तूच माझा बाबा .. भाग ३

कथा बापलेकाच्या आगळ्यावेगळ्या नात्याची


तूच माझा बाबा.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की समरला योगेश आपला खरा बाबा नाही या गोष्टीचा धक्का बसलेला आहे. योगेश त्याला एक गोष्ट सांगणार आहे.. बघू काय आहे ती..


" अजून किती वेळ थांबायचे आपण इथे निशांत?" योगेशने घड्याळाकडे बघत विचारले..

" अरे तिने घरातून बाहेर पडल्या पडल्या फोन केला होता. येते म्हणाली होती." निशांत एक डोळा रस्त्यावर ठेवून योगेशशी बोलत होता.

" तू बस इथे तिची वाट बघत. मी निघतो. मला ऑफिसला जायला उशीर झाला ना तर डॅडी ओरडतील.."

" बस काय.. मित्रासाठी एवढे पण नाही करणार का?"

" शहाण्या, तुझ्यासाठीच दोन दिवस ऑफिस बुडवून इथे उभा राहतो आहे. पण तुम्ही जिची वाट पहात आहात त्याच येत नाहीत यात माझा काय दोष?" योगेश वैतागला होता.

" यार नको ना असं बोलूस.. तिच्या घरी सगळं कळलं आहे.. खूप मारलं रे तिला. कसाबसा तिने माझ्यापर्यंत निरोप पोहोचवला आहे. ती रोज बाहेर पडायचा प्रयत्न करते आहे. पण तिच्या घरातले तिला एकटीला सोडत नाहीत. ती आज काही केले तरी जमवणार आहे. नाहीतर तिला गावी नेऊन तिचे लग्न लावायचा बेत आहे त्यांचा.." निशांत खूप टेन्शनमध्ये दिसत होता..

" ओके.. ओके.. पण मग ती आल्यावर विचार काय आहे तुझा?"

" ती आली की आम्ही दोघेही पळून जाणार आहोत.. योगेश प्लीज हे कोणाला सांगू नकोस.." निशांत इथेतिथे बघत म्हणाला..

" तू वेडा झाला आहेस का?" योगेश ओरडलाच.. "कुठे जाणार तू तिला घेऊन?"

" ते नाही ठरवले.. पण अशा ठिकाणी जाणार जिथे कोणीच नसेल.. फक्त आम्ही दोघेच.."

" आणि खाणार काय दगड? तुझ्या नोकरीचे काय?" योगेशचा हा प्रश्न येताच निशांत ताळ्यावर आला..

" तू सांग ना योगेश माझ्यात काय कमी आहे? फक्त अनाथ आहे म्हणून तिच्या घरातले मला नकार देत आहेत.. एवढ्या वर्षांनंतर माझ्यावर प्रेम करणारं आपलं कोणीतरी या आयुष्यात आलं आहे तर हे असं सगळंच अवघड होऊन बसलं आहे."

" एक मिनिट.. काय बोललास? एवढ्या वर्षांनी आपलं कोणीतरी?? मग मी कोण आहे? आईशप्पथ.. एवढ्या वर्षांच्या मैत्रीची हिच किंमत.."

" योगेश.. तू तरी असं नको बोलूस यार.. तुला मी वेगळे मानतच नाही.. तू म्हणजे माझे दुसरे शरीर आहेस रे.."

" बस कर ही नौटंकी.. ती बघ तुझी हिरोईन आली.. तिला घे.. आणि आमच्या कंपनीच्या गेस्ट हाऊस मध्ये जाऊन रहा. निदान हे मॅटर संपेपर्यंत तरी.." समोरून घाबरलेली सुचेता येत होती.. निशांतला बघताच ती पळत सुटली. तिने त्याला घट्ट मिठी मारली..
" लवकर मला कुठे तरी घेऊन चल. नाहीतर माझे बोटही तुला परत दिसणार नाही.."

" ओ लव्ह बर्डस.. हा रस्ता आहे.. येणारे जाणारे तुमच्याकडे बघत आहेत.. जरा भानावर या.." योगेश हसत बोलला.. सुचेता पटकन बाजूला झाली.. " आता मी निघू का मग?" योगेशने परत विचारले.

" नको.. आपण पटकन मंदिरात जाऊ आणि आम्ही लग्न करतो त्याचा तू साक्षीदार हो.." निशांत म्हणाला..

" एवढंच बाकी होतं.. चला लवकर.." योगेश त्या दोघांसोबत मंदिरात गेला. तिथे निशांतने आधीच कल्पना देऊन ठेवलेले गुरूजी होते. त्यांनी यांचे लग्न लावून दिले. तोच तिथे सुचेताचे वडिल भावासोबत आले..
" तुला नको सांगितले होते तरी तू याच्यासोबत हे असे लग्न केलेस?" ते खूप चिडले होते..

" काका ऐका ना.." योगेश समजावण्याचा प्रयत्न करत होता..

" काय ऐकू? कॉलेज मध्ये जाऊन सर्टिफिकेट घेऊन येते असे सांगितले म्हणून विश्वास ठेवून बाहेर पाठवले. तर इथे येऊन शेण खाल्ले हिने. एवढाच हा प्रिय आहे ना तुला? मग आजपासून आईबाप मेले तुझ्यासाठी.." तिचे वडिल खूपच जास्त चिडले होते..

" बाबा.."

" नको हाक मारूस ती शोभत नाही तुला.. आमचंच नशीब फुटकं.." सुचेताचे बाबा परत निघाले.. सुचेताने परत हाक मारली..

" बाबा.."

" यापुढे मला तुझे तोंडही दाखवू नकोस.." तिचे बाबा पाठी न वळताच बोलले..


निशांत आणि सुचेताचे लग्न झाले तर मग निशांतचे नक्की काय झाले? बघू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all