Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

तुझी डायरी

Read Later
तुझी डायरी
मी गाथा. नुकतेच दोन वर्षांपूर्वी माझे पुण्यातील सुजय कर्वे याच्याशी लग्न झाले, आणि मी गाथा पाटील ची गाथा कर्वे झाली. तसेच सांगली सोडून पुणेकर. तसें तर पुणे शहर खूप सुंदर आहे पण तरी ही आपले गाव सोडून दुसरीकडे ॲडजस्ट व्हायला वेळ लागतोच ना? तसें तर सुजयचे आई बाबा खूपच प्रेमळ आहे, म्हणून मला नवीन परिवारात पण ॲडजस्ट व्हायला वेळ लागला नाही. अरे हो! सुजयची ओळख करून द्यायची राहीलच. सुजय हा खूप प्रेमळ आणि समंजस स्वभावाचा आहे. तो पुण्यातील आय. टी. सेक्टर मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलोपर इंजिनीयर म्हणून काम करतो आणि त्याहून विशेष म्हणजे तो खूप छान साहित्यिक आहे; त्याला कथा, कविता लिहायला प्रचंड आवडते. आणि असे म्हणतात कवी लोकांना इतर लोकांच्या भावना खूप लवकर समजतात. म्हणून कदाचित तो इतका प्रेमळ असावा.
                सगळे कसे अगदी छान चालू होते. घरात आनंदीआनंद असायचा आणि त्याच आनंदाला अचानक कुणाची तरी नजर लागावी अन आनंदाचे रूपांतर दुःखात व्हावे असे घडले! रोज प्रमाणे सुजय ऑफिस ला गेला, मी आणि आई आवरून गप्पा मारत बसलो, तितक्यात बाबा उत्साहाने बोलले,
"चला आज कुठेतरी बाहेर जाऊ या." आई त्यावर नको नको करत होत्या तर मीच त्यांना जाऊयात म्हणून फोर्स केला आणि मग त्याही जाण्यासाठी तयार झाल्या. पण जायचे कुठे? हा मोठा प्रश्न होता, कारण पुण्यातले जवळपास सर्व ठिकाण फिरून झाले होते, पण तरी आम्ही कुठे न कुठे जायचे हे ठरवून बाहेर पडलो. 
"गाथा तू कार चालव आम्ही बसतो मागे" बाबा 
 "नाही नाही बाबा तुम्ही चालवा, आई बाजूला बसतील, मी तर उगाच आले बघा, मी बसते मागे." मी असं म्हणाले. त्यावर आई बोलल्या,
 "जर आम्हाला मुलगी असती तर तिला आम्ही असे सोडून फिरायला गेलो असतो काय? सोबत घेऊनच गेलो असतो ना? आणि अशी पण तू काय आम्हाला मुलींपेक्षा कमी नाही."
त्यावर बाबा मिश्कीलपणे म्हणाले,
 "ओह महिला मंडळ चला." 
आई बाबा पुढे बसले आणि मी मागच्या सीट वर. खरेतर मी सुजय ला खूप मिस करत होते, पण आईबाबांच्या आनंदापुढे मला जरा सुजयचा ही विसर पडत होता. किती खूश होते दोघे? त्यांना असे बघून मी ही मनोमन खुश होत होते.
              आम्ही लोणावळा जायचे ठरवले, म्हणजे सायंकाळ पर्यंत कसे ही परत येऊ. प्रवास छान सुरु होता, आम्ही पोहचलो. मज्जा केली आणि दुपार होताच मस्त हॉटेल मध्ये जेवण केले आणि तीन साडे तीन च्या दरम्यान पुन्हा घराकडे निघालो. हसत खेळत आमचा प्रवास पुण्याकडे चालू झाला आणि अचानक काळाची झडप पडावी तशी एक मोठी ट्रक तिची लेन सोडून ताबा सुटल्याप्रमाणे आमच्या गाडीवर येऊन धडकली. काही तासांसाठी मी बेशुद्ध होते आणि डोळे उघडले ते डायरेक्ट हॉस्पिटल मध्येच! मला क्षणासाठी काय चालले हे कळत नव्हते आणि शुद्ध येताच मी आई अन बाबा यांचा शोध घेऊ लागले. तोच आतमध्ये सुजय आला नि मला घट्ट मिठी मारुन अगदी शांत बसून होता मी त्याला काही विचारणार तर ढसाढसा रडायला लागला. मला तर काहीच कळेनासे झाले होते. तितक्यात एक नर्स तिथे आली आणि बोलली मिस्टर कर्वे तुम्हाला डॉक्टरांनी बोलावले आहे, आणि मी देखील सुजयच्या मागे मागे डॉक्टरच्या केबिन कडे गेले.
               डॉक्टर ने सुजय ला केबिन मध्ये बोलावले आणि सांगितले की आमच्या प्रयत्नांना यश आले नाही, आम्ही तुमच्या आई वडिलांना नाही वाचवू शकलो. सुजय जरा वेळा साठी स्तब्ध झाला. काही न बोलता तो केबिन च्या बाहेर आला आणि माझा हात पकडून मला ज्या वॉर्ड मध्ये आईबाबा होते त्या वॉर्ड कडे घेऊन गेला, अगदी एक शब्द ही न बोलता. मला भीती वाटत होती, नक्की काय झालं आहे? काही झाले तर नसणार ना? त्या काहीश्या मिनिटात किती तरी हजार प्रश्न माझ्या डोक्यात आले. आणि शेवटी वॉर्ड आला! बघते तर काय? आई आणि बाबा दोघांनाही पांढऱ्या कापडात गुंडाळून ठेवले होते. त्यांना बघून मला कंठ फुटेना, मी त्यांना फक्त बिलगून होते आणि अचानक खूप जोराने ओरडायला लागले. माझ्या आवाजाने स्तब्ध झालेला सुजय भानावर आला, आणि मला सावरायचे सोडून अगदी एका लहान मुलासारखा माझ्या कुशीत शिरून रडायला लागला. दोघांपैकी कुणाला तरी शांत होऊन परिस्थिती सांभाळायची होती म्हणून मीच स्वतःला सावरत सुजय ला सावरले. आणि विधीपूर्ती कडे वळालो.
                   काही दिवस, काही महिने लोटले. सुजय एक दिवस मला म्हणाला,
 "ऐक ना आपण पुणे सोडतोय."
 मी विचारले,
 "का?" तर त्यावर उत्तर देत तो म्हणाला,
"या घरात माझ्या आईबाबाच्या खूप साऱ्या आठवणीं आहेत, घरातील प्रत्येक घटक त्यांच्यासोबत जोडला गेला आहे आणि त्यामुळेच मला त्यांच्या आठवणीमधून बाहेर पडता येत नाही आहे."
 "पण आपण जाणार कुठे?"
 "हैदराबाद. मी कालच सरांना ट्रांसफर ऑर्डर साठीची रिक्वेस्ट केली आहे. एक नवीन शहरात एक नवीन सुरुवात करूया."
मी पण मान डोलवत त्याला होकार दिला.
                       दुसऱ्या दिवशी सुजय ट्रान्सफर लेटर घेऊन आला आणि आम्ही घरातील एक ही वस्तू न घेता हैद्राबाद जाण्यासाठी निघणार तोच सुजयला आठवले की त्याच्या डायरीज घ्याव्यात अन तो डायरीज घेण्यासाठी गेला. 
"आपण इथून काहीच नेणार नव्हतो ना? मग या डायरीज का?"
"माहीत नाही, पण मला सारखे असे वाटते आहे की या डायरीज सोबत असाव्यात."
त्यांनी गाडी बोलावली, प्रवास सुरु झाला. मी पुण्यातल्या सर्व आठवणीं डोळ्यांत साठवून घेऊन चालले होते, पण काही क्षण हे डोळ्यांत थांबायला तयार नव्हते, ती अश्रू बनून अलगद डोळ्यांतून बाहेर पडत होती. त्यात अचानक सुजय पुटपुटला,
 "देह हा आपला नश्वर आहे, पण ज्या अमर असतात त्या म्हणजे आपल्या आठवणीं." मी त्याच्या कडे बघत बोलले,
"पण तू हे असे का बोलतोय?"
"बघ ना, उद्या मी असाच अचानक निघून गेलो."
 तितक्यात मी रुसून त्याच्या हलकीशी कानाखाली मारली अन रडायला लागले. 
"ओय मारले तू मला आणि तूच रडते आहॆस?" 
 "मग तुझ्याशिवाय आयुष्य मी कल्पनेत सुद्धा नाही पाहिले आणि तू?"
"अगं वेडे पण मी तुला हे सांगतोय की आठवणीं जिवंत असतात, आणि त्यात तर मी कायम तुझ्यासोबतच असणार." 
 "नको ना असे विचित्र बोलू, मला भीती वाटतेय."
"बरं बरं नाही बोलत, खुश! मग चला घर आले."
                     घर नक्कीच पुण्यातल्या घरापेक्षा मोठे होते पण त्यात ज्यांच्यामुळे घरपण होते ते आता आमच्यासोबत नव्हते, पण या नवीन घरात एक नवीन सुरुवात करणे अत्यंत महत्वाचे होते. आम्ही गृहप्रवेश केला. रात्रीचं जेवण हे बाहेरूनच मागवले, जेवण झाले आणि आम्ही दोघे ही टेरेस वर गेलो. गच्च चांदण्यांनी भरलेले आभाळ बघत सुजय म्हणाला,
"ते बघ बाबा आणि ती बघ आई तिकडे."
 "अरे, तिकडे नाही इकडे बघ, जे सोबत आहेत ना ते आहेत आपले आई बाबा."
आणि छोटेसे हास्य ओठी ठेऊन सुजय चे डोळे पाण्याने गच्च भरले, पण त्याला असे व्याकुळ बघून मी रडायला लागले आणि त्याने मला सावरले.
                      बघता बघता वर्ष उलटून गेले, वाटले आता सगळे सुरळीत झाले. रोजप्रमाणे सुजय ऑफिस ला गेला, आणि दुपारी एक कॉल करत असतो पण आज तो केला नाही. सायंकाळ झाली, मी सुजय ची वाट बघत होते पण तो काही दिसेना, मी त्याला कॉल लावत होती पण मोबाईल स्विचऑफ सांगत होता. मग तर मला अजून जास्त काळजी वाटायला लागली. काय करू नि काय नको अशी माझ्या मनाची अवस्था चालू होती. तितक्यात घरच्या फोन ची रिंग वाजली. 
"हॅलो, सुजय कर्वे यांच्या घरी लागलाय काय कॉल ?"
  "हो बोला, आपण कोण?"
"मॅडम सिटी केयर हॉस्पिटल मधून बोलतोय, आज आय. टी. सेक्टर च्या बिल्डिंग मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने खूप साऱ्या एम्प्लॉइज ना इजा झाली आहे तर त्यात काही गंभीर रीत्या जखमी आहेत, म्हणून ऍडमिट केले आहे तर तुम्ही लवकरात लवकर या."
 असे बोलून त्यांनी फोन ठेवला. मी आहे त्या अवस्थेत हॉस्पिटल ला जायला निघाले.
                  माझे मन पुन्हा मला भूतकाळात घडलेल्या गोष्टीकडे घेऊन गेले, ती तशीच परिस्थिती होती जशी आई बाबांच्या वेळेस माझ्या मनाची झाली होती. डोळ्यांत अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते आणि मनात हजारो प्रश्न ठाण मांडून बसले होते. वेळ देखील लवकर सरत नव्हती, अगदी *पाच किलोमीटर* चे अंतर सुद्धा संपेना, पण माझ्या मनाच्या घालमेळ मुळे ते अंतर मला खूप वाटत होते आणि शेवटी मी हॉस्पिटलला पोहचले. डॉक्टर मला आय. टी. सेक्टर. चे जेवढे घायाळ इंजिनिअर होते त्यांच्या वॉर्ड कडे घेऊन गेले, मला सगळ्यांची अवस्था बघवत नव्हती. पण यात सुजय कुठेच दिसत नव्हता. 
"डॉक्टर यात सुजय नाही आहे?" मी प्रश्न केला.
"मॅडम अजून अठरा जण हे इमर्जन्सी वॉर्ड मध्ये आहेत त्यांची अवस्था जरा गंभीर आहे."
मी घाई घाई त्या वॉर्ड कडे निघाले आणि मला पहिल्याच बेडवर सुजय दिसला. मला त्याला असे बघून रडू आवरेना, मी डोळ्यांत दाटलेले ढग तिथे बरसवू लागले. पण तो गोड हास्य करून मला शांत हो असे काही खूणवत होता. नंतर मला मिठीत घे असे सांगून तो माझ्या मिठीत आला आणि तसेच ओठी गोड हास्य ठेऊन माझ्या मिठीत त्याने अखेरचा श्वास घेतला, जणू काही फक्त माझ्यासाठी त्याने प्राण रोकून धरला असावा. माझ्यावर अगदी आभाळ कोसळावे, इतके मोठे संकट येऊन कोसळले. इतक्या वेळ ज्या अश्रूचा पूर डोळ्यातून वाहत होता ते अचानक डोळ्यातच गोठले. मी अगदी स्तब्ध होऊन गेले, मला फक्त माझे आयुष्य संपले इथे याची जाणीव होत होती, मी सुजय ला मिठीत घेऊन तशीच तिथे बसून होते, तितक्यात एक नर्स तिथे येऊन मला सुजयने शेवटची लिहलेली चिट्टी मला देऊन गेली, ज्यात त्याने फक्त 'डायरी' असे लिहलेले होते. पण त्यावेळेस मी स्वतःला सावरायच्या मनस्थितीत नव्हतेच, पण जाताना त्याचा हसरा चेहरा हेच सांगत होता की तुला तुझे आयुष्य हसत जगायचे आहे. म्हणून मी ही त्याला खोटे का होईना हसून निरोप दिला.
               काही दिवसानंतर मी सुजय ने केवळ पेज वर डायरी का लिहले असावे, याचा शोध घेण्यासाठी त्याच्या डायरीज उघडून बघितल्या. तर त्यात मला माझ्यासाठीच्या खूप साऱ्या कविता भेटल्या. म्हणजे इतर कविता खूप कमी होत्या, पण बाकी सगळ्या कविता या माझ्या वरच्याच होत्या. मी क्षणासाठी हसले खरे पण नंतर किती तरी वेळ त्या डायरींना कवटाळून रडत बसले. तितक्यात माझी एक वेगळ्याच डायरीवर नजर पडली, ज्यावर माझा नि सुजय चा फोटो चिटकवलेला होता. मी ती डायरी उघडली त्यात पहिल्याच पानावर 'प्रिय गाथा फक्त तुझ्यासाठी.' असे लिहले होते. आणि पुढील पानावर एक कविता होती,

परिस्थिती खेळेल तुझ्याशी खेळ,
त्यात जाऊ देऊ नको तुझा तू तोल.
लढण्यासाठी आता हो तू तयार,
संघर्षाचा या करावा लागेल तुला स्विकार.
स्वतःच बन तू ढाल स्वतःची,
नको बाळगू भीती जगाची.
सबला आहे तू अबला नाही,
जिंकून घेशील दिशास दाही.
मी तर सोबत तुझ्या कायम आहे,
पण माझ्याहूनही सखी माझी सक्षम आहे.
पुन्हा एकदा सुरवात नवी तू करशील ना?
हसत रहा बस, माझ्यासाठी एवढे करशील ना?

                 मला आज कळले, त्याने या डायरीज का सोबत घेतल्या होत्या. सुजय गेल्यावर माझी जगण्याची आशा देखील संपली होती. अगदीच माझा दुर्दैवी काळ माझ्याभोवती भिंगत होता आणि मला त्याच्यासोबत भिंगवत होता, पण सुजयच्या डायरी ने मला जगण्याची एक नवी उमेद मिळाली, जगण्यासाठीचे कारण मिळाले. आणि कळले की तो कुठे ही गेला नाही तो तर माझ्या सोबतच आहे. आणि जरी काळाचा अंधार भोवताली होता तरी त्याच्या आठवणीची प्रकाशज्योत माझ्या सोबत कायम होती. आणि त्यांनीच लढण्यासाठी एक नवीन बळ दिले. आणि तो कुठे ही गेला नाही माझ्या सोबत च आहे याची जाणीव झाली,मी एक दीर्घ श्वास घेतला आणि खूप दिवसानंतर मनमोकळे पणाने डायरीकडे बघून हसू लागले.


समाप्त


लेखक : करण सोळसे 
ईरा टीम : नाशिक
लघुकथा/लेख
विषय : आणि ती हसली
उपविषय : तुझी डायरी 
स्पर्धा: ईरा राज्यस्तरीय करंडक
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Karan Solse

//