तूच माझा बाबा... भाग ४

कथा बापलेकाच्या आगळ्यावेगळ्या नात्याची


तूच माझा बाबा.. भाग ४


मागील भागात आपण पाहिले की निशांत आणि सुचेता पळून जाऊन लग्न करतात. योगेश त्यांना मदत करतो. हे तिच्या आईवडिलांना मान्य नसते म्हणून ते तिच्याशी संबंध तोडतात.. बघू पुढे काय होते ते..


" हे तुमचे सध्याचे घर.." योगेश गेस्ट हाऊसचा दरवाजा उघडत म्हणाला.

" अरे पण काका काही बोलणार नाहीत का?" निशांतने चाचरत विचारले.

" बोलणार? ओरडणार म्हण.. मला खूप ओरडा बसणार आहे. तुझे लग्न झाल्यावर त्यांना सांगितले म्हणून. आणि आज तर ऑफिसलाही गेलो नाही. ठणाणा चालू असेल माझ्या नावाचा."

" खरेच का? सॉरी.. आमच्यामुळे तुम्हाला बोलणी." सुचेता भेदरून म्हणाली.

" घाबरतेस काय? अग हा मस्करी करतो आहे तुझी.. पण मला सांग तुझे बाबा अचानक मंदिरात कसे आले?" निशांतने विचारले.

"आपण मंदिरात जाताना बाबांच्या ऑफिसमधले मित्र दिसले मला. त्यांनी बहुतेक बोलावले असेल बाबांना.. बाबा बोलतील ना परत माझ्याशी?" सुचेता रडवेली झाली होती.

" होईल सगळं नीट. ते कसं पिक्चरमध्ये दाखवतात, हिरोईनचे आईवडील तिच्याशी बोलत नसतात. मग तिला बाळ होते. नंतर तिचे आईवडील तिच्याशी बोलू लागतात." निशांत मस्करी करत होता.

" तू पण ना.." सुचेता लाजली.

" तुमचा हा प्रेमसंवाद संपला असेल तर मला आज्ञा द्या. मी तुम्हाला घर दाखवतो. ते बघून घ्या."

" दाखवायची काय गरज? आम्ही काही दिवसच राहणार आहोत.." निशांत आश्चर्याने म्हणाला.

" हुशार.. नंतर कुठे जाणार? मुलांच्या पीजी रूममध्ये? जोपर्यंत नवीन घर मिळत नाही तोपर्यंत इथेच रहा. मी बोलतो डॅडींशी.." योगेश निघाला. निघताना त्याने निशांतला मिठी मारली.
"मनापासून अभिनंदन.. तुझे वैवाहिक आयुष्य सुखाचे जावो. बाय सुचेता.."

" थॅंक यू भाऊजी.." सुचेता चाचरत म्हणाली..

" ए प्लीजच.. हे भाऊजी वगैरे नको. मला योगेश अशीच हाक मार. चला तुम्ही मला इथून बाहेर ढकलायच्या आत मी निघतो."
असे म्हणत योगेश तिथून बाहेर पडला. निशांत दरवाजा लावून आला. सुचेता अजूनही योगेश गेला त्या दिशेने बघत होती.
" किती वेगळा आहे ना हा? मगाशी बाबांशी पण बोलायला गेला. आता इथे पण या घराची किल्ली देऊन गेला.."

" हो.. तो आहेच तसा.. उगाच नाही तो माझा बेस्ट फ्रेंड." निशांत अभिमानाने बोलला. " आणि त्याचे कौतुक करून झाले असेल तर आता या नवीन ताज्या नवर्‍याकडे पण लक्ष द्या जरा.."

" नवीन ताजा.. भाजी असल्यासारखे वाटलं मला.." सुचेता खुदखुदत म्हणाली.

" हो.. नवीन. ताजा.. आपल्या बायकोला भेटायला आतुर असा.." निशांत तिच्या जवळ जात म्हणाला..

योगेश जरा घाबरतच घरी गेला. त्याची आजही ऑफिसला दांडी झाली होती. त्याने हळूच दरवाजा उघडला.

" आजही गेला नाहीस ना ऑफिसला? " आईचा आवाज आला..

" आई तू ना ग्रेट आहेस.. तुला न बघता पण कसे समजले मी आहे ते?" योगेश आईला मस्का मारत म्हणाला.

" ते माझे सिक्रेट आहे. का गेला नाहीस तू? बाबा चिडले आहेत.."

" आई, अग थोडा प्रॉब्लेम झाला आहे."

" काय रे? तू काही भानगड केलीस का?"

" आई.. काहिही काय बोलतेस? मी आजवर कधी चुकीचे वागलो आहे का? अग निशांतने लग्न केले.."

" काय??" सुधाताई ओरडत म्हणाल्या.

" आई.. हळू.. तू तर असे ओरडते आहेस, जसे मीच लग्न केले आहे."

" करून तर बघ असे लग्न.. गाठ माझ्याशी आहे."

" आई, माझे लग्न झाल्यावर गाठ तुझ्याशी कशी असेल? गाठ तर माझ्या बायकोशी पडेल ना?" योगेश उगाचच निरागस चेहरा करत बोलला.

" तू पण ना?? आता जरा सिरियस हो.. काय झाले एवढे की त्याने एवढ्या तडकाफडकी लग्न केले?"

" आई, अग तिच्या घरी मान्य नव्हते. तो अनाथ आहे म्हणून.."

" म्हणून ती मुलगी पळून आली? आपल्या आईवडिलांना सोडून येणारी मुलगी निशांतला साथ देईल?" सुधाताईंनी विचारले..


सुधाताईंच्या मनात सुचेताबद्दल निर्माण झालेला समज योगेश दूर करू शकेल? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all