Feb 28, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

तूच काली,तूच चण्डि..

Read Later
तूच काली,तूच चण्डि..


गोष्ट छोटी डोंगराएवढी
एक दुर्गा अशीही
तूच काली,तूच चण्डि"ए भेन@@@.. आण ते पैसे इकडे.. साली रंडी.. सगळ्यांखाली झोपून येते.. आण ते इकडे.

"बाबा.. काही काय बोलताय तिला!"


बांधलेल्या केसांचा अंबाडा पकडत त्याला उलटसुलट हिसके देत त्याने तिच्या हातातलं पैशांचं पाकीट जवळजवळ खेचुन आणि त्यात असलेली सगळी जमा घेऊन तो पुन्हा दारूच्या भट्टीवर गेला, आणि जायच्या आधी उलट उत्तर करणाऱ्या लेकीच्या पण मुस्काटात देऊन गेला.


"आई..का एवढं सहन करतेस? अगं लोकांच्या घरी धुणी भांडी करून राबतेस आणि हा माणूस तुला एवढं घालून पाडून बोलतो तरी तू ऐकतेस! नको सहन करूस आई." पंधरा वर्षाची तिची लेक रडत असलेल्या आईला समजावत बोलत होती.

"बाळा.. अगं तुम्हा पोरींसाठीच सहन करते गं. नायतर असल्या हैवानाला का सहन करेन मी!" लता मोठ्या पोरीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत बोलत होती. बाकी दोघी मुली पण घाबरलेल्या अवस्थेत आईच्या कुशीत येऊन बसल्या होत्या.

घरकामाच्या ठिकाणाहून शेठ लोकांनी दिलेले जुने कपडे तिच्या लेकींनी अगदी हौसेनी घातले. (जुने कसले नवेच ते पण एकदा घातलेले कपडे मोठी लोकं पुन्हा वापरत नाहीत म्हणून ते जुने.)

भाकरी, भाजी आणि गोडाचा शिरा असा छोटासाच पण पोटभरीचा बेत करून लताने पोरींना खाऊ घातलं आणि तयार झालेल्या पोरी गरबा खेळण्यासाठी संध्याकाळी बाहेर सभामंडपात गेल्या.

दारातूनच लेकींना नाचताना बघून लताला फार आनंद झाला होता. इतक्यात बेवड्या बापाला गर्दीतूनच धडपडत जातांना बघून अंजलीच्या म्हणजे लताच्या मोठ्या मुलीच्या काळजाचा ठोकांच चुकला. तिची नजर लता ला एवढ्या गर्दीतूनही काहीतरी सांगू पाहत होती पण गाण्याच्या आवाजामुळे तिला काही ऐकूही येत नव्हतं आणि अंजलीचे हातवारेही समजत नव्हते. तिच संपूर्ण लक्ष मुलीकडे असतांनाच अचानक बाजूने येऊन कैलासने तिच्या उजव्या कुशीत लाथ मारली आणि ती दाराबाहेरच्या कुंडीवर जाऊन आदळली. आपल्या लहान बहिणींना मंडपात थोपवून अंजली धावतच आईजवळ आली.


कैलास लता वर हात उचलणार तोच अंजलीने बाजूचा बांबू उचलून बापाला मारायची सुरुवात केली. आजूबाजूची सगळी गर्दी अंजलीवर नजर रोखून होती. दारूच्या नशेत असणाऱ्या कैलासला अचानक झालेल्या मारामुळे उठताही येईना. त्याच अवस्थेत त्याची कॉलर पकडून अंजलीने त्याला सभामंडपात फरफटत आणली आणि मंडपात स्थापित केलेल्या चण्डिकादेवीच्या चरणाशी फेकली.

दारूच्या नशेत देवीच्या पायाशी उपडी पडलेल्या बापाला लाथेनी सरळ करत त्याच्या छातीवर पाय देत अंजली गरजली. इथून पुढे माझ्या आईच्या वाटेला गेलास तर छातीवरचा पाय मानेवर देऊन कायमची तुला संपवून टाकेन लक्षात ठेव.. अस म्हणत हातातील बांबू तिने पूर्ण ताकदीनिशी स्टेजवर उभा आपटला.

नशेत असलेल्या कैलासची नशा लेकीचा अवतार बघून पूर्णपणे उतरली. त्याच लक्ष एकदा देवीच्या मूर्तीकडे तर एकदा विस्कटलेल्या केसात आणि डोळ्यात अंगार असलेल्या लेकीकडे जात होती. त्याच्याही नकळत त्याचे हात जोडले गेले आणि अशी चूक पुन्हा करणार नाही म्हणत त्याने त्याच्या जीवाची भीक मागितली.

लताच्या डोळ्यातलं पाणी थांबता थांबेना. कोणी कधीच तिची बाजू घेतली नव्हती पण आज तिच्यासाठी तिच लेक दैवीशक्ती म्हणून उभी राहिली होती म्हणून तिचेही हात नकळतपणे लेकीसमोर जोडले गेले होते.

समाप्त
श्रावणी लोखंडे..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading

//