Feb 25, 2024
पुरुषवादी

तूच माझा बाबा

Read Later
तूच माझा बाबा


तूच माझा बाबा.." बाबा, या वर्षीचा माझा वाढदिवस जोरात करायचा.." समर योगेशला सांगत होता..

" जो हुकुम मेरे आका.. "

" बाबा.. तू जर असं बोललास ना, तर मी तुझ्याशी बोलणार नाही हां.."

" काहिही कर.. पण ही शिक्षा देऊ नकोस बरं.." योगेश कान पकडत म्हणाला.

" काय चालू आहे दोघांचे?" आतून चहा घेऊन येत असलेल्या सुचेताने विचारले..

" काही नाही.. आम्ही टाईमपास करत होतो.." योगेश म्हणाला.

" नाही कसे? मी ऐकले आहे आतमध्ये सगळे.. समर काय हवे आहे तुला?" सुचेताचा आवाज किंचित चढला होता. समर घाबरला आहे हे बघून योगेश त्याला जवळ घेत म्हणाला ,
"काही नाही. आम्ही वाढदिवसाचे प्लॅनिंग करत होतो.."

" हो.. मला थीम पार्टी करायची आहे.." समर पडलेल्या आवाजात म्हणाला.

" अजिबात नाही.. आत्ताच तुझे पिकनिकचे पैसे भरले आहेत. ते ही खूप जास्त. परत ही पार्टी.. नाही.. जास्तीत जास्त आपण तुझ्या मित्रांना घरी बोलावू.. मी पावभाजी करेन.. पण थीम पार्टी वगैरे नाही.."

" बाबा.." समर रडवेला झाला होता.

" तू नको काळजी करूस. मी आहे ना? आपण हवी तशी पार्टी करू.. तू जा खेळायला.." योगेशने समरला बाहेर पाठवले..

" अरे पण.." सुचेताने बोलायचा प्रयत्न केला. बाबाची आज्ञा ऐकत समर पळाला सुद्धा..

" धडपडलास तर पार्टी कॅन्सल.." योगेश
ओरडला.

" हो बाबा. " समरने ओरडून सांगितले..

" तू ना.. डोक्यावर चढवून ठेवले आहेस त्याला.. माझे अजिबात ऐकत नाही त्यामुळेच तो.." सुचेता धुसफुसली.

" त्याला नाही चढवणार, मग काय तुला चढवणार? तशी ही तू डोक्यावर चढलीच आहेस.." योगेश हसत म्हणाला.

" मस्करी अजिबात नको.. काय गरज आहे, आधी पिकनिक मग मोठी पार्टी याची?"

" असू दे ग.. एकुलता एक आहे तो.. त्याचे लाड नाही करणार मग कोणाचे करणार?"

" तो निर्णयही तुझाच होता.." सुचेता योगेशकडे रोखून बघत म्हणाली.

" तो योग्यच होता.. जाऊ दे ना तो विषय.. आता आणायचे का समरला भाऊ किंवा बहिण?"

" तू ना दिवसेंदिवस चावट होत चालला आहेस.. चल जाऊ दे मला.." सुचेता लाजत म्हणाली..

इकडे समर त्याच्या मित्रांसोबत खेळायला आला होता. खेळून दमल्यावर सगळे गप्पा मारत बसले होते. समरने बोलायला सुरुवात केली..

" हे फ्रेंड्स, या वर्षी पण माझा बर्थडे जोरात आहे हा.. तुम्ही सगळ्यांनीच यायचे आहे.."

" या वर्षी काय करणार आहेस?" एकाने विचारले.

" ॲव्हेंजर्स थीम..मला आणि बाबाला खूप आवडतात ते. तुम्ही तसे ड्रेस घालून या. सॉलिड मजा करू." सगळे याने इम्प्रेस झाले असले तरी यश मात्र समरकडे बघून कुत्सित हसला..

" तू असा का हसलास?" समरने विचारले.

" मी कुठे हसलो?" यश सावरत म्हणाला.

" मी बघितले आता.. बोल काय झाले? तुला खोटे वाटते माझा बाबा अशी पार्टी ठेवणार आहे म्हणून? माझा बाबा ना, खूप ग्रेट आहे.. तो जे बोलतो ते नेहमी करतो.." समर चिडून बोलत होता..

" तुझा बाबा? कोण तुझा बाबा?" यश अजूनच हसत म्हणाला..

" तू डोक्यावर पडला आहेस का? बाबा एकच असतो.. माझा बाबा योगेश.." समरचा राग वाढत चालला होता.

" हो का. मग जाऊन विचार त्यांना, ते तुझे खरे बाबा आहेत का? माझी आई कालच सांगत होती, ते तुझे खरे बाबा नाहीत म्हणून.." यश समरला चिडवत म्हणाला.. समर चिडला. यशला मारायला निघाला. बाकीच्या मुलांनी त्याला धरले.

" माझ्याशी मारामारी करण्यापेक्षा घरी जाऊन विचार.." यश तिथून निघत म्हणाला..


काय असेल यशच्या या बोलण्याचा अर्थ? पाहू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//