तू तर चाफेकळी - भाग 26

Love Story


तू तर चाफेकळी - भाग 26


गाडीवरून जात जाता अबिरला चहाची टपरी दिसली. तशी त्याने बाईक थांबवली.


" चहा घेऊयात......?? " त्याने विचारलं


" हो चालेल ना.... काय मस्त हवा पडलेय. " अंजु गाडीवरून उतरली.


" तू थांब इथेच मी घेऊन येतो...... " त्याने गाडी एका बाजूला पार्क केली आणि तो जायला निघाला. तोपर्यंत अंजुने घरी फोन केला आणि ती अमेयशी बोलत होती.

रस्ता क्रॉस करायला म्हणून अबिरने इकडे तिकडे पाहिलं. तेवढ्यात एक गाडी अगदी त्याच्या जवळून निघून गेली. त्याच्या अंगावर एकदम काटा आला. फक्त गाडी जवळून गेली तर आपली अशी अवस्था झालेय... मग त्या दिवशी तर......??? त्याचा भूतकाळ सर्रकन त्याच्या डोळ्यांसमोर तरळला....


उन्हाळा संपून नुकतीच पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे कुठे ना कुठे मधुनच पावसाची हलकी सर पडे. तर कधी अचानक मुसळधार पाऊस हजेरी लावुन जायचा. त्या दिवशी असेच अबिर आणि त्याचे सगळे उडाणटप्पू मित्र कोणालाही न सांगता शहराबाहेर खूप लांब गेले. अबिर आपली मोठी कार घेऊन तर सोहम , मॉन्टी , रोहन आणि अनुराग असे बाईक्स घेऊन मॉन्टीच्या बर्थडे सेलिब्रेशन साठी एका बीचवर पोहोचले. निषादने अभ्यासाचे कारण सांगून त्यांच्यासोबत जायचं टाळलं होतं. कारण बर्थडे सेलिब्रेशन म्हटलं की बाटल्या रिकाम्या होणार नि सगळ्यांनी जबरदस्ती करून त्याला पाजली असती हे त्याला पक्कं ठाऊक होतं. त्यामुळे तो गेलाच नाही. सगळे बीचवर गेले तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. मॉन्टीने खास सेलिब्रेशनसाठी बीचवरच हॉटेल बुक केलं होतं. हॉटेलवरती केक वगरे कट करून लंच झालं आणि मग सगळे बीचवर पळाले. नुकताच सुरू झालेला पाऊस आणि समुद्रावरून जाणारा खारा वारा अंगाला झोंबत होता. तिथेच वाळूत सगळ्यांनी बस्तान ठोकलं. थोडा वेळ त्यांची थट्टा मस्करी चालु होती. मग वेटरने सगळ्यांसाठी ड्रिंक्स आणि ग्लासेस आणून ठेवले आणि तो निघून गेला. मॉन्टीने सगळ्यांचे ग्लास भरून दिले.


"चिअर्स...... " सगळ्यांनी ग्लास एकमेकांवर आपटवले.


" यार मॉन्टी अरेंजमेंट भारी केलेय एकदम.... " सोहम म्हणाला.


" बस काय....?? आपल्या बर्थडेची पार्टी आहे. मग जंगीच असणार ना....? " मॉन्टी हसला.


हळूहळू एकेक पेग वाढत होते. कोणी उठून डान्स करत होत तर कोणीतरी मोठ्याने गाणी म्हणायला लागलं. सगळ्यांनाच आता बऱ्यापैकी चढली होती. इतक्यात अबिरचा फोन वाजला. निषादचा होता.


" हॅलो...... तू..... तू ... का आला नाहीस.... किती मस्त पार्टी रंगलेय माहितेय का तुला....." अबिरला धड बोलताही येत नव्हतं.


" झालं का तुमचं सुरू...?? तरी मला वाटलंच तुमचे प्रोग्रॅम चालू असतील.... अबिर तुझ्या मॉमचा दोनदा फोन येऊन गेला मला काय सांगू मी....?? तू उठ लवकर तिथून मी न्यायला येतोय तुला...." निषादने फोन कट केला.


" यार हा निषाद पण ना.... सगळा मूड घालवला पार्टीचा.... " खूप ड्रिंक्स झाल्याने अबिरचा सारखा तोल जात होता.


" ए अबिर कुठे निघाला तू.... बस इथे...... निषाद आला तर त्याला पण आपण इथेच बसवू.... मग तुझी मम्मा कोणालाच फोन करणार नाही....... " ग्लास दाखवत मॉन्टी एकटाच हसत म्हणाला.


रात्रीचे जवळजवळ बारा वाजत आले तरी त्यांची पार्टी संपण्याची चिन्हे दिसेनात. निषादला यायला वेळ गेला. तोपर्यंत सगळे हवेत तरंगत होते. मॉन्टी सगळ्यांना खूप लांबवरच्या बीच रिसॉर्ट वरती घेऊन आला होता. त्यामुळे निषादला ते नक्की कुठे आहे ते शोधायला खूप वेळ गेला. मॅनेजरकडे चौकशी करून तो बिचवरती आला तर सगळे खाली पडले होते. कोणी वाकडे तिकडे होऊन एकमेकांच्या अंगावर पडले होते. सोहम नि रोहन तर काय बडबडत होते त्यांचं त्यांनाच माहीत....त्यांना बघून निषादने कपाळावरच हात मारला.


" उठा चला... खूप झालं... मॉन्टी उठ..... अबिर...रोहन..... " निषादने अक्षरशः हलवून सगळ्यांना जागं केलं.


त्याने आधी रोहन आणि अबिरला नेऊन त्याच्या गाडीत बसवलं. मॉन्टी , सोहम आणि अनुराग आपापल्या बाईक्स घेऊन आले होते... पण त्यातलं कोणीही गाडी धड चालवू शकेल असं त्याला वाटत नव्हतं. शेवटी त्याने त्या तिघांसाठी कॅब बुक केली आणि कॅब येइपर्यंत तो तिथेच थांबला. त्यांच्या बाईक्स सकाळी नेतो सांगून त्याने मॉन्टीच्या खिशातून कार्ड काढून पेमेंट केलं. कारण इतकं मोठं बिल निषाद देऊ शकत नव्हता. कॅब आली तसं त्याने तिघांना व्यवस्थित बसवलं आणि कॅब ड्रायव्हरला गाडी त्यांच्या गाडीच्या मागोमाग आणायला सांगितली.


त्यांना बसवून तो अबिरच्या गाडीकडे आला. ड्रायव्हिंग सीटवरती बसायला त्याने दरवाजा उघडला तर अबिर मागून उठून तिथे येऊन बसला होता.


" तू..... तू काय करतोस इकडे...?? उतर आधी खाली जा मागे जाऊन बस..... " निषाद त्याला उठवत होता


" ए तू....... तू कोण मला सांगणारा...... माझी गाडी मी हवं ते करीन तू कोण...... " तो दारूच्या नशेत बडबडत होता.


" अबिर तू उठ... मी ड्राइव्ह करतो. तुला जास्त झालेय. उठ प्लिज.... " त्याचा हात धरून तो त्याला बाहेर खेचत होता. पण तो अजिबात हलत नव्हता.


शेवटी निषादचा नाईलाज झाला तो गपचूप त्याच्या बाजूला जाऊन बसला. अबिरने गाडी स्टार्ट केली... नशेत असल्याने थोडा वेळ गाडी इकडे तिकडे जात होती. मग जरा वेळाने त्याने गाडी कंट्रोल केली आणि तो सरळ नेऊ लागला. त्याने गाडीत मोठ्याने म्युझिक सुरू केलं.. नि त्या तालावर गाडी चालवता चालवता तो हातवारे करत होता. निषाद तर कानात बोटं घालून बसला होता. अचानक अबिरने गाडीचा स्पीड वाढवला....निषाद जवळजवळ ओरडलाच.


" अबिर...... अबिर सावकाश....... हळू चालव गाडी.." निषाद जीव मुठीत घेऊन बसला होता. मागे पाहिलं तर रोहन कधीच झोपला होता.


" ए तू मला शिकवायचं नैई..... मी.... मी... काय हवं..... ते.... ते करीन....." अबिरने अजूनच गाडीचा स्पीड वाढवला.


आता गाडी जवळजवळ शंभरच्या स्पीडला होती. निषादने मागे पाहिलं तर कॅब कुठे दिसत नव्हती. अबिरला कसं आवरावं हेच त्याला कळत नव्हतं... इतक्यात त्याला दुरूनच एक चहाची टपरी दिसली. काहीतरी कारण काढून अबिरला गाडी थांबवायला लावू असं त्याने ठरवलं आणि तो त्याला बोलला.


" अबिर..... अबिर चहा....... " पण जोरात लावलेल्या म्युझिक सिस्टीम मुळे अबिरला ते ऐकूच गेलं नाही.


निषादने त्याला हात लावून जाग केलं... अबिरने त्याच्याकडे पाहिलं.... आणि पुढच्याच क्षणी..... गाडीचे ब्रेक कर्कचून दाबले गेले...... दोन क्षणासाठी सगळंच थांबलं.....!!!! निशब्द झालं होतं!! नेमकं काय झालं ते कोणालाच कळलं नाही.....!!!!


क्रमशः.....

🎭 Series Post

View all