तूच माझी आई. भाग -३

वाचा आई आणि लेकीच्या नात्याची कथा.
तूच माझी आई.
भाग -तीन.

श्वेताची परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. चारच वर्षात नवऱ्याने टाकली म्हणून आईबाबाकडे येऊन राहिलेली ती. भाऊ वहिनी आणि आता तर आईबाबाही तिच्याकडे खोचक नजरेने पाहत होते. जास्त शिक्षण न झाल्यामुळे काही नोकरी धंदा करून वेगळे राहावे हाही पर्याय नव्हता. म्हणून नाईलाजाने ती या लग्नाला तयार झाली.

सारिकाच्या बोलण्याने श्वेताबद्दल कुसुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता पण तिच्या वागण्यात तिला काहीच खोट आढळत नव्हती. केतकीची शाळेची तयारी, सर्वेशचा टिफिन हे सारे ती मनापासून करत होती. सासुसासऱ्यांशीही प्रेमानेच वागे.


हळूहळू श्वेता सगळ्यात मिसळून गेली. सासुसासरे खूष होते. आधी काहीसा फटकून वागणारा सर्वेश हळूहळू खुलत होता. केतकीचे तर माईशिवाय पान हलत नसे. शाळेतल्या गमतीजमती, अभ्यास, तयारी सगळ्यांसाठी माई लागायची. आपण योग्य मुलगी शोधली याचा कुसुमताईला अभिमान वाटत होता.


एके दिवशी सकाळी श्वेताला मळमळत होतं, दोन तीनदा ओकारीही झाली. ऍसिडिटी वाढली असेल म्हणून तिने दुर्लक्ष केले.


"माई तुझ्या पोटात बाळ आहे? पोटात बाळ असलं की असाच त्रास होतो, ते टीव्ही वरच्या मालिकेत बघितलेय. हो ना गं आजी?"

तिने कुसुमताईकडे बघून विचारले आणि श्वेताचे मन वाऱ्यावर झुलू लागले. कारण पाळीची तारीख उलटून आठ दिवस झाले होते. इतक्या वर्षात असे एकदाही झाले नव्हते. दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी तिला 'गुड न्युज' सांगितली.


इतक्या वर्षानंतर अचानक आई बनणार ही बातमी ऐकून श्वेताच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

पहिल्या नवऱ्याने वांझोटी म्हणून तिला टाकले, पण ती वांझ नव्हतीच. आईपण काय असतं हे ती आता अनुभवणार होती. क्षणात तिच्या डोळ्यासमोर केतकीचा नाजूक चेहरा उभा राहिला. आणि मनातील भावनेवर तिने आवर घातला.

"मॅडम, मला हे बाळ नकोय हो." ती निग्रहाने म्हणाली.

"श्वेता, अगं इतक्या वर्षापासून तू या मातृत्वाला आसूसली होतीस ना? अचानक काय झाले? एक महिन्याचा जीव तुझ्या उदरात वाढतोय. दहा दिवसांनी त्याचे हृदयाचे ठोके सुरु होतील. " डॉक्टर तिला समजावत होते.


"म्हणजे बाळाला अजून जीव फुटला नाहीये न? किमान त्या बाळाचा जीव घेतलाय असा ठपका तरी माझ्यावर बसणार नाही. मॅडम, खरेच हो, मला नकोय हे बाळ." तिने डोळे पुसतच म्हटले. बाळाच्या आगमनाने छोट्या केतकीवर होणारा अन्याय ती मान्य करू शकत नव्हती.

********

दिवसामाजी दिवस सरत होते. केतकी मोठी होत होती. सुंदर नाजूक कळीचे फुलात रूपांतर झाले होते. श्वेताच्या तालमीत ती आता चांगली तयार झाली होती. अभ्यास, घरकाम, स्वयंपाक सर्वच तिला यायचे.

माई बद्दल मनात ओढ तर होतीच पण आई म्हणायला मन कधी धजावले नव्हते. तिने आपल्याला आई म्हणावे ही अपेक्षा श्वेताने केव्हाच सोडून दिली होती. एवढे सोडले तर दोघींचे नाते चांगले बहरले होते.

केतकीचे ग्रॅज्युएशन आटोपले नी तिला रिषभचे स्थळ सांगून आले. रिषभ एका मोठ्या कंपनीत कामाला होता. घरी आई बाबा दोघेच. देखणी केतकी पहिल्याच नजरेत रिषभला आवडली. सहा महिन्यात त्यांच्या लग्नाचा बार उडाला.


दोन महिन्यांनी केतकीकडे गोड बातमी असल्याचा फोन आला आणि तिच्यासाठी काय करू नी काय नको असे श्वेताला झाले. पहिली तीन महिने ती केतकीला घरी घेऊन आली. एखाद्या नाजुक फुलासारखी ती केतकीला जपत होती, तिने एकदा म्हटलेही, "माई किती गं जपतेस? आजारी नाहीये मी."

"असू दे गं, माझं नाजूक फूल आहेस तू." श्वेता हसून म्हणाली.


पहिले बाळंतपण माहेरीच करायचे या हट्टाने सासूबाईने केतकीला परत माहेरी पाठवले. श्वेता कितीही चांगली असली तरी तिला ना बाळंतपणाचा अनुभव, ना छोट्या बाळाचा. आपला कसा निभाव लागेल या विवंचनेत केतकी होती.

केतकीचे बाळंतपण नीट पार पडेल ना? वाचा पुढील अंतिम भागात.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
फोटो गुगल साभार.
******

🎭 Series Post

View all