Feb 25, 2024
पुरुषवादी

तूच माझा बाबा.. भाग १०

Read Later
तूच माझा बाबा.. भाग १०


तूच माझा बाबा.. भाग १०

मागील भागात आपण पाहिले की सुचेताचे आईबाबा तिला बाळाला अनाथाश्रमात ठेवायला सांगतात. जे ऐकून योगेश बाळाची जबाबदारी घेण्यासाठी सुचेताला लग्नासाठी विचारतो. आता बघू पुढे काय होते ते.


" बघितले. हे असे असते. लांबून मदत करायला कोणीही तयार असते. पण जेव्हा आपल्यावर येते तेव्हा सगळे लांब जातात." बाहेर गेलेल्या सुधाताईंकडे बघत सुचेताचे बाबा बोलले.

" ते मी बघतो. सुचेता तुझे काय मत आहे? तू आहेस लग्नाला तयार?" योगेशने विचारले.

" मी? " सुचेता बोलू शकत नव्हती.

"तू ठरव. त्याआधी मी तुला आणि बाळाला घरी सोडतो."

"घरी? कोणत्या घरी?" सुचेताच्या आईने विचारले. " बाळाची काळजी कोण घेणार?"

" ते मी बघतो. सुचेता, मी तुला आता घरी सोडतो. त्यानंतर घरी जाऊन आईशी बोलतो. मग ठरवू, काय करायचे? कसे करायचे?" ठरवल्याप्रमाणे योगेश सुचेताला आणि बाळाला घेऊन निघाला. सुचेताच्या माहेरच्यांशी तो एका शब्दानेही काही बोलला नाही. त्याला बोलावेसे वाटले नाही. त्याने जाता जाता फोनवर जेवणाची ऑर्डर दिली. सुचेता फक्त बघत होती. दोघे घरी पोहोचले. डोहाळेजेवणासाठी आणलेली फुलांची वाडी सुकून गेली होती. सुचेताला हुंदका फुटला. काय करावे हे योगेशला सुचेना.

" मी घर स्वच्छ करायला माणसांना सांगतो. जेवण येईल. तू जेवून घे. मी घरी जाऊन येतो. आईशी बोलतो. मग तुला घ्यायला येतो." योगेश गेला आणि ते रिकामे घर सुचेताला खायला उठले. जिथे तिथे निशांतच्या खुणा होत्या. त्याच्यासोबत घालवलेले सगळे सोनेरी क्षण तिच्या डोळ्यासमोर दिसत होते. बाळ रडायला लागल्यामुळे तिची तंद्री तुटली. तिला निशांतचे शब्द आठवले.
" कितीही , काही झाले तरी आपण आपल्या बाळाला पोरके करायचे नाही." तिने निर्धाराने बाळाला घट्ट धरले आणि ती स्वतःशीच म्हणाली ," काही झाले तरी मी तुला पोरकं होऊ देणार नाही."


" आई, आई.." योगेश हाका मारत घरी पोहोचला. कधी नव्हे ते त्यांचा दरवाजा सताड उघडा होता. सुधाताई कुठेच दिसत नव्हत्या. त्याने बेडरूममध्ये बघितले. सुधाताई आत रडत होत्या.

" आई.. तुला नाही का पटला माझा निर्णय?" योगेश सुधाताईंच्या जवळ जात बोलला.

" तुझ्यासाठी ते महत्वाचे आहे?" सुधाताई व्यथित स्वरात बोलल्या.

" आई, नको ना असं बोलूस.. आजपर्यंत कधीतरी मी तुम्हाला दुखावले आहे का?"

" आजपर्यंत दुखावले नाहीस, त्याचे उट्टे काढतो आहेस का? एकुलता एक मुलगा आमचा. सुंदर, हुशार, श्रीमंत. तरूणींच्या गळ्यातला ताईत आहेस तू. तुझ्या लग्नासाठी माझी पण काही स्वप्नं होती. पण तू? सगळं एका क्षणात मातीमोल करून टाकलंस." सुधाताई बोलत होत्या.


" आई, मला वाटलं तुला सुचेता आवडत असेल."

" ती मला आवडते की नाही हा प्रश्नच नाही. प्रश्न हा आहे की तिचे हे पहिले लग्न नाहीये. आणि जर मी चुकत नसेन तर हे तुझ्या बाबांना पण मान्य होणार नाही."

" आई, मग त्या बाळाला अनाथाश्रमात ठेवलेल तुला चालेल?"

" योगेश, मी एवढी कठोर नाही हे तुलाही माहीत आहे. सुचेता या सगळ्यातून सावरेपर्यंत आपण तिला सगळी मदत करू. तिची इच्छा असेल तर दुसरे लग्नही लावून देऊ."

" म्हणजे तिचे दुसरे लग्न व्हावे ही तुझी इच्छा आहे, फक्त ते स्वतःच्या मुलाशी नाही झाले पाहिजे. बरोबर?"

" तुला हवे ते समज. बाबा येतीलच इतक्यात. मी त्यांना फोन केला आहे. तू त्यांच्याशीच बोलून घे." सुधाताई निर्वाणीचे बोलल्या.

" काही बोलायची गरज नाही. मी ऐकले आहे सगळे. " श्रीकांतराव दरवाजात उभे होते.

" बाबा, तुम्हीच सांगा ना आईला की मी बरोबर वागतो आहे." योगेश श्रीकांतरावांकडे वळला.

" अजिबात नाही. तुझी आई बरोबर बोलते आहे. निशांत तुझा खास मित्र होता. त्याच्यासाठी आणि त्याच्या बायकोसाठी जेवढे शक्य होते ते सर्व केले. आता हे लग्न म्हणजे जास्तच होते आहे. आमच्याही तुझ्याकडून काही अपेक्षा आहेत."

"बाबा, मी तिला वचन दिले आहे.

" तिला दिलेले वचन महत्वाचे की आईवडील?"

" मला दोन्ही महत्वाचे वाटतात.."

" मला नाही. तुला काहीतरी एक स्वीकारावे लागेल." श्रीकांतराव कडक स्वरात बोलत होते. वडिलांचा बदललेला स्वर योगेशला खटकला.

" बाबा, मला त्या दोघांना असे वाऱ्यावर नाही सोडता येणार."

" मग आम्हाला सोड. तुझा हाच निर्णय कायम असेल तर तू हे घर सोडावेस हेच योग्य."

" बाबा, थोडा विचार करा ना."

" विचार करूनच बोलतो आहे. ज्या बाळाला त्या मुलीचे आईवडील स्वीकारायला तयार नाहीत, तिच्यासाठी आमच्याशी वाद घालतो आहेस, आम्हाला दुखावतो आहेस. छान पांग फेडलेस."

" तुम्ही आता चिडला आहात. तुमचा राग गेला की बोलू."

" ते शक्य नाही. तुझा निर्णय झाला असेल तर तू जाऊ शकतोस." श्रीकांतराव बोलत होते. योगेशने सुधाताईंकडे बघितले. त्या त्याच्याकडे बघायलाही तयार नव्हत्या. योगेश गप्पपणे आपल्या बेडरूममध्ये गेला. आपली बॅग भरून तो बाहेर आला.

" ज्या दिवशी तुम्हाला वाटेल मी चुकलो नाही, त्या दिवशी आपण नक्की भेटू. येतो मी." योगेश घराबाहेर पडला. सुधाताई श्रीकांतरावांच्या गळ्यात पडून रडू लागल्या.योगेश घराबाहेर तर पडला. पण सुचेता करू शकेल त्याच्यासोबत सहजासहजी संसार? पाहू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//