तूच माझा बाबा.. अंतिम भाग

कथा बापलेकाच्या आगळ्यावेगळ्या नात्याची


तूच माझा बाबा.. भाग १२



मागील भागात आपण पाहिले की योगेशची कथा सांगून होते. त्यावर समर काहीच न बोलता निघून जातो. आता बघू पुढे काय होते ते.


" सुचेता, समर तुझ्याशी बोलला?" ऑफिसमधून आल्या आल्या योगेशने विचारले. सुचेताने मान हलवली.

" हा बोलणारच नाही का आता माझ्याशी?"

" बोलेल रे. थोडा वेळ दे त्याला." सुचेता त्याला समजावत बोलली.

" अजून किती वेळ द्यायचा? हा अबोला मला नाही सहन होत." योगेश दुःखी स्वरात बोलला. सुचेता काहीच न बोलता फक्त त्याच्या हातावर हात फिरवत राहिली. योगेशही दुखावलेल्या नजरेने समरच्या बंद खोलीकडे बघत राहिला. तो सध्या फक्त जेवण्यापुरताच खोलीबाहेर यायचा. बाकीचा सगळा वेळ काहीतरी करत असायचा. सुचेता आणि योगेशने अजून काही दिवस वाट बघायची असे ठरवले होते तरी घरात एक नकोसा तणाव भरलेला आहे हे जाणवत होते. सतत हसत असणाऱ्या त्या घराला ती शांतता असह्य होत होती.

समरचा वाढदिवस जसा जवळ येत होता तसतशी योगेशची घालमेल वाढत चालली होती. खरेतर त्याचा बारावा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या डोक्यात काय काय प्लॅन होते. पण आता तोच दुरावला होता. योगेशला बघितले की समर कारण काढून आत निघून जायचा. शेवटी योगेशने ही कोंडी फोडायची ठरवली.

" समर, मला तुझ्याशी बोलायचे आहे."

" मी थोडा बिझी आहे. नंतर बोलू का?" बोलताना त्याने बाबा म्हणायचे टाळले हे योगेशला जाणवले. तो कडवट हसला.

" तुला मी इथे नको आहे?" योगेशने सरळ प्रश्न विचारला.

" माझ्याकडे एक पाहुणे येणार आहेत. मला त्यांना घ्यायला खाली जायचे आहे. मी नंतर बोलू का प्लीज?" योगेश खांदे पाडून खुर्चीवर बसला. समर खाली निघून गेला. हे कोण पाहुणे असतील? सुचेताचे आईबाबा? पण तिने नंतर त्यांच्याशी जेवढ्यास तेवढाच संबंध ठेवला. मग कोण असेल? बाहेर कोणाचातरी बोलण्याचा आवाज आला.

" आजी, आजोबा हे आपले घर." समरचा आवाज आला.

" अरे, हळू.. वय झाले आहे माझे." योगेशने आवाज कान देऊन ऐकला.
" आई??? कसं शक्य आहे? " तो उठला. दरवाजात खरेच सुधाताई आणि श्रीकांतराव होते.

" तुम्ही दोघं? इथे?" त्याला काय बोलावं तेच सुचेना.

" आत येऊ ना?" श्रीकांतरावांनी विचारले.

" बाबा.. " योगेशने पुढे काहीच न बोलता जाऊन त्यांना मिठी मारली. सुधाताई बघत उभ्या होत्या. योगेशने त्यांना मिठी मारल्यावर इतके वर्ष थांबवलेले त्याचे अश्रु बाहेर पडले. कोणाचा आवाज आहे हे बघायला आलेली सुचेता दरवाजातच थबकली. पुढे येऊ की नको विचार करत असतानाच सुधाताईंनी तिला पुढे बोलावले.

" सॉरी.." त्या सुचेताला बोलल्या.

" आई.." सुचेता रडायला लागली. तिचा आवेग ओसरल्यावर तिने श्रीकांतरावांना नमस्कार केला.

" मी चहा ठेवते. तुम्ही बसा.." सगळे बसले. सुधाताई घर बघत होत्या. योगेशच्या मनात प्रश्न खदखदत होता. तो जाणून बाबा सुधाताईंना म्हणाले,
" तुमच्या चिरंजीवांना प्रश्न पडला आहे की आपण इथे कसे? बरोबर ना?"

" नाही.. ते म्हणजे.." योगेशचे ततपप झाले.

" आमच्या नातवाने आमची चूक आम्हाला दाखवून दिली. ती पटली. म्हणून इतक्या वर्षांनी त्याचे म्हणणे ऐकून आम्ही आलो." सुधाताई समरकडे बघत बोलल्या.

" खरंच? पण त्याला तुमचा पत्ता, नंबर कसा सापडला?" योगेश समरकडे न बघता बोलला.

" बाबा, मी शोधून काढले फेसबुक आणि अजून कुठून कुठून. बेडरूममध्ये बसून मी हेच शोधत होतो. तुला आवडले माझे बर्थ डे गिफ्ट?" समरने पुढे येत योगेशला विचारले.

" खूप.." अजूनही योगेशची त्याला जवळ घ्यायची हिंमत होत नव्हती. समरच त्याच्या जवळ आला.

" माझ्यामुळे तुझे आईबाबा तुझ्यापासून दूर गेले होते म्हणून जोपर्यंत त्यांची आणि तुझी परतभेट होत नाही तोपर्यंत तुझ्याशी बोलायचे धाडस होत नव्हते."

" वेडा आहेस तू.." योगेशने समरला उचलून घेत म्हटले. आईबाबा दोघेही प्रेमाने ते बघत होते. समरच्या मनात काही दुरावा नाही हे बघून योगेशच्या मनावरचे दडपण कमी झाले होते. तो पहिल्यासारखा हसत खेळत बोलू लागला. सगळे जेवायला बसले. जेवताना न राहवून योगेश बोलून गेला,
" आई बाबा, इथेच रहाल आता आमच्यासोबत ?" त्याने प्रश्न विचारताच सुधाताई , श्रीकांतराव आणि समर एकमेकांकडे बघू लागले. समरने बोलायला तोंड उघडले.

" बाबा, मला माहीत आहे. मोठ्यांच्या मध्ये नाही बोलायचे. पण तरिही. मीच आजीआजोबांकडे कायमचा रहायला जाणार आहे.."

" काय? हे कधी ठरले?" सुचेताने विचारले.

" आई, माझ्यावरचे प्रेम कमी होऊ नये म्हणून बाबाने दुसरे बाळ होऊ दिले नाही. याचा अर्थ त्याचा स्वतःवर किंवा स्वतःच्या प्रेमावर विश्वास नाही. मग तो विश्वास जेव्हा त्याला येईल. तेव्हाच आम्ही परत येऊ. राईट आजी?" समर मोठ्या माणसांसारखे बोलत होता. सुचेता आणि योगेशला क्षणभर काहीच समजले नाही.

" समर??"

" हो बाबा.. मला एक पूर्ण फॅमिली हवी आहे आता. आजी, आजोबा, तू , आई, मी आणि माझी बहीण किंवा भाऊ.. देशील?"

योगेशच्या डोळ्यातला होकार हळूहळू सगळ्यांपर्यंत पोहोचला.. एक कुटुंब परत नव्याने एकत्र आले.


नमस्कार.. ही कथा एका सत्यघटनेवर आधारित आहे. स्त्रीच्या मातृत्वाची महती गाताना पुरूषाचे पितृत्व थोडेसे दुर्लक्षितच राहते. त्यातूनही वंशाचा दिवा या संकल्पनेमुळे पुरूष तसा बदनामच आहे. अशावेळेस जगात असेही काही पुरूष आहेत ज्यांनी त्या मुलावर अन्याय होऊ नये म्हणून स्वतः पिता होणे टाळले. खरेतर असे त्याग हे दिसून येत नाहीत. ते प्रकाशात आणण्याचा हा छोटासा प्रयत्न. या कथेतल्या योगेशने दुसरे बाळ होऊ दिले तरी खऱ्या आयुष्यातल्या योगेशने ठामपणे तो निर्णय टाळला.. एक सलाम त्यांच्या वृत्तीला..

कथा कशी वाटली ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all