Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तुजविण सख्या रे.. भाग १०

Read Later
तुजविण सख्या रे.. भाग १०अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- प्रेमकथा
कथेचे नाव :- तुजविण सख्या रे..
निशा थोरे (अनुप्रिया)

तुजविण सख्या रे.. भाग १०

दहा वर्षानंतर….

“रुद्र काय चाललंय तुझं? असं करून कसं चालेल? ज्यांच्याकडून तू कर्ज घेतलंयस ते त्यांचे पैसे मागण्यासाठी आपल्या दारात येऊ लागलेत.”

“हो, माहितीये मला. प्रत्येक वेळी मला असं सुनवायची गरज नाही. मी माझे प्रयत्न करतोय. मी सर्वांचं घेतलेलं कर्ज नक्की परत करेन.”

रुद्र चिडून म्हणाला.

“अरे पण कधी आणि कसं परत करणार आहेस? आपला बिझनेस तर ठप्प झालाय.”

“हो, पण ही अवस्था आपल्या लग्नाच्या वेळीस होती का? चांगला उद्योगपती, गाडी, बंगला बघूनच तुझ्या आईवडिलांनी तुझं माझ्याशी लग्न लावून दिलं ना! आणि तुही माझ्याशी लग्न करायला एका पायावर तयार झाली होतीस. मग आता काय झालं?”

“हो, तुझं घरदार, बंगला गाडी, पैसा संपत्ती पाहून माझ्या आईवडिलांना तुझी भुरळ पडली आणि त्यांनी माझं लग्न तुझ्याशी लावून देण्याचा निर्णय घेतला. मीही तुझ्याशी लग्न करायला तयार झाले. मग आमचं चुकलं का? प्रत्येक मुलीचे आईवडील जे करतात तेच त्यांनी केलं. आपल्या मुलीच्या भविष्याचा, सुखाचा त्यांनी विचार केला हे चुकलं का त्यांचं? जे वैभव पाहून त्यांनी माझं लग्न तुझ्याशी लावून दिलं; त्यातलं आता आपल्याकडे काय उरलंय, सांगशील मला? सगळंच तर तू विकून टाकलंस. आता फक्त हा बंगला उरलाय तोही बँकेकडे गहाण आहे. बँकेतूनही हफ्त्यांच्या वसुलीसाठी बँकेचे कर्मचारी घरी येऊ लागलेत.”

“हो बरोबर आहे प्रभा, आपली कंपनी बंद पडली. आपलं खूप मोठं नुकसान झालं पण माझी एकट्याचीच ही अवस्था नाही ना! कोरोनाच्या काळात बऱ्याच कंपन्या बंद पडल्या. छोटे मोठे उद्योगधंदे बुडाले. कित्येकांचे रोजगार गेले. जवळचे नातेवाईक गेले. आपणही आपल्या आईबाबांना त्याच काळात गमावून बसलो ना! आणि तुही तुझ्या आईला. विसरलीस का?”

आईच्या आठवणीने प्रभाच्या डोळ्यात पाणी आलं.

“नाही रे! कसं विसरेन? पण रुद्र आता पुढे काय? आपलं भविष्य काय? आपल्या मुलीचं, स्वराचं भविष्य काय? निदान तिचा तरी तू विचार करायला हवास. थोड्या महिन्यांनी आपल्या स्वरालाही आपल्याला चांगल्या शाळेत घालावं लागेल. मग पुढे काहीतरी ठरवावं लागेल ना!”

“मी प्रयत्न करतोय प्रभा, होईल सगळं ठीक.”

“मी काय म्हणते रुद्र, तू नोकरी का करत नाहीस?“

“इतकी वर्षे बिझनेस केल्यानंतर आता पुन्हा नोकरी करू म्हणतेस? वेडी आहेस का? इतकी वर्षे बॉस म्हणून वावरलोय आता दुसऱ्या कोणाचं तरी बॉसिंग मला आवडेल का? दुसऱ्या कोणाच्या हाताखाली काम करणं मला रुचेल? नाही, नाही ते शक्य नाही.”

“मग मला तरी नोकरी करू दे.”

“नाही मुळीच नाही. कितीदा तुला तेच सांगायचं? एकदा सांगितलेलं कळत नाही. तू नोकरी करणार नाहीस या अटीवरच तर आपलं लग्न झालंय. विसरलीस? त्यामुळे तू नोकरी करायची नाही म्हणजे नाही.”

रुद्र चिडून म्हणाला. या प्रसंगमुळे आज बऱ्याच वर्षांनी त्याला तन्वीची आठवण आली. जुन्या जखमेवरची खपली निघाली आणि जखम भळभळून वाहू लागली.

“नोकरी करणाऱ्या मुली पाहिल्यात नं आणि त्यांचे बॉसही! पाहिल्या काय चांगल्या अनुभवल्यात. जिच्यावर मनापासून प्रेम केलं तिने प्रमोशन, पैसा यासाठी माझ्या प्रेमाला लाथ मारून माझ्याच बॉससोबत...”

तन्वीविषयीची चीड त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. रुद्र रागाने पाय आपटत त्याच्या खोलीत निघून गेला. प्रभा डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहत होती.

“तू अजूनही तसाच आहे.”

प्रभा स्वतःशीच पुटपुटली. तिला रुद्र लग्नासाठी पहायला त्यांच्या घरी आला होता, तेंव्हाचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला. खरंतर रुद्र लग्नासाठी तयारच नव्हता. त्याच्या आईने बळजबरीने त्याला मुलगी पाहायला आणलं होतं पण त्याने प्रभाला पाहिलं आणि ती त्याला आवडली. प्रभा सुशिक्षित, देखणी एमए झालेली मुलगी. दोन वर्ष परदेशी जाऊन तिने तिचं उच्चशिक्षण पूर्ण केलं होतं. रुद्र आणि प्रभाच्या आईवडिलांना दोघांची जोडी आवडली होती. ‘रुद्र कर्वेसारख्या मोठ्या उद्योजकाचं स्थळ सांगून आलं होतं म्हणून प्रभाचे आईबाबा खूष होते. मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम ठरला. सर्वांची पसंती झाली होती पण लग्न ठरवतानाच रुद्रने स्पष्ट केलं.

“मी लग्न करायला तयार आहे पण माझी एक अट आहे, लग्नानंतर तुमची मुलगी नोकरी करणार नाही. तसं आमच्या घरात तिला काही कमी पडणार नाही. ती खूप सुखात राहील. सारी सुखे तिच्या पायाशी लोळण घालतील. तिला अजून पुढे शिकायचं असेल तर करसपॉंड्स कोर्स करून ती तिचं शिक्षण पूर्ण करू शकते. अगदी पी एचडी.सुद्धा करू शकते माझी कशाला हरकत नाही फक्त तिने नोकरीसाठी घराबाहेर पडायचं नाही. ही अट मान्य असेल तरच लग्न होईल अन्यथा आपला मार्ग मोकळा आहे.”

त्याचं निग्रही बोलणं आजही प्रभाला जसंच्या तसं आठवलं. तिच्या आई वडिलांनाही वाटलं, एवढं गडगंज श्रीमंती असलेलं घर मिळाल्यावर आपली मुलगी कशाला नोकरीसाठी वणवण करेल? नोकरी करण्याची तिला गरजच काय? आणि म्हणून मग प्रभाच्या आईवडिलांनी रुद्रची अट मान्य केली आणि तिचं लग्न रुद्रशी लावून दिलं.

“आतापर्यंत छानच सुरू होतं पण अचानक कोरोना आजाराचं संकट आलं आणि सगळं संपलं. वाईट वेळ कधीच सांगून येत नाही. बिझनेस बुडाला त्या मागोमाग पैसा, यश, कीर्तीही गेली. धनसंपत्ती, जमीन जुमला सगळं गेलं. सगळं ऐश्वर्य लयास गेलं. सगळे नातेवाईक संपत्ती गेल्यावर आपोआप दूर झाले पण आपल्याला पुन्हा उभं राहावं लागेलच नां! असं हातपाय गाळून कसं चालेल? मला काहीतरी पाऊल उचलावंच लागेल. पडत्या काळात मी रुद्रचा हात सोडणार नाही.”

प्रभाच्या डोळ्यातून आपोआप पाणी वाहू लागलं. रुद्रच्या आवाजाने तिची तंद्री भंग पावली.

“प्रभा, तू टेन्शन घेऊ नकोस. उद्या एका क्लाईंटसोबत मीटिंग आहे. त्याचंच प्रेझेन्टेशन बनवतोय. ही मिटिंग एकदा यशस्वी झाली नां मग बघच तू. आपला बिझनेस पुन्हा जोमाने सुरू होतो की नाही ते. फक्त ही मिटिंग.”

“ऑल दि बेस्ट रुद्र. देव करो आणि तू म्हणतोयस तसंच होऊ दे पण फक्त एकदा माझं म्हणणं ऐकून घे. तुझा बिझनेस पुन्हा स्थिरस्थावर होईपर्यंत तरी आपल्याला घर चालवावं लागेल. आतापर्यंतच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स होत्या त्या सर्व संपत आल्यात. आता आपल्याकडे काही शिल्लक नाहीये. आजची तुझी मिटिंग यशस्वी झाली तर मग मला पुढे काही करण्याची गरजच नाही. तू म्हणशील तेच होईल पण समज दुर्दैवाने मीटिंग यशस्वी झाली नाही तर मग मी नोकरी करणार. मी माझ्या स्वराला असं कष्टाचं आयुष्य देऊ शकत नाही. मलाही स्वतःला तपासून पाहता येईल. मी घर सांभाळून नोकरी करू शकते का याचा अंदाज घेता येईल. अँप्लिकेशन टाकूया बघू आला कॉल तर जाता येईल नाहीतर नाही आणि तुला सांगू का! आता सध्याला तरी कोव्हीडमुळे वर्क फ्रॉम होम असाच जॉब मिळेल. आठवड्यातून एक दोनदा ऑफिसमध्ये जावं लागेल. मग काय हरकत आहे तुझी?”

रुद्रने थोडा विचार केला.

“प्रभा बोलतेय ते खरं आहे, सद्या जगणं महत्वाचं आहे. पैसा कमवणं हाच मुख्य हेतू आहे. ही क्लाईंट मीटिंग यशस्वी झाली तरीही जम बसायला वेळ लागेल. ऑर्डर पूर्ण करायला थोडं तरी हातात भांडवल हवं. त्यामुळे प्रभाला नोकरी करू द्यावी का? आणि असंही घरूनच काम करणार आहे मग कसली चिंता?”

रुद्र क्षणभर थांबून म्हणाला.

“प्रभा, तुझ्या नोकरी न करण्यामागे माझी काही कारणं आहेत. ज्यामुळे मी तुला विरोध करत होतो. ही क्लाईंट मिटिंग यशस्वी झाली तर तुझ्यावर नोकरी करण्याची वेळही येणार नाही पण घरून काम असेल आणि तुझी इच्छा असेल तर प्रयत्न करायला हरकत नाही.”

त्याचं बोलणं ऐकून प्रभाला खूप आनंद झाला.

“ओह्ह, थँक्यू सो मच रुद्र! मी लगेच कुठे नोकरीसाठी जागा आहेत का ते पाहते.”

असं म्हणत ती आनंदाने त्याला बिलगली. त्याने तिला जवळ घेतलं आणि तिच्या माथ्यावर ओठ टेकवत मिठी अजून घट्ट केली. त्याचे डोळे मिटले पण आज त्याच्या बंद डोळयांना तन्वीचा चेहरा दिसू लागला. तिच्या आठवणींनी त्याचा जीव कासावीस झाला.

आणि आज त्याच्या डायरीत शब्द होते.

“आज पुन्हा इतक्या वर्षांनी तिची आठवण झाली. घाव पुन्हा हिरवा झाला.”

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

निशा थोरे (शिवप्रिया - शब्दस्पर्श)

Service

मला शब्दांच्या विश्वात रमायला खूप आवडते.

//