तूच माझा बाबा.. भाग ८

कथा बापलेकाच्या आगळ्यावेगळ्या नात्याची


तूच माझा बाबा.. भाग ८


मागील भागात आपण पाहिले की लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी निशांत सुचेताला तिच्या माहेरी घेऊन जातो. ती तिच्या आईला डोहाळजेवणाचे आमंत्रण देते. बघू आता पुढे काय होते ते.

" सुचेता, हा निशांत कुठे गेला आता? बायका यायची वेळ झाली." सुधाताई वैतागल्या होत्या.

" तो.. माझ्यासाठी चिरोटे आणायला गेला आहे." सुचेता लाजत म्हणाली.

" अग पण मला सांगायचे ना. मी केले असते. अगदीच नाहीतर योगेशला पाठवले असते आणायला. तू पण ना?"

Ll" त्याला माझे डोहाळे पुरवायचे होते म्हणून." सुचेता बोलतानाही लाजत होती.

" समजलं हो तुमचे प्रेम. कसा गेला आहे?"

" बाईकवर."

" येईल मग लवकर. तू बस इथे. तोपर्यंत तुझी वाडी भरते." सुधाताई म्हणाल्या. तोच दरवाजाची बेल वाजली.

" निशांत.." सुचेता पटकन उठायला गेली.

" काही गरज नाही उठायची. योगेश उघडेल दरवाजा."

"सुचेता, तुझे आईबाबा आले आहेत. " योगेशने आत येऊन सांगितले. सुधाताईंनी प्रश्नार्थक सुचेताकडे बघितले.

" ते आम्ही त्यादिवशी आईकडे गेलो होतो, मी आईला ये म्हणून सांगितले. ती येईलच याची खात्री नव्हती म्हणून तुम्हाला काही बोलले नाही. राग नाही ना आला आई?" सुचेता घुटमळत बोलली.

" राग नाही ग. पण आश्चर्य वाटले वर्षभर तुझ्याशी एक शब्दही न बोललेले हे अचानक इथे कसे आले याचे. असो. तुला बरे वाटले ना? जा तू ये त्यांना भेटून. मी आहेच." नाही म्हटलं तरी सुधाताई थोड्या नाराज झाल्या होत्या. सुरूवातीला सुचेताने जेव्हा जेव्हा आईला फोन केला होता तेव्हा त्यांनी फोन कट केला होता. कितीतरी वेळा सुचेताला माहेरच्या आठवणीत रडताना त्यांनी पाहिले होते. तेव्हा त्यांनी आणि निशांतनेच तिला सावरले होते. आता हिच माणसे परत आली आहेत? पण असो. तिचेच आईवडील, आपण काय बोलायचे? सुधाताई आतमध्ये विचार करत बसल्या होत्या. तोच घाबरलेला योगेश आत आला.

" आई. "

" काय रे? काय झाले? तुझा चेहरा का काळवंडला आहे?"

" आई, मी जरा जाऊन येतो."

" आता कुठे चाललास? तो निशांत पण कुठे गायब आहे?"

" आई.. निशांत.."

" काय झाले त्याचे? पैसे विसरला का घरी?"

" आई त्याचा अपघात झाला आहे." योगेश पटकन बोलला. योगेश एवढा का घाबरला आहे, हे विचारायला आलेल्या सुचेताने त्याचे शब्द ऐकले. अचानक आलेल्या ताणाने ती चक्कर येऊन पडली. योगेशने तिला उचलले. पलंगावर ठेवले. तिच्या आईबाबांना काय करायचे, बोलायचे ते सुचत नव्हते. ते तसेच बघत राहिले. सुधाताई पुढे झाल्या. त्या सुचेताजवळ बसल्या. योगेश बाहेर पडणार तोच सुचेता जोरात "आई ग.." अशी ओरडली.

" योगेश.." सुधाताईंची हाक आली. योगेश पळत आत आला.

" हिला बहुतेक दवाखान्यात न्यावे लागेल." सुधाताई सुचेताच्या आईकडे बघत बोलल्या. योगेश काही बोलणार तोच त्याला रक्ताने भरत असलेली चादर दिसली.

" आई, तू गाडी उघड. मी हिला घेऊन येतो. तुम्ही येता का?" योगेशने सुचेताच्या वडिलांना विचारले. ते दोघे सुद्धा निघाले. योगेशने सुचेताला तिच्या नेहमीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. सुचेताचे आईवडील तिथे थांबणार होते. तो आणि सुधाताई निशांतला बघायला निघाले.

" निशांतला खूप लागले आहे का रे?" सुधाताईंनी घाबरत विचारले.

" आई.. त्याला बहुतेक रस्त्यातला खड्डा दिसला नाही. त्यावरून जाताना बाईक पडली. पाठून गाडी येत होती." योगेशला पुढे बोलवले नाही. सुधाताई ओठ घट्ट मिटून बसल्या.

" तुला कोणी सांगितले?"

" पोलीस स्टेशनमधून फोन होता." यापुढचा प्रवास शांततेतच झाला. दोघे हॉस्पिटल जवळ पोहोचले. योगेशने मगाशी आलेल्या नंबरवर फोन करून कुठे यायचे ते विचारले. दोघेही पळत वॉर्डपाशी आले. निशांतच्या ऑपरेशनची तयारी सुरू होती. तोपर्यंत या दोघांना भेटायची परवानगी दिली.

" निशांत.." योगेशने हाक मारली. आश्चर्य म्हणजे त्याने डोळे उघडले. योगेशला आणि सुधाताईंना बघून त्याने हसल्यासारखे केले.

" माझे बाळ.. अनाथ नाही." तो पुढे बोलूच शकला नाही. योगेश बघतच राहिला.

" डॉक्टर. प्लीज.. हा आता बोलत होता.. अचानक गप्प झाला.. प्लीज बघा ना.." योगेश रडत होता. सुधाताईंनी त्याला मिठीत घेतले.

" आई.. हा असा कसा जाऊ शकतो.. आपण काय सांगणार सुचेताला?" सुधाताई मूकपणे अश्रु ढाळत होत्या. तोच त्यांचा फोन वाजला. सुचेताच्या मोबाईलवरून फोन होता..

" हॅलो.."

" सुचेताची आई बोलते आहे. सुचाला मुलगा झाला.." सुधाताईंनी फोन कट केला. इतका वेळ आवरून ठेवलेले अश्रु आता मात्र बांध फोडून बाहेर पडत होते.


योगेश आणि सुधाताई सांगू शकतील ही गोष्ट सुचेताला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all