तू तर चाफेकळी - भाग 12

Love Story

तू तर चाफेकळी - भाग 12

अबिरचं फोनवरच बोलणं अंजुने ऐकलं. पण तिने तसं दाखवलं नाही. तो कॅफेटेरियात असल्याने अंजु परत आलेली त्याने पाहिली नाही. तिने आपल्या टेबलवरची पाण्याची बाटली उचलली आणि ती राकेश सोबत निघुन गेली. अबिर कितीतरी वेळ तसाच बसुन होता.एकतर काल रात्री मुंबईतून आल्याने नीट त्याची झोप देखील झाली नव्हती. जागरणाने त्याचे डोळे मिटायला लागले. ऑफिसमध्ये कोणीच नव्हतं. हाफ डे असल्याने सगळे घरी पळाले होते. त्याला तिथे बसल्या बसल्याच झोप यायला लागली. त्याने समोरच्या टेबलवर डोकं ठेवलं आणि डोळे मिटले. त्याला कधी झोप लागली ते त्याच त्यालाच कळलं नाही.

.......................................

अंजु राकेशसोबत बाहेर आली खरी पण तिचं कशातच लक्ष नव्हतं. ऑफिसजवळच्याच एका कॉफी शॉप मध्ये राकेश तिला घेऊन गेला. तुरळक गर्दी होती. हॉटेलच्या एका बाजूच्या टेबलवर ते दोघे येऊन बसले. अंजु नुसतीच इकडे तिकडे बघत होती. राकेश मात्र खुश होता. अंजु त्याचयासोबत आलेय यावर त्याचा विश्वासच बसेना. इतक्यात वेटर आला.


" सर ऑर्डर..... " वेटरने कागद पेन सरसावले.


" अंजली , काय घेणार तू....?? " तरी तीच लक्षच नाही.


" अंजु........ " त्याने पुन्हा हाक मारली.


" आ.....?? काय.....? " तिला काहीच कळेना


" काय घेणार तू.....?? " राकेश


" एक कॅपचिनो...... " अंजु


" एक कॅपचिनो... एक कोल्ड कॉफी..... " राकेशने वेटरला सांगितलं.


" अंजु... तुला काही खायला हवंय....?? " तिने नकारार्थी मान हलवली.


" ok thank you...... " राकेश म्हणाला तसं वेटर निघुन गेला.


"अंजु.... मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. " त्याने हात एकमेकांत गुंफले.


" हा... बोल..... " तिची नजर दुसरीकडेच होती.


" अंजु..... मला तुला सांगायचं होत की......" त्याच वाक्य पुर्ण व्हायच्या आतच वेटरने कॉफी आणुन ठेवली.


" सर कॉफी....... " राकेश त्याच्याकडे बघुन कसनुस हसला आणि वेटर निघुन गेला.


" अंजु.... कॉफी घे ना..... " राकेश


" अं.... हो..... बोल ना काय बोलायचंय तुला...? " तिने कॉफीचा एक घोट घेतला नि तिला जरा बरं वाटलं.


" अंजु.... तुला आठवतंय तू पहिल्यांदा ऑफिसला आलीस तेव्हा रस्ता चुकली होतीस. वाटेत मी भेटलो तेव्हा तू आपल्या ऑफिसचा पत्ता मलाच विचारलास.... " राकेश


" हो ना...म्हणुन तर त्या दिवशी वेळेत आले मी. नाहीतर पहिल्याच दिवशी उशीर झाला असता मला... " अंजूचे ओठ रुंदावले.


" आपली मैत्री पण किती छान झालेय ना. मध्ये बाबा आजारी होते तेव्हा तू किती धावपळ केली होतीस. मी रजेवर असताना माझं सगळं काम पण तुला करावं लागलं होतं.. " राकेश" मग आज काय आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे का...?? " ती किंचित हसली.


" तसं नाही. पण यामुळेच आपण एकमेकांना बऱ्यापैकी ओळखतो..... हो ना.... " राकेश


" हमम........ " कॉफीचे घोट घेत ती इतकंच पुटपुटली.


" म्हणुनच मला तुला सांगायचं होतं की............. " त्याचं बोलणं अर्धवटच राहील. इतक्यात अंजुचा फोन वाजला." राकेश , मी आलेच हा. आईचा फोन आहे.... " असं म्हणुन ती बाजुला गेली.राकेश शांतपणे तिला न्याहाळत कॉफी घेत होता. 2 मिनिटात फोनवरच बोलणं संपवुन ती परत आली." सॉरी राकेश... पण मला निघायला हवं..." अंजुने मोबाईल पर्स मध्ये टाकला." काही सिरीयस आहे का....?? मी येऊ का तुझ्या सोबत....? " त्याने काळजीने विचारलं." अरे नाही नाही. आई बाबा दोघे पण बाहेर जातायत. त्यांना यायला उशीर होईल. माझ्याकडे चावी पण नाही घराची. सो मला बोलावलंय लवकर. चल मी पळते हा. थँक्स फॉर कॉफी.... " ती पळतच तिथुन बाहेर पडली." अंजु.... आज मी तुला भावना सांगू शकलो नाही. पण मी तुझ्यासाठी नक्की काहीतरी स्पेशल प्लॅन करेन आणि तुला लग्नासाठी विचारेन. मला खात्री आहे तू नाही म्हणणार नाहीस.... " राकेश मनातच बोलत उठला. वेटरने आणुन दिलेलं बिल त्याने पे केलं आणि तो तिथुन निघून गेला.


.........................................


साधारण रात्री आठच्या दरम्यान अबिरला जाग आली. तो अजुनही ऑफिसच्या कॅफेटेरियामध्ये झोपला होता. त्याने आजूबाजूला पाहिलं तर मिट्ट काळोख. त्याने मग मोबाईल चाचपला आणि त्याची बॅटरी सुरू केली. दोन मिनिटं आपण कुठे आहोत हेच त्याला लक्षात येत नव्हतं. तसाच उठुन तो बाहेर आला. डेस्क बघुन त्याला आपण ऑफिसमध्ये अडकल्याच लक्षात आलं. मोबाईलच्या उजेडातच तो आपल्या डेस्कजवळ पोहोचला. खाली ठेवलेली आपली बॅग , डबा , बॉटल त्याने घेतली. मग तो फ्रेश व्हायला वॉशरूम कडे वळला. बाहेर जाणार तोच त्याला मधल्या पॅसेंजच्या खिडकीतून दोन तीन माणसं उभी असलेली दिसली. एक व्यक्ती पाठमोरी होती आणि इतर दोघांच्या चेहऱ्यावर मास्क लावलेले होते. प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या दरवाज्याजवळ ते उभे होते. ऑफिस आणि प्रोडक्शन रूमकडे जाणारा दरवाजा लॉक केला होता. त्यामुळे त्याला ती माणसं कोण आहेत ते नीट कळत नव्हतं. त्याने पाहिलं तर मास्क लावलेल्या माणसांपैकी एकाने पाठमोऱ्या व्यक्तीच्या हातात पैशाचं पुडक दिल त्यांच्या हातवाऱ्यांवरून ते धमकी देत आहेत असं त्याला वाटलं. थोड्या वेळाने ती तिन्ही माणसं निघुन गेली. अबिरच्या डोक्यात विचाराचं वादळ उठल होतं. नक्कीच कंपनीमध्ये काहीतरी चालू आहे. लवकरात लवकर या गोष्टींचा शोध लावायला हवा. काहीतरी मनाशी ठरवून तो पुन्हा आपल्या डेस्कजवळ आला. बॅग खाली ठेवली आणि पीसी सुरू केला. मेहता कंपनीचे सगळे डिटेल्स त्याच्याकडेच तर होते. त्यामुळे त्याला कोणतीही रिस्क नको होती. त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत होतं. थोडा वेळ पीसीवरती काम करून त्याने तो बंद केला आणि तो घरी जायला उठला. तो मेन दरवाज्यापाशी आला तर डोअर बाहेरून बंद होतं. त्याने हाका मारल्या. पण सिक्युरिटीवाला खूप लांब होता. त्याला काही त्या ऐकू जाण्यातल्या नव्हत्या.


" आपण असे कसे झोपलो यार इथे...... ?? आता ऑफिस पण बंद करून गेलेत...शीट..... " स्वतःलाच कोसत तो तिथेच उभा राहिला. थोड्या वेळाने त्याची ट्यूब पेटली तसा त्याने कोणालातरी फोन केला.


" हॅलो.... हा काका... मी अबिर बोलतोय. मी इथे आज ऑफिसमध्ये अडकलोय. प्लिज तुम्ही याल का.. ?? " अबिर" हो येतो दहा मिनिटात....." पलीकडून फोन कट झाला.


थोड्याच वेळात त्याला गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. काकांनी लॉक उघडुन त्याला बाहेर घेतलं आणि ते निघाले.

...................................

अंजु घरी आली आणि आई बाबा तिला सांगून बाहेर गेले. आज ती खरंच वैतागली होती. काम तर होतच शिवाय अबिरच असं तुटक वागणं तिला लागलं. थोडा वेळ ती तशीच सोफ्यावर बसुन होती. तिला अबिरच वागणच कळेनासं झालं होतं. कालपर्यंत तर माझी मस्करी करत होता आज असा रुडली का बोलला असेल...?? आपणही काही कमी त्रास नाही दिला त्याला. तिला तिचेच एकेक उद्योग आठवुन हसायला आलं. थोडा वेळ गेला असेल तोच बेल वाजली. तिने जाऊन दार उघडलं. तर समोर अमेय.


" तू..... ? तू कसा काय लवकर आलास आज...?? " तोंड वेडावत ती म्हणाली.


" मला आत तरी येऊ दे. मग सांगतो हा म्हशे. सरक . जाडी झालेय नुसती. जागा पण नाही आत यायला... " हेल्मेट काढतच तो आत आला." तू रेडा. दादा यार डोकं नको खाऊ. ऑलरेडी बोअर झालंय खूप...... " ती सोफ्यावर येऊन बसली.


" पाणी तरी दे जरा " त्याने आपली बॅग काढुन समोर टेबलवर ठेवली. तिने त्याला पाणी आणुन दिलं.


" काय झालं.....?? काम खूप होतं का आज....?? " पाण्याचे घोट घेत घेत त्याने विचारलं.


" Nothing... कंटाळा आलाय जाम.... आत्ताच आले मी. अर्धा तास झाला असेल फारतर... " तिचं तोंड एवढुस झालं." जा. फ्रेश होऊन ये बर वाटेल. जा उठ... "


" नको ना........."


" अजिबात नाही. उठ जा.. आणि आवरून ये खाली.." त्याने तिला जवळजवळ उठवलं आणि खोलीत पाठवलं.


थोड्या वेळात ती फ्रेश होऊन खाली आली. तीने पाहिलं तर अमेय किचन मध्ये काहीतरी करत होता. ती आवाज न करता हळूहळू पावलं टाकत त्याच्या मागे जाऊन उभी राहिली. ओट्यावर सगळा पसारा मांडलेला होता. एका बाजूला टोमॅटो , कांदा गोल कापुन ठेवलेले... दुसरीकडे ब्रेड काढून ठेऊन त्याची पिशवी तशीच टाकलेली... एकीकडे बटर काढुन ठेवलेलं... तो मजेत काकडीचे स्लाईस करत होता...

" अंजु..... आपल्यासाठीच चाललंय. मदत करायला आलीस तर बरं होईल.... " त्याने म्हटलं


" आता काय पाठीमागे पण डोळे लावुन घेतले आहेस का...?? " अंजु आश्चर्याने म्हणाली.


" त्याच काय आहे ना... घरच्या बोक्याची पावलं लगेच ओळखता येतात. त्यासाठी मागे डोळ्यांची गरज नाही... " तो तिच्याकडे वळला.


" दादा...... " तिने गाल फुगवले.


" चल चल नखरे करू नको आता. फ्रिजमधलं चीज दे काढुन.... " तो पुन्हा आपल्या कामाला लागला. तिने चीज काढुन त्याच्यासमोर ठेवलं." हमम... आता बघ शेफ अमेयच्या हातचं वर्ल्ड फेमस चीज सँडविच..... " त्याने आपली कॉलर ताठ केली.


" हो का.... कर कर. मी बसते तोपर्यंत टीव्ही बघत...." अंजु जायला वळली.


" ए गप उभी रहा इथे. झालं की गरम गरम देतो माझ्या पिल्लूला..... " तो हसला.


तिला पण गंमत वाटली. दोघांनी मग मजा मस्ती करत सँडविच केलं. सॉस त्यावरून मस्त चीज.... सगळं तयार करून दोघेही टीव्ही समोर येऊन बसले. अमेयने मस्त दोघांच्या आवडीची मुव्ही लावली. सँडविच खाता खाता दोघेही तल्लीन होऊन मुव्ही बघत होते. त्यात वेळ कसा गेला कळलंच नाही. नऊ वाजता आई बाबा आले. बाबांनी बाहेरूनच येताना जेवणाचं पार्सल आणलं होतं. पण या दोघांची सँडविच खाऊनच पोटं भरली होती. आई आत किचनमध्ये गेली ती ओरडतच बाहेर आली.

" किती पसारा घातलेला ओट्यावर......" आईचा आवाज ऐकून दोघांनीही आधी टीव्ही बंद केला. त्यांना आता कुठे तोंड लपवू असं झालं होतं.


" अमेय , अंजु.....उठा आधी.. मी आवरून खाली यायच्या आत ओट्यावरचा पसारा आवरायचा नाहीतर तुमची काही धडगत नाही.... " आईचा रुद्रावतार बघुन दोघेही किचनमध्ये पळाले.

.........................................

ऑफिसमधून काकांनी अबिरला फ्लॅटवर सोडलं. त्याची झोप आता चांगलीच उडाली होती. आल्यावर तो फ्रेश झाला. दुपारचं काहीच शिल्लक नव्हतं. त्याला सपाटून भूक लागली होती. त्यामुळे त्याने ऑनलाइन पिझ्झा ऑर्डर केला. घरात बऱ्यापैकी पसारा झाला होता. त्याने ते सगळं आवरलं. साठलेले कपडे धुवायला टाकले. तोपर्यंत त्याचा पिझ्झा आला. पोटभर खाऊन झाल्यावर त्याला जरा बरं वाटलं. रात्रीचे अकरा वाजले होते. तो बेडवर आडवा झाला. मगाशी ऑफिसमध्ये त्याने जे काही पाहिलं होतं ते त्याला अंजुला सांगणं गरजेचं वाटू लागलं. तिला मेसेज करण्यासाठी त्याने मोबाईल हातात घेतला. अंजु देखील नुकतीच येऊन झोपली होती. झोपूनच ती तिच्या आवडीचं पुस्तक वाचत होती. इतक्यात मेसेजची टोन वाजली. तिने पाहिलं तर अबिरचा मेसेज.

\" तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे \"

अंजुने मेसेज बघितला. पण सकाळचं त्याचं वागणं आठवलं नि तिने त्याच्या मेसेजकडे दुर्लक्ष केलं. अबिर मात्र तसाच तिच्या मेसेजची वाट बघत राहिला...


क्रमशः.....

सॉरी सॉरी भाग टाकायला खूपच उशीर झालाय. पण रागावू नका हा. तुमच्यासाठी म्हणुन भाग मोठा लिहिला आहे. दुसरा भाग देखील लगेच पोस्ट करायचा प्रयत्न आहे. इराच्या फेसबुक पेजवर कथा येण्यास खुप वेळ जातो. त्यामुळे तुम्ही साईट वरती किंवा आता अँप वरती आम्हा लेखकांचं नाव टाकुन सर्च केल्यावर कथेचे भाग पोस्ट केले आहेत की नाही ते कळेल. तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतेय. प्रतिक्रिया खूपच कमी येत आहेत. कथेबद्दल काही सूचना असल्यास बिनधास्त कळवा. तुमच्या प्रमाणेच मला देखील वाचनाची आवड आहे. मी वाचलेल्या पुस्तकांची नावे तुमच्यासाठी सांगत जाईन.

आजचे पुस्तक - अवचित होता भेट तुझी
लेखक शोभा राऊत.

© ® सायली विवेक