तू तर चाफेकळी - भाग 27

Love Story


तू तर चाफेकळी - भाग 27


लाऊड म्युझिक मुळे निषादचे शब्द अबिरच्या कानावर पोहोचलेच नाहीत. अचानक त्यांच्या गाडीसमोर एक व्यक्ती आली आणि अबिरच्या गाडीचा जोरात धक्का त्याला बसला. अबिरने करकचून ब्रेक मारला. समोरचं दृश्य बघून तर निषादच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. ती व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पलीकडे त्याच्या सोबत आलेल्या स्त्रीने एकच किंकाळी फोडली. ती धावतच त्या व्यक्तीजवळ आली. त्या माणसाला जबरदस्त मार लागला होता. एव्हाना तिथे चहाच्या टपरीवर असणारे एक दोघेजण धावत आले. अबिरही गाडीतून खाली उतरला. दारू जास्त झाल्याने त्याचा तोल जात होता.


" अबिर तुला कळतंय का...? काय झालंय ते....?? " निषाद त्याच्यावर ओरडत होता. त्याला हलवून जाग करायचा प्रयत्न करत होता.


" शशशश........... " त्याने तोंडावर बोट दाखवून त्याला गप्प केलं. " इतकं पण काययययय...... झा ले लं.... ना...हिई...ये...... " एवढं बोलून तो आपला तोल सांभाळत गाडीकडे गेला आणि गाडीतून एक पैशाचं पुडक आणून त्याने त्या रडणाऱ्या बाईच्या हातात ठेवलं.


" हे..... घ्या..... नि गप्पप्पप्प.... बसा..... " त्याच्या तोंडाला येणाऱ्या वासाने त्या बाईने तोंड फिरवलं. तिचे अश्रू थांबत नव्हते. त्यात अबिरने असे पैसे तिच्या तोंडावर फेकल्याने ती चांगलीच खवळली.


" अरे पैशाचा माज कोणाला दाखवतोस... माझा नवरा तुझ्यामुळे असा रक्ताच्या थारोळ्यात पडलाय... मदत करायची सोडून पैसे फेकतोस.. लाज नाही वाटत.... " असं म्हणून तिने अबिरच्या एक सणसणीत कानाखाली वाजवली. अबिरची नशा एका क्षणात उतरली.


" अबिर आपल्याला याना हॉस्पिटलमध्ये न्यायला हवंय लवकरात लवकर..... उचल चल...." निषाद त्याला सांगत होता.


" हट.... मी मी नाही नको त्या लफडयात पडणार.... तुला हवं तर तू जा त्याला घेऊन... मी नाही.... " अबिर बडबडत होता.


" हे.... हे सगळं काय झालंय ना हे तुझ्यामुळे झालंय... आपल्याला त्यांना अशा अवस्थेत सोडून जाता येणार नाही. " निषाद त्याच्यावर ओरडला.


ती बाई धाय मोकलून रडत होती ते निषादला बघवत नव्हतं. त्याने बाकीच्यांचा मदतीने त्या माणसाला गाडीत ठेवलं आणि तो अबिरला बाजूच्या सीटवर बसवून तो स्वतः ड्रायव्हिंग सीटवरती बसला. त्याने गाडी जोरात हॉस्पिटलच्या दिशेने पळवली. अबिर अजूनही पूर्णतः शुद्धीत नव्हता. निषादने गाडी हॉस्पिटल समोर उभी केली आणि त्या व्यक्तीला ऍडमिट केलं. तो त्याच्या बायकोजवळ गेला ती अजूनही रडत होती.


" ताई.... " मगाशी अबिरने दिलेले पैसे तिने फेकून दिले होते तेच पैसे त्याने तिला परत केले... " ताई जे काही झालं त्यासाठी मी माफी मागतो तुमची.. पण हे पैसे ठेवा खर्चाला होतील... आत्ता माझ्याकडे दुसरे पैसे नाहीत. नाहीतर हे पैसे घ्या असं मी कधीही तुम्हाला म्हटलं नसतं. " तिने भरल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. त्याने तिच्या बाजूला ते पैसे ठेवले.


" ताई हा माझा नंबर आहे... कधीही तुम्हाला काही वाटलं तर मला फोन करा..... " निषाद आपुलकीने म्हणाला.


तिने तो कागद हातात घेतला आणि एक जोराचा हुंदका आला तिला....!!!


" ताई काळजी करू नका... ते नक्की बरे होतील....." निषादने हळुवार त्यांच्या हातावर थोपटलं आणि तो निघून गेला. त्याने मग अबिरला त्याच्या घरी सोडलं आणि गाडी घेऊन तो आपल्या घरी गेला.


.............................

आज नुसती गाडी जवळून गेली तर त्याच्या जीवाचा थरकाप उडाला मग त्या माणसाचं काय झालं असेल तेव्हा.....??? आपण इतके नशेत होतो की काय घडलंय ते आठवत देखील नव्हतं त्याला. त्याच्या डोक्यात एकामागून एक विचार येऊन आदळत होते. तो तसाच मागे फिरला आणि त्याने गाडी स्टार्ट केली. अंजुला काही कळलंच नाही अचानक त्याला काय झालं ते... तिने खूपदा विचारल पण तो काहिच बोलला नाही. अबिरने तिला घरी सोडलं. अमेय घराच्या बाहेर तिची वाट बघत उभा होता. त्याने अबिरला थॅंक्यु म्हटलं आणि दोघेही आत गेले. अबिर सुद्धा मग आपल्या घरी गेला.


रात्रीचे दोन वाजत आले. तरी त्याला झोप येईना. सारखा त्याच्या डोळ्यांसमोर त्या जखमी झालेल्या माणसाचा चेहरा येत होता. जसजसा वेळ पुढे सरकत होता तसतशी त्याची बैचैनी वाढत होती. काय करू....?? कोणाशी बोलू....?? निषाद.....!! त्याची एकदम ट्यूब पेटली. त्याने त्याला फोन लावला.


" हॅलो निषाद.......... " अबिरने अधीरतेने बोलायला सुरुवात केली.


" अबिर....... यार... रात्रीचे अडीच वाजलेत........" निषादने डोळे पण उघडले नव्हते इतका तो झोपेत होता.


" निषाद त्या त्या.... माणसाचं काय झालं....?? " अबिर


" कोण माणूस ........ तुला चढलेय... तू झोप..... आपण उद्या बोलू... " निषादने फोन कट केला.


"हॅलो हॅलो....... " अबिर बोलेपर्यंत निषादची समाधी लागली होती.


उद्या काही झालं तरी निषाद कडून त्या माणसाची माहिती काढायचीच असं त्यानं ठरवलं आणि झोपला.

............................


" Good morning dear......... " तिने त्याच्या केसातून हळुवार हात फिरवला तशी त्याला जाग आली.


" good morning sweetheart....... " त्याने देखील अर्धवट मिटल्या डोळ्यांनी पण हसुन तिला विश केलं.


" उठ ना आता..... किती झोपणारेस....?? " तिने विचारलं


" हो उठतो ना..... पण झोपू दे ना थोडा वेळ.... " असं म्हणून त्याने तिचा हात आपल्या डोक्याखाली घेतला. दोन एक मिनिटं अशीच गेली असतील.


" तू .... तू इतकी जाड जाड कशी झालीस.....?? " त्याने तिचा हात चाचपत विचारलं आणि हळूहळू डोळे उघडले. समोर पाहिलं तर आई डोळे बारीक करून त्याच्याकडेच बघत होती. तसा तो दचकुन उठून बसला.


" आई..... आई तू......??? " अमेय


" कोण परी आली होती का माझ्या बाळाच्या स्वप्नात...?? " आईने हसुन त्याच्याडोक्यावरून हात फिरवला


" आ....?? ते...... हो..... म्हणजे नाही...... " तो गडबडला.


" येतील हो सगळ्या स्वीटहार्ट एकदम खाली येतील हा " आईने एका हातात लपवलेली काठी पुढे आणली तसा अमेय घाबरला.


" स्वीटहार्ट काय....?? बोल कोण आहे ती मुलगी बोल..... तरी मला वाटतंच होतं तुझी लक्षणं काही ठीक दिसत नाहीत..... " आईने काठी उगारायला वर केली तसा अमेय पळाला.


" कोण नाही ग.... ते .... ते स्वप्न पडलं मला.... " तो बेडच्या भोवती नाचत होता आणि आई त्याला मारायला धावत होती .


त्यांचा गोंधळ ऐकून अंजु आत आली. दोघांची चाललेली पळापळ बघून तिला हसायला येत होतं.. बाबा बाहेर गेले होते.


" अंजु..... ए तू तरी सांग आईला... मी मी काय लहान आहे का आता मारायला.... " अमेय अंजुच्या मागे जाऊन लपला.


" अग आई काय झालं काय.....?? काय लहान मुलासारखं चाललंय तुमचं.... तू बस बघू इथे... " अंजुने आईला शांत केलं आणि तिला बेडवर बसवलं.


" अंजु याचं लक्ष नसत हल्ली कशात.... सारखा मोबाईलवर असतो बघावं तेव्हा. विचारलं की ऑफिसचे फोन येतात सांगतो... मी आत्ता उठवायला आले तर म्हणतो स्वीटहार्ट....काय चाललंय याचं काही कळत नाही.... " आई त्याच्यामागे धावुन दमली होती.


" तू सांगितलं नाहीस का तिला....?? तुला एक मुलगी आवडते ते.... " अंजु असं म्हणाली आणि अमेय रडकुंडीला आला.. ही असं काय बोलतेय.... माझं काही खरं नाही आज.


" कोण मुलगी......?? " आईने संशयाने विचारलं.


" अग तुझी होणारी सून......" अंजु हसत हसत म्हणाली.


" काय........??? " आई आणि अमेय दोघेही एकदमच ओरडले.


" हो... अग त्याच्या स्वप्नात कोण येतं माहितेय का तुला....?? दिशा पटाणी...." अंजु हसत हसत सांगत होती आणि अमेय कसनुस हसत होता. त्याला काय चाललंय तेच कळेना.


" काय करते ही.....?? " आईने विचारलं


" अग हिरोईन आहे आई ती... ती याला आवडते खूप त्यामुळे दिवसा रात्री तिचीच स्वप्न पडतात त्याला... हो की नाही रे दादा..... " अंजुने डोळे मिचकावले आणि अमेयने फक्त मान डोलावली.


" हमम.... ठीक आहे. पण खरंच तसं काही असेल तर आधी घरात सांगा. उगीच आम्हाला बाहेरून काही कळलं तर तुमची काही खरं नाही. अंजु तू आणि अमेय तू सुद्धा.. कळलं ना. मुलगा आहेस म्हणून तुझ्या सगळ्या गोष्टी अजिबात पोटात घालणार नाही. प्रत्येक आईने आपल्या मुलाला वेळीच शिस्त लावली त्याची संगत कोण आहे याकडे लक्ष दिलं तर मुलींवरचे बरेचसे अत्याचार कमी होतील.... त्यामुळे प्रेम असेल तर सांगा तसं स्पष्ट पण कोणाच्याही भावनांशी खेळायचं नाही... समजलं ना..?? " रागाने काठी टाकून आई तिथून निघुन गेली.


" काय झालंय हिला.....?? अशी का बोलत होती ही आज सकाळी सकाळी....." अमेयने विचारलं." काय झालंय हिला.....?? अशी का बोलत होती ही आज सकाळी सकाळी....." अमेयने विचारलं.


" मला पण नाही माहीत. मी तिला याआधी इतकं चिडलेलं कधीच बघितलं नाहीये.... " अंजु


" तेच ना आज अचानक असं का म्हणाली.... तिला माझ्या नि मीराबद्दल काही कळलं असेल का....?? " त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती.


" नाही. मला नाही वाटत तसं.... काहीतरी दुसरं कारण असावं.... आपण बोलून बघुया तिच्याशी....." अंजु


" मी आवरून येतो... तू हो पुढे.... " बरं म्हणून अंजु बाहेर आली. तर आई डोक्याला हात लावून सोफ्यावर बसली होती.


" आई काय झालं.....?? का एवढी चिडचिड करतेस...
?? " अंजुने तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं.


" अंजु....आई वडील मुलांना एवढं लहानाचं मोठं करतात नि तिचं मुलं जर वाईट वागली तर काय वाटत असेल गं त्या आई वडिलांना.... " आईच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं." आई काय झालंय....?? "


" सकाळी मावशीचा फोन आला होता. त्यांच्या गावात एका मुलीला कोणीतरी मारून फेकून दिलं होतं म्हणे... फार मोठी नव्हती गं.. वीसेक वर्षाची असेल... प्रेग्नंट होती वाटतं ती.... तिला फसवलं गं कोणीतरी... नि गरोदर आहे म्हटल्यावर मारून टाकलं वाटतं तिला....पोलिसांनी एकाला अटक केलेय... ती सांगत होती. गावात पण अशा घटना घडायला लागल्या तर कसं व्हायचं गं.. आधी म्हणायचं शहरात मुली जास्त बाहेर असतात छोटे कपडे घालतात म्हणून असं होतं. मग गावात तर आपलीच माणसं असतात ना सगळी... मग तरी असं का होत असेल अंजु.... " आई रडत होती. एका मुलीसाठी जीची साधी ओळख देखील नव्हती तिच्याशी पण सगळं ऐकूनच तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आता अंजुला जाणवलं की आई सकाळी दादावर इतकी का चिडली ते.


" आई.... शांत हो... आपण शक्य होतील ते सगळे प्रयत्न करतो गं मुलींना स्वतःच्या बचावाचे. पण दरवेळी नाही शक्य होत ते. घडलं हे चुकीचंच होतं.... " अंजु तिच्या पाठीवर थोपटत म्हणाली." अंजु.... आपण शिकली सवरलेली माणसं मुलगा मुलगी भेदभाव करत असतो गं... तिथे अशिक्षित लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार... ?? पण खरं सांगू आपण मुलींना जेवढे नियम घालतो ना रात्रीचं बाहेर जाऊ नको , वेळेत घरी यायचं, कुठे जाणार कोणासोबत जाणार.... हे सगळं विचारतो आणि मुलगे फक्त आई मी बाहेर जातोय गं जेवायला वाट बघू नको इतकं सांगतात नि पळतात. नि आपण पण मुलगा म्हणून लक्ष देत नाही त्यांच्याकडे असं वाटायला लागलंय मला. " आई आज पोटतिडकीने बोलत होती.


" हो आई खरं आहे तुझं. सगळ्यांनीच जर मुलींवरचे नियम अटी थोडे कमी करून मुलांना योग्य नियम घातले ना तर काहीतरी सुधारणा होऊ शकेल.... आता तू जास्त विचार करत राहू नको या गोष्टीचा... चल उठ मी करते नाश्त्याच....." अंजु आईला उठवत म्हणाली.


" काही गरज नाही... नाश्ता तयार आहे.... हे बघा मला जमतील तसे पोहे केलेत मी... आईच्या हातांची चव नाही मला पण आज घ्या गोड मानून.... " अमेयने दोघींच्या हातात पोह्यांची डिश दिली. ते बघुन आईच्या चेहऱ्यावर एक छान स्माईल आली.


मगाशी अंजु आणि आई बोलत असतानाच अमेय गपचूप किचन मध्ये गेला आणि त्याने नाश्त्याची तयारी केली होती.
खाऊन दोघेही आपलं आवरायला पळाले. पण दोघांच्याही डोक्यात आईचं बोलणं घुमत होतं. रोजचं ऑफिस रोजचं काम यापलिकडे बाकी जग हे हल्ली उरलंच नाहीये आपल्याला असं त्यांना वाटलं. अमेयने मनाशी काहीतरी ठरवलं आणि तो घराच्या बाहेर पडला...


क्रमशः......

🎭 Series Post

View all