तू तर चाफेकळी - भाग 22

Love Story

भाग पोस्ट करायला खूप उशीर झालाय. पण तब्येत खरच बरी नव्हती. त्यामुळे राहील. पण पेनलटी म्हणून तुमच्यासाठी 2 भाग पाठवत आहे. दुसरा भाग रात्री 11.30 पर्यंत पोस्ट होईल. गोड मानून घ्या. 


( मागील भागात 

थोड्या वेळाने मॅनेजर सर बाहेर आले. त्यांनी अंजु आणि अबिरच अभिनंदन केलं आणि मॅनेजर सर म्हणाले.

" तुम्हा सगळ्यांसाठी उद्या एक सरप्राईज असणार आहे....."
थोड्या वेळाने मॅनेजर सर बाहेर आले. त्यांनी अंजु आणि अबिरच अभिनंदन केलं आणि मॅनेजर सर म्हणाले.

" तुम्हा सगळ्यांसाठी उद्या एक सरप्राईज असणार आहे....." ) 


आता पुढे

तू तर चाफेकळी - भाग 22


" उद्या तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज असणार आहे..." मॅनेजर म्हणाले तशी सगळ्यांच्यात कुजबुज सुरू झाली.

" एक मिनिट एक मिनिट....... उद्या आपल्या ऑफिसला सुट्टी असणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी संध्याकाळी बरोबर सात वाजेपर्यंत एका ठिकाणी जमा व्हायचं आहे...फॉर्मल ड्रेस नकोत... तुम्ही तुम्हाला आवडेल ते घालून येऊ शकता.....का , कधी , कसं हे सगळं तुम्हाला उद्या समजेल..... " एवढं बोलून मॅनेजर सर निघून गेले.


" वॉव..... उद्या सुट्टी... म्हणजे जरा आराम करता येईल.. ए अंजु.... शॉपिंगला जाऊयात का उद्या आपण...?? " मितुने विचारलं.


" हो चालेल.... संध्याकाळ साठी मस्त काहीतरी घेता येईल... " सीमा बोलली पण दोनच मिनिटात तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह मावळला. " अरे उद्या संध्याकाळी बोलावलंय. घरून पाठवतील कसे...?? " डोक्याला हात लावत ती तिथेच बसली.


" चिल यार सीमा.... मी सांगते हवंतर तुझ्याकडे फोन करून. तू आज घरी गेलीस की सांग घरी संध्याकाळी ऑफिसला बोलावलंय म्हणून.... नाही ऐकले तर मला फोन कर मी बोलेन. रिलॅक्स... " अंजुने हलकेच तिच्या पाठीवर थोपटलं.


" ok. मग आपण उद्या सकाळी मस्त शॉपिंगला जाऊ... आणि बाहेरूनच लंच करून येऊ.... " मिताली उत्साहाने सांगायला लागली.


" झालं यांचं नेहमीच गर्ल्स टॉक चालू.... घुमून फिरून गाडी पुन्हा शॉपिंगवरच येते.... " यश हळूच पुटपुटला तरी मीतूने ऐकलंच.


" यश काय....?? काय म्हणालास तू....??" त्याला मारायला मॅडमनी हात उचलला होता.


" अग मितू कुठे याच्या नादी लागते. सोड ते सगळं...." राकेशने पटकन सावरलं नाहीतर यशने आज मारच खाल्ला असता.


" हो तेच ना. मितू तू आधी काय काय घ्यायचं आहे ते ठरव. तिथे गेल्यावर या दुकानात जाऊ मग तिकडे जाऊ नको.. फिरण्यातच वेळ जातो सगळा.... " अंजु.


" नाहीतर काय....? मागे एकदा मी , मितू आणि निशा गेलो होतो शॉपिंगला. निशा म्हणजे आधी होती इथे जॉबला मग जॉब सोडला तिने. आम्हाला दोघींना मितुने इतकं फिरवलं होतं की दुसऱ्या दिवशी पाय गळ्यात यायचे बाकी होते.... " सीमा बोललीच तसा मितालीने सीमाकडे एक रागीट लूक दिला की ती गप्पच झाली.


" अंजु हिचं काय ऐकतेस तू.... सोड ते सगळं उद्या मस्त भटकूया. मी फोन करते तुला सकाळी रेडी राहा...." मितू उत्साहात म्हणाली.


" हो चालेल...... " अंजुने फक्त हसून मान डोलावली.

तिने अबिरकडे पाहिलं तर या सगळ्यापासून तो अलिप्त असल्यासारखा असायचा. मॅनेजर सर गेल्यावर सगळे गॉसिप मध्ये रंगले होते. पण अबिरने मात्र पुन्हा एकदा स्वतःला आपल्या कामात बुडवुन घेतलं होतं. उद्या काहीही झालं तरी अबिरचा राग काढायचाच असं अंजुने मनाशी पक्कं केलं. ऑफिस सुटलं आणि सगळे आपापल्या घरी पळाले.

............................

दुसऱ्या दिवशी अंजु सावकाश उठली. आधीच झोप आवडीची. त्यात ऑफिसला सुट्टी मग काय बघायलाच नको. दहा वाजता मॅडमची सकाळ झाली. ती बाहेर आली तेव्हा आई बाबा नाश्ता करत होते.


" या... उठलात मॅडम. कशाला ते एवढ्या लवकर....? " आई हसत म्हणाली


" काय गं......!! " अंजु जाऊन तिच्या गळ्यात पडली. डोळे अजूनही अर्धवट मिटलेले.


" शी...! अंजु जा आधी आवरून ये.... काय हे.... " आई ओरडली.


" आआ आ...... असुदे ना.... आज बेड टी दे ना.... तती अजूनच तिला बिलगली.


" अजिबात नाही... नको त्या सीरिअल बघत राहू नको.. कसले दात न घासता चहा पितात ते... बेड टी म्हणे. म्हणजे दात स्वच्छ करायचे सोडून नको त्या सवयी लावतात हे सीरिअलवाले लोकांना.... " आई


" अंजु जा.. आवरून ये.. मितालीचा फोन येऊन गेला दोनदा... उठ ती येईल अर्ध्या तासात.... " बाबा म्हणाले तशी अंजु ताडकन उठली.


" काय.....?? आई तू उठवलं का नाहीस मला...मी बोलालव होते ना तुला आज शॉपिंगला जाणार आहोत ते..... " अंजु करवाजली.


" घ्या... आळशी पोरी मी तुला सकाळपासून तीनदा हाका मारल्या.. तू उठली नाहीस मग काय करू...?? जा आवरून ये पटकन.. मी पोहे गरम करते तोपर्यंत... " स्वतःची प्लेट तशीच ठेऊन आई तिच्यासाठी पोहे गरम करायला उठली. अंजुने ते पाहिलं आणि आईला हाक मारली.


" आई.... आधी बस इथे. तू पोटभर खा.. मी आवरते नि मग घेईन पोहे गरम करून..... " तिने पुन्हा तिला खुर्चीत बसवलं आणि खायला लावलं.


मग ती आवरायला पळाली. थोड्या वेळात मितू तिला न्यायला आली. आईला बाय करून दोघीही गेल्या. ठरलेल्या जागेवर सीमा येऊन थांबली होती. तिथून तिघी एकत्रच निघाल्या. मग तिघीही दुकान लुटायच्या तयारीत आत गेल्या.


मिताली एकेक ड्रेस घेऊन ट्राय करून येत होती. पण तिला काहीच पसंत पडेना. अंजु आणि सीमा कंटाळल्या. पण बोलणार काय...? दोघी मग आपल्यासाठी शॉपिंग करायला लागल्या. नि मधेच मितूच्या ड्रेसबदल रिप्लाय देत होत्या. सीमाने एक ब्लॅक कलरचा छान पंजाबी सूट सिलेक्ट केला. तिने आरशात लावून पाहिलं तर तिला तो मस्त शोभून दिसत होता. जी अवस्था मीतूची तीच अंजुची. लवकर काही पसंत पडेना. शोधता शोधता तिची नजर एका साडीवर गेली. तिला ती खूप आवडली. सीमा आणि मिताली आपल्याच विश्वात होत्या. त्यामुळे त्यांना न दाखवता तिने ती साडी पॅक करायला सांगितली. पण मितूचं काही संपत नव्हतं. शेवटी एकदाचा मीतूला ड्रेस पसंत पडला.


" अंजु तुला काहीच घेतलं नाहीस का तू....?? " मितू आपली पर्स उघडत म्हणाली.


" घेतलंय मी... पण तुम्हाला आत्ता दाखवणार नाही. " अंजुने डोळे मिचकावले.


" This is not fair yar.... आमचे ड्रेस तू बघितलेस पण तुझा दाखवत नाहीस हे काय.... " सीमा


" अरे पण तुमच्या दोघींचा ड्रेस फक्त मी बघितला आहे. बाकी कोणी नाही... सो चिल.... " अंजु


" पण तू तुझ्यासाठी काय घेतलंस ते तरी दाखव ना...?? " मिताली


" थांबा दाखवते रडू नका..... ही बघा साडी घेतलेय....." तिने त्या दोघींना पिशवीतूनच साडी दाखवली.


" वॉव.... कसली भारी....... " मितू नि सीमा एकदमच ओरडल्या.


" ए बायांनो जरा सावकाश..... दुकानात आहोत आपण घरात नाही..... " अंजु


" अरे यार पण कसली भारी दिसशील तू साडीत.... Am so excited...... " मिताली


" चला आता बिल देऊया. संध्याकाळची तयारी करायची आहे.... " अंजु बोलली नि तेवढ्यात तिचा फोन वाजला आईचा होता.


" हा आई बोल..... "


" अंजु आवरतंय की नाही तुमचं....?? जेवला नसाल ना अजून म्हणूनच फोन केला.. आटप नि लवकर ये घरी.... " आई


" आई तुला कस गं कळत सगळं... शॉपिंग झालं. आता जेवतो नि येते मी घरी..... " अंजुने फोन ठेऊन दिला.


तिघीनी मग रेस्टॉरंटमध्ये जाऊन लंच केलं आणि आपापल्या घरी पळाल्या. संध्याकाळची तयारी करायची होती ना....!!!

...................................

संध्याकाळी ठरलेल्या ठिकाणी सगळा स्टाफ पोहोचला. यश , सीमा , मिताली , राकेश आणि बाकी प्रोडक्शन , आय टी डिपार्टमेंटचा स्टाफ होता.


" अरे इथे कोणीच कसं दिसत नाही...... " राकेश इकडे तिकडे बघत म्हणाला.


" तेच ना... आपण बरोबर पत्त्यावर आलोय ना...?? " सीमा


" अग येडपट गुगल लोकेशन नावाचा प्रकार असतो... सरांनी हेच लोकेशन दिलंय आपल्याला...." यश


" अजुन अंजु आणि अबिर पण आले नाहीयेत.... आपण वाट बघुया थोडा वेळ.... " मिताली


सगळे आपापसात बोलत असतानाच अबिर आला. त्याने आज सिल्कचा पर्पल शर्ट.. स्लीवज थोड्या फोल्ड केलेल्या आणि व्हाइट पॅन्ट घातली होती. त्यामुळे त्याच्या हँडसम लूक मध्ये अजूनच भर पडली होती. तो जसजसा जवळ येत होता तसा त्याच्या परफ्युमच्या गंधाने सगळ्यांच लक्ष त्याच्याकडे गेले.


" वॉव.... अबिर you are looking dam handsome.... " आल्या आल्या मितुने त्याला कमेंट दिली.


" thank you...... " छान स्माईल देत तो म्हणाला.


" हो भावा.... लय भारी दिसतोयस....... " यशने त्याच्या खांद्यावर हात टाकला. त्यावर तो फक्त हसला.


सगळे आपल्या गप्पांमध्ये रमले होते आणि अचानक समोर लाईट्स लागले. समोर पाहिलं तर एक मोठं स्टेज होत त्यावरून मोठा प्रकाशझोत येत होता. समोर मोठं लॉन पसरलं होतं. बाजूने लायटींगच्या माळा सोडलेल्या आणि सॉफ्ट म्युझिक वाजत होतं. सगळे फक्त आ वासून बघत होते. कारण आज कंपनीच्या आयुष्यातली पहिलीच पार्टी होती. सगळेच खुश झाले. थोड्या वेळाने बाकी माणसं देखील येऊ लागली तसे ते सगळे जाऊ लागले. कोणीतरी म्हणाल अंजली आली तसे अबिरचे पाय तिथेच थबकले. त्याने मागे वळून पाहिलं तर अंजु येत होती.


चंदेरी व्हाइट कलरची साडी त्यावर बारीक डिझाइन...पदराला मोत्याची किनार.... सिवलेस चंदेरी ब्लाउज ... गळ्याभोवती एक नाजूक डायमंड नेकलेस..... हातात क्लच.... नि एका हातात पर्स... सावरत ती आतच येत होती. अबिरची तर कधीच विकेट गेली होती तिला बघून.... त्यामुळे हळूहळू रागही विरघळत होता... आज मॅडम हाय हिल्स घालून आल्या होत्या. त्यामुळे थोडं जपून चालावं लागत होतं. तरीही मधेच तिचा तोल जातच होता. ती पदर सावरत हळूहळू पुढे येत होती पण तिचं अबिरकडे लक्षच नव्हतं. त्यामुळे ती त्याच्या बाजूने पुढे जात असताना पायात पाय अडकून पडणारच होती की अबिरने तिला सावरलं. तेव्हा तिच्या लक्षात आलं मगापासून तिच्याकडे बघणारे डोळे अबिरचे होते...!!! तो मात्र अजूनही तिच्या काळ्याभोर डोळ्यात हरवला होता. नि त्याहीपेक्षा तिच्या सौन्दर्यात भर घालत होती ती तिच्या चाफेकळी नाकावरची ऑक्साईडची नोजपीन....!!!! हाय.... दोन क्षण त्याला सगळ्याचाच विसर पडला. अंजु मग त्याच्या आधाराने उभी राहू लागली.. तोच त्याच्या कानाजवळ जात ती कुजबुजली


" तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे..... " एवढं बोलून ती त्याच्यापासून बाजूला झाली.


क्रमशः.....



🎭 Series Post

View all