तुजविण सख्या रे.. भाग ११

तुजविण सख्या रे..


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- प्रेमकथा
कथेचे नाव :- तुजविण सख्या रे..
निशा थोरे (अनुप्रिया)


तुजविण सख्या रे.. भाग ११

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रभा लवकर उठली. सकाळची कामे ‘आ’ वासून तिच्यासमोर उभी होती. तिने पटापट आवरायला घेतलं. रुद्रचा ब्रेकफास्ट, स्वराचं खाणंपिणं सारं ती घाईने आटोपत होती. रुद्रलाही मिटिंगसाठी बाहेर जायचं होतं. तोही लवकर आवरून हॉलमध्ये येऊन बसला. प्रभाने त्याला कॉफी आणि नाष्टा दिला. नाष्टा करता करता थोडा वेळ स्वराशी खेळून रुद्र जाण्यासाठी निघाला.

“प्रभा, आज थोडा उशीर होऊ शकतो हं.. उशीर झाला तर तू जेवून घे फार वेळ वाट पाहत बसू नकोस.”

तिने मान डोलावली.

“ऑल दि बेस्ट रुद्र.. तुझं काम नक्की होणार.”

प्रभाने त्याला हसून निरोप दिला. रुद्र घराबाहेर पडल्यानंतर प्रभाने सकाळची सर्व कामे उरकली. स्वराला न्हाऊ घातलं. स्वरा शांत झोपल्यानंतर तिने वर्तमानपत्रातील नोकरीविषयक सदरात असलेल्या जाहिराती पाहून काही मुलाखती लाईनअप केल्या आणि एकेक करून त्या त्या कंपनीना कॉल्स करायला सुरुवात केली. दोन तीन कंपन्यानी ऑनलाईन इंटरव्हिव लाईनअप केले. ऑनलाईन इंटरव्हिव्हज झाले. हे सगळं करण्यात संपूर्ण दिवस गेला.

संध्याकाळ झाली. चहा घेऊन प्रभा फ्रेश झाली. इतक्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. अनोळखी नंबर पाहून तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. तिने पटकन कॉल घेतला.

“मॅडम, मी आय टी टेक्नॉलॉजीजमधून एच आर मॅनेजर शेफाली बोलतेय. आपण मिसेस प्रभा कर्वे?”

“हो बोलतेय. बोला नं.”

“मॅडम, तुम्ही सकाळी दिलेल्या मुलाखती संदर्भात बोलायचं होतं. तुमच्या बायोडेटा आणि सकाळी झालेल्या मुलाखतीवरून आमच्या कंपनीला पर्सनल असिस्टंट या पदासाठी जसा उमेदवार हवा होता तसा तुमचा प्रोफाइल आहे. मॅडम, अभिनंदन.. तुमचं या पदासाठी सिलेक्शन झालंय.”

“थँँक्यू सो मच मॅम. मला या नोकरीची खरंच खूप आवश्यकता होती.”

नोकरी मिळाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर पसरला.

“पण मॅडम तुम्ही या आधी कुठेच नोकरी केलेली नाही. त्यामुळे तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे. सुरुवातीला ट्रेनिंगसाठी थोडे दिवस ऑफिसला यावं लागेल आणि त्यानंतर वर्क फ्रॉम होम असेल. बाकीच्या प्रोसेससाठी आणि सॅलरीविषयी चर्चा करण्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात येऊन भेटा मग पुढच्या गोष्टी ठरवता येतील.”

“थँक्यू सो मच मॅडम. मी तुम्हाला उद्याच येऊन भेटते.”

प्रभा आनंदून गेली.

“आज बऱ्याच दिवसांनी काहीतरी चांगली बातमी कानावर पडली. देव करो रुद्रचंही काम होवो. तोही खूष होईल. आज रात्रीच्या जेवणात काहीतरी गोड बनवायला हवं.“

असं म्हणून प्रभा किचनमध्ये आली. संध्याकाळ टळून गेली तरी अजून रुद्र घरी आला नव्हता. प्रभाने छान स्वयंपाक बनवला. म्युजिक सिस्टीमवर मंद स्वरात जुनी गाणी लावली. आणि स्वराला घेऊन अंगणात रुद्रची वाट पाहत उभी राहिली. बराच वेळ झाला तरी रुद्र दिसला नाही म्हणून ती स्वराला घेऊन आत आली. इतक्यात दारावरची बेल वाजली.

“अरे, आताच आत आलो आपण स्वरा, बाबा आले वाटतं.”

ती आनंदाने दार उघडलं. दारात तिला रुद्र उभा असलेला दिसला. थकलेला, दमलेला. चेहऱ्यावर उदास भाव दाटून आले होते. पटकन तिने त्याच्या हातातली बॅग घेतली.

“अरे किती उशीर रुद्र? आम्ही मायलेकी तुझी वाट पाहत उभ्या होतो. आज बाबांना एक आनंदाची गोष्ट सांगायचीय आम्हाला. हो किनई स्वरा..”

स्वराच्या गालाचा पापा घेत ती म्हणाली. त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं.

“अरे हो.. आम्हाला खरंच एक आनंदाची बातमी सांगायची आहे पण त्या आधी तू सांग तुझी मिटिंग कशी झाली? मस्तच झाली असेल. हो नां?”

“नाही प्रभा, त्यांना माझं प्रेझेन्टेशन आवडलं नाही. हे कॉन्ट्रॅक्टही हातातून गेलं. ती ऑर्डर एका नवीन प्रतिस्पर्ध्याला गेली.”

रुद्र उदास होत म्हणाला. प्रभाच्या चेहऱ्यावर उदासी छटा पसरली. ते पाहून वातावरण हलकं करण्यासाठी तो म्हणाला,

“ही ऑर्डर नाही मिळाली म्हणून काय झालं? मी पुन्हा प्रयत्न करेन. आपल्याला दुसरी ऑर्डर मिळेल. नको टेन्शन घेऊ. एनी वे, तू काय सांगत होतीस? कोणती आनंदाची बातमी?”

खरंतर रुद्र घरी येण्यापूर्वी प्रभा खूप आनंदी होती. ती त्याला नोकरी मिळाल्याची बातमी सांगण्यासाठी खूप आतुर झाली होती पण रुद्रची मिटिंग अयशस्वी झाली आणि तिला नोकरी मिळाली या बातमीला तो कसा स्वीकारेल याचीच तिला काळजी वाटत होती. त्याच्या मनात थोडी नाराजगी असणारच हे तिला माहित होतं तरी धीर एकवटून तिने बोलायला सुरुवात केली.

“रुद्र, मी दोन चार ठिकाणी नोकरीसाठी अर्ज देऊन ठेवले होते. आज दिवसभर त्यांचे ऑनलाईन मुलाखती झाल्या आणि त्यापैकी एका कंपनीत माझं सिलेक्शन झालं. त्यांनी मला उद्या भेटायला बोलवलंय.”

ती चाचरत रुद्रला म्हणाली. त्याला खूप आश्चर्य वाटलं.

“इतक्या लवकर? आश्चर्य आहे पण छान झालं. निदान एक तरी आनंदाची बातमी कानावर आली. अभिनंदन प्रभा.”

तो कसनूसं हसला.

“थँक्यू रुद्र.. त्यांच्या एचआर मॅनेजरचा कॉल आला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की, मला या नोकरीचा आधीचा कोणताच अनुभव नाहीये म्हणून त्यांना मला आधी ट्रेनिंग द्यावं लागेल त्यासाठी काही दिवस मला ऑफिसला जावं लागेल.”

त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं.

“आणि स्वरा? तिच्याकडे कोण पाहील?”

“रुद्र, आपल्याला आलेल्या परिस्थितीशी थोडं तरी जुळवून घ्यावं लागेल ना! स्वराकडे आपल्या दोघांपैकी जो कोणी एक घरी असेल तो पाहील किंवा शेजारच्या काकूंना सांगून ठेवलंय; त्या स्वराला सांभाळायला तयार आहेत. उद्या जाऊन मी त्यांना सगळी परिस्थिती सांगून पाहते. बघूया काय मार्ग निघतोय ते?”

प्रभा त्याच्याकडे पाहून म्हणाली.

“ठीक आहे. बघ काय होतं ते? पण स्वराचे हाल झालेले मला चालणार नाही. आधी स्वरा मग तुझी नोकरी.”

तिने मान डोलावली. रुद्र फ्रेश होण्यासाठी त्याच्या खोलीत आला. डायरीच्या पानावर शब्द उमटले.

“आयुष्यात घडून गेलेल्या घटनांची पुनरावृत्ती होईल का? प्रभाही तशीच वागली तर….”

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all