तू तर चाफेकळी - भाग 13

Love Story

तू तर चाफेकळी - भाग 13

" गुड मॉर्निंग आयुडी...." अंजु मिटल्या डोळ्यांनीच किचनमध्ये काम करणाऱ्या आईच्या गळ्यात पडली.


" गुड मॉर्निंग......" आईने तिला कुरवाळले. " काय आज प्रेम व्हावतंय आईवरच... " आईनं विचारलं." काय गं.... मला कंटाळा आलाय आज ऑफिसला जायचा.... " ती तशीच आईला पाठीमागून मिठी मारून होती." का गं...? बरं वाटत नाहीये का बाळा....?? " आईने हातातल्या पोळ्या करायच्या बाजूला ठेवल्या आणि तिच्या कपाळावर हात लावून बघितलं." नाही. ताप नाहीये. पण नको वाटतंय.. " तिचं तोंड एवढुस झालं." बरं नको जाऊ. जा तोंड धुवून ये. गरम गरम तूप पोळी खा. बर वाटेल तुला.. " आईने तिची समजूत घातली.


थोड्या वेळाने अंजु आवरून आली. तेव्हा अमेय ऑफिसला निघतच होता. अंजु आळसवल्यासारखी सोफ्यावर बसुन होती." काय ग ठके. आज कामं नाहीत का तुला...?? " हाताची बाही फोल्ड करता करता तो म्हणाला." कंटाळा आलाय मला. तू जा रे. नको डोकं खाऊ. " ती करवाजली.


" बाप रे. आई आज चांगलंच तापलेलं दिसतंय सगळं. " आई नाश्ता आणत होती तिच्याकडे बघुन तो म्हणाला." अमेय , नको रे त्रास देऊ तिला. असू दे. येतो कंटाळा कधी कधी... ती आज सुट्टी टाकतेय... " आईने त्याला आणि अंजुला नाश्त्याची प्लेट दिली.


" एवढं काही झालं नाही हा अंजु.. जा उठ चल. " तो नाश्ता खात खात म्हणाला." खूप वर्कलोड झालाय रे या आठवड्यात. आज त्राणच वाटत नाहीयेत मला. प्लिज फोर्स नको करू.... " तिने मानेवरून हात फिरवला. तीही थोडं थोडं खाऊ लागली." बरं ठीक आहे. आई , बाबा कुठे गेलेत.....? दिसत नाहीत. " त्याने विचारलं


" बाबांना आज सकाळीच राऊत काकांचा फोन आलेला. त्यांचे सगळे मित्र भेटणार आहेत आज. त्यामुळे बाबा लवकर आवरून त्यांच्याकडेच गेलेत. उशीर झाला तर आज राहतील सुद्धा... " आईने सांगितलं." वा मजा आहे बाबांची.... " त्याने नाश्त्याची प्लेट खाली ठेवली. पाणी प्याला आणि तो निघाला. " आई येतो मी..." तो दरवाज्यापर्यंत गेला. त्याला काय वाटलं कोण जाणे तो तसाच मागे आला." आई मी पण नाही जात आज ऑफिसला. " त्याने त्याची बॅग काढुन सोफ्यावर ठेवली.


" अरे का...?? तुझं काय झालं आता...?? " आईला काळजी वाटायला लागली.


" आई मला काही नाही होते. दरवेळी बाबा त्यांच्या मित्रांना भेटायला जातात तेव्हा मजा करतात. मी नि अंजु पण बाहेर जातो. पण तुला कुठेच जायला मिळत नाही. सो आज आपण तिघे मजा करणार आहोत.... " अमेयने सांगितलं तसा अंजुचा देखील चेहरा उजळला." चालेल मज्जा.... " अंजु म्हणाली


" माझं काय आता मध्येच.... तुम्ही जा जायचं तर... अंजुलाच घेऊन जा कुठेतरी. ती कंटाळलेय... " आई हसली.


" फक्त अंजु नाही आई. आज तुला पण घेऊन जाणारोत आम्ही.. आई तू शेवटचं तुझ्या मैत्रिणींना कधी भेटलीस आठवतंय का....?? " अमेय" अरे काय... का मारतोयस सगळ्यांना..... " आई जोरात हसली.


" आई नको ते जोक मारू नको. सांग ना. आमच्यासारखं तुमची भेट होतच नसेल ना...?? " अंजु


" तेच ना. मागे तुम्ही लहान असताना गेले होते घरी तेव्हा एकदा मीना भेटलेली. मग तुम्ही मोठे झालात नि बाबांच्या पण सारख्या बदल्या त्यामुळे कुठे जाणच जमलं नाही. " आई म्हणाली" येस मातोश्री... म्हणुनच आज आपण मस्त एन्जॉय करणार आहोत. आजच अस नाही आता जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आपण धमाल करायची.. काय ग ठके बरोबर ना...?? " अमेयने हलकेच अंजूचं नाक ओढलं.


" आ.... दादा...... " ती त्याला मारायला धावली. तो देखील मग पळाला. त्याची पकडापकडी बघुन आई खूप हसत होती.


" आई तू नाश्ता केला नसशीलच..... हो ना... ? " आईने मान हलवली." आई तू मस्तपैकी नाश्ता कर. तोपर्यंत आम्ही जरा आजच छान प्लॅनिंग करतो. चलो कॅप्टन.... " अमेयच्या खांद्यावर हात टाकत अंजु त्याला घेऊन गेली. आई मात्र त्यांच्या अशा गमतीजमतीला बघुन हसत होती.

...................................

अंजु आणि अमेयने आपापल्या ऑफिसला येणार नसल्यास कळवलं. अमेयने अंजुच्या कानात काहीतरी सांगितलं आणि ती त्या तयारीला लागली. आईचं खाऊन होईपर्यंत अमेय नि अंजु खाली आले. आईसाठी त्याने 3 मुव्ही डाउनलोड करून घेतल्या.


" आई.... आई काय करतेस....?? " अमेय नि अंजु मोठ्याने हाक मारत होते." किती ओरडताय... " तिने कानावर हात घेतले.


" काय करतेस तू स्वयंपाकघरात..... ? " अंजु


" दुपारच्या जेवणाची तयारी करत होते..... " आई


" अजिबात नाही. आज तू काहीही करायचं नाहीस.... ये बस इथे.... " अंजु जवळजवळ ओढतच आईला हॉल मध्ये घेऊन आली आणि तिला सोफ्यावर आणुन बसवलं." अरे......... अरे पण काय चाललंय काय तुमचं.... ?? जेवण नको का करायला. तुमच्या आवडीचं करते मस्त..... " ती नको नको म्हणत होती." आई आज तुला सुट्टी.. आज तू काहीही करायचं नाहीस.. हे बघ मी तुझ्यासाठी पिक्चर लोड करून आणलेत. हे माँसाहेब आपके पास 3 ऑप्शन है । 1. सीता और गीता 2. अमर अकबर अँथनी 3. मि. इंडिया. तो बताओ आप कोनसा मुव्ही देखना चाहोगी । " शेवटच वाक्य अमेय अमिताभ बच्चनच्या स्टाईल मध्ये म्हणाला." ऑप्शन 2. अमर अकबर अँथनी.... " आई त्याच्याच स्टाईलने म्हणाली आणि तिघेही हसले.

अमेयने मग टीव्हीला पेनड्राईव्ह कनेक्ट केला आणि तिघेही आरामात बसुन फिल्म बघत होते.

..............................

इकडे अबिर लवकरच ऑफिसला आला. काल पाहिलेल्या प्रकाराबद्दल त्याला अंजुशी बोलायचं होतं. कारण आता लवकरात लवकर काहीतरी ठोस पाऊल उचलणं गरजेचं होतं. पुढच्या आठवड्यात मेहता कंपनीमध्ये प्रेझेन्टेशनसाठी जायचं होतं. त्याआधी काही झालं तर कंपनीच खूप मोठं नुकसान झालं असतं. अबिर आपल्या डेस्कवर येऊन काम करू लागला. हळूहळू ऑफिसमधील बाकी स्टाफ पण आला. पण अंजुचा काही पत्ता नव्हता. अबिर पीसीवर काम करत होता पण त्याच अर्ध लक्ष इन्ट्रान्सवर होतं. अंजु कधी येतेय त्याचीच तो वाट बघत होता. बराच वेळ गेला तस त्याची अस्वस्थता वाढू लागली. काहीतरी फाईल घेण्याच्या निमित्ताने तो बाकीच्याजवळ गेला.


" काय राकेश काय चाललंय..... ? " अबिरने सहज दाखवल्यासारखं विचारलं." अरे सेल्स ऑर्डर बघतोय. तुझं काय चाललंय ? झालं का प्रेझेन्टेशन.... ?? " राकेशने काम करता करता विचारलं" अरे नाही ना. आज मिस अंजली आल्या नाहीत ना. त्यांच्याशी थोडं डिस्कस करायचं होतं. आता थोडेच दिवस राहिलेत. " अबिर" अरे आज अंजु येणार नाहीये. तुला कळवलं नाही का तिने ....?? " त्यांचं बोलणं ऐकल्यावर सीमा बोलली." हो का.. मला काहीच माहीत नाही. कदाचित मॅनेजर सरांना अप्लिकेशन पाठवुन ठेवलं असेल त्यांनी.... " अबिर" कमाल आहे अंजुची. तुम्ही आता एका प्रोजेक्टवर काम करता म्हटल्यावर तिने तुला सांगायला हवं होतं... " मध्येच मितू म्हणाली." असो. नसेल लक्षात आलं त्यांच्या.... बाकी काय मग... " मग जरा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून तो आपल्या टेबलवर आला.\" साधं मला कळवावसं पण वाटलं नाही का हिला...? का सांगावं तिने तरी...?? परवा आपण नव्हतो तेव्हा किती काळजीने विचारायला आली होती ती. नि आपण मात्र नको त्या व्यक्तीचा राग तिच्यावर काढला..शीट. माझीच चूक आहे सगळी. पण आज आली का नसेल अंजली...?? बरं नसेल का तिला ?? कसं कळणार पण आपल्याला. फोन करू का...?? नको ती घेणार नाही. रात्री मेसेज करू \" अबिरच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं होतं.

.............................................

तीन तास मस्तपैकी पिक्चर बघून तिघेही उठले. आई उठली जवळजवळ एक वाजत आला. तरी आज जेवणाचा पत्ता नाही ते बघुन आई उठली नि किचनकडे वळली.


" माँसाहेब , कुठे जाताय आपण...?? " अमेयने तिला अडवलं.

" अरे एक वाजला काहितरी करते. तुम्हाला भूक लागली असेल ना.... सोड मला जाऊ दे...." आई


" अजिबात नाही. सगळं जेवण बाहेरून मागवलेलं आहे. थोड्याच वेळात येईल. मी नि अंजु तयारी करतो. तोपर्यंत तू इथेच बसायचं. हलायचं नाही अजिबात इथुन... " अमेयने आईला आणुन सोफ्यावर बसवलं.


अमेय नि अंजुने पान मांडली. पाणी घेतलं. तोपर्यंत ओर्डर केलेलं जेवण पण आलं. आईच्या आवडीचा मेनू होता. पनीर मसाला , रोटी आणि सोबत व्हेज बिर्याणी.. आई फार खुश झाली सगळं बघुन. मग अंजुने तिघांना व्यवस्थित वाढुन घेतलं. तिने रोटीचा एक तुकडा मोडला आणि पनीरच्या भाजीत मिसळुन आई समोर धरला.


" आता हे काय...?? मी लहान आहे का...? " आई गोड हसली.


" नाही. पण आम्ही लहान असताना तू आम्हाला भरवायचीस ना..!! मग आज आम्ही तुला भरवतो. घे एक घास चिऊचा..... " अंजुने प्रेमाने आईला भरवलं." आणि एक घास माऊचा....... " दुसऱ्या बाजूने अमेयने पण तिला घास भरवला. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आनंदाचं...!!! शब्दात देखील वर्णन करता येणार नाही इतक्या भावना दाटल्या होत्या त्यात... !!! तिने आवडीने दोघांच्याही हातचं खाल्लं.


थोड्या वेळाने त्यांनी आईला झोपायला पाठवलं. ती गेली तशी अंजु नि अमेयची खालच्या आवाजात खलबतं सुरू झाली. चारच्या दरम्यान त्यांनी आईला उठवलं. अंजुने सगळी तयारी करून ठेवली होती.

" अंजु काय.... काय चालवलंय तुम्ही दोघांनी.... " आईचं कोणीच काही ऐकत नव्हतं." आई तू शांत बस बघु इथे...... " तिने आईच्या हातात एक छानसा टॉप आणि त्यावर सूट होईल अशी लेगीन घालायला दिली." मी नाही घालणार असलं काही..... मी साडी नेसून येते ना पटकन.... हे असलं घालुन मी नाही बाहेर येणार.... " आईची घाबरगुंडीच उडाली." नो वे.. आई अग घालून तर बघ. तुला नाही आवडला तर मी फोर्स करणार नाही. प्रॉमिस. " अंजुशेवटी हो नाही करता आईने तो ड्रेस अंगावर चढवला. खरंतर अंजुने तो स्वतःसाठी मागवला होता. पण आयत्या वेळी कुठून ड्रेस आणणार अस झालं नि मुद्दाम बाहेर जाऊन खरेदी केली असती तर आई ओरडली असती कशाला पैसे खर्च केले म्हणुन. थोड्या वाढत्या मापाचा ड्रेस असावा असं आई नेहमी सांगायची. आणि त्यामुळेच अंजुने आणलेला ड्रेस आईला अगदी छान दिसत होता.

" वा आई कसली भारी दिसतेयस..... बाबांनी तुला असं बघितलं ना तर फ्लॅटच होतील ते.... " अमेय आत येत म्हणाला." गप रे. आधीच मला कसंतरी होतय यात. सवय नाही ना मला....." आई अंग चोरत म्हणाली." आई तुला नको असेल तर नको घालू. आम्ही रागावणार नाही. पण तुला ज्या गोष्टी आमच्या वयाच्या असताना मिळाल्या नाहीत ना त्या आम्ही थोड्या प्रमाणात तुला देण्याचा प्रयत्न करतोय.... " अंजु.

आईला भरून आलं. तिने मायेने दोघांच्याही चेहऱ्यावरून हात फिरवला. थोड्याच वेळात हे त्रिकुट भटकायला बाहेर पडलं. तुळशीबागेत जाऊन थोडी खरेदी झाली. मग थोडी भाजी घेतली आणि मग सगळे खाण्याकडे वळले. निवांतपणे सारसबागेत जाऊन भेळ खाऊन झाली. तरीही काही पोट भरलं नाही. सो मग त्यांची स्वारी पाणीपुरीच्या ठेल्यावर आली. सगळीकडे भटकुन ते अंजुच्या ऑफिसजवळच्या एरियात आले होते. तिथे पाणीपुरी छान मिळायची. पण अंजुच्या ते काही लक्षातच आलं नाही. ती मस्तपैकी स्वतः पाणीपुरी खात होती आणि आईला पण खाऊ घालत होती. अंजूचं ऑफिस सुटलं होतं. बऱ्यापैकी स्टाफ निघून गेला होता. अबिरच आज कशातच लक्ष नव्हतं. काल आपण नकळत का होईना अंजुला दुखावलं याचं त्याला वाईट वाटतं होतं. सगळे गेल्यावर तोही आपलं आवरून बाहेर पडला. थोडं अंतर चालून जातो तोच त्याला अंजु दिसली. आधी त्याला विश्वासच बसेना. त्याने मग थोडं पुढे जाऊन पाहिलं. हो , अंजूचं होती ती.. !! आईला पाणीपुरी कशी खायची याचं ट्रेंनिग देत होत्या मॅडम. शाळेला दांड्या मारून लहान मुलं फिरतात तशी ऑफिसला दांड्या मारून ही मजा मारतेय. आज मला महत्वाचं बोलायचं होतं हिच्याशी. नि ही इकडे मस्त मजेत आहे..त्याला आता अंजुचा राग येऊ लागला. तो निघतच होता की अंजूचं त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याने एक जळजळीत कटाक्ष अंजूकडे टाकला आणि तो निघुन गेला.


क्रमशः...

पार्ट टाकायला खुपच उशीर होतोय मला कल्पना आहे. पण सध्या पाऊस आणि त्यामुळे लाईट जाणे हा प्रकार असतो. रेंज प्रॉब्लेम अशा सगळ्याच अडचणी येत राहतात. सॉरी हा. पुढील भाग 9 जुलै ला रात्री पोस्ट होईल.

◆आजचे पुस्तक ◆
\" द दा विंची कोड \"
या पुस्तकाचे लेखक मला आठवत नाहीयेत. हे पुस्तक मराठीत अनुवादित आहे. ते मिळाल्यास नक्की वाचा.

© ® सायली विवेक

🎭 Series Post

View all