तूच आहे याला जबाबदार (भाग पाचवा)

स्त्रीचं मन कधी कोणाला ओळखता आल आहे का


तूच आहे याला जबाबदार ( भाग पाचवा )

" तूम्ही जेवणाच काय कराल. का बाहेरच जेवण करून घ्याल. कारण माझं जेवण कदाचीत बंगल्यावरच होईल. साहेब मला उपाशी नक्कीच ठेवणार नाही असं वाटतं. का तुमच्या साठी पटकन चार पोळ्या आणि भाजी टाकून देऊ. थोडासा वरण भात लावून टाकते . का आताच जेवण करून घेता "

त्याला तिच्या बोलण्याच आश्चर्य वाटलं. त्याला वाटलं ती जाणार तर नाहीच. उलट त्रागा मात्र करेल. त्याच्यावर चांगल तोंड सूख घेईल. पण झालं उलटच. ती सगळ अगदी समजूतदार पणानं घेतं होती.

तिने पदर खोचला. घाई घाईने कामाला लागली. पटापटा तिनं घर झाडून घेतलं. पटकन वरण भाताचा कुकर लावला. पोळ्या भाजी केली. सगळ घरं आवरून घेतलं.

" आता मी पटकन अंघोळीला जाते. कसं ना साहेबांकडे पहिल्यांदाच जात आहे मी. मग थोडं नीटनेटक नको का जायला" असं पुटपुटत ती अंघोळीला गेली. तिच्या घाई गडबडीच त्याला आश्चर्य वाटलं. जणू काही तिला ड्यूटीवर जायचं होतं अशी तिची लगबग सुरू होती.

आंघोळ करून आल्यावर, मग कोणती साडी नेसावी यावर तिची चर्चा सुरू झाली. शेवटी मला कोणती साडी चांगली दिसते ते तुम्हीच सांगा असं म्हणत तिने त्याने जी साडी सुचवली तीच साडी नेसली. तिचं साडी नेसण म्हणजे कसलं भारी असायचं.कुठेही सुरकुत्या पडलेल्या तिला आवडायच्या नाहीत. साडी नेसावी तरं तिनेच असं सगळे नातेवाईक म्हणायचे.

चापून चोपून साडी नेसून झाल्यावर. त्यावर मॅचींग ब्लाऊज घातलं. चेहऱ्यावर तिने हलकासा जाणवेल न जाणवेल असा मेकअप केला. दिसेल न दिसेल अशी लिपस्टिक लावली. कपाळावर देखील छोटीशी टिकली लावली.

सगळी तयारी करून ती दोघं साहेबाची गाडी येण्याची वाट बघत बसली. अशाच हलक्या फुलक्या गप्पा सुरु होत्या,

" तुमचं किनई, मला हेचं आवडत नाही. छोट्या छोट्या गोष्टींचं खूप टेन्शन घेता. ज्या प्रश्नांची ईतकी सोपी उत्तर असतात त्या साठी उगाच जिवाचं रान करता. बरं मला काय वाटंत असा निव्वळ बसून वेळ घालवण्या पेक्षा तुम्ही जेवण करून घ्या ना. मी वाढून देते. नंतर तुम्हाला एकट्याला जेवणही जाणार नाही. बसा बरं पटकन." असं म्हणत तिने त्याला जेवायला वाढलं. तो तृप्त मनाने जेवू लागला. ती आग्रह करून करून त्याला वाढत होती.  शेवटी त्याचं जेवण आटोपंल. लगेच तिने भांडी देखील घासून घेतली.

पुन्हा वेळ उरलाच.

" अहो, मंगळ सूत्राच काय करू ? म्हणजे ते काढलं तरी वाईट वाटतं ठेवलं तरी वाईट वाटतं. नाहीतर असं करते, गळ्यात छोटं मंगळसूत्र घालून घेते. म्हणजे काही अडचण नाही. "

तो काहीच बोलला नाही. तिचीच बडबड सुरु होती.

" अहो, ऐका ना एक गोष्ट राहिलीच बघा. केसात माळाय साठी मोगऱ्याचा गजरा राहिला की. असं करा ना. प्लीज. अजून आपल्या जवळ एक तास आहे. तुम्ही खाली जावून कोपऱ्या वरुन गजरा घेऊन या ना. मला केसात गजरा असला की खूप आवडतो."

त्याने पायात चपला घातल्या. जवळच कोपऱ्यावर त्याचा नेहमीचा गजऱ्यावाला बसायचा. हा दिसला की तो न बोलता मोगऱ्याचा गजरा बांधून द्यायचा.

तो खाली उतरला. रस्ता ओलांडून त्याने गजरा विकत घेतला.

जिना चढून तो वर आला. दार उघडचं होतं. त्यानं तिला हाक मारत दरवाजा लोटला. ती हॉल मधे नव्हती. त्याने तिला किचन मधे पाहिलं. ती तिथंही नव्हती. मग तो बेडरूम मधे आला. आणि त्यानं पाहिलं. सिलिंग फॅनला लटकावून तिने गळफास घेतलेला होता.

( समाप्त )
लेखक : दत्ता जोशी

🎭 Series Post

View all