काय अस वाटू लागतं.”

तन्वी डोळे ओसंडून वाहू लागले. तन्वीचे शब्द रुद्रच्या मनावर सपासप वार करत होते.

“नाती आपल्याला घडवत असतात की आपण नात्यांना? संभ्रमाचा विषय पण जोपर्यंत नातं असतं तोपर्यंतच सगळं. एकदा तुटलं की संपलं सगळं. प्रभा, नातं कोणतंही असो पण ते कधीच गरज म्हणून असू नये. गरजेपुरती बनलेली नाती खूप लवकर लोप पावतात गं. आधार देणारी नाती दुरावतात तेव्हा हतबल व्हायला होतं. ही नाती अविश्वास, इगोमुळे मरून जातात. नात्यांची किंमत शून्य होऊ लागते.”

तन्वीने क्षणभर थांबून रुद्रकडे पाहिलं. त्याने शरमेने खाली मान घातली.

“आपण प्रामाणिकपणे साथ निभावत राहतो आणि तरीही आपल्यावरच संशय घेतला जातो; आपल्यालाच चुकीचं ठरवलं जातं. अशावेळी ह्या धक्यातून सावरणं आणि पुन्हा उभं राहणं खरंच खूप कठीण गं! मी सावरले कारण माझा माझ्यावर विश्वास होता. माझ्या चरित्र्याला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाहीये. आज मी आय टी टेकनॉलॉजिसची मॅनेजिंग डायरेक्टर आहे. माझा स्वतःवर विश्वास होता म्हणूनच मी यापदावर पोहचू शकले. प्रभा, मी सावरले पण माझ्यासारख्या सगळ्याच सावरतील असं नाही नां!”

“अगदी खरंय मॅडम, तुम्ही सावरलात. तुम्ही तुमचा प्रवास एकटीने तुमच्या मनासारखा ठरवलात आणि त्यानुसार प्रत्येक संकटावर मात करत तो यशस्वीरित्या पारही केलात. ज्या स्त्रियांना समाजाने नाकारलं अशा स्त्रियांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिलेत आणि त्यांच्या मुलांसाठीही तुम्ही पाळणाघर केलंत त्यांच्या संगोपणाची जबाबदारीही तुम्ही मोठ्या मनाने स्वीकारलीत. मॅडम, मला अभिमान वाटतो की तुमच्यासारखी धडाडीची स्त्री माझी बॉस आहे.”

प्रभा सद्गदित होऊन म्हणाली.

“मिस्टर कर्वे, मी ज्याच्यावर प्रेम केलं. त्याने माझ्यावर विश्वास दाखवला नाही. अर्ध्या वाटेवर त्याने माझा हात सोडून दिला. लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याने माझ्यावर संशय घेतला. त्याने मला कधीच काही सांगितलं नाही. मूळात नातं असणं म्हणजे तरी नेमकं काय ओ? एकमेकांत संवाद असणं आणि तोच जर खुंटला तर नातं संपुष्टात येतं. माझ्याही बाबतीत तेच झालं. तो कदाचित माझ्याशी बोलला असता तर मी त्याला सत्य सांगितलं असतं पण तो काहीच न बोलता बरंच बोलून गेला. त्याच्या डायरीतले प्रत्येक शब्द मनावर घाव करत राहिले पण त्या घावाने मी कणखर बनत होते. मी माझा खडतर प्रवास पूर्ण केला; या प्रवासात मी पडले, धडपडले अगदी रक्तबंबाळही झाले पण तरीही मी उभी राहिले. चालत राहिले. अगदी त्याच्याविना मी सगळं सोसत राहिले. आपल्या जोडीदाराशिवाय मी एकटी चालत राहिले. जोडीदाराशिवायचा प्रवास किती भीषण असतो याची तुम्हाला कल्पना नाही. तुम्ही ती चूक करू नका. आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवा. एकदा गेलेले क्षण परत येत नाहीत. वेळ निघून गेली की सगळं कवडीमोल ठरतं अगदी जिवाभावाचं नातंही.”

तन्वीने डोळे पुसले. टेबलवरची फाईल उचलली. एकदा तिने रुद्रकडे पाहिलं. त्याच्या नजरेत तिला पश्चाताप दिसत होता.

“तन्वी मी चुकलो गं. मी तुला ओळखू शकलो नाही. प्लीज मला एकदा माफ कर. या चुकीचं गिल्ट कायम माझ्या मनात राहील. सतत मला बोचत राहील.“

तो तन्वीशी बोलणार इतक्यात तन्वी त्याच्याकडे न पाहता तिथून निघून गेली. प्रभा आणि रुद्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे भरल्या डोळ्यांनी पाहत राहिले. रेस्टोरंटमध्ये लावलेल्या टेलेव्हिजनवर मराठी मालिकेचं टायटल सॉंग ऐकू येत होतं.

आस तुझी,
ध्यास तुझा ,
भेटशील ना रे ..................
स्वप्न राहील अपुले
तुजविण सख्या रे
तुजविण सख्या रे

समाप्त
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all