Mar 02, 2024
सामाजिक

तूच माझी आई. भाग -४(अंतिम भाग)

Read Later
तूच माझी आई. भाग -४(अंतिम भाग)
तूच माझी आई.
भाग -चार.(अंतिम भाग.)

"असू दे गं, माझं नाजूक फूल आहेस तू." श्वेता हसून म्हणाली.

पहिले बाळंतपण माहेरीच करायचे या हट्टाने सासूबाईने केतकीला परत माहेरी पाठवले. श्वेता कितीही चांगली असली तरी तिला ना बाळंतपणाचा अनुभव, ना छोट्या बाळाचा. आपला कसा निभाव लागेल या विवंचनेत केतकी होती.


शेवटच्या महिन्यात तपासणी करिता माहेरच्या डॉक्टरांकडे गेल्यावर तिथल्या डॉक्टरांनी लगेच श्वेताला ओळखले.

"ही कोण?" डॉक्टरांनी विचारले.

"लेक आहे माझी." श्वेता हसली.

डॉक्टरांच्या कपाळावरचे प्रश्नचिन्ह केतकीच्या नजरेतून सुटले नाही. तपासणी करून बाहेर आल्यावर श्वेताला बाहेरच थांबवून बाळाबद्दल थोडं विचारायचे आहे म्हणून ती आत गेली.


"डॉक्टर, तुम्ही माईला कसे ओळखता?"


"अगं, ती खूप जुनी पेशंट आहे माझी. माझ्या प्रॅक्टिसच्या सुरुवातीच्या काळातली. म्हणून मी ओळखते. तिला एवढी मोठी मुलगी कशी? हाच प्रश्न मला पडला." डॉक्टर.


"मी तिची सावत्र मुलगी आहे. तिला मूल होत नाही म्हणून पहिले लग्न तुटले होते. नंतर माझ्या बाबांनी तिच्याशी लग्न केले. नंतरही तिला कधी बाळ झाले नाही." केतकी खिन्नपणे सांगत होती.


"चुकते आहेस तू. श्वेता निपुत्रिक होती कारण तिच्या पहिल्या नवऱ्यात दोष होता. दुसऱ्या विवाहानंतर ती प्रेग्नेंट होती, पण तिने ती प्रेग्नन्सी नाकारली.

वांझोटी म्हणून हिनवल्यावर इतक्या वर्षांनी मातृत्व चालून आल्यावर मात्र तिने ते नाकारले कारण तेव्हा तिने तुला स्वीकारले होते. नशीबवान आहेस तू की एवढी माया करणारी आई तुला मिळाली." डॉक्टर तिच्याकडे बघून म्हणाल्या.

केबिनमधून बाहेर निघतांना केतकीला दाटून आले होते.

"सगळे ठीक आहे ना? मॅडम काय म्हणाल्या?" श्वेताने काळजीने विचारलेल्या प्रश्नावर केतकी आपले अश्रू लपवत मंद हसली. काही न बोलता केवळ तिचा हात तिने प्रेमाने दाबला.


एके दिवशी प्रसवकळा सुरु झाल्या आणि केतकीला ऍडमिट करण्यात आले. आजी, मावशीआजी, रूपाकाकी, सासूबाई सर्वच बाळाला पहिल्यांदा हातात घ्यायला रांगेत उभ्या होत्या. श्वेता मात्र मनात श्री समर्थाचे नामस्मरण करत बाजूला बसली होती. बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि तिच्या डोळ्यातून आनंदाचे दोन थेंब गालावर ओघाळले.


नर्स बाळाला घेऊन बाहेर आली. "बाळाला आईकडे सोपवायचे असे पेशंटने सांगितले आहे." नर्स महिलामंडळाकडे पाहून म्हणाली.


तशी सासूबाई पटकन समोर आल्या. "मी तिची सासू, पण ती मला आई म्हणते. द्या ते बाळ माझ्याकडे." सासूबाईने हात समोर केले.


"नाही, ती म्हणाली की बाळाला माझ्या खऱ्या आईकडे द्या. श्वेता नाव त्यांचं. कुठे आहेत त्या?" नर्स.

श्वेताचे नाव ऐकून मावशीआजी पटकन समोर आली.

"अगं बाई ती वांझ आहे. तिचा स्पर्शही बाळाला नको."

एव्हाना प्रसूतीगृहातून बाहेर येणाऱ्या केतकीने मावशीआजीचे बोलणे ऐकले.

"मावशीआजीऽऽ" ती ओरडली.

"माई वांझ नाहीय, खरे वांझोटेपण तर तुमच्या विचारसरणीत आहे."

"हे मी आधीच बोलायला हवे होते पण कधी बोलताच नाही आले." ती श्वेताजवळ येत म्हणाली.

"मला आपली लेक म्हणतेस ना? मग माई तूच तर माझी खरी आई आहेस. स्वतःच्या पोटात वाढलेला लहान जीव बाहेर येतो तेव्हा केवढा आनंद होतो, हे सगळं मी अनुभवलंय.

केवळ माझ्यासाठी तू मातृत्वाच्या या आनंदाला पारखी झालीस, मला माफ कर गं. आई, ह्या बाळावर पहिला हक्क फक्त तुझा आहे. माझ्यावर जेवढं प्रेम केलंस ना त्याच प्रेमाने ह्या बाळाला माझ्याआधी तू पहिला स्पर्श कर." केतकीचा स्वर कातर झाला होता.

श्वेताने केतकीला जवळ घेऊन बाळाला हातात घेतले. तो चिमणा जीव हातात घेतल्याक्षणी श्वेताच्या डोळ्यातून धारा वाहायला लागल्या. आज त्याच्या जन्माने केतकीबरोबरच तीही आई झाली होती.

****** समाप्त ******
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//