Feb 25, 2024
पुरुषवादी

तूच माझा बाबा.. भाग ५

Read Later
तूच माझा बाबा.. भाग ५


तूच माझा बाबा.. भाग ५


मागील भागात आपण पाहिले की सुचेता आणि निशांत, योगेशच्या गेस्ट हाऊस मध्ये लग्नानंतर राहू लागतात. योगेशच्या आईला मात्र पळून जाऊन केलेले लग्न आवडत नाही.. बघू पुढे काय होते ते..


" आई, जाऊ दे ना तो विषय. ते दोघे सुखी आहेत ना? आणि अजून एक. त्यांना रहायला घर नव्हते म्हणून मी आपल्या गेस्ट हाऊस मध्ये त्यांना ठेवले आहे. तू डॅडींशी बोलशील? प्लीज??" चेहर्‍यावर केविलवाणे भाव आणून योगेश बोलू लागला.

" तू पण असा चालू आहेस ना.. जरा राग टिकू देऊ नकोस. जा तू फ्रेश होऊन ये. जेवायला वाढते.. भूक लागली असेल ना?"

" आता माझे पोट पण तुझ्याशी बोलते का?"

" नाही.. चेहरा.. जा लवकर.."

" आई.."

" बोल.."

" मी निशांतला आणि सुचेताला जेवायला बोलवू? प्लीज.."

" आधी डॅडींशी बोलून घे.." आई थोडी गंभीर झाली. " तुला माहित आहे ना त्यांना हे प्रेमविवाह वगैरे मान्य नाही."

" ते तुझा शब्द कधीही डावलत नाही हे पण माहित आहे मला."

" बरं जा. मी बोलते.." सुधाताई हसत म्हणाल्या. योगेशही निश्चिंत झाला. आई बोलते म्हणाली म्हणजे निशांतचे काम होण्यातच जमा होते. तोपर्यंत त्याला घर शोधायला मदत करायला हवी. निशांतसाठी काही तरी छानसे गिफ्ट घ्यायला पाहिजे. योगेश स्वतःशीच विचार करत होता.

" योगेश, आजही ऑफिसला दांडी?" डॅडींचा श्रीकांतरावांचा आवाज आला.

" हो, डॅडी.. ते जरा.." योगेश चाचरत म्हणाला.

" आणि ते गेस्ट हाऊसचे काय झाले? मला सिक्युरिटीचा फोन आला होता." डॅडींचा आवाज चढला होता. योगेश मान खाली घालून उभा होता..

" डॅड..ते..."

" शब्दांचे खेळ नको. पटापट बोल. ते कंपनीचे गेस्ट हाऊस आहे. तिथे तू कोणाला ठेवले आहेस?"

" निशांत आणि त्याच्या बायकोला."

"निशांतची बायको?" त्यांच्या आवाजात आश्चर्य होते.

" ते बाबा.."

" जे असेल ते.. मला ऑफिस आणि फॅमिली लाईफ एकत्र करायला आवडत नाही. दोनेक दिवसात त्यांची दुसरी सोय कर." त्यांचा आवाज निवळला होता.

" हो बाबा.."

"लग्न केले म्हणतोस पण त्याला कामधंदा तरी आहे का काही?"

" हो डॅडी.."

" पगार चांगला नसेल तर तसे सांग.. आपल्या ऑफिसमध्ये काम देऊ.."
हे ऐकून योगेशचा चेहरा उजळला..

" थॅंक यू डॅडी.. यू आर ग्रेट.."

" माझ्या एकुलत्या एका मुलासाठी मी एवढे नक्कीच करू शकतो.."

" यस डॅड.. आणि मी पण तुमच्यासाठी हवे ते करू शकतो.."

" दोघे मिळून मला वेगळे टाका.." सुधाताई नाक मुरडत म्हणाल्या.

" असे कसे? तू तर आम्हाला जोडणारा धागा आहेस.. बरं. आता उद्या बोलावू त्या दोघांना जेवायला?"

" बोलव.. बघू तरी कशी आहे ती मुलगी. चालेल ना तुम्हाला?"

" माझा काय संबंध? मित्र याचा, स्वयंपाक करणार तुम्ही. मी कुठे येतो या सगळ्यात?"

" उगाच भाव नका ना खाऊ डॅडी.. उद्या या लवकर घरी." योगेशने विषय संपवला.

" निशांत, ड्रेसवर जायचे योगेशच्या घरी? त्याच्या घरातले काय म्हणतील?"

" काही नाही म्हणणार. काकू खूप चांगल्या आहेत. त्यांना माहित आहे आपले लग्न कसे झाले आहे ते. आणि ऐक ना.. ते सोन्याचे मंगळसूत्र मी नंतर केले तर चालेल का? आता घरासाठी किती पैसे लागतील माहित नाही. कमी पडायला नको. पण मी लवकरात लवकर तुझ्यासाठी मंगळसूत्र घेईन. आय प्रॉमीस." निशांत खिन्नपणे बोलला.

"तू माझ्यासोबत आहेस तर मला दागिन्यांचीही गरज नाही. आणि मी तर तुला काहीच देऊ शकत नाही. सध्यातरी फक्त सर्टिफिकेट आहेत माझ्याकडे. धड नोकरीही नाही अजून." सुचेता निशांतचा हात हातात घेत बोलली.

" तसा विचार नको करूस. नवी नवरी म्हटलं की कसे मेंदीने रंगलेले हात, चेहर्‍यावर हळदीचे तेज, गळ्यात दागिने असे रूप समोर येते ना.. माझ्यामुळे हे सगळे तुला अनुभवता आले नाही, याचे वाईट वाटते मला."

" पण तुला अनुभवते आहे ना, तेच खूप आहे माझ्यासाठी.." सुचेता हसत म्हणाली.

" हो का? मग कसा आहे माझा अनुभव?" निशांत तिच्या चेहर्‍यावरून बोट फिरवत म्हणाला.

" नंतर कधीतरी सांगेन.. आता आपल्याला उशीर होतो आहे." सुचेता त्याचा हात झटकत म्हणाली.

" तू ना खूप अनरोमँटिक आहेस.." निशांत रागाने म्हणाला.

" माहित आहे. म्हणूनच तुझ्यासारख्या रोमँटिक माणसाशी लग्न केले आहे. आवर आता लवकर.. योगेशच्या घरी जायचे आहे ना?"


कसे होईल सुचेता आणि निशांतचे योगेशच्या घरी स्वागत, पाहू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटतो ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//