Jan 26, 2022
सामाजिक

तूच माझा सांगाती

Read Later
तूच माझा सांगाती

"आग ए शेवंते, आवर की बिगी बिगी. किती उशीर करतीयास? सांज होऊन जाईल की, आवर लवकर लवकर." शेवंताची सासू सखू.

"व्हय माय आवरती." शेवंता

"आरं ये रायबा, तिकडं काय बघतूस? आवर की लवकर लवकर." शेवंताची सासू सखू

"आगं माय, आबाळ झालंया. पाऊस पडतूय की काय? बघतूय म्या." रायबा

"औंदा काय व्हतय काय माईती? म्हापूर येणार म्हणतायेती." परत शेवंताची सासू .

"त्येच बघतूया. औंदाच पीक बरं आलंय. पर पावसाच काय बी सांगायला येत न्हाय बग." रायबा

"आरं, तू तुज कामं कर. आपलं कायबी नुकसान व्हायचं न्हाय बग. मी देवाला साकडं घालीन." शेवंताची सासू

रायबा, शेवंता, शेवंताची सासू आणि शेवंताची दोन मुले असा त्यांचा पंचकोनी कुटुंब होतं. कोल्हापूर जिल्ह्यातील एक छोटसं खेडेगाव. त्या खेडेगावात त्यांचे एक छोटासे घर आणि एक एकर शेती एवढेच होते. त्या शेतामध्ये घरापुरते धान्य करायचे आणि थोडा भाजीपाला विकून घर चालवायचे असे त्यांचे नेहमीचेच काम होते.

आज दिवसभर शेतात राबायचे आणि कष्ट करून धान्य पिकवायचे त्याशिवाय खायला मिळत नव्हते. शेतामध्ये बी पेरण्यापासून ते पीक काढण्यापर्यंत सारं काही घरणंच करत होते. शेतात काम करायला कोणी गडी घेत नव्हते. कारण त्यांना पगार कोण देणार? आणि कसा देणार? हा सगळ्यात मोठा प्रश्न होता.

घरामध्ये दोन दुभती जनावरे होती. त्यांचे दूध थोडे घरात वापरून उरलेले विकत असत. तेवढाच घरखर्चाला हातभार. शेतामध्ये ज्वारी, मका, थोडा भाजीपाला आणि गहू, तांदूळ अशी वेगवेगळी पिके थोडी थोडी लावली होती. त्यातून घरखर्च चालेल तसेच वर्षभर पुरेल इतके जरी धान्य शेतातून मिळाले तरी घर निवांत चालू शकते अशी त्यांची योजना होती.

पिके थोडीफार वर आली होती. त्यांची छान निगा झाली होती. तरारून पीक आलेले असताना वरती आभाळ दाटून आलेले बघून रायबाचे काळीज भरून आले होते. पाऊस जास्त पडला आणि पिके सगळी कुजून गेली तर काय करायचे?? असा त्याच्या मनामध्ये विचारचक्र सुरू होते.

या विचारातच सगळेच शेतातली कामे आवरून संध्याकाळी घरी आले. घरी आल्यावर शेवंता जनावरांचे दूध काढण्यासाठी जाते आणि रायबा जनावरांना चारा घालण्यासाठी आणि पाणी पाजवण्यासाठी जातो. शेवंता तिथून आल्यानंतर घरी येऊन चूल पेटवते आणि स्वयंपाकाला लागते. भाकरी, पिठले करते आणि भात घालते. स्वयंपाक झाल्यावर सगळ्यांना जेवायला वाढते आणि ती पण त्यांच्यासोबत जेवू लागते.

"अगं ए सुमे, जरा वाकून खा की. भात ताटातन पडतंय बग खाली. अगं आपण इतकं कष्टान सगळं करतूया तर त्या लक्षुमीला अस खाली टाकायच नसतंय. ताटा म्होर वाकून खायचं असतंय. तरचं लक्षुमी परसन्न व्हती बग." सखू

"व्हय आजे." सुमी

"पण आपण समदी शेतात किती राबतो. राबल्याशिवाय काय बी मिळत न्हाय. घाम गाळल्याशिवाय पीक येत न्हाई. दिवस-रात्र मातीचाच इचार करत बसायचं आणि पाऊस पडला तर पीक कुजून जाणार आणि न्हाय पडला तर वाळून जाणार. शेतकऱ्याच आयुष्य म्हंजी नुसता नुसता कष्ट. राब राब राबायच आणि अपेक्षा काय बी करायची न्हाय. ज्ये येईल ते समादानान घ्याचं आणि पांडुरंगाचे आबार मानायचे.." सखू

"अगं आये. जेव की गुमान. काय बडबडत बसलीयास?" रायबा

"आर, पोरांना बी समद कळायला हवं. म्हंजी तेनला राबायला तरास पडत न्हाय." सखू

"व्हय, जेवल्यावर बोलत बसा की. आता जेवा गुमान." रायबा

इतक्यात वीज कडाडली आणि रायबाच्या छातीत धस्स झालं. शेतात तरारुन उगवलेल्या पिकाची त्याला आठवण झाली. रात्री जर का पाऊस पडला? तर माझ्या पिकाच काय होईल? याने त्याचे मन सुन्न झालं. त्या विचारातच त्यांने ताटातले जेवण संपवले आणि तो बाहेर येऊन उभा राहिला.

"धनी, काय बघताय?" शेवंता

"अगं, इजा कडाडल्या आणि जीव धस्स झालं बग. या पावसाच काय बी सांगायला येत न्हाय बग.. पीक वर डोलायला लागलय. औंदा तर चांगलं पीक येईल म्हटलं तर हे अस. पूर तर येतुयाच. पर या अवकाळी पावसान पण समद भुईसपाट केलं न्हाय म्हंजी झाल. शेवटी पांडुरंगाची किरपा." रायबा

"आवं, काय बी हुणार न्हाय बगा. तुमी लई ईचार करू नगा." शेवंता

असे बोलून दोघेही आत झोपायला येतात. शेवंता अंथरून टाकते. रायबा अंथरुणात पाठ टेकवतो तोच पावसाला सुरुवात होते आणि त्याचा जीव कासावीस होऊ लागला. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं तर मोठा पाऊस पडत होता.

ते पाहून शेवंता म्हणाली, "कसला इचार करताय धनी? झोप येत न्हाय काय?"

"यवढा पाऊस पडतोय समद पी व्हाऊन गेलं तर न्हायतर कुजल तर.. याचा इचार करतूय ग." रायबा.

"काय बी हुनार न्हाय बगा. म्या तसा नवस केलाय बिरूबाला. त्यो आपलं पीक वाचवील. तुमी आता झोपा गुमान." शेवंता

"आता देवाचीच किरपा. त्येच्या मनात काय हाय काय म्हाईत?" असे म्हणून रायबाने पाठ फिरवली, तशी शेवंता पण त्याच्या शेजारी झोपली.

सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट आणि कोंबड्यांची बांग ऐकून शेवंताला जाग आली. शेजारी पाहिले तर रायबा नव्हता. ती झटकन उठली अंथरूण गुंडाळून बाजूला ठेवले. अंघोळ आवरून तिने पीठ मळून भाकर्या थापल्या, भाताला आधन आणले, मिरचीचा खरडा आणि पिठले बनवले. भाकरीवर खरडा, पिठले, कांदा, मिरची घालून कपड्यात बांधले आणि ती निघाली. जाताना मुलांना म्हणाली, "पोरांनो, गुराकडं आणि घराकडं बगा रं." आणि ती लगबगीने पावलं टाकत रानाकडं गेली. रानात धनीला बघून तिच्या जीवात जीव आला. तिने झाडाला पिशवी अडकवली आणि रायबाजवळ गेली.

"धनी, ह्ये काय करताय?" शेवंता

"पाटातलं पाणी भायेर जायला बांद तोडतोय. न्हाईतर पीक समद जाईल ग." रायबा असे बोलतो न बोलतो तोच शेवंताने पण बांद तोडायला चालू केले.

"अगं शेवंते, ह्ये काय करतियेस तू? हो बाजूला. तुला ह्ये जमणार न्हाय." रायबा.

"का बरं जमणार न्हाय? समद येतंय मला." असे म्हणून ती परत कामाला लागली. ती काम बघून रायबाला खूप वाईट वाटले. एकतर पावसामुळे पीक येत नाही त्यामुळे पैशाची चणचण देखील होती, त्यात बायको पोरं इतकी राबत आहेत याचेच त्याला वाईट वाटत होते. सगळी बांद मोकळी केल्यावर दोघेही एका ठिकाणी उभे राहून पाहू लागले.

"धनी, तुमी काय बी काळजी करू नका. पांडुरंग आपल्या पाटीशी हाय." शेवंता

"व्हय ग. त्यो हाय म्हणून आपण दोन घास तरी सुकान खातोय बग." रायबा

"चला तर मग. दोन घास खाऊन घ्या. मी भाकर आणली हाय." शेवंता

"आता, तू येवड्यात आणलीस बी व्हय." रायबा

"मग, तुमी न्ह्यारी केली न्हाय तर माजा जीव कशात लागतूय व्हय?" शेवंता.

"त्ये बी खरच हाय म्हणायचं." असे म्हणून दोघेही जेवायला बसले. शेवंताने कापड सोडून त्यातील भाकरी रायबाला दिली. रायबाने एक बुक्की घालून कांदा फोडला आणि भाकरी खाऊ लागला. खाता खाता शेवंताला म्हणाला, "तू पण जेव की."

"नग, आदी तुमी जेवून घ्या. म्या घराकडं जाईन." शेवंता

"आगं कशाला? घे की इथंच. ह्ये धर." असे म्हणून रायबा भाकरीचा घास करून तिच्या तोंडाजवळ नेतो.

"आव ह्ये आन् काय नवीन? कुणीतरी बघल की." शेवंता लाजत म्हणाली.

"कुणी बी न्हाय इथ. पिरमान द्येतोय घ्ये की." म्हणत रायबान घास शेवंताच्या तोंडात भरवला तशी शेवंता लाजून चूर झाली.

शेतातील थोडी काम आवरून दोघेही घरी आले. घरी आल्यावर परत त्यांच्या कामात गुंतले असता पावसाने जोर धरला तो इतका की रात्रभर थांबायच नावच घेईना. आता मात्र रायबाचे डोळे भरून आले. आपण केलेले कष्ट वाया गेले असे वाटू लागले. तेव्हाच शेवंता त्याच्या शेजारी जाऊन बसली.

"आव कसला इचार करताय?" शेवंता

"ह्यो पाऊस समादानान जगू देत न्हाय. समद पीक गेल तर आपण खायचं काय? इतकं कषट केलं, घाम गाळल पण काय बी हाताला लागलं न्हाय बग." असे म्हणून रायबाच्या डोळ्यातून टचकन पाणी आले. ते पाहून शेवंताला काळजात कुणीतरी वार केल्यासारखं झालं. दोन दिवस जणू घरात सुतक आल्याप्रमाणे कुणीच कुणाशी बोलले नाही. शेवंताने मग उभारी घेतली.

सर्वांना समजावून सांगून शेतात मशागत केली. पाऊस थांबल्यावर परत नवीन पीक घातले. त्यात भेंडी, वांगी आणि नंतर काही प्रमाणात पालेभाजी पण होती.

आता पीक हळूहळू वर येऊ लागले. चांगले उगवलेही. थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागली होती. वसंताचा महिना येत होता. आता तो भाजीपाला तोडून बाजारपेठेत गेला म्हणजे त्यांचा जीवात जीव आला म्हणून त्यानी हळूहळू भाजीपाला तोडण्यास सुरूवात केली.

पण नशिबात काही वेगळंच वाढलेल होतं. ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. कोरोनाची लाट आली आणि सरकारने लाॅकडाऊन जाहीर केला. आता काय करावे? हा मोठा यक्षप्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. भाजीपाला तोडला तर आहे आता त्याचे काय करायचे? मग त्यांनी निर्णय घेतला. सकाळी उठून

“ए शेवंते आग आवर बिगी बिगी. उशीर व्हायला नग नाईतर येळ व्हुईल यायला. मग पुलीस धरतील की. आली का ग.” रायबा

“आव आले की जरा दम धरा. समद घ्याया तर पाईजी नव्ह. माळव आणि भाजी घेतली बगा. एक गटुळ मी घेती आणि ह्ये दोन तुमी घ्या. “ शेवंता

“बर चल बाई नायतर येळ व्हुईल.” रायबा

“चला. आग ए सुमे घराकडं जरा लक्ष दे. उगीच कुट जाऊ नग आणि गाई गुराला चारा पाणी दे. नाईतर बिचारी हंबरडा फोडतील.” शेवंता

“आग आए मी बी एतू की” सुमी

“आग नग आमी आकरा वाजू पतूर यू. तू बस घरात.” शेवंता

“आग ए शेवंते चल की. काय बोलत बसल्यास.” रायबा

“चला चला “ शेवंता

गेल्या वर्षी महापूरात त्यांच थोडफार नुकसान झालं. त्यातून उभारी घेऊन परत नव्याने सुरूवात केली तर आता ह्या कोरोनामुळे काही मिळेल की नाही माहीत नव्हतं. कोरोनामुळे सगळा शेतकरीवर्ग आपल्या शेतातील पीकावर नांगर फिरवत आहेत हे पाहून रायबाच्या काळजात धस्स झालं.

रायबाची बायको म्हणजे शेवंता म्हणाली “आव आता काय करायचं?”

रायबा सुन्न होऊन म्हणाला “यवड्या कसटान ह्ये पीक घेतलं. राब राब राबलो त्यात. घाम गाळल अन् सोन्यासारख पीक आल आणि त्यावर नांगर फिरवायची माजी काई हिमत व्होत न्हाय बग.”

शेवंता “मग वो तुमी काय सांगशीला त्ये करू.”
रायबा “ह्ये बग सकाळच्या पारी लवकर माल घ्युन शहराकड जायच. काय ते आकरा वाजूपतूर येळ हाय. ज्येवड व्हिल त्येवड विकु. मग उरल्याल तितच आशरमात दिऊ आणि घराकड यिऊया.”

शेवंता “आव मला पटतय बगा तुमचं. पण मला सांगा ते आशरम जर सापडल न्हाई आणि येळ झाला तर.”
रायबा “मग पुलीसांना दिऊ. तुमी घ्या अन् उरलेलं वाटून टाका म्हणू.”

शेवंता “बर मग मी उद्याची तैयारी करते.” म्हणून ते दोघेही भाजीपाला घेऊन शहरात गेले. काही मिळो अथवा न मिळो पण केलेले कष्ट वाया जाऊ देणार नाहीत.

खरंच देशातील शेतकरी दुष्काळ असो की महापूर आणि आता हा कोरोना कोणत्याही परिस्थितीत अगदी दोन हात करून लढत आहेत. त्यांनी शेतात घेतलेले कष्ट अगदी घाम गाळून शेतात घेतलेले पीक जर असे वाया जात असेल तर त्या शेतकर्याला किती ञास होत असेल? किती वेदना होत असतील? आपण जर एखादे काम मनापासून केल आणि कोणीतरी येऊन ते विस्कटले तर आपल्याला किती राग येतो आणि शेतकर्याचे तर संपूर्ण जीवनच त्या शेतीवर असते. अशा परिस्थितीतही ते पुन्हा नव्याने उभा राहतात. जर शेतकरी समृध्द तर देश समृद्ध. म्हणून शेतकरी समृद्ध झाला पाहिजे.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..