तू तर चाफेकळी - भाग 25

Love Story


तू तर चाफेकळी - भाग 25

लॉनच्या एका टोकाला उभं राहून एक व्यक्ती अबिरच्या हालचाली टिपत होती. तो काय करतो , कोणाशी बोलतो , कसा वागतो. याकडे त्या व्यक्तीच चांगलंच लक्ष होत. त्या व्यक्तीला बघून पार्टीमधून कोणीतरी बाहेर आलं.


" तू....?? तू इथे कसा....?? " पार्टीमधून बाहेर आलेल्या व्यक्तीने त्याला विचारलं.


" आलो सहजच. काय चाललंय बघायला हवं ना .... " त्या व्यक्तीने एक नजर सर्वत्र फिरवली.


" सगळं नीट सुरू आहे... आपण आजच पार्टीत सगळं अनाऊन्स करूया का....?? " दुसऱ्याने उत्साहाने विचारलं.


" नाही. अजून ती वेळ आलेली नाही. अजून खूप गोष्टी बाकी आहेत... "


थोडा वेळ बोलून ती व्यक्ती लॉनच्या जवळच असणाऱ्या एका हॉटेलकडे निघून गेली. तशी त्यांना भेटायला गेलेली व्यक्ती देखील परत आली. गेम तर चांगलाच रंगला होता. सगळ्यांच्या टाळ्या , शिट्यानी आसमंत बहरला होता. आता यशचा नंबर आला. जेवढा तो भन्नाट होता तेवढाच त्याला टास्क देखील भन्नाट आला होता. त्याला पाच बेडूक उड्या माराव्या लागणार होत्या. पण काही आढेवेढे न घेता यशने पटापट उड्या मारल्या. पुन्हा एकदा शाळेत गेल्यासारखं वाटत होतं सगळ्यांना. आजच्या गेमच्या निमित्ताने का होईना. लहानपणी केलेल्या गमती जमती आठवायला लागल्या.


मध्ये एक दोन मेम्बर झाले आणि मग अंजलीचं नाव घेतलं गेलं. अंजुसाठी टास्क देखील तितकंच छान होतं. तिला सगळ्यांना डान्स करून दाखवायचा होता. तिथल्या आयोजकांना काहीतरी सांगून ती स्टेजच्या मागे गेली आणि थोड्याच वेळात परत आली. मोकळे सोडलेले केस बांधले गेले.. सोडलेला पदर नीट खोचून ती एका स्टेप मध्ये उभी राहिली. ती परत येईपर्यंत स्टेजवर काळोख होता. हळूहळू गाण्याचे बोल ऐकू येऊ लागले. तसा तिच्या आजूबाजूला प्रकाश फुलू लागला. केशरी... पिवळ्या रंगांची उधळण सुरू झाली... खाली बसून अंजु एकेक मुद्रा करत होती.

रघुकुल रीत सदा चली आई.....
प्राण जाए पर वचन ना जाईए......


हळूहळू ती उठून उभी राहिली आणि गाणं मोठ्या आवाजात वाजू लागलं.


रघुवर तेरे राह निहारे......
रघुवर तेरे राह निहारे......
सातो जनम से सिया.......
घर मोरे परदेसीया.... आओ पधारो पिया.......

अंजुच्या एकेक नृत्य अदा सगळ्यांना भुरळ पाडत होत्या. आणि अबिर.... त्याची तर आज नजरच हटत नव्हती तिच्यावरून. तिचे हातवारे.... गोल गोल गिरक्या मारत तिने रेखाटलेले जणू चित्रच वाटतं होते तिचे नृत्य म्हणजे...!!! थोड्या वेळाने गाणं संपलं आणि टाळ्यांचा गजर झाला.


ती स्टेजवरून खाली आली तरी अबिर अजूनही तिच्याकडेच बघत होता.


" हॅलो..... काय लक्ष कुठाय....?? " तिने त्याच्यासमोर चुटकी वाजवली. तरी त्याचं लक्ष नाही. शेवटी कोणाचं लक्ष नाही बघुन तिने त्याला जोरात चिमटा काढला.


" आ.... आ....... केवढ्याने..... " तो कळवळला.


" मग काय लक्ष कुठे होतं.....?? कधीची हाक मारतेय....." तिने विचारलं


" तुझ्याकडेच.....!!! "


" काय.......?? "


" काही नाही......"


थोडा वेळ अशीच मजा मस्ती चालू राहिली. मग सगळे जेवायला गेले. दाल माखनी... जिरा राईस... व्हेज कढाई... रोटी असा पंजाबी स्टॉल एका बाजूला आणि एका बाजूला हक्का नूडल्स... मंचाव सूप...व्हेज मंचुरियन.... असा छान चायनीज बेत होता. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या आवडी नुसार खाण्याच्या टेबलकडे वळला.


काही वेळाने पार्टी संपली. सगळे घरी जायला निघाले.


" चल मी सोडतो तुला...." अबिर अंजु जवळ येत म्हणाला.


तेवढ्यात तिथे काव्या आली.

" अबिर... प्लिज तू मला घरी सोडशील....?? मी माझी कार नाही आणलेय....." काव्या त्याच्या जवळ सरकत म्हणाली.


" काव्या माझ्याकडे पण गाडी नाहीये..... " तिने पकडलेला त्याचा हात त्याने अलगद सोडवला आणि तिला बाजूला केलं. अंजुला तिचा फार राग येत होता.


" मग हिला कसं सोडणार होतास तू.....?? " काव्या जरा रागावली.


" मी बाईक वरून नेणार होतो तिला...... " त्याने समोर असलेल्या पार्किंग मध्ये बोट दाखवत म्हटलं.


" whatt..... ही असली चिप बाईक कधीपासून चालवायला लागलास तू.... " काव्याने तोंड वेडावल. अंजु त्यांचं बोलणं ऐकत शांतपणे उभी होती.


" ते असंच..... आता ऑफिसला जायला लागते... " तो म्हणाला.


" इवव..... तू कधीपासून असल्या भंगार गोष्टी वापरायला लागलास... तुझी पूर्ण लाईफ स्टाईलच चेंज झालेय या चिप लोकांसोबत राहून..... " शेवटचं वाक्य ती अंजूकडे नजर फिरवत म्हणाली.


" काव्या.... काय बोलतेस तू... मी मला हवं तसं वागायला मोकळा आहे कळलं तुला. नि तू प्लिज माझं डोकं खाऊ नको. जा इकडून..... " त्याचाही स्वर आता चढला होता.


" तू मला.... मला जायला सांगतोयस....?? अबिर अरे काय झालंय तुला...?? असा का वागतोस तू....?? " काव्या


" मला काहीही झालेलं नाही काव्या..... " अबिर स्वतःला शांत ठेवत म्हणाला. ते बोलत असतानाच निषाद आला.


" Hey guys... What happens.....?? " निषाद


" निषाद तू काव्याला घरी सोडशील प्लिज....?? " अबिरने सांगितलं.


" इई.... याच्यासोबत नो वे..…. " काव्या


" इतकीही वाईट गाडी चालवत नाही मी...... " निषाद हसला.


" बाय अबिर...... " त्याला बाय करून काव्या बाहेर येऊन उभी राहिली. पाठोपाठ निषाद देखील गेला. त्याने गाडी पार्किंग मधून बाहेर काढली आणि काव्याच्या समोर उभी केली. नाईलाजाने का होईना पण काव्या गाडीत बसली.


" चल आपण निघायचं का....?? खूप उशीर झालाय....?? " अबिर


" झालं होय तुमचं...?? मला वाटलं अजून कोणी येतेय की काय लिफ्ट मागायला...." अंजु रागात म्हणाली.


" आता नाही येणार कोणी..... थांब मी बाईक घेऊन येतो.... " असं म्हणुन अबिरने पार्किंग मधून त्याची बाईक आणली.


" बसा अंजली मॅडम...... " तो हसुन म्हणाला.


पण साडीमुळे तिला पाठीमागे नीट बसता येईना. त्यामुळे आधारासाठी तिने पटकन त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तसं त्याला वेगळंच वाटलं. ती सावरून बसली.

" निघायचं का.....?? " ती फक्त हम्म म्हणाली.

रात्रीचे साडेअकरा वाजून गेले होते. काळोख्या वातावरणात हलणारी झाडं झुडूप अजूनच भर घालत होती. वाऱ्याची थंडगार झुळूक अंगावर शहारा आणत होती. एवढ्या रात्री ती अशी पहिल्यांदाच बाईक वरून जात होती. त्यामुळे गार वारा अंगाला चांगलाच झोंबत होता. तिने त्याच्या खांद्याला घट्ट पकडलं. हळुहळु पुढे जाऊ लागले तसा रस्ता ओला दिसत होता. नुकताच पाऊस थोडासा शिंतडला होता. असं वाटत होतं. वाटेतच एका ठिकाणी चहाची टपरी दिसली. तेव्हा त्याने गाडी थांबवली. ती चांगलीच गारठली होती.


" चहा.....??? "

ती फक्त मानेनेच हो म्हणाली. तिला तिथेच थांबवून तो रस्त्याच्या पलीकडे चहा आणायला जाऊ लागला. तसा मागच्या वर्षी घडलेला प्रसंग त्याच्या नजरेसमोर आला. सर्रकन त्याच्या अंगावर काटाच आला...


क्रमशः...

वाचक मित्रांनो.. खूप खूप सॉरी. पण आता तुम्ही समजून जा की भाग पोस्ट यायला उशीर झाला की तुम्हाला 2 पार्टस सलग वाचायला मिळतील. आणि हो सध्या खूप कथा सुरू आहेत त्यामुळे फेसबुक वरती भाग पोस्ट व्हायला वेळ जातो तर तुम्ही अँप वरती किंवा साईट वरती माझं किंवा कथेचं नाव टाकून कथा सर्च करू शकता. म्हणजे भाग पोस्ट झालेत की नाही ते तुम्हाला कळेल नि लवकर वाचता देखील येतील.