तूच माझी आई. भाग -१

आई आणि मुलीच्या नात्याची कथा.
तूच माझी आई
भाग -एक.

सात आठ वर्षांची चिमुरडी दाराआडून श्वेताकडे टक लावून बघत होती. ती आपल्याकडे बघतेय हे श्वेताला जाणवत होते. तिचा गोरापान वर्ण, पाणीदार टपोरे डोळे, गुलाबी गाल आणि गुलाबाच्या पाकळ्यासारखेच गुलाबी गुलाबी ओठ!

डोळ्याच्या कोपऱ्यातून तीही केव्हाची त्या चिमुकलीला न्याहाळत होती. दोघींचा हा चोरशिपायाचा खेळ किमान दहा मिनिटे तरी चालला. अकराव्या मिनिटाला दोघींचीही नजरानजर झाली अन श्वेता तिच्याकडे बघून गोड हसली. बदल्यात त्या नाजूक गुलाब पाकळ्याही हलल्या. नजर मात्र बुजलेलीच, जणू तिची चोरी पकडल्या गेलीय.

श्वेताने हात हलवून तिला स्वतःकडे येण्याची खुण केली. दबक्या पावलाने ती तिच्याशेजारी येऊन उभी राहिली.

"नाव काय गं तुझं?" गोड आवाजात श्वेताने विचारले. आवाजात आपुलकीचा गोडवा आपोआप उतरला होता.


"केतकी." ती चिमुकली आपल्या मंजुळ स्वरात म्हणाली.
"तुझे नाव किती गं गोड! अगदी तुझ्यासारखेच. मला केतकीची फुले आवडतात. तू ही फार आवडलीस."

केतकीकडे हसरा कटाक्ष टाकून श्वेता म्हणाली.

"खरंच मी आवडले तुला?" केतकीच्या नजरेत काहीसा अविश्वास होता.

"हो, अगदी खरं. देवाशप्पथ!" श्वेता हसून म्हणाली.

"अगं, काय केलेस हे? आजी म्हणते देवाची शपथ घ्यायची नसते." केतकी.

" काय करणार मग? एका गोड मुलीचा माझ्यावर विश्वासच बसत नाहीये तर देवबाप्पाला मध्ये आणावेच लागेल ना." ती मिश्किल हसली.

केतकीच्या ओठावर देखील हसू उमटले.

"तुला एक विचारू?"

"काय?"

"तू खरेच माझी नवी आई आहेस?" केतकीने आपले टपोरे डोळे तिच्यावर रोखले.
तिच्या त्या निरागस प्रश्नावर श्वेताने फक्त मान डोलावली.

"पण तू तर माझ्या आईसारखी गोरी नाहीयेस. चेहराही तसा नाहीये." ती थोडीशी खट्टू झाली.

"तुला जेव्हा वाटेल ना की मी तुझी आई आहे, तेव्हाच तू मला आई म्हणून हाक मार. मग तर झालं?" तिच्या नाजूक खांद्यावर हात ठेऊन श्वेता म्हणाली.

" तोवर तुला काय म्हणू?" ती.

"श्वेताआई म्हण, ताई, माई किंवा श्वेता म्हण चालेल मला." श्वेता.

"आई? नकोच." केतकीने नकारार्थी मान हलवली.

"ताई म्हटलं तर? नाही. एवढ्याशा केतकीची साडीवाली ताई कशी असेल ना? श्वेता तरी कसं म्हणू? तू मोठी आहेस ना माझ्यापेक्षा. त्यापेक्षा तुला मी माई म्हणेन. आवडेल तुला? " तिने डोके खाजवत स्पष्टीकरण देत विचारले.

"हो, नक्कीच." श्वेताने दुजोरा दिला.


"माई, तू माझा जाच करणार आहेस का गं?" थोडावेळ थांबून केतकीने पुन्हा श्वेताला प्रश्न केला.

"हे तुला कोण बोललं?" श्वेता.


ती मावशीआजी आहे ना? ती आणि रूपा काकू पण म्हणाली.

श्वेताने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

"केतकी, मी तुला का त्रास देईन? पण तुला कधी असे वाटले ना की जाच होतोय तर मला लगेच बोल तसे. मी माझे वागणे नक्की सुधारेन." तिचा गालगुच्चा घेत श्वेता.

"केतकी ये गं झोपायला." कुसुमताईचा आवाज आला तशी ती नाजूक कळी धावत जाऊन तिच्या कुशीत विसावली.

केतकी आणि श्वेताचे नाते बहरेल का? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
फोटो गुगल साभार.
*******

🎭 Series Post

View all