तूच माझा बाबा.. भाग ७

कथा बापलेकाच्या आगळ्यावेगळ्या नात्याची
तूच माझा बाबा.. भाग ७


मागील भागात आपण पाहिले की सुचेता आणि निशांत योगेशच्या घरी जातात. सुचेताची छाप सुधाताई आणि श्रीकांतरावांवर पडते.. आता बघू पुढे काय होते ते..


" लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.." सुचेता झोपलेल्या निशांतला उठवत म्हणाली.

" काहिही काय?? आत्ताच तर लग्न झाले आपले. वर्ष झाले पण?" निशांत खडबडून उठत म्हणाला..

" आता तुला कॅलेंडर समजत नाही त्याला मी काय करू? नाही नाही.. तुला कॅलेंडर बघायला वेळच नसतो ना? दिवसभर नुसते काम काम? बायकोकडे बघायला तरी वेळ असतो का तुला?" सुचेता तक्रार करत बोलत होती.

"बाई तू चिडचिड करू नकोस हां.."

" बाई?? मी बाई??"

" नाही का? प्लीज तू चिडचिड कमी कर. मला ना माझे होणारे बाळ चिडचिडे व्हायला नको आहे.." निशांत सुचेताच्या पोटावर हात ठेवत म्हणाला.

" मी चिडचिड करत नाहीये.. मी.. मी.." सुचेताला बोलायला शब्द सुचत नव्हते.

" बघ.. यालाच चिडचिड करणे म्हणतात.. हो ना बाळा? सुचेता.. मला हालचाल जाणवली.." निशांत एक्साईट होत बोलला.

" तेच तर मी सांगते आहे, तुला वेळच नसतो.. गेले काही दिवस मला बाळाची हालचाल जाणवते आहे."

" यापुढे, तू म्हणशील ते करीन. तू फक्त सांग." निशांत कान पकडत म्हणाला.

" हा नाटकीपणा सोडून दे. आई.. म्हणजे सुधाकाकू विचारत होत्या, डोहाळजेवण कधी करायचे ते. काय सांगू?"

" सांग या रविवारी करू म्हणून. मी करतो तयारी.. पण काय तयारी करायची?"

" माहित नाही काय करायचे, आणि म्हणतो मी तयारी करेन. तोंड बघ आरशात. " सुचेता चिडवत म्हणाली. "निशांत, माझी आई येईल का रे डोहाळजेवणाला?" बोलता बोलता ती अचानक गंभीर झाली.

" बघ ना. कसे असते ते. मला जन्मापासूनच आईवडिलांचे प्रेम मिळाले नाही. तुला आईवडील असून त्यांचे प्रेम मिळत नाही.. आपण ना आपल्या बाळाबरोबर असं अजिबात करायचे नाही हां. तो किंवा ती कितीही वाईट वागला ना तरिही त्याला असे वाऱ्यावर सोडून द्यायचे नाही.." निशांत भावुक झाला होता.

" अगदी.. पण काका, काकू, योगेश अजिबात मला काहिही कमी पडू देत नाहीत. काकू तर सतत विचारत असतात, हे पाठवू का? ते पाठवू का? मला प्रसादाचा शिरा खावासा वाटला तर बरं नसताना सुद्धा करून योगेशसोबत पाठवून दिला. बघून असे वाटते, माझे इतके लाड करतात तर सुनेचे किती करतील? योगेशची बायको ना खूप नशीबवान असेल."

" ते तर आहेच. पण आता त्यांचा विषय सोड. आणि तुला काय हवे ते मला सांग. मी पुरवतो तुझे हट्ट."

" तुझे ऑफिस?"

" तुला काय वाटले तुझ्याच लक्षात आहे आपल्या लग्नाचा वाढदिवस? मी आधीच सुट्टी टाकून ठेवली होती. आजचा दिवस फक्त तुझा आणि माझा.."

" खरं??"

" अगदी खरं.." म्हटल्याप्रमाणे निशांत सुचेताला घेऊन बाहेर गेला. तिने मनसोक्त खरेदी केली. खूप दिवसांनी एकत्र वेळ घालवल्यामुळे दोघेही आनंदात होते. फिरता फिरता निशांत मुद्दाम सुचेताच्या घराजवळ गेला. आपण कुठे आलो आहोत हे आधी सुचेताला समजलेच नाही. जेव्हा समजले तेव्हा ती स्तब्ध झाली. निशांतने तिला तिच्या घराबाहेर नेले. त्याने तिला पुढे जाण्यासाठी खुणावले. सुचेताही पुढे झाली. निशांत तिथेच थांबला. सुचेताचे बाबा नुकतेच ऑफिसमधून आले होते. आई त्यांना चहापाणी देत होती. सुचेता धीर करून आत गेली आणि तिने आईला हाक मारली.

" आई.." दोघांनीही चमकून बघितले. आईला आनंद झाला. ती पुढे येणार तोच तिने वडिलांकडे बघितले. दोघांचेही लक्ष तिच्या पोटाकडे गेले. आईचे डोळे विस्फारले. न राहवून ती पुढे आली. तिने सुचेताची अलाबला घेतली.

" सुचा.."

" आई..." सुचेता आईच्या गळ्यात पडून मनसोक्त रडली.

" रडू नकोस अशा अवस्थेत. कितवा महिना ग?" आईने डोळे पुसत विचारले.

" सातवा.. आई डोहाळजेवणाला येशील?" सुचेताने घाबरत विचारले.

" हो.." आईने बाबांकडे न बघताच सांगितले. "तुला काय हवे ते सांग, मी तुझे आणि बाळाचे लाड पुरवायला हवे ते करीन."

" काही नको करूस.. फक्त तू ये. चल निघते मी. बाबा पाया पडते." सुचेता वाकत होती. आईने तिला वाकू दिले नाही. बाबा काहीच न बोलता गप्प राहिले. आई बोलली या आनंदात सुचेताने तिकडे दुर्लक्ष केले. बाहेर निशांत तिची वाट बघत उभा होता. तिला बघताच त्याने उत्साहाने विचारले,
" बोलले तुझ्याशी सगळे?" सुचेताने नकारार्थी मान हलवली.

" पण आई बोलली.. ती येणार आहे डोहाळजेवणाला." सुचेताचा उत्साही स्वर बघून आपली कोणी साधी चौकशीही केली नाही हे दुःख निशांतने गिळून टाकले. दोघेही आता वाट बघत होते त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या आनंदी समारंभाची..


व्यवस्थित पार पडेल का त्यांच्या आयुष्यातला पहिला समारंभ? बघूया पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all