Login

तू तर चाफेकळी - भाग 20

Love Story
तू तर चाफेकळी - भाग 20


सकाळी अबिरला उशिरा जाग आली. त्याने घड्याळात पाहिलं तर साडेआठ होत आलेले. त्याने पटापट आपलं आवरायला घेतलं. आज कॉन्फरसचा शेवटचा दिवस होता आणि आज प्रोजेक्टची अनौसमेंट सुद्धा होणार होती. त्यामुळे त्याच्या मनात धाकधुक सुरू होती. आवरून तो जायला निघाला. मोबाईल घेतला तेव्हा त्याला वाटलं अंजुची एकदा चौकशी करावी. त्याने तिचा नंबर डायल केला. पण रिंग होण्याआधीच फोन कट केला. त्याने मग अंजुचा विचार डोक्यातून काढुन टाकला आणि तो मेहता कंपणीमध्ये जायला निघाला.

.............................

अंजु उठली पण पायाला अजूनही थोडी सूज होती. उठताना , वळताना तिला कळ यायची. अमेयने तिच्या पायाला क्रेप बँडेज बांधुन दिलं होतं. त्यामुळे थोडा आराम पडला होता.


" Good morning madam...... " अमेय आत येत म्हणाला.


" गुड मॉर्निंग.... तुझी सकाळ चांगली झालेली दिसते... " त्याला निरखत तिने म्हटलं.


" हा.. थोडी फार. तुझ्या वहिनीचा फोन येऊन गेला.. त्यामुळे आज दिवस कसा छान जाणार बघ... " तो हसला.


" हो का.. आईला पण सांगते. म्हणजे तिचा दिवस पण चांगला जाईल.... ए आई...... " तिने आईला हाक मारलीच.


" अंजु... कारटे.... गप्प बस ना. तुला लागलंय म्हणून... नाहीतर फटकवल असतं तुला.... " त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. तोपर्यंत हाक ऐकून आई आलीच.


" काय गं अंजु.... काय झालं...?? " आई फडक्याला हात पुसत होती.


" काही नाही आई... ते ती उठली ना.. तर परत आपटली. म्हणुन ओरडतेय.... हो ना अंजु.... " अमेयने अजूनही तिच्या तोंडावरून हात बाजूला केला नव्हता. त्याच्याकडे बघत तिने मान हलवली. आईला त्यांच्याकडे बघुन हसू येत होतं.


" हा. अरे पण तोंड का धरलंस तिचं...?? " आई बोलली म्हणून अमेयने पटकन तिच्या तोंडावरचा हात बाजूला केला.


" काही नाही आई.... ते... तिच्या गालावर डास बसला होता. त्याला मारता मारता तिच्या तोंडावरच हात बसला... चुकून... " अमेय गडबडला.


"छान हा... बरं अंजु... तुला येता येईल का चहा घ्यायला...?? की आणून देऊ...? " आईने जाता जाता विचारलं.


" एवढं काय झालेलं नाही. उठ चल.... " अमेय


" आई नको.. उठलं की कळ येते. ह्याला सांग ना. हा देईल मला चहा... " तिने अमेयला एक फटका मारला.


" हट... मी नाही हा आणुन देणार अजिबात.... "


" हो काय.... ए आई मी काय म्हणत होते...... " तिने मोठ्याने बोलायला सुरुवात केली तोच अमेयने तिच्या तोंडावर परत हात ठेवला. तिच्या आवाजाने बाहेर जाणारी आई तिथेच थांबली.


" काय....?? " आई एकदा अमेयकडे एकदा अंजूकडे बघत होती.


" काही नाही. ती म्हणतेय दादा चहा देईल म्हणून.. मी देतो ना तिला. तू चल मी आलोच... " बरं म्हणून आई बाहेर गेली.


" तुला बरं नाहीये त्याचा गैरफायदा घेऊ नको कळलं ना... " अमेय.


" हम्म.... मला जरा मदत कर ना. ब्रश करायचा आहे. " ती उठत म्हणाली.


" आता काय.. ब्रशला पेस्ट लावुन दातू घासू का बाळाचे.... " तो बोबड बोलत म्हणाला.


" नेऊन सोडना बेसिन पर्यंत तरी... नाहीतर मी हाक मारीन हा परत आईला.... " अंजुने धमकीच दिली.


" नको माझे आई... चल चल....नेतो तुला... " त्याने मग तिला सावकाश वॉशरूम पर्यंत नेलं. तिचं ब्रश होईपर्यंत तो तिथेच थांबला आणि तिला पुन्हा बेडवर आणून बसवलं. तिच्यासाठी चहा घेऊन आला.


" घ्या मॅडम चहा घ्या. अजून काही आपली सेवा....?? " त्याने तिच्या हातात कप दिला.


" तसे माझे जरा पाय दुखत होते. चेपून दिले असते कोणी तर बरं वाटलं असतं जरा.... " तीची नाटकं चालू झाली.


" दोन फटके देईन आता. चल मला ऑफिसला जायला उशीर होतोय. मी निघतो. तू काळजी घे तुझी. इथे तिथे फिरत बसू नको उगीच.. नि मी संध्याकाळी लवकर येतो. आपण मग डॉक्टरकडे जाऊ... " असं म्हणून त्याने तिच्या कपाळावर किस केलं आणि तो निघाला.


" नीट जा.... " अंजुने त्याला बाय केलं तसा तो निघून गेला. तिने मग चहा संपवला आणि ऑफिसमध्ये फोन केला.

.....................................

" हॅलो.... हॅलो सीमा.... अंजु बोलतेय... "


" हा बोला मॅडम.... काय फोनच नाही तुमचा दोन दिवस. कसं झालं प्रेझेंटेशन...??" सीमाने उत्सुकतेने विचारलं.


" प्रेझेंटेशन एकदम भारी झालं.... पण मी आज गेले नाहीये कॉन्फरसला... " अंजु


" का....?? " तिला आश्चर्य वाटलं.


" अग मी काल पडलेय. पाय मुरगळलाय माझा. "


" अग काय सांगतेस काय....?? अशी कशी पडलीस....?? " सीमाला तिची काळजी वाटायला लागली.


मग अंजुने तिला सगळा वृतांत सांगितला.

" मॅनेजर सरांना सांग हा प्लिज तेवढं. मी आले की अँप्लिकेशन देईन त्यांना... " अंजु


" हो सांगते ना... अंजु तुला आठवतं मागे एकदा मी अशीच पडले होते. आपल्या पार्कींग मध्ये तेव्हा कुलकर्णी सरांनी किती धावपळ केली होती. " सीमा


" हो ना. आपल्या सगळ्यांचीच किती आपुलकीने चौकशी करायचे. मुद्दाम आपल्यासाठी काही न काही घेऊन यायचे. ते असं वागतील असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं... " अंजु बोलता बोलता उदास झाली.


" हो ना. मला पण. मला तर शॉकच लागला. असं कसं ग केलं त्यांनी... मुद्दाम त्यांना कोणी अडकवलं नसेल ना यात...?? " सीमाने आपली शंका बोलुन दाखवली.


" नाही सीमा. सगळे पुरावे त्यांच्या विरुद्ध आहेत. नि पैसे घेताना ते व्हिडीओ मध्ये क्लिअर दिसतायत गं.. पण त्यांनी असं करायला नको होतं... " अंजु


" हो....ए अंजु मला जरा सरांनी आत बोलावलंय... आपण नंतर बोलू हा.... " रामू काका सीमाला बोलवायला आले सो तिने फोन कट केला.

.................................

अबिर मेहता कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा बाकीच्या कंपनीचे रिप्रेझेन्टेटीव्ह सुद्धा आले होते. थोड्याच वेळात कॉन्फरस चालू झाली. आज शेवटचं सेशन होतं. आज प्रोजेक्ट कोणाला मिळणार हे जाहीर होणार होतं. त्याचं हार्ट आज ऐंशीच्या स्पीडने धावत होतं. त्याने आणि अंजुने खूप मेहनतीने प्रेझेंटेशन केलं होतं. त्यामुळे आता काय होतंय याची त्याला उत्सुकता लागून राहिली होती. प्रोजेक्ट बदल थोडे डिटेल्स सांगून मॅनेजर सरांनी नावं सांगायला सुरुवात केली. काही कंपनीजना चालू असलेले छोटे प्रोजेक्ट हँडओव्हर करण्यात आले.

" आणि झालेल्या प्रेझेंटेशन वरून आणि एकूण कॉस्टिंग वरून हे प्रोजेक्ट मिळतंय काव्या पटेल यांच्या SP इंडस्ट्रीजला.... "


क्रमशः...


भाग पोस्ट करायला उशीर झाला सो रागावू नका हा. दोन भाग एकत्र पोस्ट केले आहेत. प्रतिक्रिया जरा कमी कमी होतायत असं वाटतंय. तुमच्या प्रतिसादाची आम्हालाही ओढ असतेच. पुढील भाग 27 ला रात्री.

🎭 Series Post

View all