तूच माझा बाबा.. भाग ११

बापलेकाच्या आगळ्यावेगळ्या नात्याची कथा


तूच माझा बाबा.. भाग ११


मागील भागात आपण पाहिले की योगेश बाळासाठी आपले घर सोडतो. आता बघू पुढे काय होते ते..


" सुचेता, मी आलो आहे इथेच रहायला." योगेश खिन्न स्वरात बोलला. त्याचा चेहरा आणि आवाज बघून सुचेताने काहीच न बोलणेच योग्य समजले. तो आत आला. सोफ्यावर बसला. तो ही सुन्न झाला होता, हे जे काही घडले होते त्यासाठी. अगदी पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत परिस्थिती केवढी वेगळी होती. आता? ना आईबाबा ना निशांत. आहेत ते फक्त सुचेता आणि बाळ. सुचेता तरी आपली आहे का? तो खिन्नपणे हसला. काय ठरवले आणि काय झाले आहे? तो विचार करत बसला असतानाच सुचेताने चहाचा कप समोर ठेवला. त्याला आश्चर्य वाटले.

" तो मगाशी जेवण द्यायला आला होता, त्याला विनंती करून दूध आणून द्यायला सांगितले होते." सुचेताने त्याच्या मनातले ओळखून उत्तर दिले.

" चहा छान झाला आहे. मला हवा तसा."

" निशांतने सांगितले होते एकदा तुला कसा चहा आवडतो ते." सुचेता बोलून गेली. एक अवघडलेली शांतता पसरली.

" मी थांबले आहे जेवायची. तुला हवे तेव्हा सांग. मी वाढते." सुचेता कोंडी फोडत बोलली.

" सुचेता, एक विचारायचे होते." आत जात असलेली सुचेता थांबली. "तुला चालणार आहे, मी इथे राहिलेले?"

"आईंना मान्य नाही ना हे, मग तू गेलास तरी चालेल. मी बघीन काहीतरी."

" सध्या मला बाळ सोडून काही महत्वाचे वाटत नाही. आईबाबा बोलतील नंतर माझ्याशी." शेवटचे वाक्य बोलताना योगेशचा स्वतःच्या शब्दांवरही विश्वास नव्हता. योगेशने घर सोडताच त्याच्या बाबांनी सगळा बिझनेस त्याच्या नावावर केला आणि ते निवृत्त होऊन त्यांच्या गावी जाऊन राहिले. त्यांनी तडकाफडकी घेतलेला निर्णय योगेशला पटला नाही. पण त्यावर त्याचे बोलणे सुद्धा त्यांनी ऐकून घेतले नाही. सुचेता योगेशची ही तडफड बघत होती. तिला तिच्या आईबाबांचा खूप राग येत होता. काय गरज होती त्या दिवशी हे बोलायची? तशीही नंतर मदत तर काहीच केली नाही. त्यामुळे उगाचच योगेशचे घर मात्र सुटले. एवढ्या सगळ्या परिस्थितीतही योगेश बाळाचे नाव ठेवायला विसरला नव्हता. सुचेताशी ठरवून त्याचे समर असे नाव ठेवले होते. समरच्या प्रत्येक गोष्टीचे त्याने फोटो काढले होते. समरही त्याच्या बाळलीलांनी त्याचे मन गुंतवून ठेवत होता. त्याच्या सहवासात योगेश आपले दुःख विसरत चालला होता. आणि सुचेता?
समर वर्षाचा झाला. योगेशने त्याचा वाढदिवस जोरात करायचा ठरवला होता. त्या निमित्ताने आईबाबा त्याच्याशी बोलतील का हे त्याला बघायचे होते. त्याने तसा घरी फोन केला, पण त्याचा फोन दोघांनीही उचलला नाही. योगेशला खूप वाईट वाटले. तो बेडरूममध्ये उदास बसला होता. समरला झोपवून सुचेता बेडरूममध्ये आली. तिने काही पेपर्स योगेश समोर ठेवले. त्याने आश्चर्याने तिच्याकडे बघितले.

" यावर सही कर.." सुचेता बोलली.

" काय आहे हे?"

" आपल्या घटस्फोटाचे पेपर्स?"

" काय??"

" हो.. आपल्या दोघांनाही माहित आहे, हे लग्न म्हणजे केवळ नावापुरते आहे. माझ्यासाठी आणि समरसाठी मी अजून तुझा बळी जाऊ देणार नाही. तू आतापर्यंत आमच्यासाठी खूप काही केले आहेस. मला आता त्याची परतफेड करू दे. तुझ्याशी कोणीही हसत हसत लग्न करेल. कोणाला जर आपल्या लग्नाबद्दल काही प्रश्न पडलेच तर मी येऊन सांगेन की आम्ही कधीच एकमेकांचे पती पत्नी नव्हतो. ना मानसिक ना शारीरिक. आईबाबा पण तुझ्याशी परत बोलायला लागतील. योगेश सही कर यावर. जग ते आयुष्य ज्यावर तुझा अधिकार आहे." सुचेताला बोलून धाप लागली होती. पूर्ण वर्षभरात पहिल्यांदाच ती योगेशशी एवढे बोलली होती. नाहीतर दोघेही फक्त समरशीच बोलत. दोघांनाही एकमेकांशी बोलायला अवघड वाटायचे. योगेश तिचा आवेश बघून थक्कच झाला.

" बापरे.. तुला बोलताही येते?"

" म्हणजे?"
" हे एवढे बोलणे?"

" मी सिरीयसली बोलते आहे योगेश.. घटस्फोट घेऊन तू सुखाचे आयुष्य जग."

" तू जगू शकशील?"

" मी करीन मॅनेज.. निशांत गेल्यावरसुद्धा जगलेच ना.."

" हो.. पण म्हणून तू परत तेच आयुष्य जगावं असे मला नाही वाटत."

" मलाही तू हे असं जगावेस असे नाही वाटत."

" मग कर माझे आयुष्य पूर्ण.. दे मला जीवनभराची साथ." योगेश बोलून गेला. सुचेता त्याच्याकडे बघतच राहिली.

"तू काय बोलतो आहेस?"

" जे बोलतो आहे ते मनापासून.. निशांतची जागा कोणीच भरून काढणार नाही. म्हणून तू म्हणतेस तसे जग तर थांबणार नाही. समरचा बाबा तर मी आहेच. दे ना मला तुझा नवरा बनायची संधी.." योगेश हात पसरून बोलला. त्याच्या डोळ्यातले खरे प्रेम सुचेता पर्यंत पोचले. ती आवेगाने त्याच्या कुशीत शिरली. खऱ्या अर्थाने त्यांचा संसार सुरू झाला. इथे निशांत आणि सुचेताला ओळखणारी अनेक लोक होती. त्यांच्या बोलण्यातून समरच्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी घर बदलले. वडिल म्हणून प्रत्येक ठिकाणी योगेशने स्वतःचे नाव घातले होते. समर त्याचा मुलगा नाही हे तिथे कोणालाच माहित नव्हते. तिघे सुखाने राहू लागले. त्यानंतर तिथे सुचेताची एक कॉलेजमधली मैत्रीण बदली होऊन आली. जिला सुचेताचे निशांतशी लग्न झालेले माहित होते. आणि पुढचे सगळे तुला माहित आहे.



" इथेच संपली माझी गोष्ट." योगेश समरला बोलला. समर डोळे विस्फारून सगळं ऐकत होता. सुचेता डोळे पुसत होती.

" तुझे आईबाबा परत तुझ्याशी कधीच नाही बोलले?" योगेशने नकारार्थी मान हलवली.

" मला त्यांचा फोटो बघायचा आहे.." समर सुचेताला म्हणाला. सुचेताने योगेशकडे बघितले. त्याने मानेने होकार दिला. सुचेताने त्याला बॅगमधला निशांतचा फोटो आणून दिला. तो फोटो घेऊन काहीच न बोलता समर आत निघून गेला.


काय चालू असेल समरच्या मनात? योगेशचा त्याग वाया जाईल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all