तूच माझी आई. भाग -२

वाचा आई आणि लेकीच्या नात्याची कथा.
तूच माझी आई.
भाग -दोन.


"केतकी, मी तुला का त्रास देईन? पण तुला कधी असे वाटले ना की जाच होतोय तर मला लगेच बोल तसे. मी माझे वागणे नक्की सुधारेन." तिचा गालगुच्चा घेत श्वेता.

"केतकी ये गं झोपायला." कुसुमताईचा आवाज आला तशी ती नाजूक कळी धावत जाऊन तिच्या कुशीत विसावली.

"आजी, मावशीआजी म्हणते तशी ती नाहीये. ती नाही जाच करणार मला." झोपत असताना केतकी कुसुमताईला सांगत होती.

तिने केवळ हुंकार भरला. तशी तिला श्वेता बरीच वाटली होती, म्हणून तर सर्वेशच्या दुसऱ्या लग्नाचा घाट घातला होता.

"असे काही नसते हो. आजकालच्या मुलींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात बरं." मावशीआजी बरळलीच.

"सारिके, गप की. तू आणि तुझी सून रूपा दोघींनीही लहानशा लेकराच्या मनात काय काय भरवले आहे. सर्वेशच्या लग्नापुरत्याच तुम्ही आला होतात ना? मग आता उद्या गेलात तरी बरे होईल."
कुसुमताई काहीशा रागातच म्हणाली.

"राहिलं. स्वतःच्या रक्ताची बहीणच अशी बोलत्ये तर मग त्या श्वेताकडून काय अपेक्षा ठेवायची? ती तर दुसऱ्यांदा बोहल्यावर चढलेली. त्यात वांझोटी. आम्हाला काय म्हणा त्याचं?

रूपे सामानाची बांधाबांध कर बाई. सकाळीच इथून निघू आपण." सूनेकडे पाहत मावशीआजी म्हणाली. रूपानेही होकार भरत सामान आवरायला घेतले.


"आजी वांझ म्हणजे काय गं? मावशीआजी नव्या आईला वांझोटी का म्हणते?" केतकीने विचारले.

" तुला नाही कळायचे. झोप तू." कुसुमताई तिला थोपटत होती.

सगळे झोपले, कुसुमताईला मात्र झोप येत नव्हती. सारिकाला ती रागे भरली खरी, पण तिचे म्हणणे फारसे कुठे चुकीचे होते? सावत्र आई कशी असते हे ऐकून आणि बघूनही माहीत होतेच की.

श्वेता केतकीला आपली मुलगी मानून माया लावेल की नाही हा प्रश्न होता.
कुसुमला दीपिका, म्हणजे केतकीच्या आई आठवली नि डोळ्यात टचकन पाणी आले.

सर्वेश आणि दीपिकाच्या लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी केतकीचा जन्म झाला. घर कसे आनंदाने न्हाऊन निघाले. हा आनंद नियतीला जास्त काळ पाहवला नाही. केतकी पाच वर्षांची असताना एका अल्पशा आजारात काळाने दीपिकावर झडप घालून हिरावून घेतले. तेव्हापासून केतकी कुसुमच्या सानिध्यात वाढू लागली.

कुसुमताई खमकी होती पण आता थकली होती. तरणाताठा लेक डोळ्यासमोर खंगत चाललाय हे तिला सहन होत नव्हते. दुसऱ्या लग्नाला तो तयार नव्हता. शेवटी केतकीची शपथ घातली तेव्हा कुठे त्याने होकार दिला.

त्याचा होकार मिळाला आणि कुसुमताईचे वधूसंशोधन सुरु झाले. मुद्दामच घटस्फोटिता, विधवा अशा मुली ती पाहत होती.तिने सुरु केले. अशातच तिला श्वेता दिसली. नाव तेवढे श्वेता, वर्ण मात्र साधाच सावळा. नाही म्हणायला चेहऱ्यावर थोडे तेज होतेच. पण दीपिकाशी तुलना केली तर दीपिकाच सरस होती

कुसुमला सावळी श्वेता आवडली. किमान सौंदर्याचा माज तर करणार नाही असे तिचे म्हणणे होते. वांझ म्हणून नवऱ्याने मारहाण करून तिला सोडली होती. लग्नाच्या चार वर्षांत तिचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटित, त्यातून वांझ म्हणजे केतकीवर ती अन्याय करणार नाही, हे ही बरेच होते. सर्वेश साठी तिने श्वेताचे स्थळ मंजूर केले.

त्याने केवळ आई म्हणतेय म्हणून केतकीसाठी हा प्रस्ताव मान्य केला.

श्वेताची परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. चारच वर्षात नवऱ्याने टाकली म्हणून आईबाबाकडे येऊन राहिलेली ती. भाऊ वहिनी आणि आता तर आईबाबाही तिच्याकडे खोचक नजरेने पाहत होते. जास्त शिक्षण न झाल्यामुळे काही नोकरी धंदा करून वेगळे राहावे हाही पर्याय नव्हता. म्हणून नाईलाजाने ती या लग्नाला तयार झाली.

सर्वेश आणि श्वेताच्या लग्नाने छोट्या केतकीवर अन्याय तर होणार नाही ना? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
फोटो गुगल साभार.
********

🎭 Series Post

View all