तू तेव्हा तसा.. अंतिम भाग

कथा त्या दोघांची


तू तेव्हा तसा.. भाग ३

मागील भागात आपण पाहिले की कॉलेजमध्ये असताना समीराच्या प्रेमाची मस्करी करून अनिश निघून जातो. आता बघू पुढे काय होते ते.



" अरे किती वेळ झाला? येणार तरी कधी तुमच्या मॅडम?" अनिशने रिसेप्शनीस्टला विचारले.

" सॉरी सर.. मॅडमची गाडी अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना रस्त्यात थांबायला लागले. आम्ही दुसरी गाडी पाठवली आहे. त्या येतच आहेत."

" त्यांना यायला वेळ लागणार असेल तर मग आधी सांगायचे ना.." अनिश सिगारेट काढत बोलला.

" सर, तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल मनापासून माफी मागते. आणि माफ करा सर.. हा नो स्मोकींग झोन आहे. तुम्ही तिथे जाऊन सिगरेट ओढू शकता." चरफडत अनिश तिथून उठून स्मोकींग झोनमध्ये गेला. सिगारेट ओढल्यावर त्याला जरा बरे वाटले. तो शांत डोक्याने विचार करू लागला. असं चिडून त्याला चालणार नव्हतं. या नवीन प्रोजेक्टची त्याला मनापासून गरज होती. खरंतर त्याला इंडियात रहायचेच नव्हते. पण प्रियाशी झालेल्या घटस्फोटाच्या वेळेस त्याला आलेली चांगली संधी निघून गेली होती. आणि आता एकाही परदेशी इंटरव्ह्यूमध्ये तो सिलेक्ट होत नव्हता. हे जर डिल झाले तर त्याची अनेक स्वप्ने पूर्ण होणार होती. अशनी फूड चेनचे नाव मोठे होते. काही वर्ष काम इथे करायचे आणि मग परदेशात जाऊन असंच काहीतरी सुरू करायचे. परदेशात अश्या भारतीय फुडचेन्स चांगल्या चालतात हे ऐकल्यापासून त्याने त्यावर खूप पेपरवर्क केले होते. अनिश हसला. पेपरवर्क.. समीराची सवय.. काय करत असेल नक्की ती? काहीच सांगितले नाही.

" सर, मॅम आल्या आहेत. " आवाजाने अनिशची तंद्री तुटली.

" हो आलोच.." तो केबीनजवळ गेला. त्याने दरवाजावर टकटक केले. आतून "आत या" असा आवाज आला. समीराचा आवाज? छे.. ती समीरा सकाळी भेटली म्हणून वाटलं असेल. तो आत गेला. आतमध्ये खरंच समीरा बसली होती. आता धक्का बसायची वेळ अनिशची होती.

" तू???" बाजूला असलेल्या तिच्या सहकाऱ्यांना बघून तो गप्प झाला. त्यावर समीराने काहीच न बोलता कामाची बोलणी सुरू केली. अनिशचे प्रोजेक्ट अप्रूव्ह झाले. अनिश खुश झाला. बोलणी संपल्यावर त्याने समीराला विचारले,

" तुमची परवानगी असेल तर आपण कॉफी घ्यायला जाऊ या का?"

" तुम्हाला हवी असेल तर मी इथेच मागवते."

" तसं नाही.." अनिश म्हणाला. त्याला काय बोलायचे आहे हे समजून समीराने तिच्या सहकाऱ्यांना खुणावले. ते बाहेर गेले.

" बोला, काय बोलायचे आहे?"

" समीरा, थँक यू सो मच.. हे प्रोजेक्ट मला दिल्याबद्दल. "

" तुमचे काम चांगले होते. आमच्या टीमला पटले. म्हणून हे प्रोजेक्ट तुम्हाला मिळाले. यात मला व्यक्तिशः धन्यवाद द्यायची गरज नाही."

" समीरा, सॉरी.. ते मगाशी तू काही बोलली नाहीस. आणि मीच बडबडत होतो."

" काय बोलायचे होते?"

" म्हणजे अशनी फूड तुझे आहे.."

" त्याने काय झाले असते? तुला मी हे चमचमणारे खडे घातले आहेत ते हिरे वाटले असते?" अनिशने चमकून बघितले.

" तू जेव्हा माझ्याकडे बघितलेस ना, तेव्हाच तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल आलेला विचार दिसला मला."

" ते तू खूप साधी राहतेस ना.. म्हणून. " अनिश कसंबसं बोलला. समीरा हसली.

" तुला मी म्हणाले होते, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. मी आधीपासूनच साधी होते. एक छोटासा काळ मी नटायचा प्रयत्न केला. मग समजलं, हे आपल्यासाठी नाही." तिच्या बोलण्यातली खोच अनिशला समजली. तरिही फूडचेनची उत्सुकता त्याला होतीच.

"तू कधीच मुलाखत वगैरे देत नाहीस का? कारण मी जी माहिती वाचली त्यात तुझा फोटो कधीच दिसला नाही."

" मुद्दाम नाही ठेवला. काय होणार त्याने? मी बरी आणि आपले काम बरे..अजून काही प्रश्न आहेत का? कारण मला परत माझ्या घरी जायचे आहे."

" समीरा, सॉलिड लकी आहेस.. छान नवरा शोधलास." थोड्या असूयेनेच अनिश बोलला.

" तू तेव्हा जसा होतास, आताही अगदी तसाच आहेस अनिश.. तू पेपरवर्क केलेस पण कच्चे. माझा नवरा आणि मी दोघेही मध्यमवर्गीयच आहोत. आम्ही दोघांनी कष्ट करून ही कंपनी उभारली. आता तिचे नाव होते आहे कारण आम्ही त्यात आमच्या रक्ताचे पाणी करून घातले आहे. आणि हो लकी तर मी खरंच आहे. वरवरच्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्यावर विश्वास ठेवला पाहिजे याची जाणीव करून देणारा जोडीदार मला मिळाला. पहिला वहिला प्रेमभंग झाला तेव्हा आक्रस्ताळेपणा न करता समजून घेणारे, समजवणारे आईवडील मिळाले, त्या कठीण काळात मदत करणाऱ्या मैत्रिणी मिळाल्या. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्याला जग जसे दिसते तसे नसते याची जाणीव करून देणारा तू भेटलास.. तुला अजून काही बोलायचे नसेल तर मी खरंच निघते." समीरा निघाली. अनिश मात्र स्वतःशी परत विचार करू लागला, जर मी तेव्हा हिला होकार दिला असता तर हे सगळे माझे झाले असते?"

अनेकदा जी माणसे साधी राहतात त्यांच्या कर्तृत्वावर शंका घेतली जाते. त्यावर कथा लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न. कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all