तूच आहे याला जबाबदार ( भाग तिसरा)

स्त्रीचं मन कधी कोणाला ओळखता आल आहे का


तूच आहे याला जबाबदार ( भाग तिसरा )

" साहेब, मला का काढलं सांगा. त्या शिवाय मी बाहेर जाणार नाही. माझी चूक सांगा. साहेब, माझी नोकरी गेली तर मी घराचे हप्ते भरू शकणार नाही. माझ्या घरावर जप्ती येईल. " त्याचा आवेश पाहून डीजी थोडेही विचलित झाले नाही. उलट अत्यंत थंड आवाजात त्यांनी त्याला विचारलं.

" हिशोबात काही चूक आहे का?"

" मी हिशोबा साठी नाही आलो साहेब. मला का काढलत ते सांगा."

" नॉनसेन्स, मला जाब विचारणारा तू कोण आहेस. चल गेट आउट फ्रॉम हीयर. " बोलता बोलता डीजींनी बेल वाजवली आणि शिपायाला त्याला बाहेर घेऊन जायला सांगितलं. ते देखील बाहेर पडले. गाडीत बसून निघूनही गेले.

आज सगळं ऑफिस गप्प होतं. त्याच्या केबिन मध्ये कोणी आलही नाही आणि कोणी गेलंही नाही. खरं म्हणजे तो आत्ता जरी घरी निघून गेला असता तरी त्याला कोणी बोललं नसतं की विचारलं नसतं. पण घरी जावून करायचं काय आणि तिने विचारलं तर सांगायचं काय अशा अवस्थेत तो डोकं धरुन बसून राहिला. विचार करून करून डोकं बधीर झालेलं होतं.

शेवटी त्याचा ऑफीसचा वेळ संपलाच. घरी जायची वेळ झाली. ऑफीस मधून बाहेर पडतांना त्याने एकदा आपल्या केबिन कडे शेवटची नजर टाकली. आता उद्या पासून आपण ईथे नसणार. आपल्या जागी दुसराच कोणीतरी असणारं. आपल्याला नो एन्ट्री.

" मग मी काय करू, कुठं जावू ? "तो मनाशीच पुटपुटत बाहेर पडला. कितीतरी वेळ तो निरुद्देश फिरत राहिला. घरी जावूच नये असं त्याला वाटतं होतं. पण या गोष्टीला काही अर्थ नव्हता. केंव्हा ना केंव्हा घरी जाणे भाग होते. कारण त्याची बायको घरी वाट बघत बसलेली असणारं. तिला कशाचीच काही कल्पना नसणार, मग तिला काय म्हणून ही वाट बघत बसण्याची शिक्षा द्यायची.

कसाबसा पावलं ओढत ओढत तो घरा कडे आला. ती केसात गजरा माळून हसऱ्या चेहऱ्याने त्याची वाट बघत दारात उभी होती. कामावरुन थकून भागून घरी आल्यावर तिचा प्रसन्न हसरा चेहरा दिसला की त्याचा सगळा थकवा दूर होवून जातो, हे त्यानेच तिला शिकवले होते. त्या मुळे घरात तिला कितीही काम पुरल , ती कितीही थकलेली असली तरी त्याच्या यायच्या वेळेस मात्र सगळी कामं आटोपून फ्रेश होऊन त्याची वाट बघत बसायची. नंतर चहा पाणी झालं की दोघं एकमेकांना चिडवत भरपुर गप्पा मारायची. मग दोघं फिरायला जायची. येतांना किराणा, भाजीपाला, फळं घेऊन घरी यायची.

आल्यावर गाणं गुणगुणत ती त्याच्यासाठी गरम गरम स्वयंपाक करायची. त्याला अगोदर जेवायला वाढायची. तो जेवत असतांना तृप्त मनाने त्याच्याकडे बघत राहायची. तिला असं गरम गरम पोळ्या ताटात वाढतांना पाहून त्यालाही तिच्या बद्दल खूप प्रेम दाटून यायचं. कधीकधी त्याने तिच्याशी जेवतांना लगट करायचा प्रयत्न केला की ती त्याला कणकेने भरलेल्या हातांनी दूर लोटायची. कधी ती त्याच्या गालाला कणीकेचा हात लावून द्यायची. त्या वेळी त्याच्याकडे बघून तिला खूप गंमत वाटत असे.

पण आज तो आला तोच मुळी तिला बाजूला ढकलून. आला आणि बुट, मोजे, कपडे न काढता त्याने स्वतःला पलंगावर ढकलून दिलं. भकास नजरेनं डोक्यावर फिरणाऱ्या पंख्याकडे एकटक, एक अक्षरही न बोलता बघत बसला.

त्याला काय झाले ते तिला समजलंच नाही. तिलाही काय करावं ते समजेना. तिने आत जावून पाण्याचा ग्लास आणला. ती हळुवार पण त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याला पाणी दिलं. त्याच्या पायातले बुट मोजे काढले.

" काय झालं हो. बरं वाटतं नाही का तुम्हाला. डोकं दुखत आहे का. थांबा मी दाबून देते," असं म्हणत तिने त्याचं डोकं मांडीवर घेतलं आणि हळुवार पण दाबायला सुरुवात केली.

त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले. उन्मळून तो ओरडत म्हणाला,

" माझी नोकरी गेली ग "

( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all