Feb 24, 2024
प्रेम

तू तर चाफेकळी - भाग 16

Read Later
तू तर चाफेकळी - भाग 16


( " काय झालंय सर....?? माझ्या पीसीवर काय करतायत हे...?? " अंजुने विचारलं.
" मिस अंजली , तुम्ही तयार केलेलं प्रेझेंटेशन आणि टेंडरची फाईल दोन्ही गायब आहेत. " मॅनेजर सर म्हणाले आणि शॉक लागावा तशी अंजु मटकन खुर्चीवर बसली. )

आता पुढे

अंजुला तर सर काय बोलतायत तेच कळेना. आय टी डिपार्टमेंटचा माणुस आपलं काम करत होता. तरीही पीसी मधुन डिलीट झालेली फाईल त्याला रिसायकल करता येत नव्हती. एव्हाना ऑफिस मधील सगळ्यांच्याच कानावर ही बातमी गेली होती. प्रत्येकाच्या तोंडी एकच विषय. अंजु आपल्या खुर्चीत शांत बसुन होती." अंजु... हे धर पाणी....." सीमाने तिला पाणी आणुन दिल तशी ती घाबरून गटागटा पाणी प्याली." सर.... सर मी काहीही केलं नाही. ही फाईल कशी गायब झाली मला खरंच काही माहीत नाही.... " अंजु सरांजवळ येत म्हणाली. तिचा चेहरा पण रडवेला झाला होता." हे बघा.. मिस अंजली.. तुम्ही आधी शांत व्हा. तुम्हाला कोणीही दोष देत नाहीये. पण झाल्या प्रकाराची चौकशी ही करावीच लागेल... " मॅनेजर सर म्हणाले.
" अबिर.... अरे तू बोल ना काहीतरी.. आपण किती मेहनतीने केलं होतं सगळं प्रेझेंटेशन. आता फक्त उद्याचा एकच दिवस उरलाय... काय करायचं आपण...?? " ती अबिरला म्हणाली. तसा अबिर उठला.
" सर आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे... " त्याने नजरेनेच अंजुला खुणावलं." माझ्या केबिन मध्ये बसुन बोलूया...... " मॅनेजर सरांच्या मागोमाग अंजु आणि अबिर देखील आत गेले. ते आत गेल्यानंतर बराच वेळ बाहेर कुजबुज चालूच होती.
" मि अबिर हे काय आहे सगळं....?? तुमच्या दोघांवर रिस्पॉन्सीबिलिटी होती त्या डॉक्युमेंटची. तुमच्याकडे होतं ते प्रोजेक्ट.. काही कळतंय का....?? " सर चिडले होते.
" सर सॉरी... पण आम्ही सगळं नीट चेक करूनच बाहेर जायचो. माझ्या नि अबिरच्या दोघांच्याही पीसीला लॉक आहे... " अंजु रडायला आली.
" सर खरंच आम्ही काही केलेलं नाही.... पण सर आपल्या ऑफिसमध्ये काही गोष्टी घडत होत्या.... " अबिर नि अंजुने त्यांना आत्तापर्यंत त्यांना संशयास्पद वाटणाऱ्या सर्व गोष्टी सांगितल्या.
" whatt....??? हे..... हे सगळं घडतंय आपल्या कंपनीत नि आपल्याला साधी कल्पना देखील नाही...? तुम्ही हे आधी का नाही सांगितलं मला.... की हे सगळं होण्याची वाट बघत होता...??? " मॅनेजर सरांनी रागाने विचारलं.
" सॉरी सर.. पण आमच्याजवळ काहीच पुरावे नव्हते. त्यामुळे अबिर म्हणाला आत्ता सांगुन कोणीच आपल्यावर विश्वास ठेवणार नाही.... " अंजु
" छान... अरे हे ऑफिस आहे का घर....?? चुकीच्या घडणाऱ्या गोष्टीना पाठिंबा देणारी लोकही तितकीच चुकीची असतात.. आजपर्यंत आपल्या ऑफिसमध्ये असं कधीही घडलं नाही.... " मॅनेजर सर" सर.... तुम्हाला काय म्हणायचंय....?? हे सगळं आम्ही..... " अबिरचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अंजु बोलायला लागली. तिला त्याचं त्या दिवशीच फोनवरच बोलणं आठवत होतं. ती बॉटल विसरली म्हणून परत आली होती तेव्हा अबिर कॅफेटेरियात कोणाशीतरी फोनवर बोलत होता.
" अबिर.... हे .... हे सगळं तू तर नाही ना केलंस....?? " अंजुच्या चेहऱ्यावर देखील राग दिसत होता." What....?? Anjali are you out of your mind... ?? तुला कळतंय का तू काय बडबडतेस ते...?? " अबिर ओरडला." हो. मला चांगलंच कळतंय. त्या दिवशी मी तुझं फोनवरचं बोलणं ऐकलं तू कोणालातरी सांगत होतास माझं इथलं काम झाल्याशिवाय मी परत येणार नाही.. हे तर नव्हतं ना तुझं काम...?? " अंजली." What rubbish...... मी ..?? मी का करू हे....?? " अबिर देखील आता चिडला होता." पैशासाठी... माणूस पैशासाठी वाट्टेल त्या थराला जाऊ शकतो.... " अंजु आता रागाने ओरडत होती. तिचा आवाज बाहेर जायला लागला तसा बाकीचा स्टाफ देखील हळूहळू केबिनबाहेर जमा व्हायला लागला. अबिरने त्यांच्याकडे पाहिले आणि त्याला अंजुचा अजूनच राग येऊ लागला." मिस अंजली.... तुझी हिंमत कशी झाली माझ्याबद्दल असं बोलायची...?? काय पुरावा आहे तुझ्याकडे....?? " अबिरचा देखील आता स्वर उंचावला.
" तुम्ही दोघे प्लिज शांत व्हा. असं भांडुन काहिही होणार नाहीये. आपल्याला सध्या हे कोणी केलं याहीपेक्षा परवाच्या कॉन्फरन्सला कसं तोंड द्यायचं ते बघायला हवं. प्रेझेंटेशन सबमिट केलं नाही तर किती नाव जाईल कंपनीच. आधीच आपण लॉस मध्ये आहोत. त्यात अजुन नाव खराब व्हायला नको.... " मॅनेजर सर बोलले.
" सर ज्या ज्या वेळी मला संशय आला त्या त्या वेळी अबिर तिथे आसपासच होता.... " अंजली" मी या ऑफिसमध्ये काम करतो म्हणजे मी इथेच असणार ना... यावरून मी काही केलंय हे सिद्ध होत नाही.... " अबिर
" तुम्ही प्लिज शांत व्हा..... असे एकमेकांवर आरोप करून काय साध्य होणार आहे...?? " मॅनेजर सरांनी बोलत बोलत केबिनबाहेरच्या स्टाफला नजरेनेच दटावल. तसे ते आपल्या कामाला निघुन गेले.


त्यानंतर बराच वेळ सरांच्या केबिनमध्ये ते तिघे बोलत होते. मग अंजु आणि अबिर दोघेही बाहेर आले नि आपापल्या कामाला लागले. ऑफिसमध्ये अजूनही हळूहळू झालेल्या प्रकाराबद्दल कुजबुज सुरू होती.. अंजुला तर काय करावं तेच कळत नव्हतं. ऑफिस सुटलं तशी ती घरी परतली.

................................

अंजु घरी आली पण तिचा मूड ऑफ होता. ऑफिसमध्ये आज इतकं सगळं जे झालं होतं. आईने तिला पाणी आणुन दिलं." काय गं अंजु....? बरं वाटत नाहीये का..?? तोंड का उतरलय ? " आईने काळजीने विचारलं" आई मी बरी आहे. दमलेय खूप. मी जरा वरती जाऊन पडते..... "असं म्हणुन अंजु आपल्या खोलीत गेली.आईला पण तिचं उतरलेला चेहरा सगळं काही सांगुन गेला. पण तिने जास्त विचारायचं टाळलं. थोड्या वेळाने अमेय देखील ऑफिसमधून आला. आईने त्याला चहा दिला. पण अंजुच्या काळजीने तिचंही कशात लक्ष लागेना." आई , काय झालंय....?? " अमेयने चहा पिता पिता विचारलंच." अंजु रे... आत्ताच आली ऑफिसमधून पण काहीच बोलली नाही. काहीतरी झालंय एवढं नक्की.. मला तर काही सांगितलं नाही.... " आई काळजीने म्हणाली.
" बरं मी बघतो तिच्याशी बोलून.. तू नको काळजी करू. " अमेय वरती तिच्या खोलीत गेला.


लाईट न लावता अंजु तशीच अंधारात पडुन होती. झोपली नव्हती. कारण या परिस्थितीत तिला झोप लावणं शक्यच नव्हतं. अमेयने रूम मधला लाईट लावला. तशी ती दचकली." अंजु..... काय गं...?? काय झालं इतकं दचकायला...? आणि इतका घाम का आलाय तुला...? " अमेयने आपल्या रुमालाने तिचा घाम टिपला. ती उठुन बसली.
" नाही. काही नाही... जरा कणकण वाटतेय. थोडा वेळ झोपलं की बरं वाटलं.... " अंजु" अंजु... खरंच काही झालेलं नाही...?? आई पण काळजी करतेय... " अमेय" दादा... आज ऑफिसमध्ये खूप काही घडलंय... " असं म्हणुन अंजुने त्याला सगळं सांगितलं. त्याला देखील धक्का बसला. कारण जरी यात अंजुची काही चूक नसली तरी प्रत्येकाची चौकशी होणारच होती. अंजुला त्याचंच टेन्शन आलं होतं." हे बघ अंजु. तू शांत हो आधी. अग तू काय केलंच नाहीस तर घाबरायचं कारणच काय...?? कर नाही त्याला डर कशाला...? तुझ्या एकटीवर काहीही येणार नाही. अबिरही होताच की तुझ्यासोबत प्रोजेक्ट मध्ये. त्यामुळे तू शांत हो. अशी झोपून राहिलीस तर आई अजुन काळजी करत राहील. चल उठ.... " अमेय तिला उठवत होता." दादा नको ना प्लिज.. मला खरंच कंटाळा आलाय....." अंजु पुन्हा झोपायचा प्रयत्न करत होती." अजिबात नाही. एवढं काही झालेलं नाही. उठ गप... चल खाली. जेऊया मस्त... आईला तुझ्यासाठी मस्त मऊभात करायला सांगितलाय मी. खा थोडं बरं वाटलं तुला... " अमेयने जबरदस्ती तिला उठवले आणि खाली आणले.आईने टेबलवर जेवणाची तयारी करून ठेवली होती. अमेयने तिला आणुन खुर्चीत बसवलं. अंजुला तर नुसती मरगळी आली होती. आईने तेवढ्यात गरम गरम मऊभात ताटात वाढला... त्यावर लोणकढ तूप.... मेतकूट.... आणि लिंबाचं लोणचं.... सगळं बघुनच अंजुला छान वाटलं. दोन घास पोटात गेल्यावर तिला जरा तरतरी आली." अंजु.... तुझ्यासाठी एक गंमत आणलेय मी...." असं म्हणुन बाबांनी तिच्यासमोर एक डबा ठेवला." काय आहे यात.....?? " तिने उत्सुकतेने विचारलं.


" तूच बघ उघडुन....." बाबा म्हणाले तसं अंजुने घाईघाईने डबा उघडला. तिच्या आवडीचे गुलाबजाम होते त्यात..!! तिने तसाच एक गुलाबजाम चिमटीत पकडून तोंडात टाकला.
" आमच्यासाठी नाही आणत कोणी काय.... कितीही झालं तरी शेंडेफळच लाडकं असतं सगळ्यांच.... " अमेय रागावला." हे घे... ललू नको हा... खा... " अंजुने त्याला पण एक गुलाबजाम भरवला. तशी त्याची कळी खुलली." हावरटे.... जास्त खाऊ नको. घराची दारं मोठी करायला लागतील.... " कारण अजून एक गुलाबजाम अंजुच्या पोटात चालला होता." गप तू... बाबांनी माझ्यासाठी आणलेयत... हो ना बाबा...?? " अंजु खुशीत म्हणाली." हो हो... खा तू नि त्याला पण दे... " बाबा समाधानाने हसले. तसं अमेयने डोळ्यांनीच आईला आश्वस्त केलं. अंजुची गाडी आता रुळावर आली होती.

........................................


अबिरच डोकं मात्र शांत होत नव्हतं. राहून राहून त्याला सकाळी अंजु त्याला जे बोलली तेच आठवत होतं. \" तिची हिम्मत कशी झाली मला अस बोलायची....?? मी सोडणार नाही तिला....\" रागाने तो फेऱ्या मारत होता. पण त्याचवेळी त्याच घड्याळाकडे सुद्धा लक्ष होतं. आज अबिर ऑफिसमध्येच होता. आज नक्की काहीतरी घडणार याची त्याला खात्री होती. त्यामुळे ऑफिस सुटल्यावर कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने तो वरच्या मजल्यावर जाऊन लपला होता. त्याला अंजुचा प्रचंड राग येत होता तरीही स्वतःला कसंतरी कंट्रोल ठेवून तो होणाऱ्या गोष्टींकडे आपलं मन वळवत होता. त्याला खात्री होती आज डॉक्युमेंट गायब झालेत त्यामुळे आजच उरलेले पैसे द्यायला ती व्यक्ती येईल. थोडा वेळ तो तिथेच बसून राहिला. पण खालच्या मजल्यावर कोणीच आलं नाही. तो कंटाळला. जवळजवळ रात्रीचे दहा वाजायला आले होते. तरीही कोण आलं नव्हतं. शेवटी तो जायला निघाला. वॉचमनला आधीच कल्पना असल्याने त्याने मेन डोअर ओपन ठेवला होता. अबिर बाहेर पडला आणि त्याने वॉचमनला डोअर लॉक करायला सांगितलं. अबिर दोन एक पावलं पुढे गेला तोच त्याला गेट मधुन कोणाची तरी गाडी आत येताना दिसली. तसा तो बाजूच्या झाडीत लपला. गाडी पार्किंग लॉटच्या दिशेने गेली. एवढ्या रात्री कोण आलं असेल...?? ही तर ऑफिसचीच गाडी आहे. तो मग दुसऱ्या बाजूने पार्किंग लॉटमध्ये पोहोचला. एका दाराआड लपून राहिला. मगाशी आलेल्या गाडीतून एक व्यक्ती खाली उतरली. तसा अबिरला धक्काच बसला. पार्किंग मध्ये दुसऱ्या दोन व्यक्ती आधीच त्यांची वाट बघत तिथे उभ्या होत्या" हम्म ही घ्या तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती या पेनड्राइव्ह मध्ये आहे. " गाडीतून आलेल्या व्यक्तीने पेनड्राइव्ह त्यांच्याकडे देत म्हटलं." खूप मोठं काम केलंय तुम्ही आमचं. आधीसारखच. म्हणून बॉसनी यावेळी खुश होऊन तुमच्यासाठी खास भेट पाठवली आहे.... " दोनपैकी एका व्यक्तीने त्यांच्या हातात एक बॉक्स दिला आणि एक पैशाने भरलेलं इनवोलप दिलं." अहो , याची काय गरज होती... तुमच्या साहेबांना सांगा लवकरच ही कंपनी बंद होणार आहे म्हणून.... " ती व्यक्ती मोठ्याने हसली. त्यात इतर दोघेही सामील झाले.


थोड्या वेळाने तिघेही निघुन गेले. पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्यांचं बोलणं लांबूनच कोणीतरी शूट करत होतं.आता फक्त प्रतीक्षा होती ती उद्याची....!!


क्रमशः.....


भाग कदाचित खूप छोटा वाटेल तुम्हाला. पण मनासारखं लिहूनच होत नव्हतं. त्यामुळे भाग पोस्ट करायला उशीर झाला.   गोष्ट तयार असली तरी कागदावर उतरवताना त्यात अनेक गोष्टी बदलत जातात..पण इथून पुढचे भाग तुमच्या उत्सुकता वाढवणारे असतील हे निश्चित..
© ® सायली विवेक


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//