तूच माझा बाबा भाग २

कथा बापलेकाच्या आगळ्यावेगळ्या नात्याची


तूच माझा बाबा भाग २


मागील भागात आपण पाहिले की समर त्याच्या वाढदिवसासाठी उत्सुक असतानाच त्याचा मित्र त्याला सांगतो की योगेश त्याचा बाबा नाही. बघू आता पुढे काय होते ते..


" बाबा, मी तुझा मुलगा नाही?" दरवाजातूनच समरने विचारले.. सुचेतासोबत गप्पा मारत बसलेला योगेश त्याचा आवाज ऐकून घाबरला. सुचेताच्या ह्रदयाचा ठोका चुकला.. दोघांनीही वळून पाहिले.. मळलेले कपडे, विस्कटलेले केस, लाल डोळे आणि घट्ट मिटलेले ओठ. दोघेही बघतच राहिले.
" समर.. काय झाले तुला?" सुचेताने पुढे होत विचारले..

" बाबा, तू माझा बाबा नाहीयेस का?" समरने परत योगेशला विचारले.

" कोण बोलले तुला? असे का विचारतो आहेस?" सुचेताने योगेशकडे घाबरून बघत समरला विचारले.

" कोण बोलले हे महत्त्वाचे नाही, खरे की खोटे ते सांग.." समर हेका सोडायला तयार नव्हता. योगेश पुतळ्यासारखा निश्चल उभा होता. समरही सुचेताकडे न बघता फक्त योगेशकडे बघत होता. त्याला वाटत होते की योगेश म्हणेल की तू जे ऐकलेस ते खोटे आहे.. मीच तुझा बाबा आहे.. पण तो काहीच बोलत नव्हता.

" हो ते खरे आहे.." योगेश चेहर्‍यावरची रेखही न हलवता बोलला..

" योगेश...." सुचेता किंचाळली..

"नाही.. तू खोटे बोलतो आहेस.. सांग तू खोटं बोलतो आहेस.." समर योगेशला मिठी मारून रडत बोलू लागला..
" सांग ना तू खोटं बोलतो आहेस.."

" हे खरं आहे.." योगेश समरच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. त्याच्या डोळ्यातले अश्रु समरच्या डोक्यावर पडले..

" हे खोटं आहे.." समर रडतच त्याच्या खोलीत गेला.. सुचेता त्याच्यापाठी जाणार तोच त्याने दरवाजा बंद करून घेण्याचा आवाज आला..

" समर.."

" राहू दे त्याला एकट्याला थोडा वेळ.."

" अरे पण त्याने जीवाचे काही बरेवाईट केले तर??"

" नाही करणार तो. माझा मुलगा आहे.." बोलता बोलता योगेश थांबला..

" योगेश.." सुचेता त्याच्या गळ्यात पडून रडायला लागली..

" म्हणून सांगत होतो तुला, त्याला आधीच सगळे खरं सांगूया. " योगेश तिला थोपटत म्हणाला. त्याचे डोळे मात्र बेडरूमच्या दिशेला होते..

" मला तुम्ही नेहमीच बापलेक म्हणून हवे होता.." सुचेता स्फुंदत म्हणाली.. योगेश काहीच न बोलता फक्त गप्प बसला.. कितीतरी वेळ असाच निघून गेला. रडून रडून थकलेल्या सुचेताला योगेशने सोफ्यावर बसवले. तो स्वयंपाकघरात गेला. आत त्याने खिचडीची तयारी सुरू केली. एका बाजूला त्याचे हात स्वयंपाक करत होते. तर मन दुसरीकडेच फिरत होते.. खिचडी झाल्यावर तो बाहेर आला. त्याने सुचेताला खुणावले.. ती दरवाजाजवळ गेली. तिने समरला हाक मारली. आतून काहीच आवाज आला नाही. ते बघून योगेश तिच्याजवळ आला.

" समर, दरवाजा उघड.."

" मी अभ्यास करतो आहे."

" जेवण झाल्यावर अभ्यास कर."

" मला भूक नाहीये.."

" तुझी इच्छा. भूक लागली की सांग. सगळे मिळून जेवायला बसू.."

" प्लीज.. मला नाही जेवायचे.."

" मी आग्रह नाही केला तुला.. वाटले तर बाहेर ये.. मी आहे इथेच."

" तू खूप वाईट आहेस.."
कितीतरी वेळाने योगेशच्या चेहर्‍यावर हसू आले.

" मला माहित आहे. वाटले तरच बाहेर ये."
योगेश वेळेपर्यंत दरवाजा उघडला गेला होता. रडून डोळे सुजलेला समर बाहेर आला.. त्याला बघून योगेशच्या पोटात गलबलले.. तो वळला.. त्याने ताटात खिचडी, ताक वाढले. त्याने समरला घास भरवायला हात पुढे केला..

" तू खरंच माझा बाबा नाहीस?" समरने परत विचारले..

" तुला आठवते, तू लहान असताना जेवताना, झोपताना तुला मीच गोष्ट सांगावी असा हट्ट करायचास?" योगेशने बोलायला सुरुवात केली..

" त्याचा इथे काय संबंध?" समरने विचारले.

" आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे.. योगेश, सुचेता आणि निशांतची.. ऐकणार का?"


काय असेल योगेश आणि सुचेताचा भूतकाळ? बघू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all