तू तर चाफेकळी - भाग 28

Love Story

मागील भागांची लिंक... आत्तापर्यंतचे सर्व भाग इथे वाचायला मिळतील. 

https://www.irablogging.com/search?search=Sayali+vivek

तू तर चाफेकळी - भाग 28



आई का अस्वस्थ होती ते अंजु आणि अबिर दोघांनाही जाणवलं. चारच दिवसांनी रक्षाबंधन होतं. त्यामुळे अंजुला आणि पर्यायाने आईला काहीतरी सरप्राईज द्यायचं असं अमेयने ठरवलं आणि तो कामाला लागला. अंजु आपलं आवरून ऑफिसला गेली. आता नवीन प्रोजेक्ट सुरू होणार होतं त्यामुळे कंपनीला चांगलाच प्रॉफिट मिळणार होता. पण त्या आधी त्यावर काम करणं ही तितकंच आवश्यक होतं. अंजु ऑफिसला पोहोचली तोच तिला सगळ्यांचा घोळका झालेला दिसला.


" आता काय नवीन झालं असेल....? " असा विचार करत ती आत शिरली. तीने पाहिलं तर त्यांच्या ऑफिसला काव्या आली होती.


" सो गाईज.... मिस काव्या आजपासून आपल्या कंपनीसोबत काम करणार आहेत. ही समोरची केबिन त्यांची असेल... " मॅनेजर सर बोलत होते.


तिच्याकडे बघून सगळ्यांचीच तोंड वाकडी झाली होती. पण करणार काय..कितीतरी दिवसांनी कंपनीला कोणतं तरी मोठं प्रोजेक्ट मिळालं होतं त्यामुळे पर्यायाने काव्याला मदत करणं भागच होतं. सगळ्यांनी सरांसमोर तोंड देखल्या तिला हाय हॅलो केलं. ती मग आपल्या केबिनमध्ये गेली आणि मॅनेजर सर देखील आपल्या केबिनकडे गेले.


" ही कशाला आलेय इथे....?? " सीमा बोलली


" अग त्यांच्या कंपनीला पण प्रोजेक्ट मिळालं आहे ना... दोघांनी मिळून करायचं आहे.. " अंजु आपल्या जागेवर बसली.



" हो ना मग दुसरं कोण का आलं नाही इकडे....?? हीच कशाला आली...?? पार्टीमध्ये कशी वागत होती बघितलंस ना...?? " मिताली



" नाहीतर काय.... मला तर डोक्यातच गेली होती. अबिरच्या जागी मी असतो तर तिथेच एक ठेवून दिली असती.... " यश


" जाऊदे आपल्याला काय करायचंय.... आपण आपलं काम करायचं.... " अंजु म्हणाली आणि सगळेच आपापल्या कामाला लागले.



थोड्या वेळाने काव्याने प्रोजेक्ट टीम मध्ये असणाऱ्यांना बोलावून घेतलं आणि काम समजावुन दिली. त्यामध्ये अंजली आणि अबिर सुद्धा होते. बोलून झाल्यावर काव्याने सगळ्यांना बाहेर पाठवलं. अबिरला मात्र तिने थांबवलं. अंजुने जाता जाता मागे वळुन अबिरकडे पाहिलं पण तो शांत होता. अंजु बाहेर गेली तशी काव्या आपल्या खुर्चीवरून उठली आणि अबीरजवळ आली. तो हातातली फाईल चाळण्यात बिझी होता.



" सोड ना अबिर किती कामाचं बघतोस तू...." तिने त्याचा हात आपल्या हातात घेत म्हटलं पण त्याने हात बाजूला करत सोडवून घेतला.



" काव्या तू प्रोजेक्टच्या टर्म्स आणि कंडिशन नीट वाचल्यास ना...?? नाहीतर पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो.." तो फाईल मधुन डोकं वर न काढता म्हणाला.



" अबिर .... आता आपण रोज भेटू शकतो. मला इकडे यायला मिळालं हे खूप बरं झालं ना...? " तिने त्याच्या हातातली फाईल काढुन घेतली आणि टेबलवर ठेवली. त्याच्या गळ्यात हात टाकले.



" काव्या हे ऑफिस आहे...... " तो ओरडला आणि त्याने तिचे हात बाजूला केले.


" असू दे.... हे माझं केबिन आहे. इथे कोण येणारे बघायला.... " ती पुन्हा त्याच्या जवळ जाऊ लागली..


" तुझं काही काम असेल तेव्हाच बोलव मला..... " त्याने हातातली फाईल तिच्या टेबलवर ठेवली आणि तो बाहेर गेला.


काव्या मात्र मनात चरफडली...\" किती दिवस असा लांब पळशील माझ्यापासून.... कधी ना कधी माझ्या जवळ येशीलच..... \" ती स्वतःशीच हसली.


.....................................

अंजु घरी आली पण तिचा मुड नव्हता. एकतर काम खूप जास्त होतं त्यात आजपासून काव्या पण ऑफिसला यायला लागली होती. तिचा उतरलेला चेहरा बघून बाबांना राहवलं नाही. त्यांनी विचारलंच


" अंजु... बाळा बरी आहेस ना...?? " त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.


" हो.... जरा ऑफिसला काम होतं जास्त..... " तिने सोफ्यावर मान टेकवली.



" धर पाणी घे.. चहा करु का मस्त.....?? " आईने पाण्याचा ग्लास पुढे करत विचारलं.



" हो... गरज आहे. " ती मग आवरायला आत खोलीत निघुन गेली.


थोड्या वेळाने अंजु खाली हॉलमध्ये आली. आईने मस्त आल्याचा चहा करून दिला. चहाचा एक घोट घेतला आणि तिला बरं वाटलं. तोपर्यंत अमेयदेखील ऑफिसमधून आला.



" काय चहाचा वास येतोय बाहेर पर्यंत.... मी फक्त वासावर धावत आलो गेटपासून.... " अमेय आत येत म्हणाला.



" गप रे.... मस्करी करतोस काय माझी...?? " आई


" अग नाही. खरंच...... मला पण दे ना अर्धा कप... मी आलोच फ्रेश होऊन.... " जाता जाता अंजुच्या डोक्यात मात्र टपली मारून गेला.



तो आवरून आला तरी अंजु किती वेळ तशीच बसून होती.

" जा मला जरा चहा दे..... उठ आळशी..... " अमेयने तिला डिवचल.


" चहा केलेला आहे जा गरम करून घे. मी देणार नाही..... " अंजु शांतच



" तू दिलास तर काय फुकट जाईल का..... ? दे गप.... " अमेय


आई आणि बाबा लांबून त्यांची गंमत बघत होते..


" आई बघ ग कसा ओर्डर सोडतोय मला..... बायकोला सांग तुझ्या चहा द्यायला मी नाही देणार.... " अंजुने गाल फुगवले.


" ती आली की ती देईलच. तोपर्यंत तू दे... मग कोण विचारणारे तुला... तुझं लग्न करून द्यायचं मग यायचं नाही इकडे अजिबात...... " अमेय



" आई........... " अंजु लहान मुलांसारखी ओरडली. " बघ ना कसा छळतोय मला. कुठून उचलून आणलं याला..... " अंजु



" मला नाही... तुलाच उचलून आणलंय...." त्याने वेडावलं. तशी अंजु त्याच्या मागे पळाली.. बराच वेळ दोघांची मस्ती सुरू होती.. मग त्यानंतर बिचाऱ्या अमेयच्या पोटात चहा गेला.....


.................................

अबिर घरी आला. पण तरीही त्याच्या डोक्यात मागे झालेल्या अक्सिडेंटबद्दल विचार घोळत होते. त्याने निषादला फोन केला.


" काय करतोयस निषा.......?? " त्याने सहज फोन करावा तसं विचारलं


" आज एकदम निषा...?? ते पण इतक्या दिवसांनी...? कुठे उगवला चंद्र काय माहीत.... " निषाद बोललाच



" गप रे... ते सगळं जाऊ दे. मला सांग मागे आपण कॉलेजला असताना त्या पार्टीच्या वेळी अक्सिडेंट झाला आठवतंय ना.." अबिर



" हो त्याचं काय...?? मधेच कुठे आठवलं तुला....?? " निषाद



" मधेच नाही रे.. खूप दिवस डोक्यात तोच विचार आहे. मला सांग जो माणूस गाडीखाली आला होता तो कसा आहे...?? कुठे राहतो...?? मला भेटायचंय त्यांना..." अबिर




" अबिर , अक्सिडेंट झाला त्यावेळी त्या माणसाला खूप मार लागला होता आणि तू पूर्ण दारूच्या नशेत.... मी त्याला कसबस हॉस्पिटलमध्ये नेलं. पण दोनच दिवसांनी तो गेला... त्याची बायको होती सोबत.... " निषाद



" काय........??? " अबिर जवळजवळ ओरडलाच. " अरे पण असं कसं झालं... तू .... तू काहीच बोलला नाहीस मला.....?? " आयुष्यात पहिल्यांदा अबिर हे ऐकून घाबरला होता.



" कारण त्या नंतर तू अमेरिकेत निघून गेलास...? कधी सांगणार होतो तुला मी..? त्याची बायको तुझ्या नावाने रोज शिव्या शाप देत असते...." निषाद नाईलाजाने म्हणाला



" Ohhh god.... Nishad am so sorry ... यार हे ... हे असं काही होईल असं मला वाटलंच नव्हतं.... निषाद मला त्यांना भेटायचंय रे.... त्यांना सॉरी म्हणायचंय....प्लिज आपण जाऊया ना..." अबिर कळवळून म्हणाला.


" आता बोलून काही उपयोग आहे का...?? ती बाई तुला दारात सुद्धा उभं करणार नाही... अबिर अरे तुला माहितेय तू तिचं कधी न भरून येणारं नुकसान केलं आहेस..." निषाद रागावला



" निषाद यार प्लिज... मला एकदा घेऊन चल ना.. मला माही मागायची आहे त्यांची.... प्लिज I insist...." अबिर



" हो बघू.....तुला बघुन त्या कशा रिऍक्ट होतील मला माहित नाही.... "



" मी... मी बोलेन त्यांच्याशी....... " थोडा वेळ बोलून त्याने फोन ठेवून दिला.


अबिरचं डोकं सुन्न झालं होतं. इतकं काही होईल असा कधी विचारही त्याने केला नव्हता...दोन दिवसांनी निषाद आणि तो एका वस्तीजवळ पोहोचले. लागून लागून प्रत्येकाची घरं होती. त्यामुळे मध्यें जायला छोटी वाट.. तिथेच वाळत टाकलेले कपडे... काठ्या आडव्या झालेल्या... घरांची छपरं खाली आलेली.... कोणी दात घासतंय तर कोंणी भांडी कपडे करत होतं... अबिरला या सगळ्याची अजिबात सवय नव्हती. त्यामुळे तो जरा बिचकतच पावलं टाकत होता. थोड्या चढवावर अजून काही खोल्या होत्या.. त्यातल्याच एका खोलीत त्या अक्सिडेंट झालेल्या व्यक्तीची बायको राहत होती..निषादने बोटानेच अबिरला त्यांची खोली दाखवली.. निषाद पुढे जाऊ लागला... तोच अबिरला त्या खोलीतून बाहेर येणारा राकेश दिसला. तसा तो एका बाजूला लपला.... हा इथे कसा....??? अबिरला आश्चर्य वाटलं....!!


क्रमशः.......


भाग अर्धा लिहून झाला होता.. परंतु त्यानंतर भाग पूर्ण करायला वेळ मिळाला नाही. सध्या फार धावपळ सुरू आहे त्यामुळे कथा सुचायला थोडा वेळ जातोय.. दिवाळीपासून भाग रेग्युलर पोस्ट होतील. अजून 8/10 दिवस तरी भाग जमतील तसे पोस्ट होतील. दिरंगाई साठी क्षमस्व.

https://www.irablogging.com/search?search=Sayali+vivekhttps://www.irablogging.com/search?search=Sayali+vivekhttps://www.irablogging.com/search?search=Sayali+vivek

🎭 Series Post

View all