तुजविण सख्या रे.. भाग १२

तुजविण सख्या रे..


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- प्रेमकथा
कथेचे नाव :- तुजविण सख्या रे..
निशा थोरे (अनुप्रिया)

तुजविण सख्या रे.. भाग १२

दुसऱ्या दिवशी प्रभा तिच्या नवीन कंपनीच्या ऑफिसमध्ये गेली. तिथे तिच्या नियुक्तीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. तिच्या कामाविषयी पगाराविषयीचं बोलणं झालं आणि तिची त्या कंपनीत पर्सनल असिस्टंट म्हणून नियुक्ती झाली.

“अभिनंदन मॅडम, हे तुमचं अपॉइंटमेंट लेटर. तुम्ही कधी पासून जॉईन कराल? आजपासून?”

शेफालीने प्रश्न केला.

“थँक्यू सो मच मॅडम, इतकी मोठी संधी तुम्ही मला दिलीत! पण मी उद्यापासून आलं तर चालेल का? माझी एक लहान मुलगी आहे. आज तिची सोय पाहते आणि मग उद्या पासून येते. ठिक आहे ना?”

“हो चालेल. तुम्ही उद्यापासून आलात तरी काही हरकत नाही पण जर तुमच्या मुलीला सांभाळण्याचा प्रश्न असेल तर आपल्या कंपनीने समोरच्या बिल्डिंगमध्ये लहान मुलांसाठी बेबी सेटिंगची सोय केलेली आहे.”

“अरे व्वा! म्हणजे मी तिला माझ्या सोबत घेऊन येऊ शकते?”

“हो नक्कीच, म्हणजे तुमचा जीव टांगणीला लागून राहणार नाही आणि तुमचं कामही चांगलं होईल. चला मी तुम्हाला इथल्या स्टाफशी ओळख करून देते.”

शेफाली किंचित हसून म्हणाली. थोड्या वेळात शेफालीने प्रभाला सर्वांची ओळख करून दिली. रिपोर्टींग बॉसची ओळख झाली. प्रभाने सर्व प्रोसेस समजावून घेतल्या. थोड्या वेळाने ती घरी परत आली. स्वरा खूप रडत होती आणि रुद्र तिला जोजवण्याचा प्रयत्न करत होता. प्रभा आत आली. हातातली पर्स सोफ्यावर भिरकावून पटकन तिने स्वराला घेतलं.

“काय झालं पिल्लू? का रडतेय राणी? रडू नको हं.. मम्मा आलीय न आता. शांत हो शोना.”

प्रभा तिला थोपटून शांत करत होती.

“आता रोज असंच होणार का प्रभा? स्वराचे असे हाल होणार आहेत का?”

रुद्रने चिडून विचारलं.

“अरे नाही, उद्यापासून मी तिला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. आता वर्क फ्रॉम होम नसेल तरी काही चिंता करण्याची गरज नाही कारण कंपनीच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये स्त्री सहकाऱ्यांसाठी बेबी सेटिंगची सोय केली आहे. त्यामुळे आता आपल्याला काही अडचण नाही. मी कामावर असतानाही अधून मधून तिच्यावर लक्ष ठेवू शकते.”

प्रभा आनंदाने म्हणाली.

“अच्छा? इतक्या साऱ्या सवलती? चांगली कंपनी आहे. कोण आहेत डायरेक्टर?”

“त्यांची दहा डायरेक्टरांची टीम आहे. अजून माझी प्रत्येकाशी ओळख झाली नाही पण मला सर्वांनाच असिस्ट करायचं आहे. त्या कंपनीचे मेन डायरेक्टर राधाकृष्णन अय्यर हे बर्लिंगमधून बिझनेस पाहतात. बाकीचे इथे असतात. बघूया कसं होतंय?”

“अच्छा..”

रुद्रच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. सारा भूतकाळ त्याच्या भोवती फेर धरू लागला. मनात उगीच शंकेची पाल चूकचुकली.

“तुझं अभिनंदन प्रभा. इतक्या चांगल्या फर्ममध्ये तुझी निवड झाली.”

“थँक्यू रे, आता माझी कामं वाढतील. आता बघ तुझंही काम कसं मार्गी लागेल. काही दिवसांत आपलं सगळं चांगलं होईल, बघच तू.”

“हं..”

त्याने हुंकार भरला आणि तो आत निघून गेला. दुसऱ्या दिवसापासून प्रभाची धावपळ सुरू झाली. सकाळचा नाष्टा, दुपारचं जेवण, बाकीची घरातली कामे, स्वराची तयारी, तिला न्हाऊ माखू घालणं सारी कामे संपून तिला घरातून निघावं लागे. रुद्रची तिला फारशी मदत होत नसे. फार फार तर कधीतरी स्वराला खेळवणं, बाहेर फिरवून आणणं इतकी मदत तो करत असे. ‘हेही नसे थोडके’ असं म्हणून प्रभा त्यातच आनंद मानून घ्यायची.

प्रभाच्या कामाचा व्याप वाढला. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर ती घरून कामं करत होती. एक दोन महिन्यातच ती तिच्या कामात तरबेज झाली. फार कमी अवधीत तिने सारी कामे शिकून घेतली होती. सतत लॅपटॉपवर काम आणि कानाला फोन असं चित्रं प्रभाच्या घरी दिसू लागलं. रुद्रला मात्र कुठेच काम मिळत नव्हतं. कोणीही त्याच्याशी भागीदारी करायला तयार नव्हतं. ‘रिकामं डोकं सैतानाचं घर‘ अशी त्याची स्थिती झाली होती. मन नैराश्यानं ग्रासलं होतं. मनात निरनिराळे विचार थैमान घालत होते. एक दिवस रात्रीची जेवणं उरकल्यावर प्रभाने भांडीकुंडी, केर, लादी उरकून आपल्या खोलीत आली. मोबाईल बेडवर ठेवून बाथरूममध्ये गेली. रुद्र बेडवर काहीतरी वाचत बसला होता. इतक्यात प्रभाच्या मोबाईलची रिंग वाजली. रुद्रचं लक्ष त्याकडे गेलं.

“बॉस..“

मोबाईलच्या स्क्रीनवर नाव झळकलं. रुद्रच्या कपाळावर आठी पडली. मोबाईल घेण्यासाठी तो पुढे आला; इतक्यात प्रभा बाहेर आली आणि तिने कॉल घेतला. ती बोलत बोलत गॅलरीत आली. बराच वेळ तिचा कॉल सुरू होता. त्यानंतर ती आत आली.

“कोणाचा कॉल होता? ती इतका वेळ काय बोलत होती?”

रुद्रच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने तिच्याकडे पाहून खुणेनेच कॉलबद्दल विचारलं.

“काही नाही रे! माझ्या कामाचा कॉल होता. उद्याच्या मिटिंगच्या प्रेझेंटेशनबद्दल बोलत होतो.”

“ठीक आहे. मी झोपतो. गुडनाईट.”

असं म्हणून तो पलंगावर आडवा झाला. आता त्याच्या डोक्याला नवीन भुंगा लागला होता. आता वारंवार तसंच घडू लागलं. प्रभा तासंतास कॉलवर बिझी राहू लागली. रुद्रच्या मानगुटीवर पुन्हा एकदा संशयाचं भूत बसलं. एकदा तर त्याने प्रभाने सांगितलेली माहितीतली सत्यता तपासून पाहण्यासाठी सोशल मीडियावर, गूगलवर त्या कंपनीला सर्च करण्याचा प्रयत्न केला. प्रभाने सांगितलेली सर्व माहिती खरी होती. कंपनीचे डायरेक्टर राधाकृष्णन अय्यर आणि दोन तीन डायरेक्टर्सची नावे त्याला दिसली.

“याचा अर्थ ती यापैकीच कोणत्यातरी डायरेक्टर सोबत बोलत असेल पण इतकं काय अर्जेंट काम असेल की रात्रीचे कॉल्स प्रभाला घ्यावे लागताहेत?”

त्या संशयाने तो पोखरला जाऊ लागला. प्रभाच्या प्रत्येक हालचालीवर तो जाणीवपूर्वक लक्ष ठेवू लागला. तिच्या अपरोक्ष तिचा मोबाईल चेक करू लागला. एके दिवशी त्याने तिच्या नकळत तिचे आणि तिच्या बॉसचे मेसेजेस वाचले.

बॉस :- “आज तुझं प्रेझेंटेशन खूप छान झालं.”
प्रभा :- “थँक्यू.”
बॉस :- “यावरून एक कळलं की तू खूप हुशार आणि प्रामाणिक असोसिएट आहेस. याचा अर्थ कंपनीने जी तुझी निवड केली; ती अगदी योग्य आहे. सगळे डायरेक्टर्स तुझ्या कामावर खूप खूष आहेत.”
प्रभा :- “तसं काही नाही, मी फक्त माझं काम केलं.”
बॉस :- हा तुझा चांगुलपणा झाला. बाय दि वे, आज तू खूप छान दिसत होतीस.”
प्रभा :- “ओह्ह रियली! थँक्यू सो मच. बरं आपण नंतर बोलूया का? स्वरा रडतेय. बाय, बाय. नंतर बोलू. गुडनाईट.”
बॉस :- “ ओके बाय. गुडनाईट स्वीट ड्रीम डिअर..”

मेसेजेस पाहून त्याला खूप विचित्र वाटलं.

“कोण आहे हा? हा माझ्या बायकोला छान, सुंदर असे मेसेज पाठवतोय. काय चाललंय ह्यांचं? प्रभा नक्की कामच करतेय ना?”

रुद्रच्या मनात संशयाने जागा बळकावली. दिवसांमागून दिवस जात होते तसं रुद्र अजूनच विक्षिप्त वागू लागला. मद्यपान करू लागला.

“तू काय बाबा, आता मोठी ऑफिसर झालीस! तू कमवते म्हणून तर घर चालतंय ना! आम्ही काय रिकामटेकडे! तू आहेस म्हणून आमच्या पोटापाण्याची सोय होतेय नाहीतर उपाशी मरावं लागलं असतं! तू आज आमचा पोशिंदा झालीस ना!”

रुद्र सतत प्रभाला टोचून बोलू लागला. प्रभाच्या डोळ्यातून पाणी वाहत असे तरी ती शांत राहून स्वतःच्या मनाला समजावून सांगत असे.

“सध्या तो टेन्शनमध्ये आहे. प्रत्येकवेळी त्याच्या हाती अपयश आल्याने तो निराश होतोय पण त्यावर मद्यपान हे सोल्युशन नाही. आता मलाच त्याला समजून घेतलं पाहिजे. त्याचा राग, चिडचिड सहन करायला हवं. माझा विश्वास आहे; एकदा का त्याला काम मिळालं की तो नक्की बदलेल. चांगलं वागू लागेल. या जगात त्याच्या इतकी चांगली व्यक्ती दुसरी कोणी नाही.”

प्रभा रुद्रची मनःस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होती पण त्याच्या मनात तिच्याविषयीचा कडवटपणा दिवसागणिक वाढतच चालला होता आणि तो संशयाच्या खाईत लोटला जात होता. रुद्र आणि प्रभाच्या नात्याची वीण उसवत चालली होती. तिच्या संसाराची नाव पैलतीरी जाण्याऐवजी भवसागरात हेलकावे घेत बुडण्याच्या मार्गावर होती. त्यांचं नातं तुटत चाललं होतं. मनापासून चाललेला संवाद संपत चालला होता.

आज त्याच्या डायरीत शब्द होते.

“एकदा का नात्यातला विश्वास संपला की, सारं संपून जातं आणि मग ही नाती ठिसूळ होऊ लागतात. समोरच्याच वागणं आपल्या मनासारखं नाही झालं की अपेक्षाभंग आणि त्यातून पर्यायाने येणार दुःख, येणारा मीपणा वाढत जातो आणि नातं तुटू लागतं. एकाच घरात राहूनही पेईंग गेस्ट असल्याचा फिल यायला सुरू होतं. आज माझ्यासोबत पुन्हा एकदा तेच घडतंय. पुन्हा एकदा नातं संपुष्टात येऊ लागलंय.”

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all