मागील भागात आपण पाहिले की डोहाळेजेवणाच्या दिवशी निशांतचा अपघाती मृत्यु होतो. तेव्हाच सुचेताची डिलिव्हरी होते. ती कशी सामोरी जाईल या सगळ्याला. पाहू आता.
" योगेश, तू इकडचे सगळे सोपस्कार पार पाड. मी सुचेताला बघते." सुधाताई धीराने घेत म्हणाल्या. "तुझ्या मदतीला कोणी येऊ शकेल?"
" बघतो.. "
" बाबांना फोन करू नकोस. उगाच त्यांना परदेशात टेन्शन द्यायला नको. आणि योगेश थोडे धीराने घे. सुचेतासमोर आपणच असे गळून गेलो तर तिचे काय होणार? तुझी ही तयारी झाली की मला फोन कर. मी त्या दोघांना घेऊन येते." सुधाताई गंभीरपणे सांगत होत्या.
" आई, सुचेताला या अवस्थेत?" योगेशला आश्चर्याचा धक्का बसला.
" तिची इच्छा असेल तर तिच्या नवर्याला शेवटचं बघायचा तिला हक्क आहेच. त्या बाळात निशांतचा पण जीव अडकला असेलच ना? बघू डॉक्टरांनी परवानगी दिली तरच." सुधाताई तिथून निघाल्या. त्या जाताच योगेश डोळे पुसून तयारीला लागला. त्याने त्याच्या मित्रांना कळवले होते. सगळे त्याच्या मदतीला धावून आले. सुधाताई सुचेताजवळ पोहोचल्या. ती त्यांची वाटच बघत होती.
" आई, निशांत?" सुधाताईंना तिने आई म्हणून मारलेली हाक तिच्या आईला खटकली. पण त्या काही बोलल्या नाहीत. सुधाताई पुढे झाल्या. त्यांनी सुचेताच्या डोक्यावरून हात फिरवला.
" तुला बघायचे आहे निशांतला?"
" तो का नाही आला?"
" तो नाही येऊ शकणार."
" खूप लागले आहे का त्याला? मग नंतर येईल ना तो बघायला? त्याने अजून बाळाला पण नाही बघितले."
" सुचेता.. मन घट्ट करून ऐक. निशांत आपल्याला सोडून गेला आहे. मी तुला आणि बाळाला न्यायला आले आहे. आपण जायचे का त्याला शेवटचा निरोप द्यायला?" सुधाताई डोळ्यातून पाणी येऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न करत होत्या.
"आई, नका ना असं बोलू. आत्ताच आमचे बाळ जन्माला आलं आहे. नका त्याला लगेच असं पोरकं करू." सुचेता रडत होती.
" मला समजतय ग सगळं. पण आपल्या हातात काही असतं का? तुला बघायचं आहे का त्याला?" सुधाताई तिच्याकडे न बघता बोलत होत्या.
" हो. मी येते." सुचेता डोळे पुसत उठायचा प्रयत्न करू लागली. ते बघून इतका वेळ शांत असलेली तिची आई पुढे आली.
" अग, ओली बाळंतीण तू? कुठे निघालीस अशी?"
" आई, माझ्या नवर्याबद्दल तुम्हाला कोणालाच काहीच वाटत नाही का?"
" तसं नाही ग. पण तू अशा परिस्थितीत कुठे जाणार?"
" आई, आम्ही दोघांनी सात जन्म एकत्र रहायचे ठरवले होते. सात वर्ष सुद्धा राहता आलं नाही ग मला त्याच्यासोबत. माझं सगळंच राहून गेलं ग. मला त्याला खूप प्रेम द्यायचे होते. माझा संसार सुखाचा करायचा होता. सगळेच राहून गेले." सुचेता परत रडायला लागली. तेवढ्यात सुधाताईंचा फोन वाजला. त्यांनी फोनवर बोलून घेतले.
" सुचेता, येतेस? की मी जाऊ?"
" मी येते आई." ती तयार होईपर्यंत सुधाताई डॉक्टरांशी बोलल्या. त्यांनीही परिस्थिती समजून घेऊन बाळाला आणि सुचेताला स्पेशल ॲम्ब्युलन्समधून फक्त थोडा वेळासाठी बाहेर नेण्याची परवानगी दिली. इतका वेळ रडणारी सुचेता निशांतचा देह बघून मात्र सुन्न झाली. सुधाताईंनी सावधगिरी बाळगून तिला लगेच तिच्या आईसोबत परत पाठवून दिले. या अशा परिस्थितीतही सुचेताला प्रकर्षाने जाणवले की सुधाताई आणि योगेश तिच्यासाठी काय काय करत आहेत.
योगेशने निशांतचे सगळे दिवसकार्य करत होता. दिवस अक्षरशः पटापट निघून गेले. बाळ वेळेआधी जन्माला आल्यामुळे सुचेताला अजून दवाखान्यातून सोडले नव्हते. तिचे आईबाबा, भाऊ तिथे असायचे. ती मात्र कोणाशीच बोलत नव्हती. ना बाळाकडे बघत होती. सुधाताई रोज चक्कर मारायच्या. तिच्यासमोर बाळ ठेवायच्या. तिला घ्यायला लावायच्या. ती मात्र काहीच प्रतिसाद देत नव्हती. ते बघून सुधाताईंना तिचे थोडे टेन्शन आले होते. शेवटी सुचेताला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. योगेश आणि सुधाताई तिला बघायला गेले होते. सुचेताचे वडिल आणि भाऊ एकमेकांशी बोलत होते. या दोघांना बघताच ते गप्प बसले. सुचेताची आई सुचेताला काहीतरी समजावत होती. सुचेता जोरजोरात मान हलवून नाही म्हणत होती.
" सुचेता , काही अडचण?" सुधाताईंनी विचारले.
"मी सांगते.." सुचेताची आई पुढे झाली. "आमचे हे सुचेताला घरी घेऊन जायला तयार आहेत. पण त्यांचे म्हणणे आहे की बाळाला अनाथाश्रमात ठेवूया. तसेही ही बाळाकडे बघतही नाही. मग याची जबाबदारी कोण घेणार?" त्यांना हे आवडत नव्हते हे समजत होते. हे ऐकून योगेश मात्र चिडला.
" तुम्हाला एवढाच त्रास होत असेल तर बाळाला मी घेऊन जातो. तुम्ही घेऊन बसा तुमच्या मुलीला." त्याचे बोलणे ऐकून दुखावलेल्या नजरेने सुचेताने योगेशकडे बघितले. त्याचा आवाज ऐकून बाहेर उभे असलेले तिचे वडील आणि भाऊ आत आले. आत काय घडले असेल त्यांना अंदाज आला.
" हे बघा. थोडा व्यवहारिक विचार करा. उद्या एक मूल पदरात असलेल्या मुलीशी कोण लग्न करणार? पुढे गुंतागुंत होऊन ठेवायची वेळ येणार त्यापेक्षा आताच ठेवले तर?"
" बाबा.. काय विचार करताय तुम्ही?" सुचेता शहारली.
" बरोबर बोलतो आहे मी. आधीच त्या अनाथ मुलाशी लग्न करून बसलीस. आणि आता तो तर त्याचं पोर देऊन गेलाही. तो ही अनाथ, त्याचे पोरही अनाथ."
" नाही.. हे बाळ अनाथ नाही. मी त्याचा बाप आहे. सुचेता तुला चालणार असेल तर मी तुझ्याशी लग्नाला तयार आहे." योगेश बोलून गेला.
" योगेश...." सुधाताई काहीच न बोलता तिथून निघून गेल्या.
सुधाताई, श्रीकांतराव योगेशच्या निर्णयाला मान्यता देतील का? पाहू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा