Feb 25, 2024
पुरुषवादी

तूच माझा बाबा.. भाग ६

Read Later
तूच माझा बाबा.. भाग ६
तूच माझा बाबा.. भाग ६


मागील भागात आपण पाहिले की सुचेता आणि निशांत योगेशच्या घरी पहिल्यांदाच जाणार आहेत.. बघू आता काय होते ते..


" आई, आले ते दोघे." योगेश पळत आत येत म्हणाला.
" त्यांना तिथेच थांबायला सांग. मी आलेच." सुधाताई म्हणाल्या. त्या लगबगीने बाहेर आल्या. सुचेता, निशांतचे त्यांनी औक्षण केले. ते बघून सुचेता भारावून गेली. ती लगेच त्यांच्या पाया पडली. त्या तिला उठ म्हणेपर्यंत तिची रडायला सुरुवात झाली होती. त्यांनी तिला मिठीत घेतले. तिच्या तोंडून पटकन आई असे निघून गेले. सुधाताईंनी तिला थोपटले. निशांत आणि योगेश बघतच होते.

" म्हणजे आता आमचा पत्ता कट?" निशांतने हसत विचारले.

" तू तर बोलूच नकोस माझ्याशी.. एकतर लग्न झाल्यावर मला समजते ते ही योगेशकडून. तुला काही लाज वगैरे?" सुधाताई कृतककोपाने बोलल्या.

" काकू. प्लीज चिडू नका ना. तुमच्याशिवाय कोण आहे मला."

" हो का?" सुधाताई पुढे काही बोलणार तोच योगेश मध्ये बोलला, " आई मला खूप भूक लागली आहे. बोलणी खाण्यापेक्षा जेवून घेऊ या का? सुचेता चल डॅडींशी ओळख करून देतो तोपर्यंत."
सगळ्यांच्या अगत्याने सुचेता भारावून गेली होती. श्रीकांतरावांचा प्रेमविवाहाला विरोध असला तरिही ते सुचेताशी छान बोलले. सुचेताही सुधाताईंच्या पाठी पाठी करत होती. त्यांनाही ते आवडत होते ते समजत होते. जेवणे झाली. सुचेताने आवरायला त्यांना मदत केली. सगळे थोडावेळ गप्पा मारत बसले होते. सुचेताच्या वागण्या बोलण्याची छाप सुधाताई आणि श्रीकांतरावांवर पडली होती. बोलता बोलता सुधाताई बोलल्या.

" तुझी एखादी बहिण आहे का ग लग्नाची?"

" कोणासाठी आई?" सुचेताने पटकन जीभ चावली. " मी तुम्हाला आई म्हटलं तर चालेल का?"

"नक्की म्हण. तशीही मला मुलगी नाही. तुझ्यारूपाने ती मिळाली असे वाटत आहे. मुलगी म्हणशील तर आमच्या योगेशसाठी. त्याला ही तुझ्यासारखीच सुंदर, सद्गुणी मुलगी शोधते आहे. पण याला कोणी पसंतच पडत नाही बघ."

" माझी कोणी बहिण नाही लग्नाची. पण आता नक्की कोणी दिसली चांगली की आधी तुम्हाला कळवते." सुचेता हसत म्हणाली.

" तुमचा वधूवरसूचक मंडळाचा संवाद झाला असेल तर आई जराशी उठशील का?" योगेश वैतागून म्हणाला.

" कशासाठी?"

" आई.."

" हो आलेच.." सुधाताई उठल्या आणि योगेशसोबत गेल्या. परत येताना दोघांच्याही हातात भेटवस्तू होत्या.

" निशांत आणि सुचेता, इथे बसा."

" काकू , अहो हे काय?"

" मोठ्यांना प्रश्न विचारायचे नाहीत. बस म्हटले की बसायचे. समजले?" निशांत आणि सुचेता बसले.. सुधाताईंनी एका छानशा साडीने सुचेताची ओटी भरली. तिच्या हातात एक पेटी दिली. त्यांनी सांगितले म्हणून तिने ती उघडली. त्यात जोडवी, दोन बांगड्या आणि छोटेसे मंगळसूत्र होते. ते बघून सुचेता आणि निशांत दोघांचेही डोळे पाणावले.

" काकू हे सगळे? मी नंतर करणारच होतो.." निशांत कसबसं बोलला.

" करशील तेव्हा करशील.. पण नव्या नवरीला हे असं बघणं चांगलं नाही वाटत. आणि हे डोकं योगेशचे बरं. तुम्हाला जर आवडलं नाही तर सांगा. बदलून मिळेल."

" तुमचे आभार कसे मानू हेच समजत नाही.." सुचेता योगेशला म्हणाली.

" सोपे आहे.. जेवायला बोलावून. " योगेश हसत म्हणाला. त्याने काही कागदपत्र निशांतच्या हातात ठेवले.

" हे तुझे जॉइनिंग लेटर.. लवकरात लवकर तुला हवे असेल तर तू कंपनी जॉइन करू शकतोस. कंपनी तुला क्वार्टर्स पण देईल.." निशांतने काहीच न बोलता योगेशला मिठी मारली.. सुचेता आणि निशांत सुधाताई आणि श्रीकांतरावांना नमस्कार करायला वाकले.

" सुखाचा संसार करा.." त्यांनी आशीर्वाद दिला..


होईल का, सुचेता आणि निशांतचा सुखी संसार? पाहू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//