तू काय देतेस ??

Tu Kay Detes


काय देतेस...

तो थकून भागून आला ,आणि आला तसा मोबाईल वर chatting करायला सुरू झाला..

ती आली आणि लगेच स्वयंपाक घरात गेली... आणि त्याला पाणी घेऊन आली..

ती... तुझं बरंय बाबा.. आला की मोबाईल घेऊन आराम करत फॅन खाली बसतोस, हातात आयता पाण्याचा ग्लास मिळतो.. मग चहा..मग जेवण..

तो...अग पण ह्याआधी मी ऑफिसमध्ये मर मर करतो, तुझ्या पेक्षा ढीग भर कमावतो..मग कुठे तुम्हाला सुख दिसते..

ती... हो खरंय अगदी तुझे..आम्ही काहीच करत नाही.. हेच म्हणायचे ना तुला

तो... मग तू असे काय करतेस ग..तो तुझा तुटपुंजा पगार त्यात ग होते.. घर तर माझ्या पगाराशिवाय चालू शकत नाही..

ती... तू काय देतोस ह्याची जाणीव आहे मला अरे ,आणि मी काय देते त्याच्या बदल्यात ते ही मला माहित आहे रे...

तो...नोटा तिच्या हातात ठेवतो..घे ह्या आणि तू काय करते त्याच्या बदल्यात ते मला सांग..

ती ......लगेच आता जाते...आणि सगळे धान्य आणि केलेला स्वयंपाक घेऊन येते...आणि त्याच्या समोर मांडते...

तो... /रागात / हा काय मूर्खपणा आहे..ही काय पद्धत झाली..ह्यातून काय सिद्ध होते..तुला हे इथे माझ्या समोर आणायची काय गरज होती..

तिने लगेच एका ताटात सगळे अन्न ठेवले आणि एका ताटात त्याचे पैसे...आणि म्हणाली तुला भूक लागल्यावर तू काय खाशील ते सांग मला..

तो........तू मूर्ख आहेस का ,मी काय पैसे खाणार का ,मी अन्नच खाणार ना..

ती....... बरोबर ना ,तू अन्नच खाशील ना... मग हेच समज की तुझ्या पैश्याने पोट भरले असते तर मी स्वयंपाक केलाच नसता.. त्यासाठी धान्यच लागते.. त्यासाठी भाकरच बनवावी लागते.. आणि मी तेच करते... मी जो स्वयंपाक करते तो माझा ह्या घरासाठी आणि तुझ्या भुकेसाठी केलेला एक यज्ञ आहे...तू पैसे देतोस तर मी घराला घरपण देते...इथे राबते पण फुकट राबते.. कारण याचा मला पगार मिळत नाही... कारण माझ्या तुटपुंज्या पगारावर मी स्वाभिमानाने जगते.. बाकी तुझे उरलेले पैसे तुझ्याच घराला लावते...

तो.......हसून अग इतकी का चिडतेस ,मी तर गम्मत करत होतो.. पैसे काय ते तर आपल्यासाठीच आहेत..

ती....... नाही तुझे पैसे माझा स्वाभिमान कधी कमी करतील ह्याचा नेम नाही..म्हणून मी तुटपुंजी का असेना माझी कमाई पण ती तू दिलेल्या पैश्यापेक्षा खूप मोलाची आहे.. निदान माझा आवाज तुझ्या आवाजा पुढे दबला जात नाही.. त्या आवाजात स्वाभिमानाची खनक असते..

तो....... तू खरंच कठोर स्वाभिमानी झाली आहेस यार, माझी तुला समजण्यात चूक झाली ..इथुनपुढे अशी चूक होऊ देणार नाही ..करशील ना माफ मला..

ती....... its ok... मग चल तूच आता चहा कर..आणि स्वयंपाक ही तूच कर, आणि ओटा ही तूच आवर..कळू दे तुला की बोलून तोडायला जितके सोपे असते तितके सावरायला सोपे नसते ,आणि तो पसारा किती कसरत लागते ती.. हीच तुझी शिक्षा आज म्हणजे तुला पुन्हा अशी उपरती होणार नाही..माझ्या वाटेला तू पुन्हा जाणार नाहीस..मी वाट बघते जेवणाची..मला भूक लागली आहे....

आणि ती आता मोबाईल घेऊन chatting करत बसते