तुजविण सख्या रे.. भाग १३

तुजविण सख्या रे..


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- प्रेमकथा
कथेचे नाव :- तुजविण सख्या रे..
निशा थोरे (अनुप्रिया)

तुजविण सख्या रे.. भाग १३


दिवसेंदिवस रुद्र आणि प्रभाच्या नात्यात वितुष्ट येत होतं. खरंतर प्रत्येक नात्यांची वेगळी भाषा, वेगळी बोली असते आणि तेच नाही समजलं तर अविश्वासाचा भस्मासूर फोफावत जातो. रुद्रच्या बाबतीतही तेच घडत होतं. संशयाच्या व्याधीने तो ग्रस्त झाला होता. त्याच्या संशयाला खतपाणी घालणाऱ्या घटना वारंवार घडत होत्या. आजही असंच एक कारण त्याला संशय घ्यायला मिळालं होतं.

रविवारचा दिवस होता. प्रभाला ऑफिसला सुट्टी होती. रविवार असल्यामुळे आज प्रभा निवांत उठली होती. काल रात्रीच तिने इडलीचं पीठ तयार करून ठेवलं होतं. रविवार स्पेशलमध्ये आज इडली चटणीचा बेत तिने आखला होता. थोड्याच वेळात रुद्र फ्रेश होऊन बाहेर हॉलमध्ये बसला. प्रभाने स्वराला आंघोळ घातली. तिला तयार केलं आणि एकीकडे गॅसवर इडलीचा कुकर चढवला आणि दुसरीकडे खोबऱ्याची चटणी बनवायला घेतली. गरमागरम इडली चटणीची डिश घेऊन ती हॉलमध्ये आली. टेबलावर ट्रे ठेवला आणि ती स्वराला घेऊन सोफ्यावर बसली. तिने रुद्रला नाष्टा दिला आणि ती स्वराला इडली भरवू लागली. सर्वजण शांतपणे नाष्टा करत होते इतक्यात प्रभाच्या मोबाईलची रिंग झाली. रुद्रचं तिकडे लक्ष गेलं. प्रभाने स्वराला सोफ्यावर बसवलं आणि तिने कॉल घेतला. बोलत बोलत ती जागेवरून उठली आणि किचनच्या दिशेने चालू लागली. थोडा वेळ बोलून तिने कॉल कट केला.

“रुद्र मला ऑफिसला जावं लागेल. अर्जंट काम आलंय. तू स्वराला सांभाळशील का?”

तिने रुद्रकडे पाहिलं. त्याने तिच्याकडे न पाहताच उत्तर दिलं.

“नाही. तिला शेजारच्या काकूंकडे सोड. मलाही बाहेर जायचंय. एका क्लाईंटबरोबर मीटिंग आहे. ती मीटिंग माझ्यासाठी खूप महत्वाची आहे.”

“अरे मलापण जावं लागेल. महत्वाचं काम आहे.”

प्रभा काकुळतीला येऊन म्हणाली.

“आज रविवारी? सुट्टीच्या दिवशी?”

“हो आहे. मला जावं लागेल तू समजून घे.”

रुद्र स्वराजवळ थांबायला तयार नव्हता म्हणून मग शेवटी तिने स्वराला शेजारच्या काकूंजवळ ठेवलं आणि ती घरातून बाहेर पडली. रुद्रने प्रभाचा पाठलाग करायचं ठरवलं. ती घराबाहेर पडल्या पडल्या रुद्रही लगेच तिच्या मागे गेला. आडोशाला उभे राहून तिच्यावर पाळत ठेवून होता. प्रभा चालता चालता फोनवर बोलत होती. इतक्यात तिने रिक्षा थांबवली. रिक्षाड्राईव्हरशी बोलून ती रिक्षात बसली. रिक्षा रुद्रच्या डोळ्यासमोरून भुर्रकन निघून गेली. रुद्रने पटकन दुसरी रिक्षा केली.

“त्या रिक्षाचा पाठलाग कर.”

घाईने रिक्षात बसत त्याने रिक्षाड्राईव्हरला सांगितलं. रिक्षाड्राईव्हरने मीटर फिरवला आणि रिक्षा स्टार्ट केली. रिक्षा प्रभाच्या रिक्षाचा पाठलाग करत वेगाने धावत होती. रुद्रचं पूर्ण लक्ष त्याच्या पुढे धावणाऱ्या रिक्षाकडे होतं.

“अरे हे काय! प्रभाची रिक्षा तिच्या ऑफिसच्या रस्त्याने जात नाहीये. प्रभा मला ऑफिसमध्ये काम आहे असं म्हणाली होती पण मग ऑफिसला न जाता कुठे चालली आहे? ऑफिसच्या नावाखाली प्रभा?”

तो मनातल्या मनात पुटपुटला. इतक्यात प्रभाची रिक्षा एका मोठ्या रेस्टोरंटसमोर थांबली. ती रिक्षातून उतरली. रिक्षाड्राईव्हरला रिक्षाभाडं दिलं आणि ती रेस्टोरंटच्या आतल्या दिशेने चालू लागली. रुद्रही मागोमाग आला आणि ती काय करतेय ते पाहू लागला. प्रभाने पर्समधून मोबाईल काढला आणि चालता चालता ती कोणाशीतरी बोलत होती.

“अच्छा, आल्याचं कळवत असेल. प्रभा तू सुद्धा? सगळ्या साल्या एकजात सारख्याच.पैसा, संपत्ती, प्रतिष्ठेच्या मागे धावणाऱ्या!”

तो मनातल्या मनात चरफडून म्हणाला. पुन्हा त्याच्या मनातल्या संशयाने डोकं वर काढलं. प्रभा आत गेलेली पाहताच रुद्रही पाठोपाठ आत गेला. सकाळची वेळ असल्याने रेस्टोरंटमध्ये वर्दळ तशी कमीच होती.

“आज मी तिला रंगेहाथ पकडणारच. काय प्रकरण आहे तिच्या बॉससोबत ते मला पाहायचंच आहे. आज मी तिला जाब विचारणारच.”

मनाशी पक्का निर्णय करून तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला. रुद्रला असं अचानक समोर पाहून प्रभा आश्चर्यचकित झाली.

“रुद्र तू? इथे? तुझी मिटिंग..”

प्रभाचं वाक्य पूर्ण होण्याआधी रुद्र तिच्यावर संतापून ओरडला.

“हीच थेरं करायला बाहेर पडलीस का? नोकरीच्या नावाखाली काय चाललंय तुझं? तुला काय वाटलं तू माझ्या डोळ्यात धूळ फेकशील आणि मला काहीच कळणार नाही? डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजराला कितीही वाटलं त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही पण तसं नसतं. एक ना एक दिवस जगाला सत्य कळतंच. आज मला तुझं खरं रूप समजलंच. तुही तशीच निघालीस.”

“तशी म्हणजे कशी? काय म्हणायचंय तुला? याचा अर्थ तू पाठलाग करत होतास? तू माझ्यावर संशय घेतोयस रुद्र?”

“संशय नाहीये हा. माझी पूर्ण खात्री आहे. तू तुझ्या बॉससोबत इथे..”

“तोंड सांभाळून बोल रुद्र. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याआधी सत्यता तरी तपासून बघ. एकदा ऐकून तर घे.”

प्रभाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. आजूबाजूच्या टेबलवर असलेले एक दोन कस्टमर्स त्या दोघांकडे आश्चर्याने पाहू लागले.

“मला तुझं काही ऐकायचं नाही. मला जे समजायचं होतं ते समजलंय. मला तुझं तोंडही पाहायचं नाहीये. याचसाठी मी तुला नोकरी करण्यासाठी बाहेर पाठवत नव्हतो. सगळ्या बायका एकाच माळेच्या मनी. एकीला झाकावं आणि दुसरीला पुढे करावं. अशा आहात. एक जात स्वार्थी, फसव्या आणि लोभी. मला आता इथे एक क्षणही थांबायचं नाहीये.”

“का? ज्यासाठी तू माझा पाठलाग करत आलायस त्या माझ्या बॉसला पाहायचं नाही तुला? बघ तरी..”

प्रभा चिडून म्हणाली.

“नाही, चालू दे तुझं जे चाललंय ते. आजच्या नंतर तुझा माझा काही संबंध नाही. आजच मी वकिलाकडून घटस्फोटाचे पेपर्स तयार करून घेतो. सर्व बंधनातून तुला मोकळं करतो. मग त्यानंतर तू तुझ्या बॉससोबत हवं ते करायला मोकळी होशील. तुझ्या वाटेतला अडसर दूर होईल. कर जीवाची ऐश!”

रुद्रच्या मुठी आपोआप आवळल्या जाऊ लागल्या. तो तिथून निघून जाणार इतक्यात त्याच्यामागून टाळ्या वाजवत एक व्यक्ती पुढे आली.

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all