तू तर चाफेकळी - भाग 7

Love Story

तू तर चाफेकळी - भाग 7


अबिरच्या डोक्यात अंजु चांगलीच फिट झाली होती. आजपर्यंत त्याने त्याच्या मागेपुढे करणाऱ्या अनेक मुली पहिल्या होत्या. का नसणार ...?? अबिर देसाई कॉलेजचा चार्मिंग बॉय....!!!! त्याच्या हँडसम लूकवर..... त्याच्या अँटीट्यूड वर अख्ख कॉलेज फिदा होतं. ऑफिसमध्ये देखील मिताली , सीमा आणि बाकी दुसऱ्या डिपार्टमेंटच्या मुली त्याच्याशी बोलायची संधी शोधायच्या. या सगळ्यात वेगळी होती ती फक्त अंजु...!!! दिसायला फार छान अट्रेकटीव्ह नसली तरी रेखीव चेहरा... बोलके डोळे .... नाजूक जीवणीचे ओठ आणि सगळ्यात सुंदर दिसायचं ते तिचं ते तरतरीत नाक...!!! अगदी चाफेकळी सारखं...!!! नि त्या नाकाच्या शेंड्यावर असणारा राग... !! लाल लाल व्हायचं तिचं नाक राग आला की. त्याला हे सगळं आठवून हसू येत होतं. तो आपल्याच विचारात गुंतला होता. तेव्हढ्यात फोन वाजला आणि त्याची तंद्री भंग झाली.


" हॅलो..... हा बोल....... " त्याने फोन उचलला.


" हॅलो.... कसा आहेस तू....? पुणे मानवतय ना....?? " पलीकडून एक स्त्री बोलत होती.


" हो. हळूहळू होतेय सवय. काही खतरनाक प्राणी पण भेटले इकडे... पण छान चाललंय... " अंजुचाच चेहरा आला पटकन त्याच्या डोळ्यासमोर नि तो स्वतःशीच हसला .


" काय......?? तुला त्रास देतंय का तिकडे कोण....?? "


" नाही तसं काही नाहीये. मी ठीक आहे. " अबिर


" मी येऊ का तिकडे.......??? काही त्रास असेल तर सांग... नि जेवणाचं काय....??? "


" नाही. मी मजेत आहे इकडे. तू उगीचच काळजी करू नको. मला आवडत नाही. तुला चांगलं माहितेय.. जेवण करायला मावशी येतात....." अबिर


"Ok.... तू कितीही सांगितलंस तरी माझं लक्ष आहे तुझ्यावर......." ती जरा तोऱ्यात म्हणाली.


" तू काय डिटेक्टिव्ह सोडलेस का माझ्या मागे.....??? " त्याला आश्चर्य वाटलं.


" नाही. पण तुझ्या गोष्टी कळतात मला... नि तुला तिथे कसलाही त्रास झाला तर मी तिथे निघून येईन लक्षात ठेव.... " पलीकडून तिने फोन आपटला.


त्याला काय करावं सुचेना. तो जमेल तेवढ सगळं मॅनेज करत असे. तरीही तिची अशी अति काळजी त्याला नको वाटायची. त्याने मग मोबाईल बाजूला ठेवला आणि तिथेच सोफ्यावर पडल्या पडल्या त्याला झोप लागली.

................................
दुसऱ्या दिवशी सकाळी अमेय लवकर निघाला. अंजु अर्ध्या झोपेतच त्याला बाय करायला आली. तरी जाता जाता \" तिला जास्त त्रास देऊ नको \" हे कानात कुजबुजलीच.

" झालं का तुमचं...... ?? अंजु तो दोनच दिवस जातोय... " बाबा हसून म्हणाले.


" बघा तरी... आज भारीच प्रेम व्हावतंय दादावरच.....नाहीतर दोघ जीव खातात नेहमी एकमेकांचा.... " आई


" दादा वर नाही काही... वहि..... " ती पुढे बोलायच्या आत अमेयने तिच्या तोंडावर हात ठेवला.


" हो आई खूपच प्रेम आलंय आज तिला माझ्यावर... ललू नको हा बाळा.... तुला मी भलपुल खाऊ आणीन हा.. माझं शहाणं पिल्लू ते..... " त्याने तिला जवळ घेऊन कपाळावर ओठ टेकवले... " आणि चुकून काही पचकलीस... तर आल्यावर फटके देईन तुला डुचके.... " तिला दूर करता करता तो हळूच तिच्या कानात पुटपुटलाच. काही झालंच नाही असं दाखवत दोघांच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि आईबाबा दोघांच्याही अशा अचानक उफाळुन आलेल्या प्रेमाकडे आश्चर्याने पाहत होते.


" आई मी निघतो...... गेल्यावर कॉन्फरन्स साठी जावं लागेल लगेच त्यामुळे फोन करायला मिळाला नाही तर वाट बघु नको... " अमेय.

" हो. पण एखादा मेसेज तरी कर नीट पोहचल्याचा..... " आई

" हो... मातोश्री करतो. " आईला नमस्कार करून तो गाडीत बसला. बाबा त्याला सोडायला स्टेशनवर गेले. गाडी गेटमधून बाहेर पडली तशा आई नि अंजु आत आल्या. बऱ्यापैकी उजाडायला लागल होतं त्यामुळे आई कामासाठी किचनकडे वळली.

" अंजु तू चहा घेशील ना......?? मी गरम करून आणते.... " तिने आतूनच विचारलं.


पण एक नाही की दोन नाही.. अंजुचा काही आवाज नाही म्हणून आई हॉल मध्ये बघायला आली. तर मॅडम सोफ्यावर पडल्या पडल्या घोरायला लागल्या होत्या. आईने कपाळावरच हात मारला. \" कसं होणार या पोरीचं \" बडबडतच आई आपल्या कामाला लागली.

..................................

पुण्याच्या ब्रँचला जॉईन झाल्यापासून अबिर जरा लवकरच ऑफिसला यायचा. आज ही तो लवकर आला आणि कॉफी पिण्यासाठी कॅफेटेरियात गेला तर रामू काका चहा करत होते.

" गुड मॉर्निंग काका..... चहा कोणासाठी करताय....?? " कॉफी मशीन सुरू करता करता तो म्हणाला.


" गुड मॉर्निंग साहेब... ते मिताली मॅडम आल्या आहेत आज लवकर त्यांना हवाय चहा नि कुलकर्णी सर पण येतील आता म्हणुन करतोय.... " ते हसऱ्या चेहऱ्याने म्हणाले.


" ok.... आज मिताली कशी काय लवकर आली...?? " मग मध्ये कॉफी घेऊन त्याने मशीन बंद केलं .


" काम करतायत कायतरी....... " रामू काका

" ok बघतो..... " कॉफीचा मग घेऊन तो आपल्या डेस्कवर आला.

पलीकडच्या बाजुला मिताली कामात असलेली त्याला दिसली. तिचं डेस्क भिंतीकडे असल्याने ती आल्याचं त्याला दिसलं नाही.


" हाय..... गुड मॉर्निंग .... आज लवकर.....?? " अबिर तिच्या डेस्कजवळ येऊन उभा राहिला. मितालीने वरती पाहिलं तर अबिर.... !!! तो स्वतःहून तिच्याशी बोलायला आलाय बघितल्यावर तिला हायस वाटलं.


" गुड मॉर्निंग...... अरे कुलकर्णी सरांनी काम सांगितलंय. म्हणून आले आज लवकर....... " मिताली


" तू कसा काय पण लवकर......?? " मितूने चहाचा एक घोट घेत एक सुस्कारा सोडला.


" मी रोज याच टायमिंगला येतो. मला पण काम आहे प्रेझेंटेशनच... आता मिस अंजली आल्या की कामाला लागणार.... " त्यानेही कॉफीचा एक सिप घेतला.


" मला तर मागचे सगळे रेकॉर्ड काढायला संगितले आहेत सरांनी....... वैताग आलाय.... " तिने डोक्याला हात लावत फाईल चाळायला सुरवात केली.


" ओहह...... काही हेल्प लागली तर सांग..... " तो म्हणाला.


" हो नक्की... एकतर सगळे रेकॉर्डस वरच्या फ्लोअरच्या रूम मध्ये आहेत... ते आणेपर्यंतच अर्धी होईन मी बहुतेक....." मिताली


" एवढं करण्यापेक्षा तुझ्या आधी कोण होतं त्यांनी रेकॉर्ड ठेवलेच असतील की पीसीला.... आत्ता या 1/ 2 वर्षातले त्यात ऍड कर... मग झालं तर..... " अबिरने बोलता बोलता कॉफी संपवली आणि त्याच्या डोक्यात एकदम ट्यूब पेटली.


" अरे हो.... माझ्या हे लक्षातच आलं नाही...... " तिच्या चेहऱ्यावर उत्साह आला एकदम.


" चल. तुझं काम चालू दे..... मी जातो माझ्या कामाला..... " तो हसत तिथून निघुन गेला.

.....................................

ऑफिसचा बाकीचा स्टाफ देखील हळूहळू यायला लागला. राकेश , यश , सीमा एकत्रच आले. पण अजुन अंजुचा पत्ताच नव्हता. थोड्या वेळाने मॅनेजर सरांनी अबिरला फोन करून आत बोलावुन घेतलं.


" May I come in sir......?? " अबिर

" yess..... मि. अबिर तुम्ही एकटेच कसे काय...?? मी मिस अंजलीना पण बोलावलं होतं. त्या आल्या नाहीयेत का....?? " मॅनेजर सर हातातलं घड्याळ न्याहाळत म्हणाले.


" सर ती..........." तिला ओरडा नको म्हणुन अबिर काहीतरी थाप मारण्याच्या बेतात होताच. तोच मॅनेजर सरांनी केबिन मधुनच अंजु आपल्या डेस्ककडे जाताना दिसली. तिला बघुन अबिरने कपाळावरच हात मारला. सरांनी रामू काकांना सांगुन अंजलीला बोलावलं. घाबरतच ती केबिनमध्ये आली.

" मिस अंजली..... ही काय वेळ आहे का ऑफिसला यायची...??  " सर ओरडले.


" सॉरी सर.... ते बस मिस झाली....... " अंजली.


" शाळेत सांगायची कारण इथे देऊ नका. हे ऑफिस आहे. पुन्हा जर तुमचा लेटमार्क आला तर तुमच्या पेमेंट मधून पैसे कट केले जातील. लक्षात ठेवा.... "


" येस सर....... " ती खाली मान घालुन उभी राहिली. बाजूला अबिरला बघुन यानेच सरांना काहीतरी सांगितलं असेल असं तिला वाटलं. सर त्यांच्या कामाचे डिटेल्स मागत होते. ते सगळे अबिरनेच दिले. अंजु मात्र गप्प होती. जुजबी बोलुन ती बाहेर आली. मागोमाग अबिर देखील. डेस्कवर आल्या आल्या तिने जोरात आपली पर्स आपटली त्यामुळे सगळ्यांचंच तिच्याकडे लक्ष गेलं.

" काय ग अंजु...... काय झालं चिडायला.....? " राकेश


" काही नाही.... " तोंडावर बारा वाजले होते मॅडमच्या काय बोलणार त्या.


" आज लेटमार्क लागलाय मॅडमचा नि सरांचा ओरडा मिळालाय...... " मागुन येणारा अबिर पुटपुटला.


" तू..... तुझ्यामुळेच सर ओरडले मला...." ती ओरडली.


" माझा काय संबंध...? उलट मी सांगणार होतो की तू इथेच आहेस कॅफेटेरियात वगरे... पण मी सांगायच्या आधीच सरांनी तुला बघितलं. मी काय करणार त्याला...." त्याने खांदे उडवले.


" अंजु.... त्याला का ओरडतेस....?? तुझं नेहमीचंच झालंय उशिरा यायचं.....कुलकर्णी सर कधी बोलले नाहीत. पण नवीन सर थोडी ना तुला सांभाळून घेणार आहेत... " सीमा


" असू दे ग सीमा... आपली अंजु लहान आहे. आपणच घ्यायचं तिला समजुन.... " यश म्हणाला. त्याने मग अंजुसाठी मस्त आलं मारके चहा करायला सांगितला त्यांना.


" हो. आपण घेतो समजून पण प्रत्येक वेळी कोण घेणार आहे का....?? " राकेश


" सॉरी ना.... पुन्हा नाही उशीर होणार... " तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं.


" हे बघ अंजु... ऑफिस म्हटलं की काही नियम आलेच. सो इथुन पुढे तुझं तुलाच सगळं हँडल करावं लागेल. दरवेळी तुला समजुन सांगायला आम्ही नसू ना... " सीमाने हलकेच तिच्या दंडावर थोपटलं.

तोपर्यंत रामू काका मस्त चहा घेऊन आले. सोबत तिच्या आवडीचं चीज सँडविच पण होतं. ते बघुन अंजुचा चेहरा खुलला. तिने डोळ्यांनीच यशला थँक्स म्हटलं. सगळेजण मग आपापल्या कामाला लागले. इतका वेळ बाकीच्यांचं बोलणं ऐकत असलेला अबिर देखील आपल्या डेस्ककडे वळला. पण पुन्हा मागे आला.


" लवकर ऑफिसला येण्यासाठी..... रोज लवकर उठावं ही लागतं अंजली मॅडम..... " तिच्या डेस्कजवळ जाऊन तो कुजबुजला आणि मागे फिरला. त्याच बोलणं ऐकुन अंजुचा घासच अडकला.

" याला आता काय न सांगताही कळायला लागलंय की काय....??? " तिला आश्चर्य वाटलं. मग तिने चहा नि सँडविच खाल्लं आणि कामाला लागली.

.....................................

" अंजली आपल्याला प्रेझेंटेशन साठी काही फाईल्स लागणार आहेत. तुम्ही आणाल का....?? " अबिर तिच्या डेस्कजवळ येत म्हणाला.


" हो आणते... बघु कोणत्या फाईल्स लागणार आहेत ते....मी सांगते रामू काकांना ते आणुन देतील... " ती त्याच्याकडून लिस्ट घेत म्हणाली.


" नाही. या फाईल्स महत्वाच्या आहेत. जुने सगळे रेकॉर्डस त्यात असतील सो तुम्ही आणल्यात तर फार बरं होईल. शिवाय त्या दिवशी तुम्हाला ती माणसं दिसली होती...त्यामुळे आपल्याला खूप सावध राहून काम करावं लागणार आहे.... " शेवटचं वाक्य तो हळू आवाजात बोलला.


" हो ,बरोबर. मी आणते फाईल्स. तू तोपर्यंत बाकी ग्राफ नि डिझाइन बघ प्रेझेंटेशनसाठी.... मी आलेच... " त्याच्या हातातुन लिस्ट घेऊन ती वरच्या मजल्यावर गेली.

जुन्या सगळ्या रेकॉर्डच्या फाईल वरच्या मजल्यावरच्या शेवटच्या रूममध्ये होत्या. तिने रामू काकांकडून रूमच्या चाव्या घेतल्या नि लॉक उघडलं. बरेच दिवसात कोणाचं तिकडे येणं जाणं नसल्याने बऱ्यापैकी धूळ साचली होती. तिने आपली ओढणी नाकाभोवती लपेटली आणि ती आत आली. सगळ्या फाईल्स त्या त्या वेंडर्स नुसार , डिपार्टमेंट नुसार लावुन ठेवल्या होत्या. त्यातुन तिने मागच्या डिल्सच्या , कॉस्टिंग आणि पेमेंटच्या फाईल्स घेतल्या आणि ती खालच्या मजल्यावर आली.


" या घे फाईल्स...... " तिने अबिरच्या डेस्कवर फाईल ठेवल्या नि चेहऱ्यावरचा घाम पुसला. त्याने फाईल्स बघितल्या.


" पण आपल्याला याच्या मागच्या वर्षीच्या पण फाईल्स लागतील.... आणशील का...?? " त्याने अगदी सहज विचारलं.


" आणते....... ( आता काय आलिया भोगासी....) " तोंड वेडावत ती पुन्हा वरती गेली.


आधीच्या वर्षाच्या फाईल्स तिने त्याला आणून दिल्या. पण त्या फाईल्स बघुन अबिर ही फाईल घेऊन ये ती फाईल घेऊन ये असं सांगुन त्याने तिला जवळजवळ अजून चार पाच वेळा वरती पिटाळलं. आता मात्र जिना चढ उतार करून अंजुची हालत झाली होती. तो मुद्दाम करतोय हे तिच्या एव्हाना लक्षात आलं होतं. पण करणार काय...?? काल मॅडमनीच त्यांना तिखट थालीपीठ खाऊ घातलं होतं ना...!! त्याचेच हे परिणाम दिसत होते. शेवटची फाईल आणायला अंजु वरती जायला निघाली. तेव्हा बाकीचा स्टाफ घरी जायला निघाला होता. सगळ्यांना बाय करून ती वरच्या फ्लोअर वरती आली. तिचे पाय जाम दुखायला लागले होते. कशीबशी ती मधल्या पॅसेज मधून रूमकडे जाऊ लागली. तोच तिला कोणाची तरी चाहुल लागली. मागापासून असं दोन तीनदा झालं. तिने मागे वळुन पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं. नक्कीच कोणीतरी आपल्यावर नजर ठेवतंय हे तिला जाणवलं..


क्रमशः.....


कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथा कोणीही कॉपी पेस्ट करू नये. कथा आवडल्यास नावसहित शेअर करावी ही विनंती.
© ® सायली विवेक

🎭 Series Post

View all